एक अकेला इस शहरमें.... 

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी एक ‘रेडी टू असेम्बल’ असं बुकशेल्फ खरेदी केलं होतं. त्याची जोडणी करायला कंपनी माणूस पाठवणार होती. तो मला फोन करून वेळ विचारून आला. काम झाल्यावर जाताना म्हणाला, ‘मॅडम मी तुम्हाला मिसकॉल देतो. तुम्ही फोन उचलू नका.’ म्हटलं ‘का बुवा?’ तर म्हणाला, ‘मला तुमची कॉलर ट्यून कॉपी करायची आहे! खूप मस्त आहे.’ मी जाम खुश झाले. माझी कॉलर ट्यून होती (अजूनही तीच आहे) ‘ये दिल और उनकी निगाहोंके साये..’ का कोण जाणे, संगीतकार जयदेवांची गाणी आवडणारे लोक मला माझ्यासारखेच वाटतात.. आपले वाटतात. 

संगीतकार जयदेव यांचा जन्म नैरोबी येथे ३ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. नंतर लुधियाना इथं वास्तव्य. पण चित्रपटात काम करण्याच्या वेडानं दोनदा ते मुंबईला पळून आले. दोन्ही वेळा त्यांना घरगुती अडचणींमुळं लुधियानाला परत जावं लागलं. वडिलांचं आजारपण, मृत्यू यामध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. बहिणीचं लग्न करून देईपर्यंत त्यांनी ती व्यवस्थित पारही पाडली. मग मात्र प्रख्यात सरोदिये उस्ताद अली अकबरखां यांच्याकडं संगीत शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला अली अकबरखां यांच्याकडं आणि नंतर एस. डी. बर्मन यांच्याकडं जयदेव संगीत सहाय्यक म्हणून काम करू लागले. हे दोघंही त्यावेळी ‘नवकेतन फिल्म्स’साठी संगीत देत होते. ‘नवकेतन’नंच जयदेवना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिला सुपरहिट चित्रपट दिला - हम दोनो! सुपरस्टार देव आनंदचा डबल रोल, साधना, नंदासारख्या नायिका, दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेली सुंदर कथा, साहिरची गाणी आणि जयदेवचं संगीत असं सगळं छान जुळून आलेलं रसायन होतं ते. ‘प्यासा’नंतर साहिर - एसडी एकत्र आले नाहीत, कदाचित त्यामुळं हा चित्रपट जयदेव यांच्याकडं आला असावा.. आणि जयदेव यांनी साहिरच्या काव्याला चार चांद लावले. ‘कभी खुदपे कभी हालातपे रोना आया’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘जहांमे ऐसा कौन है’, ‘प्रभू तेरो नाम’ या सुंदर गाण्यांबरोबर आणखी दोन खास गाणी आहेत ‘हम दोनो’मध्ये. रफी - आशाचं ‘अभी ना जाओ छोडकर’ हे अतिशय रोमँटिक द्वंद्वगीत त्यावेळी तरुणाईनं लगेच उचलून धरलं आणि दुसरं - हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात प्रसिद्ध, ‘माईल स्टोन’ म्हणता येईल असं भजन, ‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम..’ शांतरसाचा परिपाक आहे या गाण्याची रचना. ऐकायला जितकी साधी वाटते, तशी ती रचना नाही. ते एकाचवेळी सामान्यांना आणि जाणकारांना मोहवणारं गाणं आहे. खुद्द अनिल विश्वास म्हणाले होते, की ‘अल्ला तेरो नाम’सारखं कम्पोझिशन मला कधी सुचलं नसतं! 

पण इतकी सुरेख गाणी देऊन, चित्रपट सुपरहिट होऊनही देव आणि चेतन या दोन्ही आनंद बंधूंनी जयदेवना पुन्हा काम दिलं नाही. (चेतन आनंदचं दिग्दर्शन असलेला ‘किनारे किनारे’ १९६३ मध्ये आला, पण त्याची निर्मिती ‘नवकेतन’ची नव्हती) पडद्यामागच्या राजकारणात जयदेव, मदनमोहन यासारखे प्रतिभावान पिचले, मनानं खचले; पण जेव्हाजेव्हा संधी मिळाली, तेव्हातेव्हा स्वतःला सिद्ध करत राहिले. आपल्याला या पडद्यामागच्या कहाण्या सांगोवांगी कळलेल्या असतात, त्यामुळं तिथं दुर्लक्ष करून त्या कलाकाराचं फक्त काम बघावं. 

लतानं तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, ‘सलिल चौधरी, मदनमोहन आणि जयदेव यांच्या रचना गाताना त्यांना न्याय देता आला याचं मला खूप समाधान आहे. जयदेव यांच्या कठीण चाली गाणं आव्हान असायचं. त्यांचं राग संगीताचं ज्ञान सखोल होतं. मला गाणं एकदा समजावून सांगितलं, की जयदेवजी निर्धास्त असत.’ समसमा संयोग म्हणतात तो असा! ‘तू चंदा मैं चाँदनी’, ‘रात भी है कुछ भिगी भिगी’, ‘तुम्हे देखती हूँ’, ‘ये दिल और उनकी’, ‘ये नीर कहांसे बरसे है’, ‘अल्ला तेरो नाम’, ‘संसार के सब सुख तेरे’... ही गाणी फक्त जयदेवांच्या नाही, तर लताच्या देदीप्यमान साम्राज्यालासुद्धा झगमगतं तोरण लावतात. जयदेव यांनी ‘माटीघर’ नावाच्या नेपाळी चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्यातलं एक गाणं नेपाळ नरेश राजा बिरेन्द्र यांनी लिहिलेलं होतं. ते गाणं लताच्या अत्यंत कठीण गाण्यांपैकी एक आहे म्हणे! 

गायकांमधलं वैविध्य हे जयदेव यांचं वैशिष्ट्यं. लता, रफी, आशा, तलत, मन्ना डे यांच्याबरोबर सुरेल काम झालं आहेच; पण अगदी भीमसेनजी, परवीन सुलताना, छाया गांगुली, येसुदास, भूपेंद्र, रुना लैला, हरिहरन, पिनाझ मसानी यांच्याबरोबरसुद्धा खूप सुंदर गाणी त्यांनी केली आहेत. ‘किनारे किनारे’ चित्रपटात तर तब्बल नऊ गायकांकड़ून वेगवेगळी गाणी त्यांनी गाऊन घेतली होती. त्यातली मुकेशचे ‘जब गमे इश्क़ सताता’, तलत मेहमूदचं ‘देख ली तेरी खुदाई’, मन्ना डे यांचं ‘चले जा रहे थे किनारे किनारे’ ही गाणी मला फार आवडतात. 

कुणाचा विश्वास बसेल का, की या माणसानं फक्त ४० एक फिल्म्स केल्यात? आणि इतक्या कमी कारकिर्दीत किती विविध गीतकारांची गाणी केलीत जयदेवनी! ‘हम दोनो’ आणि ‘मुझे जीने दो’मुळं साहिरबरोबर जास्त काम केलं असं वाटतं आणि कबीर-तुलसीदास यांच्या रचना चित्रपटात चालबद्ध करायचं कठीण कामही! (चित्रपट - अनकही). 

जांनिसार अख्तर (ये दिल और उनकी), शेहरैयार (सीनेमे जलन), गुलजार (घरौंदा), नक्श लायलपुरी (तुम्हे हो ना हो), न्याय शर्मा (जब गमे इश्क़ सताता/देख ली तेरी खुदाई), मकदूम मोईनुद्दीन (आपकी याद आती रही), कैफ़ी आझमी (पीतल की मोरी घागरी), हरिवंशराय बच्चन (कोई गाता मैं सो जाता).... किती नावं! याशिवाय गालिब, महादेवी वर्मा, माया गोविंद, जिगर मुरादाबादी यांचं काव्य गैरफिल्मी गीतांतून आपल्यासमोर आणलं ते वेगळंच! 

हरिवंशराय बच्चन यांची पूर्ण ‘मधुशाला’ त्यांनी मन्ना डेबरोबर केली आहे. फार सुंदर आहे. माझ्यासारख्या अनेकांना हिंदी अभिजात साहित्य फारसं वाचलेले नसूनही ‘मधुशाला’ आवडतं किंवा मुखोद्‍गत असतं, त्याचं श्रेय मन्ना डे आणि जयदेवांच्या समर्पक सादरीकरणाचंही! 

घरौंदा (१९७७), आलाप (१९७७), दूरियां (१९७९), तुम्हारे लिए (१९७८) आणि गमन (१९७९) हे जयदेव यांचे थोडे नंतरचे चित्रपट. वेगळे विषय म्हणून म्हणा हे चित्रपट चर्चेत तरी आले आणि त्यातलं संगीतही चाललं. ‘घरौंदा’चं संगीत तर आधुनिक बाजाचं, मोहमयी मुंबईच्या व्यक्तिमत्वाला साजेसं. अमोल पालेकर, झरीना वहाब महानगरीत राबणाऱ्या कित्येक स्वप्नाळू तरुणांचा चेहरा, तर रुना लैला, भूपेंद्र त्यांचे आवाज बनून गेले आणि ‘जीनेकी वजह कोई नही मरनेका बहाना ढूंढता है’ हे जयदेव यांचंच जणू अंतरंग.(मदनमोहन गेल्यावर जयदेवनी दिलेली प्रतिक्रिया - ‘आयुष्य संपविण्यासाठीच त्यानं मद्याचा अतिरेक केला असणार..’ स्वतः जयदेवच्या मनातील हीच खळबळ सांगून जाते.)

या पाच चित्रपटांच्या आधी आणि नंतरही जयदेव वर्षाला एखादा चित्रपट करत राहिले. एकटा जीव, एका खोलीचं घर, त्यामुळं उपजीविका भागत होती. मग ८५ मध्ये आला ‘अनकही’! अतिशय वेगळी अशी खानोलकरांची मूळ कथा, पालेकरांचं दिग्दर्शन, दीप्ती नवल, डॉ लागू यांच्यासारखे सक्षम कलाकार. पण या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं ते संगीतकार जयदेव आणि गायक पंडित भीमसेन जोशी (ठुमक ठुमक पग दुमक) यांना. तुलसीदासाचं ‘रघुबर तुमको मोरी लाज’ हे पद हा या चित्रपटाचा मानबिंदू आहे. आशानं गायलेले कबिरांचे ‘कौन ठगवा नगरिया’सुद्धा खूप सुंदर आहे. 

वर उल्लेख केलेल्या गाण्यांशिवाय ‘अब कोई गुलशन ना उजडे’, ‘मांग में भरले रंग’ (मुझे जीने दो), ‘जैसे सूरज की गरमी से’ (परिणय), ‘सीनेमे जलन’, ‘आपकी याद’ (गमन), ‘प्यास थी फिरभी तकाजा’ (मन्ना डे/आलिंगन), ‘शाम निकस गये’ (आशा भोसले/गैरफिल्मी) ही जयदेवांची काही गाणी मला फार आवडतात. 

मदनमोहन, जयदेव आणि रोशन यांची खूप मैत्री होती म्हणे. देदीप्यमान प्रतिभेचं त्यांच्या हयातीत चीज न होणं हा एक समान धागा त्यांना एकमेकांशी जोडत असावा का? विशेषतः मदनमोहन आणि जयदेव यांच्यावर ‘अपयशी चित्रपटांचे संगीतकार’ असा शिक्का उमटवणारी, रोज नव्या सूर्याला वंदन करणारी जालिम चित्रपटसृष्टी, तिला हे दोघं; ‘जिंदगीमें जब तुम्हारे गम नहीं थे, इतने तन्हा हम कभी नही थे..’ असं तर म्हणत नसतील? 

नाही म्हणायला ‘रेश्मा और शेरा’, ‘गमन’ आणि ‘अनकही’साठी तीन नॅशनल अवॉर्डस मिळालेत ही बाब जयदेवांच्या चाहत्यांना थोडी सुखवून जाते. 

खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा, Maverick म्हणता येईल असा हा गुणी संगीतकार. ६ जानेवारी १९८७ रोजी जयदेव यांचं निधन झालं. या महानगरात त्यांचं असं कुणीच नव्हतं. अक्षरशः ‘एक अकेला इस शहरमें’ असे ते आले आणि गेले. आपल्याला मात्र ‘धड़कते है दिल कितनी आजादीयोंसे’चा आनंद वाटून गेले!

संबंधित बातम्या