संगीत मनको पंख लगाए... 

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

रोजची कामं उरकताना मी एकीकडं गाणी लावून ठेवते. परवा अशीच प्लेलिस्ट ऐकताना ‘लागा चुनरीमे दाग’ लागलं. शेवटचा तराणा सुरू झाला आणि मी हातातलं काम थांबवलं. काही गाणी, त्यातल्या जागा अशा असतात, की त्या तुमचं पूर्ण लक्ष ओढून घेतातच. ‘लागा चुनरीमे दाग’चा तराणा प्रत्येक वेळी नव्यानंच ऐकल्यासारखा मी श्वास रोखून ऐकते आणि शेवटच्या तिय्यावर गाणं संपतं, तेव्हा एखादी सुरेल मैफिल ऐकल्याचं समाधान मिळतं. 

‘लागा चुनरीमे दाग’ ऐकलं की मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात. आमचं कॉलेज एकदम कडक होतं. तिथं सोशल, गॅदरिंग, संगीत-स्पर्धा यामधे प्रेमाची श्रृंगारिक गाणी म्हणायला परवानगी नसे. त्यामुळं जी काही गाणारी मंडळी असत त्यांना ठराविक लोकप्रिय देशभक्तिगीतं, भक्तिगीतं किंवा प्रबोधनात्मक अशा संस्कारी गाण्यातून निवड करायला लागे. मग जो तयारीचा गायक असे त्याच्या वाट्याला ‘लागा चुनरीमे दाग’ येई आणि एखादा उभरता गायक ‘ऐ मेरे प्यारे वतन’ म्हणून वाहवा मिळवे. (तसंही एरवीसुद्धा बघा ना, ऑर्केस्ट्रा किंवा गाण्याच्या कार्यक्रमातल्या मुख्य गायकाला त्याची तयारी किती ते दाखवायला ‘लागा चुनरीमे दाग’ किंवा रफीचं ‘मधुबन में राधिका’ म्हणायचा मोह आवरत नाहीच!) तर एकूण काय मन्ना डे या हरहुन्नरी गायकाच्या गाण्यांशिवाय आमचा कॉलेज-डे पार पडायचा नाही. 

प्रबोधचंद्र डे ऊर्फ मन्ना डे यांचा जन्म (१ मे १९१९) कलकत्त्यातल्या सुखवस्तू घरातला. काका के सी डे हे त्या काळातले प्रसिद्ध गायक, त्यांचा प्रभाव मन्ना डे यांच्यावर होता. काकांनी त्यांना गाताना ऐकलं आणि गळ्यात गाणं आहे, हे ओळखून संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढं १९४२ मध्ये कलकत्त्यातील अनेक कलाकार मुंबईला आले. के. सी. डे दृष्टिहीन असल्यानं मन्ना डे त्यांच्याबरोबर सोबत म्हणून मुंबईला आले. उस्ताद अमान अली आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं आणि काकांच्या हाताखाली साहाय्यक म्हणून कामालाही सुरुवात झाली. पुढं प्रतिभावान तरुण संगीतकार एस. डी. बर्मन यांचे साहाय्यक म्हणून काम करायची संधी मिळाली. गंमत म्हणजे १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटात के. सी. डे यांनी गायला नकार दिला म्हणून ‘तेरी अमर भावना अमर रही’ हे गाणं मन्नादांनी गायलं, पण अगदी काकांच्याच स्टाइलमध्ये. मग पुढं तशीच गाणी मिळत गेली. याचाच परिणाम म्हणून की काय, मन्नादांनी चित्रपटात वृद्धाच्या, साधूच्या तोंडी प्रबोधनपर, भक्तिगीतं किंवा देशभक्तिपर आणि आदर्शवादी अशी गाणी पुढंही अनेकदा गायलीत. खुद्द एसडींनी खास मन्ना डेंसाठीच कंपोज़ केलेलं आणि मन्ना डे यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळालेलं, ‘मशाल’ चित्रपटातील ‘उपर गगन विशाल’ हे गाणंसुद्धा त्याच प्रकाराचं आहे. टांगेवाल्याच्या मुखातून तत्त्वज्ञान सांगणारं. तरीही मन्ना डे हिंदी चित्रपटसृष्टीत रमले, यश मिळवत गेले हे महत्त्वाचं. कारण त्यावेळी मन्ना डे वडिलांना वचन देऊन आले होते, की जर मला संगीत क्षेत्रात यश मिळालं नाही, तर तुमच्या इच्छेला मान देऊन मी वकिलीचं शिक्षण घेईन. 

मला मन्नादांच्या सांगीतिक वैविध्याबद्दल फार आश्चर्य वाटतं. हरप्रकारचं गाणं त्यांनी गायलं आहे. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ सारखं क्लासिकल, ‘आओ ट्विस्ट करे’ सारखं पाश्चात्त्य, ‘ना तो कारवां की तलाश है’ सारखी कव्वाली, ‘चलत मुसाफिर’ सारखं लोकगीत, ‘जोडी हम्मारी जमेगा कैसे जानी’ सारखं विनोदी, ‘हर तरफ अब यहीं अफसाने है’ सारखं आशादायी, ‘तू प्यारका सागर है’ सारखं भक्तिरसपूर्ण, ‘ए भाय जरा देखके चलो’ सारखं हसता हसता रडवणारं, ‘ये दोस्ती हम नही तोड़ेंगे’ सारखं खेळकर, ‘दिलका हाल सुने दिलवाला’ सारखं मजेदार, ‘ना चाहूं सोना चांदी’ सारखं खोडकर, ‘मस्ती भरा है समा’ सारखं अवखळ, ‘पूछो ना कैसे मैंने रैन बितायी’ सारखं विरहगीत, ‘ऐ मेरी जोहराजबी’ सारखं चिरतरूण प्रेमगीत; या गुणी गायकाला साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. 

विरोधाभासी गंमत म्हणजे पडद्यावर, ‘एक चतुर नार’मध्ये मन्नादांना किशोरकडून हरायचं होतं, तर ‘केतकी गुलाब जूही चंपक बन फुले’मध्ये साक्षात पं. भीमसेन जोशी यांना गाण्यात हरवायचं होतं... आणि या दोन्ही गाण्यांत मन्नादा किती दिलखुलास गायलेत. मन्ना डे यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांना जेव्हा कळलं ‘बसंतबहार’मधल्या एका गाण्यात त्यांना पंडितजींबरोबर जुगलबंदी करून त्यांना हरवायचं आहे, तेव्हा ते प्रथम नाहीच म्हणाले. घरी जाऊन पत्नीला म्हणाले, की इतक्या मोठ्या गायकाची बरोबरी करायची आणि त्यांच्याविरुद्ध जिंकायचं, हे काही मला जमणार नाही. पत्नीनं समजावलं, की ती चित्रपटाची गरज आहे, तुम्ही नाही तर दुसरं कुणी गाईलच की! शेवटी मन्नादा तयार झाले. अगदी तयारीनं गायले आणि एक अजरामर गीत घडलं. यातून एकच जाणवतं, जो कलाकार दुसऱ्याच्या कलेचा आदर करतो, कलाकाराचा मान राखतो तो स्वतःही श्रेष्ठ असतोच. 

ते ‘एक चतुर नार’बद्दल बोलतानाही किशोरच्या इम्प्रोवायझेशनचं कौतुक करतात. रफीबरोबर त्यांनी शंभरएक गाणी केली आहेत. मुकेश तर राजकपूरचा प्रथम स्वर, मन्नादा दुसरे; तरी कुणाबरोबर त्यांची स्पर्धा नव्हती. एकमेकांबरोबर सौहार्दाचे संबंध होते.. आणि जेव्हा केव्हा एकत्र गात तेव्हा ‘वरचढ’ गाण्याची ईर्ष्या नसे; गाणं चांगलं झालं पाहिजे, बस! 

असं म्हणतात, की सुरुवातीला बऱ्याच गायिका मन्ना डे यांच्याबरोबर गायला नाखुश असत. एकतर त्यांचा आवाज मुळातच वजनदार आणि त्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार. त्यामुळं गायिकांना आपला प्रभाव पडणार नाही असं वाटत असावं. पण आपल्या लताबाईंनी किती सुंदर ड्युएट्स केली आहेत मन्नादांबरोबर. ‘आवारा’मधल्या ‘तेरे बिना आग ये चाँदनी’पासून ते १९८६ च्या ‘मक्कार’ चित्रपटात राजेश रोशननं संगीत दिलेल्या ‘तेरे रंगमे रंगली चुनरिया’पर्यंत; शिवाय ‘श्री 420’मधलं ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे तर हिंदी चित्रपटगीतांतील सर्वांत गाजलेलं, अजोड प्रेमगीत! दोघांची ही आणखी काही गाणी पाहा - ‘मस्ती भरा है समा’, ‘आजा सनम’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘चुनरी संभाल गोरी’, ‘मेरे दिलमे है एक बात’, ‘जहां मैं जाती हूँ’, ‘चढ़ गयो पापी बिछुआ’, ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’, ‘अपनी कहानी छोड़ जा’, ‘दिलकी गिरह खोल दो’, ‘तुम गगन के चंद्रमा हो’, ‘सोचके ये गगन झूमे’, ‘यशोमती मैय्या से’, ‘याल्ला याल्ला दिल ले गयी’, ‘जा तोसे नही बोलू कन्हैया’, ‘उमडघुमड़ कर आयी रे घटा’... तयारीच्या दोन गायकांचं असं सुरेल सायुज्य ऐकणाऱ्याला श्रीमंत करून जातं. 

एक राज कपूर सोडला तर कुठल्याही एकाच नटाबरोबर त्याचा आवाज म्हणून मन्ना डे यांची जोडी जमली नाही. त्याचा त्यांना काही फायदा/तोटा झाला असेल. पण माझ्यामते कुठल्याही एकाच नटाशी बांधिलकी नसल्यानं त्यांचं गाणं हे ‘गाणं’ म्हणून जास्त प्रभावी झालं. त्यांना तटस्थपणे गाणं मांडता आलं. लता, मन्ना डे हे दोन गायक असे आहेत, की जे आपल्याला गाणं सांगतात. स्वतः त्यात रममाण न होता आपल्याला मात्र शब्द-सुरांकडं खेचून नेतात. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायामुळं जमत असेल का असं गाणं त्यांना? ‘पूछो ना कैसे मैंने रैन बितायी’ ही ओळ ऐकल्यावर ‘सगळी रैन तळमळून, जागून काढली असणार’ हे वेगळं सांगावं लागतच नाही. ‘रैन बितायी’चा स्वराविष्कारच असा, की विरह भावना पोचतेच आतपर्यंत. 

बासू भट्टाचार्यांनी १९७१ मध्ये ‘अनुभव’ नावाचा विलक्षण चित्रपट केला होता. त्याला कनु रॉय यांनी अप्रतिम संगीत दिलं होतं आणि गीतलेखक होते कपिलकुमार. त्यातलं ‘फिर कहीं कोई फूल खिला’ हे गाणं माझं अतिशय लाडकं गाणं आहे. याच संचाच्या पुढच्या ‘आविष्कार’मधलं ‘हसनेकी चाहने इतना मुझे रुलाया है’ हेसुद्धा खूप खास गाणं आहे. ही दोन गाणी लूपवर टाकून मी कितीही वेळा ऐकू शकते. 

मनका समंदर प्यासा हुआ 
क्यों किसीसे मांगे दुवा 
लेहरोंका लगा जो मेला 
तूफाँ ना कहो उसको। 

पतिपत्नीच्या नात्यातील रितेपणा, दोघांचा एकेकटेपणा, मनानंच वरवर घातलेली समजूत; मन्नादांच्या ‘गाणं सांगणे’ या खुबीमुळं प्रत्येक वेळी या ओळी ऐकताना अंगावर काटा येतो.

‘ऐ मेरे प्यारे वतन’ हे तर गीत-संगीत-अभिनय-गायन या सर्व कसोट्यांवर १०० टक्के उतरलेलं अद्‍भुत गाणं. त्यातल्या रबाब या अफगाणी वाद्याबरोबर मन्नादांचा आवाज अक्षरशः तादात्म्य पावला आहे. बंद खोलीत, मायदेशाकडं डोळे लावून बसलेल्या, परिस्थितीनं दबलेल्या लोकांसाठी गाताना मन्ना डे यांनी किती बंदिस्त, कंट्रोल्ड आवाज लावलाय पाहा. 

मन्ना डे यांनी जवळपास सर्व भारतीय भाषांतून गाणी गायलीत. १९८० नंतर हिंदी चित्रपटातून गाणं कमी केलं असलं, तरी बंगाली गाणी आणि कार्यक्रम सुरूच होते. मराठीतसुद्धा किती छान छान आणि वैविध्यपूर्ण गाणी आहेत त्यांची. ‘अ अ आई, म म मका’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘घन घनमाला नभी दाटल्या’, ‘नंबर 54’ ही त्यांची गाजलेली मराठी गाणी. 

एकेकाळी हिंदी साहित्यजगतात खळबळ उडवणारी ‘मधुशाला’ ही डॉ. हरिवंशराय बच्चन यांची अजरामर काव्यरचना मन्ना डे-जयदेव या द्वयीनं जनसामान्यपर्यंत पोचवली. ‘दिन को होली, रात दिवाली, रोज मनाती मधुशाला।’ या ओळी मन्नादांच्या वजनदार आवाजात वास्तवाची चर्रकन् जाणीव करून देतात. 

मन्नादांनी २४ ऑक्टोबर २०१३ रोजी इथली यात्रा संपवली. गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार, फ़िल्मफेयर पुरस्कार, पद्मभूषण आणि इतर अनेक यथोचित मानसन्मान त्यांना मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मानही मिळाला. चाहत्यांचं प्रेम मिळालं. समाधानी आयुष्य मिळालं. त्यांच्याच शब्दात त्यांच्याबद्दल सांगायचं, तर - 
‘संगीत मन को पंख लगाए 
गीतों में रिमझिम रस बरसाए 
स्वर की साधना परमेश्वर की...’

संबंधित बातम्या