आदरांजली

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 2 मार्च 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

मला मोहम्मद रफी प्रचंड आवडतो आणि लता मंगेशकर तर दैवतच आहे माझ्यासाठी! आता त्यात विशेष ते काय; आपण सारेच त्यांचे भक्त आहोत. रफीची, ‘चौदहवी का चांद हो’, ‘रहा गर्दिशोंमें हरदम’, ‘दूर रहके ना करो बात’, ‘छू लेने दो नाजूक होठोंको’, ‘ये जुल्फ अगर खुलके’, ‘ये वादियां ये फिजाए’, ‘सौ बार जनम लेंगे’, ‘हुस्नवाले तेरा जवाब नही’, ‘तुझको पुकारे मेरा प्यार’, ‘जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है’, ‘भरी दुनियां में आखिर दिलको’, ‘न झटकों जुल्फसे पानी’... ही सगळी सगळी माझी अत्यंत आवडती गाणी आहेत. ही गाणी आहेत संगीतकार रवि यांची! 

‘बदले बदले मेरे सरकार नजर आते है’, ‘मिलती है जिंदगीमें मुहोब्बत कभी कभी’, ‘लागे ना मोरा जिया’, ‘वो दिल कहांसे लाऊ’, ‘ग़ैरोंपे करम अपनोपे सितम’, ‘लो आ गयी उनकी याद’ ही माझी, लताची काही आवडती गाणी. ही गाणीसुद्धा संगीतकार रवि यांची आहेत. 

इतकी लोकप्रिय गाणी, अनेक सुपरहिट चित्रपट करूनसुद्धा रवि यांचे नाव ‘माझा आवडता संगीतकार’ म्हणून चटकन का नाही आठवत? मला अनेकदा त्यांच्यावर मी अन्याय करते आहे का, अशी खंत वाटते. 

संगीतकार रविशंकर शर्मा ऊर्फ रवि यांचा जन्म गुड़गावचा (३ मार्च १९२६). वडील भजनगायक होते, त्यामुळं घरात गाणं होतं. परिस्थिती फार सधन नाही, फार हलाखीचीही नाही. अभ्यासात रस नव्हता. घराला हातभार लावावा म्हणून त्यांनी इलेक्ट्रिशियनचं काम शिकून घेतलं. दिल्लीला पोस्टखात्यात काही महिने नोकरी केल्यानंतर पुढं त्याकाळच्या बऱ्याच कलवंतांप्रमाणं ऑल इंडिया रेडिओत वादक म्हणून काम आणि मग ओघानंच मुंबईला प्रयाण! डोक्यात वेड मोहम्मद रफीसारखं गायक होण्याचं. १९५० मध्ये रवि एकटेच मुंबईला आले तेव्हा कुठं काही काम मिळत नव्हतं. सुरुवातीला मालाड स्टेशनवर रात्र काढून दिवसा कामासाठी वणवण. हे कळल्यावर वडिलांनी महिन्याला ४० रुपये पाठवायला सुरुवात केली. मग रविंनी पत्नीसह काळबादेवीला एका छोट्याशा खोलीत संसार थाटला. उधारी चुकविण्यासाठी रेडिओ, इस्त्री दुरुस्तीची कामं करत, एकीकडं कोरसमध्ये गाणं सुरू झालं होतं. ‘आनंदमठ’च्या ‘वंदे मातरम’चा कोरस गाताना संगीतकार हेमंतकुमार यांचं त्यांच्याकडं लक्ष गेलं आणि रवि त्यांच्याकडं साहाय्यक म्हणून काम करू लागले. ‘शर्त’, ‘जागृति’, ‘नागिन’, ‘दुर्गेशनंदिनी’ अशा चित्रपटांचे साहाय्यक संगीतदिग्दर्शक रवि होते. ‘नागिन’मधली प्रसिद्ध ‘बीन’ची धून घडविण्यात रविंचा वाटा होता. १९५५ च्या ‘वचन’पासून त्यांनी स्वतंत्र संगीत द्यायला सुरुवात केली. त्यातलं ‘चंदामामा दूरके’ हे गाणंसुद्धा रविंनीच लिहिलं आहे. 

रवि यांच्याबद्दल खय्याम म्हणाले होते, ‘इनका काम एकदम साफसुथरा, सादगीवाला; लेकिन कशिशवाला था। सबसे ज्यादा जुबिली पिक्चर्स इनके नामपर होगी। ब्यूटीफुल कम्पोजिशन और ठेहराव था इनके गानेमे। और रवि सबके मनपसंद संगीतकार थे। प्रोड्यूसर डायरेक्टर खुश रहते थे उनके काम पर।’ यातला शब्द न् शब्द अचूक आहे. रवि यांचं संगीत तर मनमोहक होतंच; पण त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. म्हणून तर ‘वचन’नंतर निर्माते गोएल यांचे जवळपास सगळे चित्रपट रविंनी केलेत. तेच जेमिनी, बी. आर. चोप्रा यांच्याबाबत. याबद्दल बोलताना रवि म्हणालेत, ‘जब कोई टीम चलती है, तो लोग भी कम्फ़र्टेबल रेहते है।’ 

रवि एका गाण्याच्या कमीतकमी ३-४ चाली निर्मात्यांना ऐकवत, त्यांना चॉइस म्हणून. पण जी पहिली चाल केलेली असे तीच फायनल होई, कारण पहिली चाल नेहमीच शब्दाचे अर्थ लेऊन उमटलेली असते. निर्माता दिग्दर्शकांना असा चॉइस देणारे रवि, गीतकारांनाही पूर्ण स्वातंत्र्य देत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकदाही आधी चाल करून त्यात शब्द बसवून घेतले नाहीत, एकदाही! म्हणूनच साहीरसारख्या मनस्वी गीतकाराबरोबर रवीची तार जुळली असावी. 

‘काजल’ चित्रपटात, ‘छू लेने नाजूक होठोंको’ ही नज्म मुशायरा-तरन्नुम स्टाइलमध्ये करायची होती. पण त्याचा मुखडा वाचल्यावर रविंना वाटले, की इतके ओघवते शब्द, हाताशी रफीसारखा हुन्नरी गायक; तर याला सुंदर चाल लावून गाणं करूयात. निर्माते माहेश्वरी, नाखुशीनं तयार झाले. म्हणाले, की गीत असेल तर दोन अंतऱ्यांपेक्षा मोठं नको. साहिरनं दोन कडवी लिहून दिली आणि निघून गेले. रविंनी लावलेली अप्रतिम चाल आणि रफीचं भन्नाट गायन; ते ऐकून सगळेच प्रभावित झाले. हे ‘चालणारं’ गाणं आहे हे लक्षात आल्यावर अजून एखादं कडवं वाढव म्हणून साहिरला सांगायचं तर साहीर गाणं देऊन गायब झालेले. शेवटी दोन अंतऱ्याचंच गाणं रेकॉर्ड झालं. 

याच चित्रपटातील ‘ये जुल्फ अगर खुलके बिखर जाए तो अच्छा’ हे अजून एक क्लासिक गाणं. रविंना, शेवटी येणारा ‘अच्छा’ थोडा खटकत होता. त्यांनी साहिरला विचारलंही, की ‘अच्छा के आगे कुछ नही, अच्छा हो वगैरा?’ साहीर म्हणाले, ‘नाही, अच्छा ही अच्छा रहेगा।’ मग त्या ‘अच्छा’ला उठाव देऊन गाण्याची चाल रचली गेली. रविंनी दोन वेगवेगळ्या प्रकारे ‘अच्छा’ योजलं होतं, तिसऱ्या ‘अच्छा’ची अॅडिशन रफीसाहेबांची!! 

‘चौदहवी का चांद’ (१९६०) संगीतकार रविंसाठी महत्त्वाचा, माईलस्टोन चित्रपट. खरं तर एस. डी. बर्मन हे गुरुदत्तचे आवडते संगीतकार. पण ‘कागज के फूल’नंतर ‘एसडीं’नी गुरुदत्तबरोबर काम करणं थांबवलं. त्यामुळं ‘चौदहवी का चाँद’ रविकडं आला. गीतकार कोण असावेत असं गुरुदत्तनं रविंना विचारलं. रवि म्हणाले, की ऊर्दूची जाण असलेला कुणीही चालेल. मग शकील बदायुनी यांना गीतलेखनासाठी विचारण्यात आलं. नौशाद आणि गुलाम मोहमद सोडून शकीलनं इतर कुणाबरोबर विशेष काम केलं नव्हतं. रवि त्यांच्या एका मुलाखतीत सांगतात, की शकील इतका मोठा प्रसिद्ध शायर, पण तोच रविंना म्हणाला, की आपण प्रथमच एकत्र काम करतोय, तर सांभाळून घ्या! असा एकमेकांप्रती आदर असेल तर ‘चौदहवी का चाँद हो..’सारखं अविस्मरणीय गीत का नाही घडणार? या गीताची गंमत म्हणजे ‘चौदहवी का चाँद हो’ हा मुखडा रविंना सुचला, त्यांनी शकीलना विचारलं, की यावरून ‘शीर्षक गीत’ करता येईल का? शकिलनी ५ मिनिटात गाणं लिहिलं आणि एकेका ओळीला चाल देत, १० मिनिटात गाणं तयारही झालं! 

आशा भोसले म्हटलं, की आपल्याला आठवतात ‘ओपी’ आणि ‘आरडी’. पण संगीतकार रवि यांनी आशाबरोबर अफाट काम केलं आहे. अक्षरश: काही मोजके अपवाद वगळता, प्रत्येक चित्रपटात त्यांनी आशाला गाणी दिली आहेत. ‘दिलकी कहानी रंग लाई है’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘कौन आया के निगाहोंमे’, ‘चंदामामा दूरके’, ‘तोरा मन दर्पन कहलाए’, ‘ये राते ये मौसम नदीका किनारा’, ‘मुझे प्यारकी जिंदगी देनेवाले’, ‘मुझे गलेसे लगालो’, ‘ये रास्ते है प्यारके’, ‘नील गगनपर उडते बादल’, ‘जब चली ठंडी हवा’, ‘मत जैय्यो नौकरिया छोड़के’, ‘जिंदगी इत्तेफाक है’, ‘उलझन सुलझे ना’... ही काही गाजलेली आशा-रवि यांची गाणी! 

रवि यांनी आशा आणि महेंद्र कपूर यांची सुरुवातीची कारकीर्द घडवली म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 

रवि यांचं बी. आर. चोप्रा यांच्याबरोबरसुद्धा छान ट्युनिंग जुळलं होतं. ‘गुमराह’, ‘हमराज’, ‘वक्त’, ‘धुंद’, ‘आदमी और इंसान’ असे लोकप्रिय चित्रपट दोघांनी एकत्र केलेच; पण १९७० ते ८२ असा मोठा ब्रेक घेऊन रवि चित्रपटसृष्टीत परत आले, तेव्हा ‘निकाह’ हा चित्रपट बी. आर. चोप्रांनी रविंकडंच सोपवला. त्यातली गायिका-नटी सलमा आगाची एकूणएक गाणी गाजली. ‘दिलके अरमाँ आंसूओंमें बह गए’ या गाण्यासाठी तिला फ़िल्मफ़ेअर मिळालं. 

या दुसऱ्या इनिंगमध्ये रवि हिंदी चित्रपटसृष्टीत फार रमले नाहीत. पण साउथमध्ये, विशेषतः मल्याळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी बरंच काम केलं. तिथं त्यांना ‘बॉम्बे रवि’ या नावानं ओळखत. या ‘बॉम्बे रविं’नी अनेक चित्रपटांना ‘ॲवॉर्ड विंनींग’ संगीत दिलं. 

मायावी मुंबई नगरीत १९५० मध्ये येऊन स्ट्रगल करणारा, स्टेशन-फूटपाथवर रात्री गुजरणारा कलाकार, १९६० पर्यंत इथं स्थिरावला. १९६० च्या ‘चौदहवी का चाँद’ नंतर यश, कीर्ती, पैसा, सन्मान भरभरून मिळालं. सांताक्रूझला स्वतःचा बंगला, म्युझिक रूम, दारात गाड्या सगळं उभं राहिलं. पण प्रत्येक सहृदयी यशस्वी कलाकाराच्या/व्यक्तीच्या आयुष्यात समाधान नांदतंच असं नाही. कलाकाराच्या खासगी आयुष्यात डोकवायचं नाही म्हटलं तरी, वर्तमानपत्रं, इंटरनेटच्या माध्यमातून काही गोष्टी समजतात. स्वकष्टानं उभारलेल्या वास्तूच्या, विशेषतः जिथं रफी, लता, आशा, साहीर, शकील असे कलाकार वावरले, अजरामर संगीत घडलं त्या म्युझिक रूमच्या ताब्यासाठी मुलाविरुद्ध कोर्टात जावं लागणं ही गोष्ट किती खंतावणारी असेल! सुदैवानं दोन्ही मुलींनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. ७ मार्च २०१२ मध्ये आपला ८६ वा वाढदिवस साजरा करून चारच दिवसांनी रविंनी या मायानगरीचा निरोप घेतला. 

रविंना ‘खानदान’, ‘घराना’ या हिंदी चित्रपटांच्या संगीतासाठी, तसंच त्यांच्या अनेक हिंदी गाण्यांना फ़िल्मफ़ेअर ॲवॉर्ड्स मिळाली आहेत. अनेक दक्षिणी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. तरी, ‘आज मेरे यारकी शादी है’, ‘बाबुलकी दुवाए लेती जा’ या गाण्यांशिवाय बारात आणि ‘ऐ मेरी जोहराजबी’शिवाय आजही फॅमिली फंक्शन्स होत नाहीत, हीच खरी त्यांच्या कामाची पोचपावती!! रविंचं काम लक्षात राहतं, पण नाव नाही. अशावेळी साहिरचे शब्द आठवतात, रविंच्याच, ‘धुंध’मधल्या ‘संसारकी हर शै का’मधल्या ओळी आहेत - 
एक पलकी पलक पर है, ठहरी हुई ये दुनिया।
एक पलके झपकने तक हर खेल सुहाना है ।। 

‘पलक झपकनेतक’ मिळालेल्या वेळात आपल्यासाठी सुरेल संगीत घडविणाऱ्या रविंना, मार्च महिन्यात येणाऱ्या त्यांच्या दोन्ही स्मरणदिवसांसाठी आदरांजली!!

संबंधित बातम्या