एक दिन हमको याद करोगे

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 16 मार्च 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या, अनेक प्रेमकथा बहरल्या. काही अधुऱ्या, तर काही पूर्णत्वास गेलेल्या. काही पूर्णत्वास जाऊनही टिकल्या नाहीत. काहींबद्दल नुसतेच अंदाज बांधून गॉसिप केलं गेलं. एक संगीत आस्वादक म्हणून या गॉसिप्सकडं दुर्लक्ष करावं, एकूणच कलाकारांच्या खासगी आयुष्याचा फार मागोवा घेऊ नये असं मला वाटतं. कारण त्यामुळं कलाकृतीच्या रसास्वादात पूर्वग्रहाचं हीण मिसळलं जाण्याचा धोका असतो. तरीही, गीता दत्त-गुरुदत्त या जोडीविषयी मला कायम कुतूहल वाटत आलंय. त्याचं कारणही सांगते. गीता दत्त ही माझी आवडती गायिका आहेच, पण तिच्या अनेक गाण्यांमध्ये तिच्या जीवनाचे प्रसंग उमटलेले जाणवतात. तिच्या एकूण कारकिर्दीचा आलेखसुद्धा तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणानुरूप वरखाली झालेला दिसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि दुर्दैवी कारण म्हणजे दोन्ही मनस्वी कलाकारांच्या अकाली मृत्यूनंच या कहाणीचा शेवट झाला. गुरुदत्तचं ३७ आणि गीताचं ४१, ही काय कलाकाराची जाण्याची वयं आहेत का? किती तरी प्रतिभाविष्काराचे अर्धोन्मीलित कोंब आपल्याबरोबर घेऊन गेले असतील दोघंही!

गीताचं सुरुवातीचं आयुष्य एक परिकथा होती. उत्तरार्ध मात्र दर्ददायी, अस्वस्थतेचा. They lived happily ever after असा शेवट लाभला नाही या परीकथेला.

गीता घोष रॉय चौधुरीचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० मध्ये एका धनाढ्य जमीनदार कुटुंबात झाला. दहा भावंडं असलेलं हे मोठं कुटुंब १९४२ मध्ये मुंबईला, दादरला स्थलांतरित झालं. त्यावेळी एकदा गीता घरातच गाणं गात होती. ते संगीतकार हनुमान प्रसाद यांनी ऐकलं आणि भक्त प्रल्हाद चित्रपटासाठी तिला गायला बोलावलं. वयाच्या पंधराव्या वर्षी इतक्या सहजपणे तिचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. भक्त प्रल्हादमधलं गाणं ऐकून एस. डी. बर्मन यांनी ‘दो भाई’साठी गीताला संधी दिली. यातल्या ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ या गाण्यानं इतिहास रचला. आधीच्या गाण्यांवर बंगाली प्रभाव होता, त्यातून बाहेर येत गीताला स्वतःची शैली सापडली. शब्दावर अर्थवाही जोर आणि आवश्यक तिथं हेलकावे देत नादमय सादरीकरण हे गीताचं वैशिष्ट्य ‘मेरा सुंदर सपना’मध्ये आणि तिथून पुढच्या प्रत्येक गाण्यात दिसतं. ‘दो भाई’मधलं ‘याद करोगे याद करोगे, एक दिन हमको याद करोगे’ हेही अतिशय सुरेख गाणं आहे. अवघ्या सतराव्या वर्षी या गायिकेच्या गाण्यात किती आत्मविश्वास, मॅच्युरिटी आणि कारुण्य भरलेलं होतं! याच आत्मविश्वासाच्या जोरावर गीतानं नंबर एकचं स्थान मिळवलं. १९४७ ते ५० या तीन वर्षांत जवळजवळ ४०० गाणी गायलीत तिनं. १९५० च्या सुरुवातीच्या जोगननंतर मात्र गीताकडचं काम कमी होऊ लागलं. लता मंगेशकर नामक संगीतसूर्य क्षितिजावर तळपू लागला होता. १९४९ मध्ये ‘अंदाज’, ‘महल’ आणि ‘बरसात’च्या तुफान यशानं लता टॉपची गायिका झाली. लताचं हे यशसुद्धा कष्टसाध्य होतं. गीतासाठी तो काळ थोडा कठीण होता. पण तिचे बंगाली आणि गुजराती चित्रपट सुरूच होते. 

‘अपनेपे भरोसा है तो एक दांव लगाले’ म्हणत १९५१ मध्ये ‘बाजी’ चित्रपटाद्वारे गीतानं पुन्हा बाजी मारली. उडत्या चालीची क्लब साँग्स ही गीताची स्पेशालिटी. ‘तदबीरसे बिगड़ी हुई तक़दीर बनाले,’ हे गझलच्या अंगानं लिहिलेलं गाणं, एसडींनी गीताच्या आवाजात एक फडकतं धमाल गाणं म्हणून पेश केलं. याच चित्रपटातलं ‘सुनो गजर क्या गाय’ हे अजून एक बहारदार गाणं. या गाण्याचं चित्रीकरण मला फार आवडतं. एक तर गीता बाली आणि गीता दत्त ही जोडीच इतकी अफलातून आहे ना! क्लब साँग गाणं सोपं काम नाही. ही गाणी narrative असतात, कथानकाला पुढं नेणारी असतात. मागं स्त्रीसमूह नाचतोय, पुढं टेबलावर देवानंद/के एन सिंग/रहमान टाइप्स मंडळी पाइप ओढत तिरक्या डोळ्यांनी बघताहेत आणि गीता बाली/शकीला/शामा, गीता दत्तच्या convincing आवाजात सूचक इशारे करतेय... धमाल गाणी असायची ती! (मेरा नाम चिंचीचू, नीले आसमानी, जाता कहां है दीवाने, ओ बाबू ओ लाला, बाबुजी धीरे चलना, जी भरके प्यार करलो, अजी ओ सुनो तो, अरे तौबा अरे तौबा, सोच समझकर दिलको लगाना, चाँद ढलने लगा ही अजून काही तिची क्लब साँग्स)

‘बाजी’ हा गीता-गुरुदत्त यांचा पहिला एकत्र चित्रपट. गीता दत्तच्या व्यक्तिमत्त्वानं गुरुदत्त भारावून गेला होता. ती प्रस्थापित यशस्वी गायिका, तो मात्र चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत होता. गीता आपली भलीमोठी लिमोझीन गाडी घेऊन गुरुदत्तला भेटायला जात असे. ओ.पीं. नय्यर यांच्या शब्दात सांगायचं, तर गीता-गुरुदत्तची प्रेमकहाणी हा फिल्म इंडस्ट्रीतला एक उत्सवच होता. १९५३ मध्ये दोघं विवाहबद्ध झाले. 

‘बाजी’, ‘जाल’, ‘प्यासा’, ‘कागजके फूल’ या गुरुदत्तच्या चित्रपटांत एसडींकडं गीता गायली. तर ‘बाज’, ‘आरपार’, ‘CID’, ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटांना ओपींचं संगीत होतं. ‘बाज’ सोडला (बाजसाठी गीतानंच गुरुदत्तकडं ओ.पीं.ची शिफारस केली होती) तर ओपींकडचे सगळे चित्रपट गाजले, गाणी तुफान चालली. 

मात्र, या प्रेमाच्या उत्सवाला कसलंसं गालबोट लागलं. एखाद्या सुंदर चित्राला तडा जावा, तसं झालं गीता-गुरुदत्तच्या संसाराचं. गीता तीन मुलं, संसार यात गुरफटली. पार्श्वगायनासाठी म्हणावा तसा वेळ देता येत नव्हता. असंही म्हणतात, की तिनं गुरुदत्तच्या चित्रपटाबाहेर गायलेलं त्याला आवडत नसे. त्यात वहीदावरून संशय... गीताचं करिअर मागे पडू लागलं. ‘प्यारमे जरा संभलना, बड़े धोखे है इस राह में’ असं काहीसं झालं त्यांच्या प्रेमाचं. 

‘प्यासा’ आणि ‘कागजके फूल’ चित्रपटांची नायिका वहीदा, गायिका गीता आणि दोघींचा नायक होता गुरुदत्त! ‘कागजके फूल’मधलं ‘वक्त ने किया क्या हंसी सितम। तुम रहे ना तुम, हम रहे ना हम’ ऐकताना हमखास माझ्या डोळ्यात पाणी येतं, ते गीताच्या आर्त गायकी‘मुळं’ आणि गीता‘साठी’सुद्धा. तीच जणू गुरुदत्तला म्हणतेय, ‘हम भी खो गए तुमभी खो गए। एक राह पर चलके दो क़दम।’ 

सत्तावन्नच्या प्यासाला छान यश मिळालं, जाणकारांची दाद मिळाली, सर्वत्र कौतुक झालं. एका शायरच्या जीवनावरच्या चित्रपटानं यश पाहिल्यामुळं गुरुदत्तनं अजून एक ‘ऑफबीट’ महत्त्वाकांक्षी चित्रपटाला हात घातला, दिग्दर्शकाच्या जीवनावर बेतलेला, ‘कागजके फूल’. १९५९ मध्ये आलेला ‘कागजके फूल’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. गुरुदत्त कर्जात बुडाला. लगेच, ‘चौधवीका चाँद’ची निर्मिती करून नुकसान भरूनही काढलं, पण ‘कागजके फूल’सारख्या कलात्मक चित्रपटाचं अपयश त्याला खात होतं. त्याचा आत्मा होता त्या चित्रपटात. 

एकोणीसशे बासष्टचा ‘साहिब, बीबी और गुलाम’ या पुढच्या कलात्मक चित्रपटाची गतसुद्धा ‘कागजके फूल’सारखी झाली. जाणकारांनी, समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं, अनेक पुरस्कार मिळाले, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोसळला. त्यातलं गीताचं ‘कोई दूरसे आवाज दे चले आओ’ ऐकताना काटा येतो अंगावर! ‘रात रात भर इंतजार है, दिल दर्दसे बेक़रार है...’ खरंच, अशी वेळ येऊ नये कुणावर! मीनाकुमारीचं खूप आवडतं होतं हे गाणं. मला त्यातलं ‘पिया ऐसो जियामे समाय गयो रे’ ऐकतानासुद्धा गलबलतं, पियाचं प्रेम मिळणार नाहीये हे ठाऊक असल्यानं.

गीता-गुरुदत्त वेगळे राहत होते, दोघंही मानसिक एकटेपणाचे शिकार झाले होते. एसडींसारख्या जिव्हाळ्याचा संगीतकाराकडंसुद्धा गीता पूर्वीसारखी गात नव्हती. अतिरिक्त मद्यपान आणि झोपेच्या गोळ्यांच्या ओव्हरडोस घेऊन गुरुदत्तनं सगळ्याच आघाड्यांवरील अपयशावर जणू मार्ग शोधला. पैशाचं गणित या मनस्वी कलाकाराला जमलं नाही हेच दुर्दैवी सत्य. 

गुरुदत्त मागं सोडून गेलेल्या कर्जबाजारी संसाराची घडी बसवण्यासाठी गीता पुन्हा सावरून उठली. पण हे जग कुणासाठी थांबून राहत नाही. एसडी लताला घेऊन, ओपी आशाला घेऊन सज्जतेनं काम करतच होते. गीताची दुसऱ्या नंबरची जागा आशानं पटकावली होती. गीतानं स्टेज शो करायला, दुर्गा पूजेचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. प्रचंड मेहनत, प्रवास, दगदग. एकेका कार्यक्रमात सलग पंचवीस गाणी गायची गीता! १९७१ मध्ये बासू भट्टाचार्यांनी एक क्लासिक चित्रपट केला होता, ‘अनुभव’. संगीतकार कनु रॉय यांनी या चित्रपटात गीताला तीन सोलो गाणी दिली. ‘कोई चुपकेसे आके’, ‘मुझे जा ना कहो मेरी जान’ आणि ‘मेरा दिल जो मेरा होता’ ही तिन्ही गाणी गाजली. तनुजाच्या त्या समंजस लोभस भूमिकेला गीताचा आवाज शोभला. मुक्तछंदात मुक्तपणे गायली गीता. तिच्या चाहत्यांनाही, गीता परत आली असा दिलासा वाटू लागला. पण विझण्यापूर्वी मोठ्या होणाऱ्या ज्योतीसारखं अनुभवाचं यश होतं. आयुष्यात वाट्याला आलेलं सारं दुःख, अवहेलना विसरून उभं राहायचं, तर ‘बेहोश हूँ बिन पिये’ अशक्य झालं होतं का तिला? एकटेपणा, डिप्रेशन, लिव्हरचं दुखणं, यातून सावरली नाही गीता. २० जुलै १९७२ ला याच आजारपणात तिचा अंत झाला.

गीताबद्दल अनेक गोष्टी आपल्याला सहसा माहीत नसतात. तिला मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा छान बोलता येत असत. पोस्टखात्यानं गीताच्या स्मरणार्थ तिकीट छापलं होतं. तिच्याबरोबर काम करणाऱ्या कोरस, वादक यांना ती फार प्रेमानं वागवे, त्यांच्याबरोबर पिकनिकला जात असे. लता, रफी आणि आशाबरोबर तिची मैत्री होती. गुरुदत्तपासून वेगळं झाल्यावर ती काही दिवस आशाच्या घरी राहत होती. गीताला चित्रपटात काम करायची खूप इच्छा होती, ‘बधू बरन’ या बंगाली चित्रपटात काम करून तिनं ती हौस भागवली. तिची मैत्रीण आणि गुरुदत्तची बहीण, चित्रकार कल्पना लाजमी यांच्या मते गीता दिसायला अतिशय सुंदर होती, ‘अजिंठ्याच्या चित्रातल्या सारखी!’

गीताचं गाणं शब्दांत पकडता येत नाही. फक्त उडतं, अवखळ, सानुनासिक, लाडिक गाणं म्हणजे गीता नव्हे. ‘आजकी रात पियाँ, दिल ना तोड़ो’मधल्या ‘पियाँ’चा गोडवा म्हणजे गीता. ‘दिलको यहां मत फेंकिये’(चल दिये बंदा नवाज)मधल्या ‘फेंकिये’ची तड़फ म्हणजे गीता. ‘तदबीरसे बिगड़ी हुई’मधल्या ‘हेहेहे ssहेहे’ची बेफिकिरी म्हणजे गीता. ‘जाता कहाँ है दीवाने’मधल्या ‘झूठी है तेरी कसम’चा स्पष्टवक्तेपणा म्हणजे गीता. ‘अच्छा तो ये दिल हमारा होगया’मधला अवखळपणा म्हणजे गीता. ‘कोई दूर से आवाज दे, चले आवो’मधली गूढरम्यता म्हणजे गीता. ‘हसके बिताले दो घडीकी जवानी है’ मधल्या ‘दो घडीकी’चा हेलकावा म्हणजे गीता. ‘घूँघट के पट खोल रे’मधले समर्पण म्हणजे गीता, ‘टकराके नैन मिलता है चैन मूरख क्यू रोता है’ हा परखड सवाल म्हणजे गीता, ‘कैसे कोई जिये? जहर है जिंदगी उठा तुफान वो, आसके सब बुझ गए दिए’मधली हताश स्वरात गाणारी ती गीता आणि ‘आज सजन मोहे अंग लगालो’मधले आर्जवसुद्धा गीताच! गीता जितकी ऐकाल तितकी नव्यानं सापडत जाते. कुणी म्हणतं, तिच्या आवाजात करुणा होती, कुणी म्हणतं घंटेसारखी खनक होती. गीता दत्तच्या गाण्यांचा जबरदस्त चाहता; पराग सांकला यांनी प्रचंड संकलन/संग्रह करून तिची वेबसाइट केली आहे. त्यांनी अतिशय चपखल शब्दांत गीताच्या गायकीचं वर्णन केलंय. ते म्हणतात, ‘गीताच्या आवाजात मधाचा गोडवा आणि गाण्यात मधमाशीचा डंख आहे.’

‘याद करोगे याद करोगे, एक दिन हमको याद करोगे,’ असं बजावून गेलीय गीता. तसंही तिला विसरणं शक्य आहे का?

संबंधित बातम्या