हो सके तो लौटके आना

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 6 जुलै 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

मला आजही तो दिवस आठवतोय, २७ ऑगस्ट १९७६, घरात मोठी भावंडं गंभीर चेहऱ्यानं काही बोलत होती. त्यांच्या बोलण्यात डेट्रॉईट, बीबीसी, मुकेश, हार्टअॅटॅक असे काही शब्द ऐकू येत होते. मग कळलं की मुकेश गेला! ‘जवळच्या’ माणसाचा अनुभवलेला हा पहिलाच मृत्यू! प्रचंड रडले होते मी. लहान होते, मला वाटायचं की आपण मोठे झालो की लता, रफी, किशोर, मुकेश ही मंडळी आपल्याला भेटणारच, अगदी दोस्ताना होणार आपला त्यांच्याशी आणि ते खोटं ठरवून मुकेश असा मधेच निघून कसा जातो?

अशी काय जादू होती मुकेशच्या आवाजामध्ये, की ज्याचं जाणं आबालवृद्धांना चटका लावून गेलं? अगदी एकाच शब्दात सांगायचं तर ‘सच्चेपणा’. मुकेशच्या गाण्याशी श्रोता लगेच कनेक्ट होतो. मुकेश जेव्हा ‘रात अंधेरी दूर सवेरा’ किंवा ‘आंसू भरी है ये जीवनकी राहे’ असं सांगतो, तेव्हा त्यातल्या दुःखाचा पीळ ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोचतो. मुकेशच्या सांगण्यातली निरागसता मोहवते ऐकणाऱ्याला.

आजकाल भक्त हा शब्द फार सर्रास वापरला जातो. मला काय वाटतं, आपल्यासारखे मुकेशचे वेडे चाहते आहेत ना, ते खरे आद्य भक्त या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यांना मुकेशच्या आवाजाच्या, गायकीच्या मर्यादा ठाऊक असतात. तरी त्यांना मुकेश मनापासून आवडत असतो किंवा आपल्यातलाच एक ‘तिथं’ आहे, आपल्यासाठी गातोय ही आपुलकीची भावना असते मुकेशबद्दल.

मुकेशचा जन्म (२२ जुलै, १९२३) दिल्लीच्या सुखवस्तू झोरावरचंद माथुर यांच्या मोठ्या कुटुंबात झाला. वडील इंजिनिअर होते, साहजिकच मुलानंही इंजिनिअर व्हावं ही अपेक्षा. पण या बाबाच्या डोक्यात गाणं होतं, घरात बहिणीची संगीत शिकवणी ऐकून गाण्याची गोडी लागलेली. मॅट्रिकनंतर काही दिवस पीडब्ल्यूडी खात्यात नोकरी करत असताना मुंबईला सिने-कलावंत हवेत अशी जाहिरात बघून मुकेश मुंबईला आला. १९४१ मध्ये निर्दोष नावाच्या चित्रपटात कामही केलं. त्यावेळी त्याच्या आवाजापेक्षा, देखण्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जास्त पडला असावा (यातलं ‘दिल ही बुझा हुवा है तो फसलें बहार क्या’ हे मुकेशचं पहिलं सोलो गाणं).

त्याकाळी मोतीलाल यांचा इंडस्ट्रीत दबदबा होता. ते मुकेशच्या लांबच्या नात्यातले. आपल्या ‘पहली नजर’ या चित्रपटात एक गाणं मुकेशला द्यावं म्हणून त्यांनी आग्रह धरला. अनिल बिस्वास यांनी ‘दिल जलता है’ हे गाणं मुकेशकडून गाऊन घेतलं आणि rest is history. सैगलच्या छायेतल्या या मासूम आवाजाचे तीर बिस्मिल को और बिस्मिल करत राहिले.

एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये दोन महत्त्वाचे चित्रपट आले, ज्यांमुळं चित्रपटसंगीत विश्वात पुढं होणाऱ्या काही अद्वितीय सामंजस्यांची बीजं रोवलेली होती. एक होता नौशादचा ‘अंदाज’, ज्यामध्ये मुकेशला सैगलच्या छायेतून बाहेर येऊन स्वतःची स्टाइल मिळाली (झूम झूम के नाचो आज, तू कहे अगर, टूटे ना दिल टूटे ना, हम आज कही दिल खो बैठे) आणि दुसरा होता ‘बरसात’ (छोड़ गए बालम, पतली कमर है). शंकर-जयकिशन (एस जे) यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिलाच चित्रपट. या चित्रपटापासूनच राज कपूर, एस जे, मुकेश, लता, ही एक जबरदस्त टीम आकाराला आली. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी हे गीतकारसुद्धा या टीमचा महत्त्वाचा हिस्सा होते.

‘अंदाज’साठी नौशादकडं मुकेशनं लताच्या नावाची शिफारस केली होती. लता मुकेशला बड़े भैया म्हणायची. मैत्रीचं मोल जाणणारी माणसं सगळ्यांना प्रिय असतात. अभिनयाची हौस भागतेय म्हणून मुकेशनं एका चित्रपटाच्या करारावर न वाचताच सही केली होती. त्या करारात तो चित्रपट (माशुका) पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात गायचं नाही अशी अट होती. हा माशुका १९५३ मध्ये आला आणि आपटला. एखादा गायक त्याच्या ऐन उमेदीचा काही काळ, तगडे गुणवंत स्पर्धक असताना बाजूला पडतो आणि तरी राज कपूर, एस जे अशा मित्रांमुळं पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतो. आग (जिंदा हूँ इस तरहा), बरसात (पतली कमर है), आवारा (आवारा हूं), आह (रात अंधेरी दूर सवेरा) यातील मुकेशची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली, त्यामुळं राज कपूर मुकेशच्या या असल्या कराराच्या भानगडीमुळं नक्कीच नाराज झाला असणार. याच काळात श्री 420 प्रदर्शित झाला. ‘दिलका हाल सुने दिलवाला’ आणि ‘प्यार हुवा इकरार हुवा’ ही गाणी मन्ना डे यांच्याकडं गेली, पण मुकेशच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं ‘मेरा जूता है जापानी’ प्रचंड गाजलं, परदेशात हे गाणं (आणि आवारा हूँ) राज कपूरची ओळख ठरलं. तसाही राज कपूर ‘स्वतःच्या आवाजावर’ किती काळ नाराज राहील ना? पुन्हा दोघांच्या साथीचा सिलसिला सुरू झाला तो अगदी मुकेशच्या निधनापर्यंत. ‘सत्यम शिवम सुंदरम्’मधलं ‘चंचल शीतल’ हे मुकेशचं शेवटचं गाणं. ‘जागते रहो’, ‘जिस देशमे गंगा बहती है’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘धरम करम’ हे त्याआधीचे चित्रपट. त्यातही ‘मेरा नाम जोकर’ची मुकेशची तिन्ही गाणी, ‘जाने कहा गए वो दिन’, ‘केहता है जोकर’ आणि ‘जीना यहाँ मरना यहाँ’; लोकप्रिय झाली असली तरी चित्रपट चालला नाही. 

‘धरम करम’मध्ये राज कपूरसाठी पुन्हा मुकेश गायला, आपल्या मित्रासाठी शेवटचं गाऊन गेला- ‘एक दिन बिक जायेगा माटीके मोल, जगमे रह जाएंगे प्यारे तेरे बोल।’

अजून एक संगीतकार जोडी होती, ज्यांनी मुकेशच्या आवाजातल्या ‘पॅथोस’चा फार समर्पक उपयोग करून घेतलाय. कल्याणजी आनंदजी यांनीसुद्धा अफाट काम केलंय मुकेशबरोबर. ‘मेरे टूटे हुए दिलसे’ (छलिया), ‘मुझको इस रातकी तनहाई में आवाज ना दो’ (दिल भी तेरा हम भी तेरे), ‘हमने अपना सबकुछ खोया’ (सरस्वतीचंद्र), ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे’ (पूरब और पश्चिम), ‘तुम्हे जिन्दगीके उजाले मुबारक’ (पूर्णिमा), ‘जुबाँ पे दर्दभरी दास्तां चली आयी’ (मर्यादा), ‘हमने अपना सबकुछ खोया प्यार तेरा पानेको’ (दुल्हादुल्हन) वानगीदाखल ही दर्दभरी गाणी पाहा; अँग्री यंग मॅन, अमिताभ उदयापूर्वीचे कल्याणजी आनंदजी किती वेगळे होते, ते या गाण्यांतून लक्षात येतं. 

या दोघांशिवाय रोशन (देवर, बावरेनैन, दिल ही तो है), सलिल चौधरी (आनंद, मधुमती, रजनीगंधा), खय्याम(फिर सुबह होगी, कभी कभी) यांनी मुकेशबरोबर झकास काम केलंय. दुर्दैवानं मदनमोहन, जयदेव, एस.डी. बर्मन, या त्यावेळच्या गुणी संगीतकारांनी मुकेशला फारशी गाणी दिलेली दिसत नाहीत. 

ओ.पी. नय्यर ‘संबंध’चं संगीत करत होते, तेव्हा ‘चल अकेला चल अकेला’ हे गाणं मुकेशला द्यावं अशी आशाची सूचना, किती योग्य होती पाहा. मुकेशच्या आवाजातला निर्मळपणा गाण्यालाही स्वभाव देऊन जातो. रिटेकवर रिटेकचा आग्रह धरणाऱ्या मुकेशचं हे गाणं पहिल्याच टेकमध्ये रेकॉर्ड झालंय. ‘भाभी की चूड़ियां’मधलं ‘तुमसेही घर घर केहलाया’ या गाण्यावर संगीतकार सुधीर फडके यांच्या गायकीची छाप जाणवते आणि मुकेशच्या आवाजातला जिव्हाळासुद्धा. अनिल बिस्वासने ‘दिल जलता है’ शिवाय अजून जी काही थोडी गाणी केलीयत मुकेशबरोबर, त्यापैकी हम लोगमधलं ‘अपनी नजरसे उनकी नजर तक’ हे माझं आवडतं गाणं आहे.

जेव्हा जेव्हा, ‘मुझे रात दिन ये खयाल है’, ‘झूमती चली हवा’, ‘जाने कहाँ गए वो दिन’, ‘सजनवा बैरी हो गए हमार’, ‘कई बार युहीं देखा है’ अशी थोडी कठीण गाणी आली, तेव्हाही मुकेशनं त्यांचं अक्षरशः सोनं केलं आहे. मुकेश म्हणजे सॅड साँग्ज हे समीकरण खुद्द मुकेशलाही मान्य होतं, त्या प्रकारची गाणी गाणं हा त्याचा फर्स्ट चॉइस होता आणि तरी, ‘डम डम डिगा डिगा’, ‘सुनो जी सुनो हमारी भी सुनो’, ‘जप जप जप रे गोरी जप रे प्रीतकी माला’, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही’, ‘पतली कमर है’, ‘नैन द्वारसे मनमे वो आये’, ‘रुक जा ओ जानेवाली रुक जा’ अशी थोडी विनोदी किंवा ‘तेरी अदाओंसे मरमर गए हम’, ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के’, ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘छोटीसी ये जिंदगानी रे’, ‘तुम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी’ अशी जरा हलकीफुलकी गाणीसुद्धा छान निभावली आहेत.

‘ख़यालोंमें किसीके’, ‘किस्मत में बिछड़ना था हुई क्यों उनसे मुलाकात रे’ (गीता दत्त), ‘बड़े अरमानों से रखा है बलम’, ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’, ‘छोड़ गये बालम’, ‘दिलकी नजरसे नजरोंके दिलसे’, ‘दिल तड़प तड़पके कह रहा’ (लता मंगेशकर), ‘वो सुबहा कभी तो आएगी’ (आशा भोसले) ही मुकेशची गाजलेली आणि मला आवडणारी ड्यूएट्स. 

मुकेशच्या आवाजाचा पोत मुलायम आहे पण नाजूक नाही. मृदू आहे पण कच्चा नाही. सलिल चौधरी म्हणालेत तसा out of this world असा आहे. या आवाजातल्या कारुण्यरसाला जशी दर्दभरी प्रेमगीतं शोभतात तशीच भक्तिगीतंसुद्धा. ‘दुख हरो द्वारकानाथ शरण मैं तेरी’, ‘जिनके हृदय श्रीराम बसे’, ‘सुरकी गती मैं क्या जानू’, ही काही गैर-फिल्मी भक्तिगीतं चटकन आठवतात.

कधीतरी मनात प्रश्न येतो, ‘मेरा जूता है जापानी’ किंवा ‘आवारा हूँ’ या गाण्यांत इतकं काय विशेष आहे? १९५० च्या आसपासचा तो काळ. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वतःच्या नव्या रस्त्यानं, सरळ मार्गानं जाणाऱ्या, नवनिर्मितीचं स्वप्न या स्वतंत्र देशातील माणसाच्या डोळ्यात होतं. राज कपूरचा साधाभोळा, कधी परिस्थितीचे चटके खाणारा, हरहुन्नरी राजू या स्वप्नांचा चेहरा, तर मुकेशचा आश्वासक स्वर त्यांचा आवाज झाला. ‘जख्मोसे भरा सीना है मेरा हसती है मेरी मस्त नजर’ या ओळीत लोकांना स्वतःचं रूप दिसलं असेल. ‘माना अपनी जेबसे फकीर है, फिरभी यारो दिलके हम अमीर है’ या ओळी जगण्याला बळ देऊन गेल्या असतील. 

चार्ली चॅप्लिनसारखी स्वतःची प्रतिमा तयार करताना राज कपूरला मुकेशच्या निरागस आवाजाचा फायदा नक्कीच झाला, लोकांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. 

मुकेशबद्दल माझ्या मनात एक तक्रारवजा खंत आहे. जेव्हा गाता गळा हे एकच साधन तुमच्याकडं असतं, तोच तुमचं शस्त्र, अस्त्र, सर्व काही असतं, तेव्हा त्याची प्राणपणानं काळजी घ्यायला हवी. बरेच गायक घेतातसुद्धा. पण मुकेशनं आपला आवाज फार जपला नाही असं वाटतं. वयोमानानुसार सगळ्याच गायकांचे आवाज बदलतात, पण मुकेशनं आवाजाच्या बाबतीत निष्काळजीपणा केला असं जाणवतं. ‘जो तुमको हो पसंद वोही बात कहेंगे’, ‘बहोत दिया देनेवालेने तुझको’, ‘मैं ना भूलूंगा’, ‘फूल आहिस्ता फेंको’, ‘दर्पनको देखा तूने जबजब किया सिंगार’, ‘चल सन्यासी मंदिरमे’ या गाण्यांत काही ठिकाणी कणसूर लागलेत, शिवाय आवाजावरचा ताणही जाणवतो.

दुःखाचा आवाज झालेला हा गायक व्यक्तिगत जीवनात एकदम राजा माणूस, रंगीन मिजाज, यारोंका यार, कुटुंबवत्सल पती, पिता. हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेलेच होते, शेवटचा प्राणहारक ॲटॅक आला डेट्रॉईटच्या त्या अखेरच्या दौऱ्यावर; लता बरोबर होती, मुलगा नितीन मुकेश बरोबर होता. त्याची वेळ आली आणि तो गेला. या मायाबाजारात जेव्हा गळेकापू स्पर्धेच्या, वादंगाच्या, अन्यायाच्या, घसरलेल्या मूल्यांच्या गोष्टी कानावर येतात, तेव्हा मुकेशसारख्या नेकदिल माणसांना साद घालून परत बोलवावसं वाटतं. ओ जानेवाले हो सके तो लौटके आना...

संबंधित बातम्या