है सबसे मधुर वो गीत.. 

अंजोर पंचवाडकर 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

माझ्या लहानपणी आमच्याकडे एक एलपी रेकॉर्ड होती, ‘तलत महमूद इन ब्लू मूड.’ त्यावर सुटातल्या हसऱ्या माणसाचा देखणा फ़ोटो होता. गाणी पण सगळी भारी भारी होती एकदम, बाबा आणि मोठ्या भावंडांकड़ून वरचेवर ऐकलेली. मी लहान होते, इंग्रजी फार काही येत नव्हतं. ती रेकॉर्ड, गाणी, फ़ोटो सारं बघून मला वाटे की ब्लू मूड म्हणजे काहीतरी छान मस्त प्रकार असणार. नंतर कळलं, की ब्लू मूड म्हणजे दुःखी, उदास मूड.. आणि तो गायक अशा प्रकारच्या गाण्यांचा बादशाह होता म्हणे. 

खरोखर मी स्वतःला फार भाग्यवान समजते, की तलत मेहमूदच्या गायकीचं गारुड लहानपणीच मनावर बसलं. या गायकाबद्दल आपलेपणापेक्षा एक आदरयुक्त दरारा होता. होता का, अजूनही आहे. मॉर्निंग वॉक घेताना प्लेलिस्टमधे अचानक तलतचं गाणं आलं की मी जवळचा बाक बघून त्यावर बसून ते गाणं ऐकते. चालता चालता सहज ऐकण्यासारखं गाणं नाहीच ते. तुमचं पूर्ण अटेंशन मागतं तलतचं गाणं. 

बेखता तूने मुझसे खुशी छिनली 
जिंदा रख्खा मगर जिंदगी छिनली... यातली काळीज पिळवटून टाकणारी वेदना चालता चालता कशी ऐकायची? 

तलतच्या आवाजाचं वर्णन हमखास मृदु, मुलायम, मखमली असं केलं जातं ते अगदीच मान्य. पण त्याच्या आवाजात दर्द होता असंही म्हणतात. मुकेश, तलत आणि गीता दत्त यांच्या आवाजात दर्द होता, म्हणजे नक्की कसा होता त्यांचा आवाज? तलत घरी जेवताना किंवा मित्रमंडळींमधे काय दर्दभऱ्या आवाजात गप्पा मारे? मला वाटतं दर्द आवाजात नाही, तर गायकीत असतो. म्हणूनच ‘जाए तो जाए कहाँ’मधे दर्द जाणवतो; पण ‘ये नई नई प्रीत है’मधे नसतो दर्द. ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए’ किंवा ‘दिल मतवाला लाख संभाला फिरभी किसी पे आ ही गया’ ही किती प्रसन्न मूडची गाणी आहेत! ‘जलते है जिसके लिए’ हे तर माझ्यामते One of the best romantic songs of Hindi cinema आहे. काय सुरेख अनोखा प्रसंग आहे.. फोनवरून प्रेमाची कबुली... ‘गीत नाजुक है मेरा शिशेसेभी, टूटे ना कहीं..’ हे सांगायला तलतचा मुलायम आवाजच हवा आणि तलतच्या आवाजातला तो सूक्ष्म कंप, ती तर निसर्गाची देणगीच जणू. त्यामुळे तलतच्या आवाजाची कॉपी करणंच अशक्य. 

दुःखी गाण्यात नुसतं ढोबळ दुःख नसतं, त्यातही छटा असतात. ‘मुहोब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने’मधे किंचित उपहास, ‘तेरी आंख के आंसू पी जाऊं, ऐसी मेरी तक़दीर कहा’ मधली खंत, ‘जाने अब तुझसे मुलाक़ात कभी होके ना हो’ (फिर वही शाम) मधली हुरहुर, ‘जिंदगी तेरे जामसे एक कतरा भी पीना नही’ (बेरहम आसमां) मधली सपशेल माघार, ‘मितवा नहीं आये’ मधला अपेक्षाभंग, ‘कोई नहीं मेरा इस दुनियां में आशियाँ बरबाद है’ मधली हताशा; तर ‘कभी है गम कभी खुशियां यहीं तो जिंदगानी है’ मधला स्वीकार, ‘आ भी जा आ भी जा आज मेरे सनम’ (शामे गमकी कसम) मधली आर्तता... दर्दच्या या छटा किती सहज उतरतात तलतच्या गाण्यात. म्हणूनच ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. यातल्या दुःखितांची कीव येत नाही. 

‘रास्ते में रुक के दम ले लूँ मेरी आदत नहीं 
लौटकर वापस चला जाऊँ मेरी फ़ितरत नहीं 
और कोई हमनवा मिल जाए ये क़िस्मत नहीं 
ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ’... मजाज लखनवीची ही गझल, तलतच्या आवाजात एक वेगळी उंची गाठते. दुःखाचा सोहळा जणू! 

आवाजापेक्षाही मला तलतच्या गाण्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं सांगू? त्याचे शब्दोच्चार... शब्द असतात नेहमीचेच पण तलतच्या उच्चारात अगदी सूक्ष्म वेगळेपण असतं, त्यामुळं ते शब्द एकदम ‘हटके’ वाटतात. परेशान, मरिज, पांव, गमगीन, खून, सुहाना अशा शब्दांचे कंगोरे घासून पुसून तलत ते परेशां, मरज, पाओं, गमगीं, खूँ, सोहाना असे काय बहारदारपणे पेश करतो की ऐकत राहावे. ‘तसव्वुर’ या एका शब्दासाठी ‘फिर वो ही शाम’ ओवाळून टाकावं! 

दिलपे क्या गुजरी तेरे जानेसे कोई क्या कहे 
साँस जो आती है वो भी दर्द का पैगाम है। 

दरवेळी या ‘दर्द का पैगाम’ची नजाकत ऐकायला जीव कानात गोळा होतो माझ्या! 

या गझल किंगचा जन्मही गझलेच्या नगरीतला, लखनौचा (२४ फेब्रुवरी १९२४). वडील कर्मठ विचारांचे, त्यामुळं गाणं-चित्रपट कशालाच घरून पाठिंबा नव्हता. पुढं मुंबईला आल्यावर पार्श्वगायक म्हणून नाव झाल्यावर मग वडिलांनी स्वीकारलं, त्या आधी घरचा विरोध पत्करून मॉरिस कॉलेज (आत्ताचे भातखंडे संगीत विद्यालय) इथं गाण्याचं शिक्षण, सोळाव्या वर्षीच ऑल इंडिया रेडिओ लखनौला गैरफिल्मी गझल गायनाचे कार्यक्रम. मग कलकत्ता, मुंबई असे त्याकाळचे स्वाभाविक टप्पे. कलकत्त्याला असताना ‘तसवीर तेरी दिल मेरा बेहला न सकेगी’ (१९४४) ही गझल प्रचंड गाजली. मुकेशप्रमाणंच याच्याही डोक्यात अभिनयाचं वेड. चित्रपटकारकीर्द (आपल्या सुदैवानं) काही चालली नाही, पण त्यामुळं बंगाली नटी ललिता मल्लिक ही मात्र जीवनसाथी म्हणून लाभली. पुढं १९४९ ला मुंबईला आल्यावर अनिल विश्वास यांच्या पारखी नजरेनं तलतच्या गझलेतली जादू  
 
हेरली. १९५० मध्ये ‘आरजू’मधे दिलीपकुमारसाठी तलत गायला, गाजला आणि स्थिरावला. ते गाणं होतं - ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..’  दिलीपकुमारच्या रोमँटिक प्रतिमेला साजेसा आवाज आणि गायकी, त्याचं जोरदार स्वागत झालं नसतं तर नवल. तेव्हा देव - दिलीप - राज यांच्या जोडीनंच रफी, तलत, मुकेश हेही चित्रपटासंगीतसृष्टीचे नायकच होते! दिलीपकुमार - तलत मेहमूद जोडीचे ‘आरजू’शिवाय हे अजून काही चित्रपट आणि त्यातली गाजलेली गाणी पाहा - बाबूल (नौशाद - मेरा जीवनसाथी बिछड़ गया), तराना (अनिल विश्वास - एक मैं हूँ एक मेरी), देवदास (एस. डी. बर्मन - मितवा लागी ये कैसी), संगदिल (सज्जाद हुसैन - ये हवा ये रात ये चांदनी), दाग (शंकर-जयकिशन - ऐ मेरे दिल कहीं और चल), शिकस्त (शंकर-जयकिशन - सपनोंकी सुहानी दुनियाको), फूटपाथ (खय्याम - शाम ए गम की कसम). 

दिलीपकुमारशी जोडी जमली तरी नौशाद आणि तलतची जोडी नाही जमली. गंमत म्हणजे तलत मेहमूद आणि शंकर-जयकिशन यांची गाणी कितीतरी जास्त आणि गाजलेली आहेत. दाग (हम दर्द के मारोंका इतना ही फसाना है, कोई नही मेरा इस दुनियामें), पतिता(अंधे जहाँके अंधे रास्ते), बुटपॉलिश (चली कौनसे देश), रूपकी रानी चोरोंका राजा (तुम तो दिलके तार छेड़कर). 

मुलायम मखमली दर्दभरी गझल गायकी आणि मदनमोहन हे एकत्र आले आणि एक सुंदर सुरेल ठसा उमटवून गेले. मदहोश (मेरी यादमें तुम ना आंसू बहाना), देख कबीरा रोया (हमसे आया ना गया), जहाँआरा (मैं तेरी नजरका सुरूर हूँ), आशियाना (मैं पागल मेरा मनवा पागल, मेरा करार लेजा), हक़ीक़त (होके मजबूर मुझे), बहाना (बेरेहम आसमां). 

सी. रामचंद्र (परछाई - मुहोब्बत ही ना जो समझे), सुबह का तारा (यास्मीन - बेचैन नजर बेताब जिगर), एस. डी. बर्मन (टॅक्सी ड्रायव्हर - जाए तो जाए कहा), (देवदास - किसको खबर थी), (सुजाता - जलते है जिसके लिए), सलिल चौधरी (छाया - आंसू समझके क्यूं मुझे, इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा), (एक गाँव की कहानी - रात ने क्या क्या ख्वाब दिखाए) यांनी तलतबरोबर छान गाणी केली आहेत. याशिवाय रवि (एकसाल - सब कुछ लुटाके), खय्याम (फूटपाथ - शाम ए गमकी कसम), रोशन (अनहोनी - मैं दिल हूँ एक अरमान भरा), ओ. पी. नय्यर (सोने की चिड़िया - प्यार पर बस तो नही है), नाशाद (बारादरी - तस्वीर बनाता हूँ), जयदेव (किनारे किनारे - देख ली तेरी खुदाई), गुलाम मोहम्मद (मिर्झा गालिब - फिर मुझे दिदा ए तर याद आया) या संगीतकारांबरोबरची काही प्रसिद्ध गाणी. 

तलत मेहमूदची द्वंद्व गीते हा एक भन्नाट प्रकार आहे. भन्नाट अशासाठी की तलतचा मृदु आवाज लता - आशाच्या तलम आवाजांबरोबर जसा मॅच होतो तसाच शमशाद बेगम, सुरैया यांच्या वजनदार आवाजांबरोबरही होतो. ‘मन धीरे धीरे गाए रे’, ‘दिले नादान तुझे हुआ क्या है’, ‘राही मतवाले’ (सुरैया बरोबर); ‘मिलते ही आंखे दिल हुआ दीवाना किसीका’, ‘नदी किनारे साथ हमारे’ (शमशाद बेगम बरोबर); ‘दो दिल धड़क रहे है और आवाज एक है’, ‘सच बता तू मुझपे फिदा’, ‘प्यार पर बस तो नहीं है’, ‘तेरी निगाहोंमे तेरीही बाहोंमे (आशा बरोबर) ही काही उदाहरणे. लताबरोबरची ड्युएट्स तर अफाट आहेत - ‘सीनेमें सुलगते है अरमां’, ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे’, ‘इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा’, ‘नैन मिले नैन हुए बावरे’, ‘ओ दिलदार बोलो एकबार’, ‘आसमांवाले तेरी दुनियासे’, ‘गया अंधेरा हुआ उजाला’, ‘प्यार होके रहेगा’, ‘दिले बेकरार सोजा’, ‘ये नई नई प्रीत है’, ‘दिलमे समा गए सजन’... रत्न आहेत एकेक, रत्न! 

तलत महमूद दर्दी चाहत्यांसाठी गाण्याचे हाउसफुल कार्यक्रम करत. परदेशी स्टेज शो करणारा हा पहिला हिंदी गायक, भारताचा फ्रँक सिनात्रा म्हणत त्याला. साधारण ८०० चित्रपटगीतं आणि २०० च्या आसपास गैरफिल्मी गीतं अशी कारकीर्द. पद्मभूषण तलत मेहमूद ९ मे १९९८ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. चित्रपटसृष्टीतून ते त्या आधी बरीच वर्षं बाजूला झाले होते. 

साठच्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपटाचा बाजच बदलायला लागला. शम्मी कपूरचे ‘राजकुमार’, ‘काश्मीर की कली’, ‘जंगली’, ‘अॅन इवनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारी’ असे चित्रपट बॉक्स ऑफिस वर हंगामा करू लागले. तलतची खानदानी गझल मागं पडू लागली. पण संपली नाही. पारंपरिक जरतारी पैठणीसारखी आपण ती जपली, खास प्रसंगांत बाहेर काढायची, पुन्हा हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवायची. 

Our sweetest songs are those 
that tell of saddest thought 
पर्सी शेले या इंग्लिश कवीच्या To a skylark या कवितेतील प्रसिद्ध ओळी. सुखदुःखाची विरोधाभासी एकतानता सांगणाऱ्या. त्यावर गीतकार शैलेंद्रनी गाणं लिहिलं - 
है सबसे मधुर वो गीत जिन्हें 
हम दर्द के सुर में गाते है... 

तलत मेहमूदची दर्दभरी गाणी अशीच आहेत, दुःख सांगणारी पण आनंद देणारी... आहेत उदास तरी गमती मनोहर

संबंधित बातम्या