यहाँ के हम है राजकुमार..

अंजोर पंचवाडकर 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

आवडत्या संगीतकारांच्या गाण्यांची प्लेलिस्ट करत बसणं हा माझा फावल्या वेळातला उद्योग. विविध पोर्टल्सवर खूप तयार प्लेलिस्ट्स मिळतात. पण त्यातली सगळीच गाणी खास असतात किंवा त्याच क्रमानं हवी असतात असं नाही. शंकर-जयकिशन ऐकताना हे प्रकर्षानं जाणवतं. ''ओ बसंती पवन पागल'' कानातून हृदयात झिरपायच्या आत लगेच ''चक्के पे चक्का चक्के पे गाडी'' ऐकायला कसं आवडेल? किंवा ''रात अंधेरी दूर सवेरा''नंतर ''आसमानसे आया फरिश्ता''? काय कमाल आहे ना ‘एसजें’ची पण! काय जबरदस्त परिघ, काय ते चालीतील वैविध्य! ''मेरी आंखोमें बस गया कोई रे'' ते ''चल संन्यासी मंदिरमे''पर्यंत रेंज आहे त्यांची. 

आमचा एक मित्र ‘एसजें’ना संगीताचे दुकानदार म्हणतो. मी त्याला म्हटलं दुकान असेलच तर साड्यांच्या भव्यदिव्य भव्य शोरूम सारखं आहे. अगदी रोजच्या वापरातल्या टिकाऊ दणकट लोकप्रिय हव्यात.. ‘आवारा हूँ’, ‘दिलके झरोखेमे’, ‘पंछी बनू सारख्या’, की ठेवणीतल्या, बनारसी, पैठणी, कांजीवरम - ‘सुनो छोटिसी गुड़ियाकी’, ‘किसीने अपना बनाके मुझको’, ‘जा जा रे जा बालमवा’ सारख्या? की हातमागाच्या अभिरूचीपूर्ण खास प्रेमातल्या - ‘अजीब दास्तां है ये’, ‘हम तेरे प्यारमे सारा आलम’, ‘उनसे प्यार हो गया’ सारख्या? 

साधारण १९४९ ते ७१ या काळात १३० चित्रपटांना या दोघांनी एकत्र संगीत दिलं. वर्षाला सरासरी ६ चित्रपट म्हटलं आणि प्रत्येक चित्रपटात किमान ७-८ तरी गाणी.. म्हणजे काय अफाट काम आहे बघा या जोडीचं.. आणि बरोबर स्पर्धेत कोण तर एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर यांसारखे ''लाख मोलाचे'' संगीत सिकंदर. राजकपूर, अमिया चक्रवर्ती, हृषिकेश मुखर्जी, लेख टंडन, किशोर साहू या नेहमीच्या दिग्दर्शकांशिवाय दक्षिणेतल्या श्रीधर, एम. व्ही. रामन, के. शंकर, टी. प्रकाश अशा अनेक निर्माता दिग्दर्शकांबरोबर ‘एसजें’नी प्रचंड काम केलं आहे. 

कसं असतं ना, चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार असला तरी त्याची निर्मिती हा शेवटी व्यवसाय आहे. निर्मात्याला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायला हवा असतो आणि या ''बॉक्स ऑफिस''ची किल्ली शंकरजयकिशनच्या ताब्यात होती. असं म्हणतात, की एसजेंनी साध्या कागदावर ''आम्ही यांच्या चित्रपटाला संगीत द्यायला तयार आहोत'' अशी एक ओळ लिहून खाली सह्या केल्या, की फायनान्सर हिरो-हिरोइन कोण आहे हेही न विचारता पैसे गुंतवायला तयार होत. यात अतिशयोक्ती असेलही, पण एसजेंच्या संगीतामुळं चित्रपट चालणार हा विश्वास त्यांनी कमावला होता हेही नक्की. शंकर आणि जयकिशन वेगवेगळी स्वतंत्र गाणी कंपोज़ करत त्यामुळं साहजिकच जास्त संख्येनं चित्रपट स्वीकारू शकत असतील, एकसे भले दो या न्यायानं. 

एसजेंच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी चित्रपटाच्या संगीताचा प्राण कशात आहे ते नेमकं ओळखलं होतं. गीतकार तर त्यांच्याच मैत्रीतले; शैलेंद्र आणि हसरत जयपुरी. मुख्य गायक म्हणजे लता, रफी, मुकेश, मन्ना डे आणि राजकपूर, शम्मी कपूर, राजेंद्र कुमारसारखे नट; या सगळ्यांच्या खुबी योग्य प्रकारे वापरून, लकबी हेरून, त्यांचा आवाका ओळखून प्रत्येक गीत केलं. कदाचित त्यामुळंच त्यांच्या शैलीत प्रचंड विविधता दिसते. राजकपूरची साधा, भोळा, कधी परिस्थितीने गांजलेला, सच्चे प्रेम करणारा नायक अशी जी प्रतिमा तयार झाली त्यात एसजेंच्या गाण्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आवारा हूँ, सब कुछ सीखा हमने आणि मेरा जूता है जापानी ही गाणी राजकपूरच्या प्रतिमेसाठी माइलस्टोन ठरली. पण हेच एसजे शम्मी कपूरच्या धड़ाकेबाज धसमुसळ्या नायकासाठी; दिवानेका नाम तो पूछो, चाहे कोई मुझे जंगली कहे, तुमने किसी की जानको जाते हुए देखा है... अशी किती वेगळ्या बाजाची गाणी देतात. आणि राजेंद्रकुमारची सुस्वभावी आदर्श रोमँटिक हिरो ही प्रतिष्ठापना करायला ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका, बहारों फूल बरसाओ, कौन है जो सपनोमे आया, तुम कमसीन हो नादां हो असली बहारदार प्रेमगीतं. गंमत म्हणजे एसजेंनी देव आनंदसाठी दिलेल्या गाण्यांवर एस. डी. बर्मनची छाप मला जाणवते. बघा बरं, पतिता (याद किया दिलने कहाँ हो तुम), लव्ह मॅरेज(धीरे धीरे चल चाँद गगनमे), असली नकली (छेडा मेरे दिलने तराना तेरे प्यारका). म्हणून मला नेहमी वाटतं एखाद्याला गणित सोडवायला चांगलं जमतं, कुणाला छान स्वयंपाक जमतो, तसं एसजेंना गाणं जमलं. पूर्वी चित्रपटाचे ट्रेलर्स आजच्यासारखे केव्हाही कुठेंही गळत नसत. त्या त्या टॉकीजमधे आगामी चित्रपट कुठला ते दाखवलं जाई किंवा रेडिओवर जाहिरात केली जाई. मुख्यतः प्रेक्षक चित्रपटगृहाकडं खेचला जाई तो, त्यातली रेकॉर्ड झालेली गाणी ऐकून. गाणी गाजायला लागली की चित्रपट चालणार असं साधारण समीकरण असे. एसजेंच्या संगीतामुळं अनेक चित्रपटांच्या सिल्व्हर जुबिल्या होत. निर्माते एसजे ब्रँडसाठी एका चित्रपटाचे ४ ते ५ लाख द्यायलाही तयार असत. 

हैदराबादेतून आलेला तबलावादक शंकर सूर्यवंशी आणि गुजरातेतल्या वंसाडा या लहान गावातून आलेला पेटीवादक जयकिशन पांचाळ मुंबईत भेटतात, वयात दहा वर्षाचं अंतर असूनही त्यांच्या मैत्रीची तार जुळते. शंकर जिथं तबलजी म्हणून काम करे त्या पृथ्वी थिएटरमधे तो जयला नोकरीला लावतो, दोघांची एकत्र संगीतकार म्हणून हुस्नलाल-भगतराम यांच्याकडं उमेदवारी सुरू असतानाच राज कपूरचे ‘बरसात’च्या संगीतकार राम गांगुली (जिंदा हूँ इस तरहा वाले) यांच्याशी मतभेद होतात आणि तो चित्रपट या जोडीच्या हातात येतो... सगळंच अतर्क्य, नियतीनं घडवून आणलेलं. ते दोघं आले आणि त्यांनी जिंकलं. 
 

जावेद अख्तर यांच्या मते Pre-SJ आणि Post-SJ ही एक मोठी क्रांतीच आहे. पूर्वी गाण्याच्या चालींना फक्त महत्त्व असायचं. गाण्यासाठी चांगली चाल अत्यावश्यकच, पण त्याबरोबर पाश्चात्य ऑर्केस्ट्रासारखा वाद्यमेळ एसजेंनी आणला. पूर्वीही पाश्चात्य वाद्यं वाजवली जात पण बहुतेक वेळी, साथ केल्यासारखी. चित्रपटसंगीतांत एसजेंनी ऑर्केस्ट्रा स्टाइल सिम्फनीला महत्त्वाचं स्थान दिलं. जावेद म्हणतात गाण्याच्या लघुकथेची कादंबरी केली एसजेंनी. 

पाश्चात्य सुरावटी ''चोरून'' गाणी केली हा आरोप एसजेंवरही केला जातो. या चोरीच्या आरोपाला उत्तर कशाला देत बसायचं? त्यांनीच केलेलं बाकी काम बोलतंच की. दोघंही मूळचे वादक असल्यानं रागसंगीतावरची त्यांची पकड जबरदस्त होती. बहारों फूल बरसाओ, ओ मेरे सनम ओ मेरे सनम, जाने कहां गए वो दिन (शिवरंजनी), झनक झनक तोरी बाजे पायलिया, तू प्यारका सागर है, कोई मतवाला आया मेरे द्वारे (दरबारी), मनमोहना बड़े झूठे (जयजयवंती) आणि भैरवी तर त्यांचा सगळ्यात मनपसंत राग. त्यावर आधारित रचना पाहा - तेरा जाना, मैं पिया तेरी तू माने या ना माने, दोस्त दोस्त ना रहा, तुम्हे और क्या दूं मैं दिलके सिवा, रमैया वस्तावैया, ऐ मेरे दिल कही और चल, सुनो छोटिसी गुड़िया की लंबी कहानी. (जयकिशनच्या मुलीचं नावही भैरवी). 

एसजेंची ड्युएट्स हा एक खास विषय आहे. लताबाई होत्याच आणि रफी, मन्ना डे, मुकेशसारखे गुणी गायक. प्यार हुआ इकरार हुआ, आजा रे अब मेरा दिल पुकारा, ये रात भीगी भीगी, ऐ दिल न मुझसे छुपा, धीरे धीरे चल चाँद गगन में, दम भर जो उधर मुह फेरे, याद किया दिलने (हेमंतकुमार), एक नजर किसीने देखा (किशोरकुमार), प्यार होके रहेगा (तलत मेहमूद) किती सुंदर सुंदर गाणी. मला त्यांची शम्मी कपूरची ड्युएट्स विशेष आवडत नाहीत. काळाबरोबर एसजे बदलले असतील, माझी आवड मागंच रेंगाळत राहिली. 

हृदयनाथ मंगेशकरांनी एका मुलाखतीत जयकिशनचा एक किस्सा सांगितला होता. हृदयनाथ पेटीवर ''गजानना श्री गणराया''ची चाल लावत बसले होते. जयकिशन तिथं आले. म्हणाले, क्या चल रहा है? हृदयनाथांनी, गाणं गाऊन दाखवलं आणि म्हणाले, तिसऱ्या ओळीची चाल मनासारखी होत नाही. जयकिशन म्हणाले, हमारा वो गाना है ना, मैं पिया तोरी तू माने या ना माने, उसीका तिसरा लाइन उठाओ और लगाओ यहां! काहेको बजाए तू मिठी मिठी ताने... मंगलमूर्ति तू गणराया... 

हा किस्सा ऐकल्यावर मला वाटलं, आता हे तर मूळ संगीतकारच सांगतोय की माझं जे नोटेशन चपखल बसतंय ते वापर. गाणं छान होणं महत्त्वाचं! गाण्याचं गणित, गाण्याचं शास्त्र म्हणतात ते हेच असणार, ज्यावर या अवलियांची हुकुमत होती. मंगेशकर सांगतात जयकिशन बसल्या बसल्या पेटी पुढं ओढून चित्रपटातील पार्श्वसंगीत एका बैठकीत तयार करत. प्रसंग एकदा फ़िल्मवर बघायचा, बघताना बोटावर मात्रा मोजायच्या, स्टॉपवॉचसारख्या. उदाहरणार्थ; हिरॉईन खोलीतून बाहेर येतेय, जिना उतरतेय, आता पळत बागेत जातेय... हे सगळं बोटावर मोजून सहाय्यकाला म्हणायचे, चलो लिखलो नोटेशन! 

गाणं ''ऐकणाऱ्याला'' गाण्यात गुंगवायचं कसब संगीतकाराचं (आणि अर्थात गायकांचं). गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत गाण्याचा भाव उतरला, की पुढं गाणं फुलवत नेऊन शेवट पुन्हा अलवार. ओ मुझे किसीसे प्यार हो गया, सजनवा बैरी हो गये हमार, राजाकी आएगी बारात आणि ये मेरा दिवानापन है, ही गाणी मला यासाठी फार आवडतात. 

एसजेंची जोड़ी, ''रेंज, वैविध्य, सातत्य'' यामुळे दोन दशकं लोकप्रियतेच्या शिखरावर होती. १९५९ च्या बिनाका टॉप १० मधली ७ गाणी एसजेंची होती! पण जे वर जातं ते कधी ना कधी खाली येतंच या न्यायानं या जोडीत कुरबुरी सुरू झाल्या अशा अफवा उठू लागल्या, खऱ्या असतील, नसतीलही. पण १९७१ मध्ये जयकिशनच्या अकाली निधनापर्यंत दोघं शंकर-जयकिशन या नावाखाली एकत्र होतेच, जयकिशनच्या मृत्यूनंतरही काही वर्षं शंकरनं याच बॅनरखाली संगीत दिलं. मेरा नाम जोकर त्यांचा शेवटचा एकत्र सिनेमा. मराठीतलं ''हिरव्या हिरव्या रंगाची झाड़ी घनदाट'' हे गाणं शंकरचं! दोघांच्या स्वभाव, राहणीमान यात कमालीची भिन्नता आणि तरी दोघांनी मिळून संगीत मात्र एकतानतेनं, परस्परसमजुतीनंच केलं, त्याशिवाय इतकं यश मिळालं नसतं. जयकिशन गेल्यावर, त्याच्या आवडत्या ''गेलॉर्ड''मधे महिनाभर त्याच्या स्मृतीसाठी एक टेबल मेणबत्ती लावून जयकिशनच्या नावानं रिज़र्व ठेवलं गेलं. चर्चगेटच्या त्या चौकाला शंकर-जयकिशन चौक नाव दिलं गेलं. शंकर १९८७ मध्ये गेले, काहीसे एकाकी. चित्रपटसृष्टीतील लोकांनाही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून कळलं. 

हमसे मुहब्बत हमसे जवानी 
रंग भरी है अपनी कहानी 
सारी दुनिया में अपनी जयकार 
यहाँ के हम हैं राज कुमार... 

राजकुमार चित्रपटातील या ओळी शंकर-जयकिशन या जोडीसाठीच लिहिल्यात जणू!

संबंधित बातम्या