गूढ गंभीर स्वर

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

आपल्या नकळत आपण मनाशी काही गोष्टींच्या संगती लावत असतो. मी पहिल्यांदा गोमुख-गंगोत्री ट्रेकला गेले होते, वळणावळणाच्या अरुंद पायवाटेवर एका बाजूला खोल दरीत सतत गंगेची साथ, एका बाजूला उंच कडे. वाटेत दुरून एक अनवाणी साधू चालत येताना दिसला. मला वाटलं की हा नक्की 'गंगा आये कहासे गंगा जाए कहाँ रे', 'जनम जनमसे बंजारा', 'राही तू मत रुक जाना' किंवा 'प्रलय पयोधि जले' असलं काही गात असणार. जवळ आल्यावर कळलं की तो काही गातबित नव्हता, माझ्याच मनात साधूचा स्वर म्हणजे हेमंत कुमारचा आवाज हेच समीकरण फिट बसलं होतं. लताही तेच म्हणते, की हेमंतदांचा आवाज मंदिरात भजन गणाऱ्या साधू सारखा आणि सलिल चौधरी म्हणतात की हेमंतदांचा आवाज प्रत्यक्ष देव गायल्यासारखा.

आपण गूढरम्य हा शब्द अनेक वेगवेगळ्या संदर्भात वापरत असतो. व्हॅन गॉगची चित्रं, हिचकॉकचे चित्रपट, जींएच्या कथा..... आणि हेमंत कुमारचा आवाज, यांचं वर्णन करायला गूढरम्य याहून दुसरा चपखल शब्द नाही. हेमंत कुमारच्या आवाजातली गूढता अस्वस्थ करणारी नाही तर गाण्यातल्या सच्चेपणामुळं उत्सुकता चाळवणारी आहे.

ज्यांना हेमंतदांची गाणी विशेष आवडत नाहीत त्यांनी ती नीट ऐकली नसावीत, फक्त त्यातलं सदोष सानुनासिकत्व हेरलं असावं असं मला वाटतं. माझ्यासारख्या ज्यांना हेमंतदा आवडतात त्यांची त्या बंगाली वळणाच्या उच्चाराबद्दल, नाकातल्या गायकीबद्दल काही हरकत नसते. उलट त्यांच्या आवाजातलं वेगळेपण भुरळ घालतं. मला एसडी, देवआनंद आणि हेमंतदा यांच्या कामात एक फील गुड फॅक्टर जाणवतो. 'है अपना दिल तो आवारा' हे गाणं खरं तर मला विशेष आवडत नाही, पण त्यातल्या याच फील गुड फॅक्टरमुळे पुन्हापुन्हा ऐकायलाही चालतं. 'तेरी दुनियामें जिनेसे', 'न तुम हमे जानो', 'चुप है धरती', 'शिवजी बिहाने चले', 'गुपचूप गुपचूप प्यार करे', 'दिलकी उमंगे है जवान' आणि अर्थातच 'ये रात ये चांदनी फिर कहाँ'; तिघांच्या एकत्र अशा या सगळ्या गाण्यात तर 'हा छान वाटायला लावणारा घटक' फारच मोठा आहे. 'जाने वो कैसे' या गाण्यासाठी गुरुदत्तच्या मनाविरुद्ध (त्याला हेही गाणं रफीनं गायला हवं होतं) ठामपणे एसडींनी हेमंत कुमारलाच गायला बोलावलं असा किस्सा आहे. तो खरा असेल नसेल; पण गाणं ऐकताना दरवेळी मी एसडीला  मनातल्या मनात सलाम करते, गायकाच्या निवडीसाठी. 'हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला' ऐकताना अक्षरशः काटा येतो अंगावर. खामोशी मधल्या, 'तुम पुकारलो' मधला 'तुम'चं उच्चारण ऐकताना, 'कैसे कोई जिये' (बादबान)च्या सुरुवातीचे 'आया तूफान' ऐकताना, 'बहते हुए आंसू और बहे अब ऐसी तसल्ली रहेने दो' (या दिलकी सुनो, अनुपमा), 'बना भी न था जल गया आशियाना' (न ये चाँद होगा, शर्त),  'ज़रा देख ये क्या हवा चली न रहा सलीम न वो कली' (ऐ बाद ए सबा, आहिस्ता चल) ऐकताना मनाच्या गाभाऱ्यात खोलवर हलतं काही.

हेमंत कुमार यांना स्वतःलाही गूढतेचं आकर्षण असावं. त्यांनी संगीत दिलेल्या, 'कोई दूरसे आवाज दे चले आओ', 'झूम झूम ढलती रात', 'कहीं दीप जले कहीं दिल' या गाण्यांत गूढता स्पष्ट जाणवते. यातील 'कोहरा', 'बीस साल बाद' या रहस्यपटांची निर्मितीही त्यांचीच. गायक म्हणून हेमंतदा संगीतकारांचे गायक होते. संगीतकार म्हणून अत्यंत प्रतिभावान आणि प्रयोगशील होते. आणि निर्माते म्हणून प्रयोगशील आणि धाडसी होते. त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट, 'आनंदमठ'मध्ये ही प्रयोगशीलतेची झलक दिसते. 'हरे मुरारे प्रलय पयोधि जले' या गाण्यातले त्यांचं आणि गीता दत्तचं फेड इन-फेड आउट पद्धतीचं ड्युएट किंवा 'वंदे मातरम'ला दिलेला समरगीताचा जोशपूर्ण बाज हा अगदी आउट ऑफ द बॉक्स म्हणावा असा. आणि 'नागिन'मधली 'बीन शिवायची बीन' विसरून कसं चालेल? ती त्यांचे सहाय्यक रवि आणि आनंदजी यांनी कीबोर्डवर वाजवली आहे. १९५४ साली आलेला 'नागिन' हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट. काय एकेक गाणी होती. 'मन डोले मेरा तन डोले', 'जादूगर सैय्या छोड़ मोरी बैय्या', 'तेरे द्वार खड़ा एक जोगी, जिंदगी के देनेवाले', 'ऊंची ऊंची दुनिया की दीवारे', 'अरी छोड़ दे पतंग मेरी  छोड़ दे' आणि 'मेरा दिल ये पुकारे आजा' (शाळेत मराठीच्या बाईंनी 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार' या कवितेला या गाण्याची चाल लावली होती. आमची एका झटक्यात पाठ झाली होती ती कविता!) 'नागिन' चित्रपटासाठी हेमंतदांना फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड मिळालेच पण त्याच्या संगीतामुळे चित्रपट कसा सुपरहिट झाला, त्याचाही एक मजेशीर किस्सा आहे. चित्रपटाचं संगीत 'कॅची' झालंय हे निर्माते एस मुखर्जी यांनी ओळखलं. त्यांनी 'नागिन'च्या हजार रेकॉर्ड्स रेस्टॉरंट्स, कॉफीशॉपमध्ये फुकट वाटल्या. 'नागिन'चं संगीत तिथे वाजायला लागलं आणि चित्रपट तूफान गर्दी खेचू लागला. 

हेमंत कुमार यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमधलं वैविध्य पहा; 'बीस साल बाद', 'कोहरा', 'बीबी और मकान', 'फरार', 'राहगीर', 'खामोशी'. यातील फक्त 'बीस साल बाद' आणि 'खामोशी' यांना म्हणावं तसं व्यावसायिक यश मिळालं. त्यांनी निर्मिलेला पहिला बंगाली चित्रपट 'नील आकाशेर नीचे'सुद्धा खूप वेगळा होता. सुरूवातीला सेंसॉरच्या कात्रीत अडकलेला हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपटासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराचाही मानकरी ठरला.

'जब जाग उठे अरमां तो कैसे नींद आये', 'ये नयन डरे डरे', 'चली गोरी पी से मिलन को चली' (संगीतकार हेमंतकुमार), 'चंदनका पलना रेशम की डोरी' (नौशाद), 'चलती चले जाए जिंदगी' (किशोर कुमार), 'जिंदगी प्यारकी दो चार घड़ी' (सी रामचन्द्र) ही अजून काही माझी आवडती गाणी.

हेमंत कुमार आणि लता यांची द्वंद्वगीतं हा खरं तर स्वतंत्र लेखाचा आवाका आहे. साक्षेपी, संगीतकारांनी गायक म्हणून केलेली हेमंत कुमारची निवडही त्या प्रत्येक गाण्यासाठी अगदी चपखल. 

सी रामचंद्र- 'उम्र हुई तुमसे मिले', 'गगन झनझना रहा है', 'जाग दर्दे इश्क़ जाग'. सलिल चौधरी- 'झिर झिर बदरवा बरसे'. रवि- 'ये झूमते नजारे'. शंकर जयकिशन- 'याद किया दिलने', 'आ नीले गगनके तले'. वसंत देसाई- 'नैन सो नैन नाही मिलाओ'. रोशन- 'धीरे धीरे चढ़ गया नदीमें', 'छुपालो यूं दिलमे'. एस.डी. बर्मन- 'पिछे पिछे आकर', 'ये रात ये चांदनी'. कल्याणजी आनंदजी- 'नींद ना मुझको आए', 'तुम्हे याद होगा'. आणि स्वतः हेमंतकुमार- 'वो चाँद चुपके करता है क्या इशारे', 'सांवले सलोने आये दिन बहारके....'

सगळ्या गाण्यांबद्दल सविस्तर लिहिणं शक्य नाही. पण दोन गाणी माझी प्रचंड लाडकी आहेत, त्याबद्दल लिहिलं नाही तर मलाच लेखन अपूर्ण वाटेल. दोन्ही गाण्यांच्या प्रकृती भिन्न आहेत आणि तरी त्यातील हेमंत कुमार फॅक्टर कमाल आहे.

पहिलं आहे हेमंतदांचं एक सोलो आणि त्याचच 'दो पेहलु'वालं ड्युएट. गोव्याच्या खेड्यातला, चंद्रप्रकाशात नहालेला एक किनारा. माडांच्या आडोशात गिटार वाजवत तिला बाहेर बोलावणारा, मोहाच्या जाळ्यात ओढणारा टोनी (देव आनंद), त्याच्या सच्चेपणाबद्दल मनात साशंक असलेली पण मनापासून प्रेम करणारी, जावे की न जावे अशा द्विधा मनस्थितीत अडकलेली मारिया (गीता बाली). 
साहिरचे जादुई शब्द, 'एसडी'ची अफाट चाल....
लहरों के होंठों पे धीमा धीमा राग है
भीगी हवाओं में ठंडी ठंडी आग है
इस हसीन आग में तू भी जलके देखले
ज़िंदगी के गीत की धुन बदल के देखले
खुलने दे अब धड़कनों की ज़ुबाँ
सुन जा दिलकी दास्तँा! 

'ये रात ये चांदनी फिर कहाँ' या सोलोमध्ये आणि ड्युएटमध्ये, आपण ज्याला एरवी साधूचा स्वर म्हणतो तो हेमंत कुमारचा आवाज सेड्यूसिंग, मोहात पाडणाऱ्या, जाळ्यात ओढणाऱ्या देव आनंदला परफेक्ट शोभलाय. ही जादू हेमंतदांबरोबरच, अर्थात एसडी, साहीर आणि देव आनंदचीसुद्धा.
दुसरे ड्युएट अगदी त्या उलट. तारुण्यातील प्रेमाची अनेक वर्षांच्या विरहानंतरची उत्कट पण अपूर्ण पुनर्भेट. परिस्थितीमुळे तवायफ बनलेली ती, परदेशातून परतलेला यशस्वी तो. पुन्हा त्याच्याकडे जाणे नाकारून ती आपल्या अनाथ मुलीला सांभाळायची त्याला विनंती करतेय...

फिर आग बिरहा की मत लगाना 
के जलके मैं राख हो चुकी हूँ
त्यावर त्याचे आश्वासक उत्तर:
ये राख माथे पे मैने रख ली 
के जैसे मंदिर में लौ दिये की....

संगीतकार रोशनला कुठल्या विलक्षण पवित्र क्षणी या गाण्याची चाल सुचली असेल? आणि मजरूहचे शब्द किती हळुवार! हेमंत कुमारचा स्निग्ध आवाज ऐकणाऱ्याचे अक्षरशः मन निववतो, डोळ्यात पाण्याची धार कधी सुरू होते कळतही नाही. आमचे एक मित्र या गाण्याला 'प्रेमाची प्रार्थना' म्हणतात, किती योग्य वर्णन! मागे रोशनवर लिहिताना मी लिहिलं होतं की आमच्याकडे आलेली मुलीची जर्मन मैत्रीण 'छुपालो' ऐकताना किती भारावून गेली होती ते. गंमत म्हणजे 'ये रात ये चांदनी' माझ्या मुलीचं अत्यंत आवडतं गाणं आहे. म्हणजे बघा, आवाजाला 'मर्यादा' असणाऱ्या हेमंतकुमारनं खरं तर ही दोन्ही भिन्न गाणी किती जबरदस्त निभावली आहेत! 
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटांचा चेहरा बदलू लागला आणि अर्थातच त्यातील संगीताचाही. त्यामुळे १९७० नंतर हेमंतदा इथे रमले नाहीत. ते बंगालीतले 'टॉप'चे संगीतकार गायक होते आणि जगभर रविंद्रसंगीताचे खंदे प्रसारक. मराठीसह इतर अनेक भारतीय भाषांत त्यांनी गायलं आहे. 'हॉलिवूड'ची फिल्म 'सिद्धार्था'साठीही त्यांनी संगीत आणि पार्श्वगायन केलंय. मराठीत हेमंतदांनी गायलेली 'मी डोलकर डोलकर' आणि 'गोमु संगतीनं' ही गाणी गाजली.

स्वतः संगीतकार असूनही हेमंत कुमार इतर कितीतरी संगीतकारांकडं गायलेत आणि सुरेखच गायलेत. असं उदाहरण बहुधा दुसरं नसेल. (किशोर संगीत देत असला तरी मूलतः गायकच) रवि आणि कल्याणजी-आनंदजी हेमंतदाचे एकेकाळचे ासहाय्यक. एसडी, एसजे, सी रामचंद्र हे स्पर्धक खरं तर. मला वाटतं याला दोन-तीन कारणे असावीत. एक म्हणजे त्यांची विशिष्ट गायकी. दुसरं असं, की बंगाली चित्रपटसृष्टीत नंबर एक असल्याने हेमंतदा इथल्या स्पर्धेत फारसे नसावेतच. आणि तिसरं महत्त्वाचं कारण माझ्यामते, त्यांचा अतिशय निर्मळ सुस्वभाव! लताला घशाचा गंभीर आजार झाला होता. आजारातून बरी झाल्यावर चार महिन्यांनी तिनं प्रथम रेकॉर्डिंग करायचं ठरवलं तेव्हा खूप विचार करून हेमंत कुमारचं 'कहीं दीप जले कहीं दिल' गायचं नक्की केलं. कारण एकच, ऐनवेळी गायला जमलं नाही तर हेमंतदा त्याचा गवगवा करणार नाहीत, सांभाळून घेतील ही खात्री! संगीतकार रवी हेमंत कुमारचे ऋण कायम मानत आलेत. केवळ त्यांच्या प्रोत्साहानामुळं मी स्वतंत्र संगीत देऊ लागलो, असं ते आवर्जून सांगत. हेमंतदांच्या पत्नी गायिका बेला मुखर्जी सांगतात, हेमंतदांनी किती गरीब कुटुंबांना मदत केली होती, ते त्यांनाही हेमंतदा गेल्यावर कळलं. कलेपेक्षाही कलाकाराला मोठं करतं ते त्याचं माणूसपण!! 

वाराणसीला १६ जून १९२० ला जन्मलेले हेमंत कुमार मुखोपाध्याय, वयाच्या तेराव्या वर्षीच कोलकाता ऑल इंडिया रेडियोवर पहिल्यांदा गायले. अनादि घोष यांच्याकडे रविन्द्र संगीताचे रीतसर शिक्षण घेत होते. इंजीनियरिंगचं शिक्षण अर्धं सोडून शेवटी 

पूर्ण वेळ गाणं करण्याचा त्यांचा निर्णय किती योग्य होता नाही? शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या आणि तीस वर्षांपूर्वी (२६ सप्टें. १९८९) हे जग सोडून गेलेल्या हेमंतदांची गाणी आज विशीत असलेल्या मुलांना भुरळ घालू शकतात. संगीताचं अमरत्व म्हणतात ते हेच असावं!   

संबंधित बातम्या