आज सोचा तो....

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

एखाद्या निवांत संध्याकाळी बाल्कनीत बसावं, हातात आवडत्या कॉफीचा मग, एखादं जिवलग पुस्तक असावं आणि तरी कशातही मन रमू नये. जुन्याच कुठल्या तरी दुखाःची आठव येत रहावी. उगाच डोळे भरून यावेत. ‘आज सोचा तो आंसू भर आए....’ किंवा ‘शाम जब आंसू बहाती आ गयी। हर तरफ गमकी उदासी छा गयी....’ लता-रफी-मदनमोहन यांच्या साथीने मनावरची ती अनामी जडता भारदस्त होऊन रहावी. यातून सावरायला मग ‘सांवरी सुरत मन भायी..’ किंवा ‘आपकी नजरोने समझा..’च्या प्रसन्नतेचा उतारा लागावा.

मला मदनमोहन प्रचंड आवडतो हेच मुळात प्रचंड मोठं अंडरस्टेटमेंट आहे. अगदी शाळेत असल्यापासून रेडियोवर, ‘इस गानेके बोल है राजेंद्रकृष्ण/ राजा मेहेंदी अली खां/ कैफी आझमी के, और संगीत दिया है मदनमोहनने’ ऐकलं की जे गाणं लागेल ते खास असणारच ही खात्री. शाळेत असताना ‘नैना बरसे’ आणि ‘तू जहां जहां चलेगा’ ही गाण्याच्या भेंड्यांची हक्काची गाणी होती. तेव्हा ‘कर चले हम फिदा जान ओ तन साथियों’ ऐकून उर भरून येई. मोठं झाल्यावर ‘लग जा गले..’ने चकित केलं, ‘नैनो में बदरा छाए’ ने वेड लावलं, ‘होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा’ हे गाणं तर काळजाचा ठाव घेणारे, काय शब्द; काय चाल! ‘होके मजबूर..’ हे केवळ एक चित्रपट गीत नव्हेच, ती एक चित्रकथा आहे.
‘छेड़ की बात पे अरमां मचल आए होंगे
ग़म दिखावे की हँसी में उबल आये होंगे
नाम पर मेरे जब आँसू निकल आए होंगे
सर ना काँधे से सहेली के उठाया होगा।।’

लता/रफी यांच्या असीम अवाक्याच्या गळ्यामुळे अनेक गुणी संगीतकारांचा पट विस्तारला, बहरला. पण मुळात त्या संगीतकारांची तेव्हढी प्रतिभा होती ना? आडात होते म्हणून पोहऱ्यात आले ना? मग आपणही किस्से वादविवाद टाळून, ‘ये दुनिया ये मेहफिल’, ‘रंग और नूर की बारात’, ‘तुम जो मिल गए हो’, ‘आपके पेहलु में आकर रो दिए’, ‘मै निगाहें तेरे चेहरेसे’, ‘आपकी नजरोंने समझा’, ‘प्रीतम मेरी दुनियामें’, ‘बेताब दिलकी तमन्ना’, ‘रुके रुके से क़दम’, ‘अगर मुझसे मुहोब्बत है’, ‘दो घड़ी वो जो पास आ बैठे’ सारखी गाणी ऐकत राहायची फक्त! माझ्या सारख्यांना त्यातल्या सूर, राग, तालाचे व्याकरण कळले नाही तरी त्यातली जखम दिसते, समर्पित तरल प्रेम जाणवते, दाहकता स्पर्श करते. लता म्हणाली होती, ‘इतर संगीतकारांनी मला गाणी दिली, मदनभैयाने मला ‘गाणं’ दिलं!’ हेच आपल्या बाबतीत सुद्धा शब्दशः खरं आहे. स्वतःला सापडलेलं गाण्यातलं मर्म, गाण्याबद्दलची आत्मीयता त्या गाण्याला ‘आपलं’ करून टाकतात. 

‘जाने अब तुझसे मुलाक़ात कभी हो के न हो 
जो अधूरी रही वो बात कभी हो के न हो 
मेरी मंज़िल तेरी मंज़िल से बिछड़ आई है 
फिर वोही शाम...’ (जहाँआरा/राजेन्द्र कृष्ण/तलत मेहमूद) अगदी ज्यांची प्रेमकहाणी सफल झाली आहे अशांना सुद्धा या गाण्यातला वियोग, अधुरेपणा आपला वाटतो.

‘मिटते है मगर हौले हौले
जलते है मगर इक बार नहीं
हम शम्मा का सीना रखते है
रहते है मगर परवानो में...
तू प्यार करे या ठुकराए’ (देख कबीरा रोया/राजेन्द्र कृष्ण/लता) ऐकताना उगाच आपलाही सीना आपणच जणू प्रेमात समर्पण करत असल्यासारखा भरून येतो.

‘हमारा दर्द-ए-ग़म है ये, इसे क्यूं आप सहते हैं?
ये क्यूं आँसू हमारे, आपकी आँखों से बहते हैं?
ग़मों की आग हमने खुद लगाई आप क्यों रोए...’
(वो कौन थी/राजा मेहेंदी अली खां/लता)
स्वतःलाच जाळणाऱ्या या दर्द मधे दुसऱ्या कुणाला सामील तरी का करावं? लता आहे, मदनमोहन आहे आणि मी आहे, बास आहे की!

‘क़दम ऐसे अंदाज़ से उठ रहे थे
के आवाज़ देकर बुला लेगी मुझको...
मैं आहिस्ता आहिस्ता बढ़ता ही आया
यहां तक कि उससे जुदा हो गया मै
जुदा हो गया मै......’(हक़ीक़त/कैफी/रफी)
हे शब्द, ही चाल, हा आवाज आणि माझे पाझरणारे डोळे हेच सत्य, बाकी चित्रपटात प्रसंग क़ाय; पडद्यावर कोण गातंय हे सगळं माझ्यासाठी गैरलागू आहे.

ही वरची आणि मदनमोहनची जवळपास सर्वच गाणी आपण फक्त ऐकलेली असतात. आपल्या मराठी भावगीतांसारखी वाटतात मला ती. त्याचे व्हिडिओ कधी बघितले नसतात(बघितले तर ‘कुठून बघितले उगाच’ असा अपेक्षाभंग होतो बरेचदा). अर्थात ‘मेरा साया’, ‘मौसमर् सारखे अपवाद आहेत. बहुतांशी बी किंवा सी ग्रेड चे चित्रपट आले मदनमोहनच्या वाट्याला. कथा, अभिनय, चित्रण कुठल्याही दर्जाचे असूदे, हा आपल्या मस्तीत जीव तोडून वेड्यासारखं उत्तम संगीत देत राह्यला. 

‘कहे ये दुनिया मैं दीवाना दिन को देखूँ सपने
दीवानी दुनिया क्या जाने ये सपने हैं अपने 
घायल मन की हंसी उड़ाये ये दुनिया की रीत रे
मैं पागल मेरा मनवा पागल....’

संगीतकार रोशन आणि जयदेव हे मदनमोहनचे जवळचे मित्र. राजा मेहेंदी अली खां, राजेन्द्र कृष्ण, कैफी आझमी, अभिनेता ओमप्रकाश, सतार वादक रईस खान हेसुद्धा त्याच्या जवळच्या सुहृदांपैकी. मित्रांचा गोतावळा जमवून त्यांना उत्तम खाउपिऊ घालून संगीत मैफिल जमविणे हा शौक. पण या नंतरच्या गोष्टी. मदनमोहन घडला तो त्याच्या लखनऊच्या वास्तव्यात. बेगम अख्तर, तलत मेहमूद, फैयाजखान या कलाकारांना तो लखनऊ ऑल इंडिया रेडियोवर नोकरी करत असताना त्याने जवळून पाहिले. शब्दप्रधान संगीताचे बीज तिथेच रोवले गेले. मुंबईत जद्दनबाईंचा शेजार होता. या साऱ्यातून झिरपलेली अर्थवाही शब्दप्रधान गायकी पुढे संगीत देताना ''खास मदनमोहन स्पर्श'' घेऊन बाहेर आली. 

राय बहाद्दूर चुनीलाल या अत्यंत श्रीमंत, ब्रिटिश पोलिस खात्यातल्या कडक शिस्तीच्या खानदानी आसामीच्या घरी बगदादला मदन कोहलीचा जन्म झाला. दिवस होता २५ जून, १९२४. बगदाद, रावळपिंडी, मुंबई असं कुटुंबाचे स्थलांतर झाल्यावर दक्षिण मुंबईतील उच्चभृ वस्तीत बालपण, शालेय शिक्षण झालं. वडिलांची फिल्मिस्तानमध्ये भागीदारी असली तरी आपल्या मुलाने नट म्हणून चित्रपटसृष्टीत येण्यास त्यांचा सख्त विरोध होता. मग ‘बिघडलेल्या मुलाला शिस्त लावायला’ आर्मीत पाठवले गेले. मुलगा तिथे रमला नाही. तिथून थेट लखनौला पोचला. ऑल इंडिया रेडियो वर नोकरी करू लागला. शेवटी सिनेमात काम करायच्या ओढीने पुन्हा मुंबई. परत आल्यावर चित्रपटात नायिकेच्या बहिणीचे वगैरे रोल मिळाले. तेव्हाच केव्हातरी मदन चुनीलाल कोहलीचं मदनमोहनमधे रूपांतर झालं. आणि ‘एसडी’कडे सहाय्यक म्हणून काम करता करता नट होण्याचा हट्ट सोडून संगीतकार म्हणूनही कारकीर्द सुरू झाली. मीना कपूरचं ‘मोरी अटरियापे कागा बोले’ हे अत्यंत गोड गाणे असलेला ‘आंखे’ हा पहिला चित्रपट. मग आले ‘अदा’ (‘सांवरी सुरत मन भायी’, ‘प्रीतम मेरी दुनियामें’) ‘मदहोश’ (‘मेरी यादमें तुम ना’) ‘आशियाना’ (‘मेरा करार लेजा’). एकाहून एक सरस गाण्यांचा सिलसिला सुरू झाला.
 
किशोर कुमार (‘सिमटीसी शरमाईसी’, ‘जरूरत है जरूरत है’, ‘राही था मैं आवारा’), आशा भोसले (‘शोख नजरकी बिजलियाँ’, ‘झुमका गिरा रे’, ‘जमीसे हमे आसमांपर’), मन्ना डे (‘कौन आया मेरे मनके द्वारे’, ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’), गीता दत्त (‘ऐ दिल मुझे बतादे’), मुकेश (‘भूली हुई यादों’, ‘प्रीत लगाके मैंने ये फल पाया’) या गायकांबरोबरची गाजलेली ही काही गाणी उदाहरण म्हणून. बाकी मदनमोहनच्या कारकिर्दीचा कॅनव्हास तलत मेहमूद, रफी आणि लताच्या रंगानेच भरलेला आहे. क्वचित हलकी फुलकी (‘शोख नजरकी बिजलीयां’, ‘छडी रे छडी’) कधी कव्वाली (‘होके मायूस तेरे दरसे कोई’ -लैला मजनू) अशी गाणी दिलीत त्याने; पण खरा ओढा गझलेकडे, शायरांच्या शायरीला शतप्रतिशत न्याय देण्याकडे, ऐकणाऱ्याला हरवून टाकणाऱ्या शब्दप्रधान मेलडीकडे. 
तलत महमूद आणि मदनमोहन या दोघांनी मिळून गझलेची भूमि लखनऊला भरभरून न्याय दिला- ‘मेरी यादमें तुम ना आंसू बहाना’ (मदहोश), ‘हमसे आया ना गया’ (देख कबीरा रोया), ‘मैं तेरी नजरका सुरूर हूँ’, ‘फिर वोही शाम’, ‘तेरी आँख के आंसू पी जाऊं’ (जहाँआरा), ‘मैं पागल मेरा मनवा पागल’, ‘मेरा करार लेजा’ (आशियाना), ‘होके मजबूर मुझे’ (हक़ीक़त), ‘बेरेहम आसमां’ (बहाना).

रफीचे मैं निगाहे ऐकलत? सगळीच रचना संगमरवरी खलबत्त्यात दूध केशर खलावं तशी एकजिनसी. शेवटच्या कडव्यात रफी काय बहार आणतो!! 
‘शोख़ नज़रें ये शरारत से न बाज़ आएँगी
कभी रूठेंगी कभी मिल के पलट जाएँगी
तुझसे निभ जाएगी, मैं इनसे निभाऊँ कैसे...’
यातली कभी रूठेगी वरची हरकत अफलातून!
तशीच ती ‘तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा’ मधली ‘के तेरे बगैर ओ जानेजा, मुझे जिंदगी मुहाल है’ ची जागा, कमाल आहे.
आणि लताबाई! ‘प्रीतम मेरी दुनियामें’ (अदा) मधली ‘गर यूंही बिछड़ना था, एकदिन तुझे ओ जालिम’ वरची किंवा ‘वो चुप रहे तो मेरे दिलके’ (जहांआरा) मधल्या ‘बुझे तो ऐसे के किसी गरीब का दिल’ वरची हरकत, ‘न तुम बेवफा हो न हम बेवफा है’ मधला प्रत्येक ‘बेवफा’, ‘दिलको मिले दाग जिगरको मिले जो दर्द’ (जाना था हमसे दूर), ‘केहने को बहोत कुछ था अगर केहनेपे आते’ (उनको ये शिकायत है), ‘मायेरी मैं कांसे कहूं’, ‘वो भूली दास्तां’, ‘मेरी आंखोसे कोई नींद लिए’, ‘जो हमने दास्तां अपनी सुनाई’, ‘है तेरे साथ मेरी वफ़ा’, ‘हम प्यारमे जलनेवालोंको...’ किती गाणी सांगावीत? या आणि अशा मनावरची खपली काढणाऱ्या असंख्य गाण्यांचे एकसंध मूड जसेच्या तसे आपल्या पर्यंत पोचवते लता. उगाच नाही ती एकमेवाद्वितीय आहे. मदनमोहन-लता ही एक नंबर स्वर्गीय जोड़ी आहे. चित्रपटसृष्टीच्या मायाबाजारात जी काही सच्ची नाती जुळली त्यातलं या दोघातलं बहिण-भावाचे नाते दृष्ट लागेल असं. मदनमोहनची पत्नी शीला कोहली, अमृतसरच्या उच्चशिक्षित सुखवस्तु धिंगरा कुटुंबातली(क्रांतिकारक मदनलाल धिंगराही याच कुटुंबातला). त्यांना तीन मुले, राजीव, संजीव आणि संगीता. मुले उच्चशिक्षीत, अत्यंत गुणी; मुख्य म्हणजे वडिलांचे ऋण मानणारी, त्यांच्या कलेचे मोल जाणणारी. लताचे या मुलांबरोबर अजूनही ऋणानुबंध आहेत.

मदनमोहन गेल्यानंतर(१४ जुलै१९७५) काही वर्षांनी त्याच्या संगीताचे मर्म लोकांनी जाणले. संगीतप्रेमी ग्रुप्सना त्याच्या गाण्यांनी वेड लावले. आता तो अमका चित्रपट चालला होता की पडला, या गोष्टी निरर्थक होत्या. महत्त्व गाण्याला, चालीला होतं आणि ते तर बावनकशी सोनं होतं. मग मदनमोहन या नावाला वलय प्राप्त झालं. मदनमोहन आवडणं हे उच्च अभिरूचीचे लक्षण मानलं जाऊ लागलं. त्याच्या जयंती-पुण्यतिथीला गाण्याचे हाउसफुल कार्यक्रम होऊ लागले. मदनमोहन कल्ट तयार झाला. त्याच्या मुलांनी त्याची फार सुंदर वेबसाइट बनवली आहे. संजीव कोहलीने वडिलांच्या पश्चात त्यांनी करून ठेवलेल्या नोटेशनस् वरून एका अख्ख्या चित्रपटाचे संगीत तयार केलं, साध्यासुध्या नाही बरं, सुपरस्टार-कास्ट असलेल्या मोठ्या बॅनरच्या ए ग्रेड चित्रपटाचे! (‘वीरजारा’-शाहरुख-प्रीति झिंटा-यशराज फिल्म्स). रसिकांना आता त्याच्या विषयी उत्सुकता वाटू लागली. इंटरनेटवर त्याच्या आवाजातली गाणी अपलोड होऊ लागली. त्याच्या मुलाखतींची शोधाशोध होऊ लागली. त्याने बोललेला शब्द न् शब्द कानात प्राण आणून रसिक ऐकू लागले.

‘होटोंको सी चुके तो जमानेने ये कहां
ये चुपसी क्यूं लगी है अजी कुछ तो बोलिये....’

त्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘‘कलाकार भावनाप्रधान(जज़्बाती) असतात. कलाकारांत मानवतेची भावना नसेल तर तो चांगला कलाकार होऊच शकत नाही. भगवान ने कुछ फनकारोंको कुछ जादाही जज़्बाती बनाया है!’’ अशा या जज़्बाती कलाकाराला सतत डावललं जाण्याने किती यातना होत असतील? त्यांचा मुलगा संजीव एका मुलाखतीत सांगतो, की अपयशाचं दु:ख, अवहेलनेची जखम भरायला मदनमोहनने तोच तो जिवघेणा प्याला जवळ केला....

‘बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते
ज़िन्दगी बोझ बनी हो तो उठाये कैसे?’

नियतीची पण काय गंमत आहे पहा, जिवंतपणी पडेल चित्रपटांचा संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीने बाजूला सारलेल्या मदनमोहनच्या मृत्युनंतर रिलीज झालेले ‘मौसम़ आणि ‘लैला मजनू़’ या चित्रपटांचे, संगीत तर गाजलंच पण चित्रपट बॉक्स ऑफिस वरही हिट झाले. 

‘मुझे कर के बरबाद ज़ालिम 
पशेमान अब हो रहा है!
ये टुटे है किस के सितारे
वो किस्मत हंसी और ऐसे हंसी 
के रोने लगे गम के मारे
वो देखो जला घर किसी का...’
(लता/राजा मेहेंदी अली खान/अनपढ़)

तो नाहीच येणार परत. लताही गायची थांबली. मजरूहही गेलाच. पण जो पर्यंत कलासक्त संगीतवेडे आहेत तोपर्यंत त्यांची गाणी वाजत राहतील, कुणी एकांतात ऐकतील, कुणी जाहीर कार्यक्रमात....

‘न हम होंगे न तुम होंगे
न दिल होगा मगर फिर भी
हज़ारो मंज़िले होगी हज़ारो कारवां होंगे
बहारे हम को ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे
हमारे बाद अब मेहफिलमें अफसाने बयां होंगे!’

संबंधित बातम्या