भारदस्त आवाजाच्या गायिका...

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने सोनेरी झाला तो अनेक गुणी कलाकारांमुळे. गायिकांबद्दल बोलायचे तर १९४९ नंतर लता-युग सुरू झाले. लताच्या गायकीची अफाट रेंज पाहून संगीतकार हरखले आणि रसिक अवाक झाले. लता, आशा यांच्या आवाजाचा पोत नाजूक, पातळ होता. त्याच दरम्यान इतर काही गायिका आपल्या वेगळ्या आवाजाचा अमिट ठसा उमटवून गेल्यात. गीता दत्त, शमशाद बेगम, सुरैया आणि नूरजहां यांच्या भारदस्त आवाजाने आणि खणखणीत गायकीने चाहत्यांना वेड लावले होते. नूरजहां आणि सुरैया या दोघी गायिका-अभिनेत्री होत्या त्यामुळे त्यांच्या सौंदर्याचीही भुरळ पडे.

नूरजहांचा जन्म २१ सप्टेंबर, १९२६चा, त्यावेळच्या पंजाब प्रांतातील कसूर मधला. तिचे जन्मनाव अल्लारखी वसाई. लहानपणीच कसूरचे सुप्रसिद्ध गायक उस्ताद बड़े गुलाम अली खां यांच्याकडे पतियाळा घराण्याच्या गायकीची रीतसर तालीम तिला मिळाली. नऊ-दहा वर्षांची असल्यापासून मोठ्या बहिणींबरोबर मेळे, जलसे, तंबू थिएटर मधे नाच-गाणे सुरु झाले. त्याच सुमारास लहानग्या अल्लारखीची ‘बेबी नूर’ झाली. बेबी नूरला रूप आणि गायकीच्या जोरावर अनेक  पंजाबी चित्रपटात कामे मिळू लागली. त्यावेळी चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र होते कलकत्ता. काही वर्षे कलकत्त्यात राहून १९३८मध्ये ती पुन्हा लाहोरला परतली. मास्टर गुलाम हैदर या पारखी संगीतकाराने अनेक हिऱ्यांना पैलू पाडले आहेत, बेबी नूरला सुद्धा गुलाम हैदरांची गाणी गाऊन लोकप्रियता मिळू लागली. साहजिकच हिंदी चित्रपट आणि मुंबईला प्रयाण या पुढच्या यशाकडे नेणाऱ्या पायऱ्या चढताना बेबी नूरचे ‘नूरजहां’ या लोभस, सुरेल, लोकप्रिय अभिनेत्रीत रूपांतर झाले.

तिच्याच चित्रपटाचे दिग्दर्शक शौकत हुसैन रिझवी यांच्याशी तिने विवाह केला. १९४५ते ४७ दरम्यान नूरजहांने ‘अनमोल घड़ी’, ‘बड़ी मा, ‘झीनत’, ‘जुगनू’ असे अनेक लोकप्रिय बॉक्स ऑफिस हीट चित्रपट दिले. मंटोने नूरजहां वर लिहिलेल्या लेखात म्हटलंय की ‘घराघरात नूरजहां-वेडे घायाळ तरुण होते, तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघणारे. नोकर लोक तर तिचा फोटो समोर लावून तिची गाणी गात गात कामे उरकत’. 

अभिनयापेक्षाही तिच्या गाण्यात अफाट ताकद होती. फैज अहमद फैजची ‘मुझसे पहलीसी मुहब्बत, मेरे मेहबूब ना मांग''’ ही गझल नूरजहांने अशी काही पेश केली आहे की फैजने ते काव्य तिला अर्पण करून टाकले. मुशायऱ्यात फैजना कुणी ‘मुझसे पेहलिसी...’ची फर्माईश केली तर फैज म्हणत, ‘‘ती आता माझी नाही, नूरजहांची कलाकृती आहे!’’ 

पाकिस्तानात गेल्यावर नूरजहांने गायलेली  ‘चांदनी राते..’, ‘मुझसे पेहलिसी..’, ‘शाहबाज करे परवाज..’ अशी काही गाणी किंवा ‘दुपट्टा’ चित्रपटातील काही गीतेही मला आवडतात. आपल्या चित्रपटातील गीतांबद्दल बोलायचं तर ‘बदनाम मुहब्बत कौन करे और इश्क़पे रुसवा कौन करे’ मधल्या (‘दोस्त’) ‘‘बदनाम’’ची शब्दफेक, ‘हमे तो शाम ए गम में काटनी है’ मधली (‘जुगनू’) ‘‘तकाजा है दिलका, वही चलिये वही चलिये’’ ऐकताना अंगावर येणारा काटा, ‘जवां है मुहोब्बत’ मध्ये (‘अनमोल घड़ी’) कडव्यातल्या शेवटच्या ओळीनंतर घेतलेला मिलिसेकंदाचा पॉझ, अशी जागोजागी नूरजहां आवडून जाते. ‘आवाज दे कहाँ है’ किंवा रफी बरोबरचं ‘यहाँ बदला वफ़ा का’ ऐकल्यावर जाणवतं की दु:खसुद्धा कसं ठासून व्यक्त करता येतं. लता तिच्या मुलाखतीत आवर्जून सांगते की शब्दोच्चारातून दर्द कसा दाखवायचा ते नूरजहांचे कसब आहे. (नौशादने ‘तोड़ दिया दिल मेरा’ हे ‘अंदाज’ मधलं दर्दभरं गाणं नूरजहांच्या स्टाईलमधे लताकड़ून गाऊन घेतलं होतं.)

फाळणीनंतर नूरजहांने जिथे तिचा जन्म झाला तिथे, पाकिस्तानातील पंजाब प्रांतात परतणे, पसंत केले. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीची ती वादातीत अनभिषिक्त सम्राज्ञी होती. अभिनय करणे थांबवल्यावर अनेक वर्ष नूरजहांने पार्श्वगायन केले. ‘बेबी नूर’ ते ‘मलिका-ए-तरन्नुम असा प्रवास करून ही अल्लारखी २३ डिसेंबर २००० या दिवशी अल्लाला प्यारी झाली. 

सुरैयाचे व्यक्तिमत्त्व नूरजहांपेक्षा अगदी वेगळे होते हे तिच्याबद्दल  इंटरनेटवर जी काही माहिती उपलब्ध आहे, ती वाचताना जाणवते. गंभीर, एकाकी. तिनेही लहान वयात गायला सुरुवात केली, ‘बेबी सुरैया’ 

नावाने. पण परिस्थिती अगदी वेगळी. मरिन ड्राईव्ह सारख्या उच्चभ्रू ठिकाणी बालपण, पेटिट हायस्कूल सारखी नावाजलेली शाळा, राजकपूर, मदनमोहन असे बालमित्र. ही मुलं एकत्र रेडिओ वर गायला जात असत. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. पण घरात सत्ता मात्र आजीची. आजी आणि मामाने सुरैया आणि देवानंद यांची प्रेमकहाणी सफल होऊ दिली नाही. देवने दोन वर्षे वाट पाहून कल्पना कार्तिकशी लग्न केले, आजी आणि मामा पाकिस्तानात निघून गेले, वडील वारले, आई असेपर्यंत दोघी आणि आई गेल्यावर अखेरपर्यंत एकाकी अलिप्त जीवन कंठत राहिली सुरैया. ‘जब तुमही नही अपने दुनियां ही बेगानी है....?’

सुरैया जमाल शेखचा जन्म त्यावेळच्या लाहोरचा(१५ जून १९२९). रेडिओवर बालगायिका, मग बालनटी, सहाय्यक अभिनेत्री अशी कामे करत असताना सैगलला तिचा मधाळ आवाज आवडला. १९४६-४७मध्ये सैगल बरोबर तिचे तीन चित्रपट आले. नूरजहाँ बरोबरचा ‘अनमोल घडी’ गाजला. पुढे ४९ साली ‘दिल्लगी’ आणि ‘बड़ी बेहेन’चे यश खऱ्या अर्थाने सुरैयाचे म्हणता येईल. ‘बड़ी बेहेन’ला हुस्नलाल भगतराम यांचे संगीत होते. त्यातलं प्रत्येक गाणं गाजलं. ‘लिखने वालेने’, ‘वो पास रहे या दूर रहे’ आणि ‘बिगडी बनानेवाले’ ही सुरैयाची आणि ‘जो दिलमे खुशी बनकर आये’, ‘चले जाना नहीं’ आणि ‘चुपचुप खड़े हो’ ही लताची गाणी अजूनही आठवली जातात.

मला सुरैयाचे ‘शमा’ चित्रपटातले ‘धड़कते दिलकी तमन्ना है मेरा प्यार हो तुम’ हे गाणं प्रचंड आवडतं. (संगीतकार- गुलाम मोहम्मद, गीतकार -कैफी आझमी). हे गाणं मनाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं.

‘वो गम हसीन है जिस गमके जिम्मेदार हो तुम’... या ओळी काय झकास आहेत! ‘अफसर’ मधली ‘एसडी’ची ‘मनमोर हुवा मतवाला’ आणि ‘नैन दिवाने एक नही माने’ ही गाणीही माझी लाडकी आहेत. ‘प्यार 

की जीत’ मधलं, ‘तेरे नैनोने चोरी किया’ पण छान आहे. मिर्झा गालिब हा सुरैयाचा महत्त्वाचा चित्रपट. गालिबच्या शायरीवर प्रेम करणारी मोतीबेगम सुरेख रंगविली होती तिने गाण्यांतून. गालिबचे शब्द आणि गुलाम मोहम्मदचे अफलातून संगीत. ‘आह को चाहिए़’, ‘नुक्ताचीं है ग़मे दिल’, ‘दिले नादान तुझे हुवा क्या है...’ संगीताचे कुठलेही शिक्षण न घेताही अत्यंत सुरेल भावगायकी साधली होती तिला. मला सुरैयाचा आवाजच मुळात भुरळ घालतो. वेगळाच बंदिस्त गोडवा आहे त्यात. थोडा मधाळ, थोडा बसका आणि तरी वर चढताना न चिरकणारा. ‘मिर्झा गालिब’ मधलं ‘ये न थी हमारी किस्मत’ आणि ‘रुस्तम

सोहराब’ मधलं सज्जादचं ‘ये कैसी अजब दास्तां हो गयी है’ किती कठीण कम्पोझिशन आहेत. सुरेख चढलाय सुरैयाचा आवाज त्यात.

‘बड़ी बेहेन’ (१९४९) नंतर सुरैयाला अमाप प्रसिद्धी मिळायला लागली. मरिन ड्राईव्ह वरच्या ‘कृष्णा महल’ या तिच्या घरासमोर तिच्या दर्शनासाठी चाहत्यांची ट्रॅफिक जॅम गर्दी जमू लागली. एकेका चित्रपटाचे लाख रुपये मानधन मिळू लागले. मोठ्या लक्झरी गाडीतून ती शूटिंगला जायची. देवानंद सारखा प्रेमिक; सगळं स्वप्नवत. पण स्वप्नासारखं विरूनही गेलं. एकाकी श्रीमंती मागे राहिली. 

प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून चित्रपटसृष्टीतून संन्यासच घेतला तिने. तबस्सुम सारख्या मैत्रिणीचीसुद्धा प्रत्यक्ष भेट टाळू लागली. फोनवर फक्त गप्पा होत. आयुष्याच्या अखेरीला ती तबस्सुमना म्हणाली, ‘‘हर कोई पूछता है जिंदगी कैसी गुजर रहीं है, कैसे गुजार रही हूँ कोई नहीं पूछता।’’

३१ जानेवारी २००४ ये दिवशी सुरैया हे जग सोडून गेली. गालिब मधली मोतीबेगम म्हणते तशीच अखेर झाली तिची....

‘रहिए अब ऐसी जगह
चल कर, जहाँ कोई न हो
हम-सुख़न कोई न हो
और हम-ज़बाँ कोई न हो
रहिए अब ऐसी जगह....’

शमशाद बेगम: लहानपणीच, लता आणि आशा नंतर माझ्या ‘ओळखीची’ झालेली गायिका म्हणजे शमशाद बेगम. याचे कारण म्हणजे माझ्या बाबांची ती फार आवडती गायिका होती. मूड असेल तेव्हा ते ‘धरती को आकाश पुकारे’(‘मेला’) किंवा ‘ना बोल पी पी मोरे अंगना’(‘दुलारी’) ही तिची गाणी गात असत. ओपी नय्यर म्हणतात तसा देवळातल्या घंटे सारखा खणखणीत आवाज. एक वेगळाच ठसका, एक वेगळाच अॅटिट्यूड होता त्या आवाजात. ‘आग’ चित्रपटातील ‘काहे कोयल शोर मचाये रे’ हे गाणं प्रथम ऐकलं तेव्हा नक्की काय वाटलं हे शब्दात सांगणे कठीण, पण काहीतरी भन्नाट कानावरून गेल्याची जाणीव होती ती.

शमशाद बेगमचाही जन्म लाहोरचा. १४ एप्रिल १९१९. वडील अतिशय कर्मठ. मुलीचे गाणे बजावणे त्यांना मंजूर नव्हते. तिच्या शाळेतील शिक्षिकेला शमशादचा खडा आवाज फार आवडत असे. प्रार्थनेची मुख्य गायिका म्हणून त्यांनी तिला निवडले होते. बाकी लग्न, घरगुती समारंभात गाणी म्हणून ती आपली गायची हौस भागवून घेत असे. बारा वर्षाची असताना गाण्याची समज असणारे तिचे एक मामा तिला घेऊन गुलाम हैदर यांना भेटायला गेले. तिचा आवाज मास्टरजीना पसंत पडला आणि त्यांनी तिथल्या तिथे तिच्याबरोबर बारा गाण्यांचा करार केला. आता आली का पंचाईत! कारण वडिलांपासून चोरून ही ऑडिशन वगैरे झालेली. शेवटी मामाने, ‘बुरखा घालून रेकॉर्डिंगला जायचं आणि कुठेही फोटो छापायला द्यायचा नाही’ या अटींवर वडिलांची परवानगी मिळवली. पंजाबी गाणी, चित्रपटगीते, लाहोर रेडिओवर गायन अशी तिची करिअर आकार घेऊ लागली. १९४४ मधे मास्टर गुलाम हैदर यांच्या बरोबर सुरुवातीला शमशाद एकटी मुंबईला आली. फाळणी नंतर हैदर पाकिस्तानात गेले, शमशाद मुंबईत राहिली, तोपर्यंत तिने हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले होते. मुलाखती, फोटो, प्रसिद्धी यापासून दूर असली तरी शमशाद स्वभावाने बंडखोर असणार. त्याकाळी तिने गणपतलाल बट्टो या हिंदू वकिलाशी आन्तरधर्मीय विवाह केला होता, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी! १९५५ मध्ये पतीचे अकाली अपघाती निधन झाल्यावर मात्र काही काळ शमशाद कोलमडून गेली. त्यानंतर मोजकेच चित्रपट तिने केलेत. ‘मदर इंडिया’, ‘हावड़ा ब्रिज’, ‘मुगले आझम’, ‘किस्मत’ यातली तिची गाणी गाजली.

नौशाद, ओपी नय्यर, एसडी बर्मन, सगळेच संगीतकार त्यांच्या सुरुवातीच्या करिअर मधले शमशादचे योगदान मान्य करतात. त्याकाळच्या महत्त्वाच्या संगीतकारांबरोबर केलेल्या ठळक चित्रपटांवरून नजर फिरवली तरी शमशादचा आवाका लक्षात येईल. ‘बाबुल’ (‘मिलते ही आंखे़), ‘मेला’ (‘परदेस बलम तुम जाओगे’, ‘धरती को आकाश पुकारे), ‘दुलारी’ (‘चांदनी आयी बनके’), ‘मदर इंडिया’ (‘पी के घर आज’), ‘अनोखी अदा’ (‘आज कहाँ जाके नजर’), ‘मुगले आझम’ (‘तेरी मेहफिलमे किस्मत’) हे नौशाद बरोबर;  ‘शबनम’ (‘ये दुनिया रूपकी चोर’) ‘बहार’ (‘सैय्या दिलमे आना रे’) हे ओपी नय्यर बरोबर;  ‘आरपार’ (‘कभी आर कभी पार’), ‘सीआयडी़’ (‘लेके पहला पहला प्यार’), ‘नया दौर’ (‘रेशमी सलवार कुर्ता’), ‘किस्मत’ (‘कजरा मुहोब्बत वाला’) हे एसडी बर्मन बरोबर आणि ‘शेहनाई़’ (‘आना मेरी जान मेरी जान’), ‘खिडकी’ (‘किस्मत हमारे साथ है’) ‘पतंगा’ (‘मेरे पिया गए रंगून’) हे  सी रामचंद्र बरोबर ..... शमशाद बेगम आणि ठसकेबाज गायकी हे जणू समानार्थी शब्द होते. तिच्या गाण्याची कालातीत जादू अशी की चाळीस -पन्नास वर्षांनी ‘लेके पहला पहला प्यार’ आणि ‘सैंया दिलमे आना रे’ची रिमिक्स बाजारात आली.

शमशाद बेगमना २००९ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. उषा रात्रा या एकुलत्या एक मुलीकडे नातवंडांमधे रमलेल्या शमशाद बेगम समाधानी आयुष्य जगल्या. २३ एप्रिल २०१३ या दिवशी त्यांचे  निधन झाले. जाण्याआधी त्यांनी मुलीला सांगितले होते की, ‘‘माझी अंत्ययात्रा साधी असू दे, पण मी गेल्यावर मीडियामधे मुलाखत दे आणि माझ्या चाहत्यांना आवर्जून सांग की मी ‘मालिक के पास’  जाताना सुखी समाधानाने जातेय. मला जे हवं होतं ते सारं मला मिळालं आहे.’’
राजकुमारी, मुबारक बेगम, सुमन कल्याणपूर, जगजित कौर या आणि अशा अजून काही सुरेल गायिकांमुळेही माझी आनंदयात्रा समृद्ध झाली आहे, त्यांनासुद्धा प्रेमाने अभिवादन.

संबंधित बातम्या