दुनिया मेरे आगे... 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 27 जानेवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

िअश्क़ से तबीअत ने ज़ीस्त का मज़ा पाया 
दर्द की दवा पायी दर्द बेदवा पाया 

दुःखमय जीवनात प्रेमामुळेच काही रंगत येते, ही आपली भावना व्यक्त करताना ग़ालिबनं म्हटलं आहे, ‘प्रेमामुळं आहे त्या परिस्थितीला जीवनाची रंगत मिळाली. दुःखावरचा इलाज मिळाला आणि कोणताही इलाज नसलेलं दुःख मिळालं.’ ग़ालिबच्या काव्यात प्रेमाचे विविध रंग आढळतात. म्हणतात ते खरंच आहे, की सगळे प्रेमिक हे काही कवी नसतात, पण सगळे कवी हे प्रेमिक असतात... ग़ालिब हा जीवनावर प्रेम करणारा कवी होता. वाट्याला आलेल्या अडचणींचा, दुःखांचा स्वीकार करून, कधी त्यांचा उपहास करून त्यानं वाटचाल केली. त्याच्या कवितेत प्रेमाचा रुपकात्मक वापरही आढळतो. पण प्रत्यक्षातही त्यानं अनुभवलेलं प्रेम त्यात उमटत गेलेलं जाणवतं. त्याच्या काव्यात या प्रेमानुभवाचे पडसाद दिसतात. तसंच काही संदर्भ त्याच्या पत्रांमधून मिळतात, तर काही रूढ कहाण्यांमधूनही ग़ालिबच्या प्रेमप्रकरणांचा उल्लेख येतो. यांपैकी काही खऱ्या, तर काही खोट्याही असू शकतील. त्याच्या एका प्रेमप्रकरणावरून आसपासच्या स्त्रिया त्याच्या पत्नीला हैराण करत, असाही उल्लेख सापडतो. ग़ालिबचं आपल्या पत्नीवरही प्रेम होतं. तिची त्यानं कधीच उपेक्षा केली नाही. त्यांना झालेली मुलं न वाचल्यामुळं त्याला तिच्या दुःखी अवस्थेची कल्पना होतीच. पण कदाचित ती धर्मपरायण, तर ग़ालिब रूढ अर्थानं धर्म न पाळणारा असल्यानं, तसंच ग़ालिबच्या मद्यसेवनामुळं ती नाराज असल्यामुळं थोडेफार तणाव त्यांच्यात असावेत. 

तरुण वयात ग़ालिबनं प्रेमात पडण्याचा अनुभव घेतला. तरुण असताना एका डोमनी, म्हणजे नर्तकीवर त्याचा जीव जडला होता. (या नर्तकीचं नाव मुग़लजान होतं, असा उल्लेख सापडतो. तर ‘मिर्ज़ा ग़ालिब’ या सोहराब मोदींच्या चित्रपटात तिचं नाव मोती बेगम असं आहे.) नर्तकीकडं किंवा तवायफ़कडं जाणं हे त्या काळात फार मोठं अप्रतिष्ठा करणारं नव्हतंही. काव्याची आवड असलेल्या या स्त्रीवर ग़ालिब भाळला होता. तीही त्याच्यावर अनुरक्त होती. मात्र प्रतिष्ठेच्या कारणासाठी या युवतीनं आत्महत्या करण्यात या प्रकरणाचा शेवट झाला. दुसऱ्या एका प्रतिष्ठित कुळातील स्त्रीचंही नाव ग़ालिबशी जोडलं जातं. तसंच एका सामान्य, पण काव्यप्रेमी स्त्रीलाही ग़ालिबचं प्रेम लाभलं, असं बोललं जातं. या स्त्रीचा ‘तुर्की महिला’ असा उल्लेख आढळतो. मात्र नर्तकीनं आत्महत्या केल्याचा परिणाम ग़ालिबच्या मनावर खोलवर झाला. काही दिवस तो आजारीही पडला होता. त्यानंतरच्या त्याच्या कवितांवरही या घटनेची सावली पडली. या प्रेमाचा उच्चार त्याच्या ‘दर्द से मेरे है तुझको बेक़रारी हाए हाए’ या ग़ज़लमध्ये स्पष्टपणे दिसतो. ग़ालिब यात म्हणतो, ‘बदनामीच्या लाजेखातर तू मातीच्या पडद्याआड जाऊन लपलीस, प्रेमानं तर तुझ्यासंदर्भात पडदापद्धतीची हद्द गाठली...’ 
शर्म-ए-रुसवाई से जा छुपना नक़ाब-ए-ख़ाक में 
ख़त्म है उल्फ़त की तुझ पर पर्दादारी हाए हाए 

आयुष्यभर त्याला हे दुःख सतावत राहिलं. पुढं, वयाच्या ६३ व्या वर्षी ग़ालिबनं आपला शिष्य व मित्र मिर्ज़ा हातिम अली ‘मिह्‌र’ याला लिहिलेल्या एका पत्रात त्याची ही खंत उभारून आलेली दिसते. हा घाव त्याच्या वर्मी लागला होताच. या तुलनेनं मित्राची प्रेयसी मरण पावल्यानंतर ग़ालिब त्याचं सांत्वन करताना त्याला सांगतो, की प्रेमिकाचं नशीब मजनूँप्रमाणं असावं. त्याची प्रेयसी लैला त्याच्या डोळ्यादेखत त्याला सोडून गेली. तू तर त्याच्याही पुढं गेलास. लैला तिच्या घरात मरण पावली आणि तुझी प्रेयसी तर तुझ्या घरात असताना हे जग सोडून गेली. पुढं तो म्हणतो, मित्रा, अरे आपण मुग़लबच्चे, अजबच असतो. ज्याच्यावर प्रेम करतो, त्यालाच मारून बसतो. या पत्रात तो पुढं म्हणतो, ‘मैं भी मुग़लचा हूँ, उम्र भर में एक बड़ी सितमपेशा डोमनी को मैंने भी मार रखा है। ख़ुदा उन दोनों को बख्शे और हम तुम दोनों को भी की ज़ख्मे मर्गे दोस्त खाए हुए हैं, मगफ़रत करे। चालीस-बयालीस बरस का ये वाक़या है। बा आँके ये कूचा छुट गया, इस फ़न से मैं बेगाना-ए-महज़ हो गया, लेकिन अब भी कभी कभी वो अदाएँ याद आती हैं। उसका मरना उम्र भर न भूलूँगा, जानता हूँ कि तुम्हारे दिल पर क्या गुज़रती होगी। सब्र करो और हंगामा-ए-अिश्क़े मजाज़ी छोड़ो।’ पुढं तो एक फ़ारसीतला शेर देतो, ज्याचा अर्थ आहे, तुम्हाला जर प्रेम आणि तारुण्य हवं असेल, तर मग मुहम्मद आणि त्याच्या अपत्यांवर प्रेम करा - 
सादी अगर आशक़ी कुनी व जवानी 
िअश्क़े मुहम्मद बसस्त व आले मुहम्मद 

पुढे तो पत्रात असंही लिहितो, ‘ईश्वराशिवाय बाकी गोष्टी व्यर्थ आहेत...’ 
प्रेमासारखी उदात्त, उत्कट भावना आणि तिच्या कैक रंगच्छटा ग़ालिबच्या काव्यात येतात, त्याबद्दलचं विवेचन यथावकाश येईलच. एखाद्या सशक्त आणि उत्कट जाणिवेचा तितकाच समर्थ आविष्कार करणं सोपं नाही. अशावेळी अनेकदा शब्द अपुरे पडतात. मनातलं मनातच राहतं, कारण ते नेमकेपणानं मांडता येत नाही. ग़ालिबला मात्र हे जमलं होतं. आपलं जीवन त्यानं अनेकदा मित्रांसमोर उलगडून मांडलं. तर मनातल्या भावनांना शब्दबद्ध करताना कुठंही कसर सोडली नाही. वैयक्तिक जाणिवांचं वैश्विकपण त्यानं अचूक टिपलं आणि कवितांमधून त्याची पखरण केली. हे करतानाच, त्याला दैनंदिन विवंचना आणि प्रश्नही भेडसावत होतेच. जुन्या दिल्लीतल्या त्या हवेलीत राहताना तो चाँदनी चौकच्या आसपासच्या गल्ल्यांमधून फिरत असे. एकीकडं त्याला आपल्या पूर्वजांच्या वारशाचा अभिमान होता. पण स्वतःची वेगळी वाट त्यानं निवडली होती. समकालीन दिल्लीच्या विशिष्ट संस्कृतीचा एक हिस्सा बनून तो जगला. त्याच्या भावना, विचार आणि जाणिवा या शहराशी जास्त जुळल्या-रुजल्या. त्याला सुखाचे म्हणावे असे दिवस, कमी काळच दिसले. आपल्या सामान्य परिस्थितीवर विनोद करत, टिप्पणी करत तो या सगळ्याकडं पाहत असे. मित्रमंडळींशी तो याबाबत मोकळेपणानं संवाद साधत असेच. पण काव्यातूनही अनेकदा उपरोधानं व कधी व्यथेच्याही सुरात या संदर्भात उल्लेख करत असे. आपल्या घराच्या एकूण अवस्थेसंबंधानं तो लिही आणि त्यावरून त्याचं जगणं एकप्रकारे हलाखीचं असावं असंही वाटतं. एका शेरमध्ये तो लिहून जातो, माझ्या घराच्या दारावर आणि भिंतींवर हिरवं गवत उगवायला लागलं आहे, मी सध्या वाळवंटात आहे आणि माझ्या घरात मात्र वसंत ऋतू आला आहे - 
उग रहा है दर ओ दीवार से सब्ज़ा ‘ग़ालिब’ 
हम बियाबाँ में हैं और घर में बहार आयी है 

स्वतःच्या कफल्लकपणावर, गरिबीवर ग़ालिब अनेकदा विनोद करताना दिसतो. त्यात अतिशयोक्तीही असेल. पण जे वाट्याला आलं, ते बदलण्याची ताकद नसल्यानं तो त्यावर व्यंग्यात्मक भाष्य करत असे. त्यात काहीशी खंत असली, तरी ग़ालिबनं जीवनाविषयीचा कडवटपणा आपल्यात येऊ दिला नाही. मिस्किलपणे तो परिस्थितीला सामोरं जायचा. या वृत्तीमुळंच तो आपल्याला भेडसावणाऱ्या वास्तवाचा सामना करू शकला. याही परिस्थितीत आपली काव्यप्रतिभा टवटवीत ठेवण्यात तो यशस्वी झाला. पुढच्या काळात, म्हणजे १८५७ चं स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर दिल्लीतली व आसपासचीही परिस्थिती फारच बिघडली होती. जिणं मुश्किल झालं होतं. आपला लाडका शिष्य मीर मेहदी हुसैन ‘मजरूह’ याला १८५८ मध्ये लिहिलेल्या पत्रात ग़ालिबनं परिस्थितीची खिल्ली उडवत म्हटलं होतं, ‘ये मेरा हाल सुनो, बेरिज़्क जीने का ढंग मुझको आ गया है। इस तरफ़ से ख़ातिर जमा रखना। रमज़ान का महीना रोज़े खा का कर काटा। आइन्दा ख़ुदा रज़्ज़ाक़ है। कुछ और खाने को न मिला तो न सही, ग़म ही तो है। बस साहब जब एक चीज़ खाने को हुई, अगरचे ग़म ही हो, तो फिर क्या ग़म है?’ (माझी अवस्था कशी आहे, ते ऐक... मला आता अन्नावाचून जगण्याची कला साधली आहे, खात्री बाळग. रमज़ानचा महिना रोज़े खाऊन खाऊन घालवला. यापुढं ईश्वरच अन्नदाता आहे. आणखी काही खायला मिळालं नाही, तरी दुःख तर आहे! बस, एक गोष्ट खायला तर मिळाली, मग ते दुःख का असेना, तर मग आता दुःख कसलं?’) 

अर्थात ही खूपच नंतरची गोष्ट आहे. पण तरुण वयातला ग़ालिब बेपर्वा, अनिर्बंध पद्धतीनं जगत होता. त्यावेळच्या आपल्या खुशालचेंडू जीवनशैलीबद्दल तो लिहून गेलाच होता - 
कर्ज़ की पीते थे मय लेकिन समझते थे कि हाँ 
रंग लाएगी हमारी फ़ाका-मस्ती एक दिन 

विलासी राहणीचा आणि चैनीचा खर्च ग़ालिब तरुण असताना सुरुवातीला त्याच्या पेंशनच्या व त्याला मिळणाऱ्या इतर पैशातून भागत होता. पण ग़ालिबची जीवनशैली अशी होती, की त्याला हा पैसा पुरणारा नव्हता. तो मग कर्ज काढू लागला. त्याचं शायर म्हणून असलेलं नाव आणि कीर्ती तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यामुळं त्याला कर्जदातेही नेहमीच भेटले. फक्त काव्यावर गुजराण व्हायची, तर ते शक्य नव्हतं. कारण दरबारात काही स्थान असल्याविना अर्थलाभाची शक्यता नव्हती. ग़ालिबला काही सन्मान पुढं मिळाले खरे; मात्र ऐन उमेदीच्या दिवसांत तो अशा मानमरातबांपासून वंचितच होता. काही धनिक रसिकही त्याला भेटले, पण त्यांच्याकडून मिळणारा पैसा त्याला पुरणारा नव्हता. ठिकठिकाणी होणाऱ्या मुशायऱ्यांमधून त्याच्या ग़ज़लांना दाद मिळत होती, पण विशेष द्रव्यलाभ होत नव्हता. एकीकडं अशी स्थिती, तर दुसरीकडं ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ अशी त्याची वृत्ती आणि बाणा होता. याचा परिणाम त्याच्या एकूण आयुष्यावर झाला होता. घरातूनही काही मागण्या असतीलच. त्याचा सासरा सधन असला, तरी तो कितीसा पुरेसा पडणार होता? त्याला स्वतःला काही करणं आवश्यकच होतं. 

यावेळी मग त्यानं आपल्याला मिळणाऱ्या पेंशनबाबत दाद मागण्याचं ठरवलं. त्याला मिळणाऱ्या या पेंशनची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. उपजीविका, मानसन्मान, सधनता आणि पात्रता यांचं नातं नेहमीच सारखं नसतं. प्रत्येकाबाबत तर ते कधीच सारखं नसतं. ग़ालिबसारख्या प्रतिभावान कवीलाही जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या पैशापायी खूप व्याप करावा लागला. सुरुवातीला पेंशनसाठी आणि १८५७ नंतरच्या बदललेल्या परिस्थितीत तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या साऱ्या वाटचालीत दिसलेलं चित्र ग़ालिबला वेगळा अनुभव देऊन गेलं. दुनियादारी शिकवून गेलं. त्याचा या काळात थेट कलकत्त्यापर्यंत प्रवासही झाला. त्याच्या एका ग़ज़लमधला हा शेर बहुधा त्याला कलकत्त्याला झालेल्या समुद्रदर्शनानंतरच सुचला असावा - 
होता है निहाँ गर्द में सहरा मेरे होते 
घीसता है जबीन ख़ाक पर दरया मेरे आगे

संबंधित बातम्या