कलकत्ते का जो ज़िक्र किया...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

स्वाभिमानी मनाचा ग़ालिब खरं तर कुणापुढं झुकणं पसंत नसलेला. पुढच्या काळात त्याला जेव्हा तंगी होती, तेव्हा एका हितचिंतकानं त्याला रामपूरच्या नवीन नवाबाची स्तुती करणारा क़सीदा लिहायला सांगितलं. जेणेकरून त्याला पैसे मिळाले असते. पण ग़ालिबनं पत्र लिहून कळवलं, ‘हे जग संपत्तीनं भरलेलं असेलही. पण मी काही या जगाचा गुलाम बनणार नाही आणि माझं ईमान व बुद्धिमत्ता विकणार नाही.’ तारुण्यातच आर्थिक अडचणी होत्या, तेव्हाही त्याचा ताठा कमी नव्हता... ‘अगदी मक्क्याला काब्याचं दर्शन घ्यायला गेलो असताना जर तिथलं प्रवेशद्वार उघडं नसलं, तर मी उलट्या पावली परत फिरेन,’ असं त्यानं एका शेरमध्ये म्हटलंच आहे - 
बंदगी में भी वो आज़ादा ओ ख़ुदबीन हैं कि हम 
उल्टे फिर आए दर-ए-काबा गर वा न हुआ 

असं जरी असलं, तरी नंतरच्या काळात, १८५५ मध्ये असहायतेमुळं त्याला अगदी रामपूरच्या दरबारी आपले शब्द विकण्याची वेळ आली होती. वयाच्या तिशीत असताना ग़ालिब आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी गेला आणि दाद मागण्याचा त्यानं प्रयत्न केला. बालपणीच पोरकं झालेल्या ग़ालिबला इंग्रजांकडून वारसाहक्कानं पेन्शन मिळत होतं, ते काकांमुळं. १८०६ मध्ये काका नसरुल्लाह ख़ान यांचं निधन झाल्यानंतर ग़ालिब व त्याच्या भावाचा ताबा काकांचे मेहुणे नवाब अहमद बख्श यांनी घेतला. या कुटुंबाला पेन्शन मिळावं, अशी मागणी या बख़्श यांनी केली होती. त्यानुसार नसरुल्लाह ख़ानची जहागीर रद्द करून, वर्षाकाठी दहा हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली. अहमद ख़ाननं इंग्रजांच्या खजिन्यात भरण्याच्या रकमेतूनच दहा हजार रुपये परस्पर या कुटुंबाला द्यावेत, असा आदेश ४ मे १८०६ रोजी निघाला. पण दोन महिन्यांतच यात बदल होऊन, ही रक्कम पाच हजार रुपये इतकी करण्यात आली. त्यातलेही दोन हजार रुपये कुणा ख़्वाजा अली याला देण्याचाही उल्लेख करण्यात आल्याचं सापडतं. हा ख़्वाजा अली नसरुल्लाह ख़ानचा एक अधिकारी होता, नातेवाईक नव्हता, तरीही त्याला कुटुंबीय मानण्यात आलं होतं. याप्रकारे प्रत्यक्षात ग़ालिबच्या कुटुंबाला वार्षिक तीन हजार रुपये मिळू लागले. या रकमेचं वाटप होऊन, आई, बहीण, भाऊ आणि स्वतः ग़ालिब असे चार वाटेकरी असल्यामुळं त्याच्या वाट्याला वर्षाला यातले ७५० रुपये आले होते. १८२६ मध्ये अहमद बख़्श निवृत्त झाला. ग़ालिबची पत्नी त्याचीच पुतणी होती. तिला तो दरमहा तीस रुपयांचं इनाम देत असे. ते त्यानं निवृत्तीनंतर बंद केलं. ग़ालिबला द्यावयाची पेन्शनची रक्कमही तो नियमितपणे देईनासा झाला. ग़ालिबच्या भावाला लहान वयापासून स्किझोफ्रेनियाचा आजार होता. पुढं तो १८५७ मध्ये वारला. त्यामुळं त्याच्या कुटुंबाची जबाबदारीही ग़ालिबवर येऊन पडली होती. आपल्यावर पेन्शनबाबत अन्याय झाला आहे, हे ग़ालिब ओळखून होता. आधी अहमद बख़्शला त्यानं विनंती करून पाहिली. पण तो दुर्लक्षच करत राहिला. नंतर इंग्रज गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलपुढं आपलं गाऱ्हाणं मांडायचं ठरवून ग़ालिब कामाला लागला. अखेरीस कलकत्त्याला जाऊन आपल्या पेन्शन प्रकरणाची दाद कंपनी सरकारकडं मागण्याचं त्यानं मनावर घेतलं. या दूरच्या प्रवासासाठीही त्याला कर्ज काढावं लागलं. पण त्याच्या नावामुळं हे कर्ज त्याला मिळून गेलं. ग़ालिबला आता पैसे मिळणारच आहेत, असं त्याच्या कर्जदात्यांनाही वाटत होतंच... 

कलकत्त्याचा प्रवास म्हणजे बराच लांबचा पल्ला. मजल दरमजल करतच तो करावा लागणार होता. वाटेत थांबत, विविध ठिकाणं पाहात आणि नवे अनुभव गोळा करत ग़ालिब प्रवासाला निघाला. वाटेत त्याच्या शायरीच्या मैफलीही झाल्या... या प्रवासात १८२६ मध्ये ऑक्टोबर महिन्यात मेटकाफ या इंग्रज अधिकाऱ्याला भेटण्यासाठी म्हणून ग़ालिब कानपूरला गेला. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. तिथंच ग़ालिब आजारीही पडला. बरा झाल्यावर लखनौला जायला निघाला. याच काळात ग़ालिबच्या सासऱ्यांचं निधन झालं. त्याच्या भावाच्या आजारानं गंभीर रूप धारण केलं. ज्याच्या हाती पेन्शन देण्याचा अधिकार होता, त्या अहमद बख़्शनं भावाच्या मृत्यूनंतर हात वर केले आणि पेन्शनचे पैसे देणं बंद केलं. लवकरच, ऑक्टोबर १८२७ मध्ये त्याचंही निधन झालं. अशा घटना घडत असताना ग़ालिबचा प्रवास चालू होता. १८२७ च्या जून महिन्यात तो लखनौहून कलकत्त्याला जाण्यासाठी निघाल्याचा उल्लेख सापडतो. वाटेत १८२८ मध्ये तो बनारसला थांबला. तिथं तो तीन-चार महिने तरी होता. कानपूर, लखनौ, बांदा, इलाहाबाद, बनारस, मुर्शिदाबाद असा प्रदीर्घ प्रवास करून, अखेरीस २० फेब्रुवारी १८२८ या दिवशी तो कलकत्त्याला जाऊन पोचला. 

कलकत्ता म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य कार्यालय. अजून तेव्हा भारतात कंपनी सरकार होतं. ‘ख़ल्क़ ख़ुदा का मुल्क़ बादशाह का और अमल कंपनी सरकार का’ असं म्हटलं जायचं... इतर ठिकाणी अयशस्वी झाल्यावर कंपनी सरकारला गळ घालण्यावाचून पर्याय उरला नाही, तेव्हा ग़ालिबला कलकत्ता शहर गाठावंच लागलं. तो जवळजवळ दीड वर्षं राहिला होता. 

कलकत्त्यातल्या आपल्या वास्तव्यात ग़ालिबनं मुशायऱ्यात सहभाग घेतला. तिथल्या कलकत्ता मदरसा कॉलेजात नियमितपणे फ़ारसी काव्याच्या मैफलीही होत. कारण कामकाजाची भाषा म्हणून कंपनीचे इंग्रज अधिकारी फ़ारसी शिकत आणि त्या भाषेतील काव्याची त्यांना आवड असे. ग़ालिबच्या काव्याला हळूहळू तिथंही प्रतिसाद मिळत होता. पण नंतर मिर्ज़ा क़तील या कवीशी व इतर काहीजणांशी त्याचे वादही झाले. या मंडळींना ग़ालिबची फ़ारसी भाषा वेगळी वाटे. कारण कलकत्त्यातील लोकांना व्यापारी लोकांकडून आलेली फ़ारसी माहीत होती. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनीही इथं येऊनच ही भाषा आत्मसात केली होती. तर ग़ालिबची ती एका अर्थानं पितृभाषा होती. शिवाय इराणच्या फ़ारसी विद्वानाकडून त्यानं फ़ारसीचे धडे घेतले होते. त्याला आपल्या फ़ारसी भाषेतील प्रावीण्याचा, आपल्या वारशाचा अभिमान होता. पण भारतात जी फ़ारसी रुळली होती, तिच्यात बदल झाले होते. ती बरीचशी उर्दूप्रमाणं बोलली जात असे.  

शब्दांचे अर्थही उर्दू वळणावर होते, जे मूळ फ़ारसीतील अर्थांपेक्षा काहीवेळा निराळे असत. लोकांना त्याची कविता नीट कळत नसे. यामुळं मग ग़ालिबच्या शायरीवर कलकत्त्यातल्या मुशायऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. हळूहळू त्यानं या मैफलींना जाणं बंद केलं. पण त्याला त्यानंतर फ़ारसीत जास्तीत जास्त रचना करण्याची प्रेरणा मिळाली. फ़ारसीतील आपल्या काव्याचा बोलबाला होईल आणि या कारणामुळं फ़ारसीप्रेमी इंग्रज अधिकारी आपल्या समस्या सोडवतील, अशी आशाही त्याच्या मनात जागी झाली. या काळात त्याच्या फ़ारसी व उर्दू काव्याचा संग्रह ‘गुल-ए-राना’ या नावानं तयार झाला. तो पुस्तकरूपात मात्र प्रकाशित झाला नव्हता. कलकत्त्यात त्यानं रचलेल्या ‘गुल-ए-राना’मधील कविता यामुळं गहाळ झाल्या होत्या. पुढच्या काळात १९४१ मध्ये ग़ालिबचा उर्दू दीवान प्रकाशित झाला. त्याचा प्रभाव लोकांवर आजच्या काळातही टिकून आहे. ‘गुल-ए-राना’ला लिहिलेली प्रस्तावना ग़ालिबच्या गद्य लेखांच्या पुस्तकात समाविष्ट झाली नसती, तर हा संग्रह उजेडातही आला नसता. त्याकाळी पुस्तकांची हस्तलिखितं तयार केली जात. तशा याही पुस्तकाच्या तीन ते चार प्रती तयार केल्या गेल्या होत्या. एक प्रत लाहोरला सापडली, जी खुद्द ग़ालिबच्या हस्ताक्षरात आहे. तर, दुसऱ्या एका हस्तलिखित संग्रहाची काही पानं १९५१ मध्ये हसरत मोहानी यांना सापडली होती, पण तीही त्यांच्या मृत्यूनंतर गहाळ झाली. ग़ालिबचे अभ्यासक मलिक राम यांनी लिहून ठेवली आहे. त्यानुसार, त्यांना १९५७ मध्ये सैयद नक़ी बिलग्रामी या मित्रानं ती दिली होती. हे दुर्मिळ हस्तलिखित आजच्या उत्तर प्रदेशातल्या बिलग्राम इथल्या सैयद करम हुसैन बिलग्रामी यांच्या ग्रंथालयात होतं. त्यांची कलकत्त्यात ग़ालिबशी भेट झाली होती आणि ते परस्परांचे दोस्त बनले होते. ‘गुल-ए-राना’च्या प्रती तयार करण्यात आल्या, तेव्हा एक प्रत बिलग्रामी यांनी स्वतःसाठी मागून घेतली होती. ही प्रत त्यांच्या घराण्यात जपली गेली आणि पुढं मलिक राम यांच्या हाती आली. पण १९७० पर्यंत तिचं प्रकाशन होऊ शकलं नव्हतं. स्वतःच्या काव्याविषयी ग़ालिब अतिशय जागरूक होता आणि तो स्वतः कठोरपणे निवड करे. यासंदर्भात प्रस्तुत संग्रहात ग़ालिबनं गमतीनं म्हटलं आहे, ‘माझ्या हृदयात नेमकं काय आहे, हे कुणाला कसं कळालं असतं? शेरांची निवड करण्यानंच तर मला बदनाम (उघडं) केलं...’ 
खुलता किसी पे क्यूँ मिरे दिल का मोआमला 
शेरों के इन्तिख़ाब ने रुस्वा किया मुझे 

ज्या कामासाठी ग़ालिब कलकत्त्याला आला, ते मात्र अजून तडीला जात नव्हतं. त्यानं अनेकदा अर्जविनंत्या केल्या, पण अनुकूल जवाब मिळत नव्हता. त्यानं केलेल्या मागण्या अशा होत्या - एक म्हणजे आपलं मूळ वार्षिक दहा हजार रुपयांचं पेन्शन लागू केलं जावं. दुसरी गोष्ट, तोवरची बाकीही त्याला दिली जावी. (कारण दहाचे पाच हजार पूर्वीच केले होते.) आपल्या पेन्शनवर फक्त आपलाच हक्क असून, त्याचा वाटा इतर कोणाही नातेवाईकास देऊन त्याची रक्कम कमी केली जाऊ नये, असंही त्यानं अर्जात म्हटलं होतं. आपल्याला दिल्लीतच पेन्शन दिलं जावं, अशीही अपेक्षा त्यानं व्यक्त केली होती. आपल्या खानदानी घराण्याची दखल घेऊन, आपल्याला एखादा किताबही दिला जावा, अशीही मागणी त्यानं केली होती. मात्र ग़ालिबच्या मागण्यांना अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्याला तिथून अपयशीच परतणं भाग पडलं. ऑगस्ट १८२९ मध्ये त्यानं दिल्लीकडे परतीचा प्रवास सुरू केला आणि साधारणपणे दोनेक महिन्यांनी तो दिल्लीला पोचला. यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत ग़ालिब दिल्लीतच राहिला. 

त्या काळात आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांमधून तो कलकत्त्यातल्या वास्तव्याबद्दल लिहितो. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांना कळवतो. त्या जुन्या कलकत्त्यातील सिमला बाज़ार, गोल तलब, चितपुर बाज़ार अशा या खुणांचा उल्लेख या पत्रांमध्ये आढळतो. या जागांची नावं आता बदलली आहेत. पण अभ्यासकांनी या जागांच्या खुणा शोधून काढल्या आहेत. तो राहात असलेलं कलकत्त्यातलं घर कोणतं असावं, याचाही पत्ता लागला आहे. तिथल्या बेथुन मार्गावरील घर क्रमांक १३३ इथं तो राहिला होता. त्यानं यासाठी दरमहा सहा ते दहा रुपये इतकं भाडं मिर्ज़ा अली सौदागर आणि विलायत हुसैन यांना दिल्याचंही त्याच्या पत्रांवरून समजतं. तिथल्या हज़रत मौला अली दर्गा, कटहल बागानमधली मशीद यांचे उल्लेख सापडतात. या मशिदीच्या परिसरात तो आला होता, कारण त्याला बांदा इथून आणलेलं कुणा एकाचं पत्र तिथं पोचवायचं होतं. पण ते ज्याला उद्देशून होतं, तो मनुष्य तोवर वारला होता आणि त्याच्या विधवेला ग़ालिबनं हे पत्र स्वतः वाचून दाखवलं होतं. त्याला कलकत्ता शहर इतकं आवडलं, की बस. तिथल्या हिरवाईवर, सुंदर स्त्रियांवर, मधुर फळांवर आणि मदिरेवर तो खूश झाला. या गोष्टींचं गुणगान तो पुढंही करत राहिला. पण तिथलं दमट व उष्ण हवामान त्याला कसं आवडलं, कुणास ठाऊक...(कलकत्त्यात त्याच्या नावाचा एक रस्ताही आहे. १९६९ मध्ये त्याची स्मृतिशताब्दी झाली, तेव्हा हे नामकरण करण्यात आलं.) एका कवितेत ग़ालिब कलकत्त्याबद्दल लिहितो - 
कलकत्ते का जो ज़िक्र किया तूने हमनशीन 
इक तीर मेरे सीने में मारा कि हाए हाए

संबंधित बातम्या