शिक्षण क्षेत्रात व्यापक संधी

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

मायक्रोसॉफ्टने केलेल्या व्यापक सर्वेक्षणानुसार बहुतेक शिक्षक आणि विविध शिक्षण संस्थांना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराची गरज पटलेली आहे. या अनुकुलतेच्या पार्श्वभूमीवर आता त्याबद्दलची प्राथमिक व प्रायोगिक चाचपणीसुद्धा केली जात आहे. शालेय अभ्यासक्रमात ठराविक ध्येय आणि उद्देश ठेवून योग्य बदल करणे, अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण करणे, शिक्षक व विद्यार्थी संवाद करू शकतील अशी सॉफ्टवेअर्स बनवणे, शिक्षण कंटाळवाणे होणार नाही यासाठी सतत पण सकारात्मक बदल करण्याची मानसिकता तयार करणे, समुपदेशन करणे आदींवर काम करणे आवश्यक आहे.  

जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांत आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराची जणू चढाओढच सुरु झालेली आहे. संरक्षण, खेळ, शेती, वाहतूक व्यवस्था, व्यापार आदी क्षेत्रांत कार्यक्षमता वाढवून जास्तीतजास्त चांगले परिणाम मिळवण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याही वाढत्या वापराचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत. त्यासाठी नवनवीन संकल्पना घेऊन जशा आघाडीच्या कंपन्या पुढे येत आहेत, तसेच नवीन उद्योगही उभारत आहेत. वर उल्लेखल्या क्षेत्रांबरोबरच आणखी एका क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आता प्रवेश करू लागला आहे, ते म्हणजे शिक्षणाचे क्षेत्र. अमेरिकेतील कंपन्यांसाठी बाजारपेठांचे सर्वेक्षण करणाऱ्या एक संस्थेच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर जवळपास ५० टक्क्यांनी वाढला आहे. पुढील पाच वर्षांत हाच वेग इतर देशांतही वाढण्याचे संकेत आहेत. गुरू किंवा शिक्षकाची जागा दुसऱ्या कोणाला घेणे शक्य नसले तरी त्यांच्या कामाचे स्वरूप नक्कीच बदलणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांच्या कामाच्या स्वरूपातही मोठे फेरबदल संभवत आहेत. त्यातच कोविड-१९ मुळे जवळजवळ जगातील सर्व देशांत शिक्षण घरात बसूनच सुरू झाल्यामुळे मुलांचा संगणकाशी संपर्क आणि परिचय खूपच लवकर झाला आहे. ऑनलाइन शिक्षण आता नवीन राहिलेले नाही. पण शिक्षक प्रत्यक्षात समोर नसताना रेकॉर्डेड लेक्चर पाहणे आणि नंतर ठरलेल्या वेळेत प्रश्न विचारणे किंवा शंका निरसन करणे, ऑनलाइन परीक्षा देणे हे अजिबात नवीन राहिलेले नाही. यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा शिक्षणातील वापर तसेच व्यापकता वाढण्यास मदत होत आहे. शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने, विद्यार्थी, पालक, शिक्षक व व्यवस्थापकीय प्रशासन या सर्वांच्या दृष्टीने या विषयाचा ऊहापोह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी नजीकच्या भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येऊ घातलेल्या शैक्षणिक बदलांविषयी थोडी चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे.

शिक्षकांनी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक क्षमतेनुसार शिकवणे गरजेचे असते, पण जगातील कोणत्याही आणि विशेषतः भारतासारख्या देशात प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्येमुळे हे  जवळजवळ अशक्य आहे. मात्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे हे शक्य होऊ शकते. यावर सध्या सिडनीमधील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सने आघाडी घेतली आहे. तेथे प्राध्यापकांच्या प्रत्येक लेक्चरचे व्हिडिओ छोट्या छोट्या भागांत विभागले जातात, त्यानुसार प्राध्यापकसुद्धा लेक्चर नोट्स तुकड्यांमध्ये विभागून देतात. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. डेविड केलरमन यांनी एक इंटरनेट व मशिन लर्निंगच्या आधारित बॉट बनवलेला आहे. हा बॉट विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यातील संदर्भावरून योग्य प्राध्यापकाकडे पाठवतो, तसेच त्याच्याकडील असलेल्या प्रश्नोत्तरांच्या बँक मधून उत्तरही शोधून देतो. त्याला आधार म्हणून प्राध्यापकांच्या लेक्चरचे संबंधित छोटे व्हिडिओ व नोट्ससुद्धा उपलब्ध करून देतो. विशेष म्हणजे हे सर्व सेकंदापेक्षाही कमी वेळेत होते. उत्तरामुळे विद्यार्थ्यांचे कितपत समाधान होते या मुद्द्याला मिळणाऱ्या रेटिंग वरून उत्तराचे रेटिंग ठरते. या रेटिंगचा पुढे इतर विद्यार्थ्यांच्या साधारण सारख्या प्रश्नाच्या उत्तरासाठी उपयोग केला जातो. यामुळे डॉ. डेविड केलरमन यांनी बनवलेला बॉट अधिक प्रगल्भ तर होतोच आहे, तसेच प्रश्नोत्तरांची बँकही बनत आहे. यामुळे एकप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिकदृष्ट्या लक्ष देणे, त्याच्या शंकांचे त्वरित निरसन करणे शक्य होऊ लागले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आता स्वतःच्या अनुकूलतेनुसार शिकण्याचा वेळ व वेग घेऊ शकत आहे. 

काही कंपन्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेगावर, प्रश्नांवर, त्याच्या वर्गातील सहभागावर तसेच इतर विद्यार्थ्यांबरोबरच्या संवादावर लक्ष ठेवतात. ज्या विद्यार्थ्यांची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे, ते कोठे कमी पडत आहेत त्याचे मूल्यमापन करून त्याचा अहवाल प्राध्यापकांना तसेच पालकांना सादर करणे, तसेच विद्यार्थ्यांना विविध लेक्चर्स, नोट्स सुचविणे आदी कामे आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे शक्य होत आहेत. त्याचप्रमाणे उत्तम प्रगती करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत समजावून घेऊन इतर विद्यार्थांना सुधारणा सुचविणे, प्राध्यापकांना तसे सूचित करणे अशीही कामे आता शक्य होऊ लागली आहेत. हे सॉफ्टवेअर सध्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवले आहे. प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये त्याचा उपयोग लवकरच अपेक्षित आहे. या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार पुढील शिक्षणाची तसेच करिअरची दिशा अगदी कमी वयात सुचविणे शक्य होईल.

मुक्त शिक्षणासाठी भाषेची कुंपणे हा एक मोठा अडथळा होता. आता मात्र, मायक्रोसॉफ्टने बनवलेला दुभाषा सॉफ्टवेअर, लेक्चर सुरू असताना तीसहून अधिक वेगवेगळ्या भाषांमधे लेखी तसेच तोंडी अनुवाद सादर करू शकतो. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातृभाषेत विचारलेल्या प्रश्नाचा अनुवाद प्राध्यापकांना त्यांना हव्या असलेल्या भाषेत मिळतो, तसेच प्राध्यापकांनी दिलेले उत्तर विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या मातृभाषेत मिळते. यामुळे भाषेचे अडसर जणू मोडीतच निघाले आहेत. त्याचप्रमाणे दृष्टीहीन तसेच मूक-बधीर विद्यार्थ्यांसाठीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित शिक्षण पद्धती वरदान ठरते आहे. 

काही विद्यापीठांत सध्या ॲमेझॉन ॲलेक्साचा वापर विद्यार्थ्यांसाठी एक सर्वसाधारण कॅम्पस गाइड स्वरूपात केला जातो आहे. विद्यापीठात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधे ठराविक विभागाची माहिती, त्यातील वैशिष्ट्ये, सर्वसाधारण, तसेच प्रत्येक विषयाचे, प्राध्यापकांचे वेळापत्रक, कॅन्टीनबद्धलची माहिती अशा अनेक स्वरूपाची माहिती ॲलेक्साला विचारून घेता येते. यामुळे वेळापत्रक, तसेच माहितीचे गाइड छापण्याची गरज कमी होत आहे. या सर्वांच्या जोडीला माहिती देणाऱ्या वेबसाइट असतातच पण त्यातील नेमकी गरजेची आणि मोजकी माहिती विद्यार्थ्यांना ॲलेक्सासारखी मदतनीस सुलभ पद्धतीने देते. 

आधी सांगितल्याप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित शिक्षण पद्धतीमुळे भाषेची बंधने सैल होत आहेतच, पण त्याचबरोबर वसुधैव कुटुम्बकम् या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांना आता कोणत्याही देशातील कोणत्याही शिक्षकाकडून शिक्षणाचे धडे घेणे सहज शक्य होत आहे. यामुळे यापुढच्या काळात एक ठराविक शाळा आणि त्यातील ठराविक पद्धती हे बंधन संपुष्टात येऊ शकते. शिक्षकांनासुद्धा वेगवेगळ्या शाळेतील व देशांतील इतर शिक्षकांची लेक्चर्स समजून घेता येतील व त्याप्रमाणे योग्य बदल कराता येतील. स्वस्त होणारे कॉम्प्युटर्स व स्मार्ट फोन्स, येऊ घातलेले 5G नेटवर्क आदींमुळे विद्यार्थ्यांना जसे शिक्षण कोठेही किंवा ऑन-द-गो घेणे सहज शक्य होत आहे, तसेच शिक्षकांनासुद्धा ऑन-द-गो उत्तरे देणे शक्य होत आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बॉट्स तर चोवीस तास उपलब्ध होऊ शकतात. मायक्रोसॉफ्टने केलेल्या व्यापक सर्वेक्षणानुसार बहुतेक शिक्षक आणि विविध शिक्षण संस्थांना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराची गरज पटलेली आहे. या अनुकुलतेच्या पार्श्वभूमीवर आता त्याबद्दलची प्राथमिक व प्रायोगिक चाचपणीसुद्धा केली जात आहे. शालेय अभ्यासक्रमात ठराविक ध्येय आणि उद्देश ठेवून योग्य बदल करणे, अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण करणे, शिक्षक व विद्यार्थी संवाद करू शकतील अशी सॉफ्टवेअर्स बनवणे, शिक्षण कंटाळवाणे होणार नाही यासाठी सतत पण सकारात्मक बदल करण्याची मानसिकता तयार करणे, समुपदेशन करणे आदींवर काम करणे आवश्यक आहे. जगातील कित्येक विद्यापीठांत यावर बरेच आधी काम सुरू झालेले आहे. भारतातील विद्यापीठांनाही यावर काम करावेच लागेल. त्यांच्यासाठी ही एक संधी आहे, ज्यामुळे त्यांचे ज्ञान भांडार जगभरात सर्वत्र पोचवता येईल. कित्येक भारतीय कंपन्यांनासुद्धा कोर्सेस बनवता येतील आणि शिकवता येतील. त्यामुळे आता भारतातील विद्यापीठांना इतर देशातील विद्यापीठांबरोबरच एक प्रकारे कंपन्यांबरोबरसुद्धा स्पर्धा करावी लागणार आहे. शेवटी आजचे विद्यार्थीच उद्या समाजाचे आणि देशाचे भवितव्य घडवणारे असतात. त्यांना देशात राहूनच देशाबाहेरील ज्ञान मिळवून देण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे योगदान महत्त्वाचे होऊ शकते. त्यांना अत्याधुनिक शिक्षणपद्धती उपलब्ध करून देणे आणि इतर देशांतील समवयस्क मुलांच्या एक पाऊल पुढे ठेवणे हे आजच्या शिक्षण संस्था तसेच सरकारी धोरण आखणाऱ्यांच्या हाती आहे. त्यानुसार जितक्या लवकर सकारात्मक बदल करावे लागतील ते करणे अत्यंत गरजेचे आहे.

संबंधित बातम्या