तंत्रज्ञान वाचणार आपले मन

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 10 मे 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

पुढील दशकाच्या शेवटी मेंदूतील हालचाली, संकेत समजावून घेऊन रोजच्या जीवनातील जटिल समस्या सोडवणे आता शक्य होऊ शकते. मात्र त्यातील संभाव्य धोक्यांचा विचार करून ते धोके टाळण्यासाठीही भविष्यात काही पावले उचलणे आवश्यक ठरेल.

वित्तीय क्षेत्रातील ‘गार्टनर’ या आघाडीच्या अमेरिकी कंपनीच्या अहवालानुसार जगातील जवळजवळ ३५ टक्क्यांहून अधिक कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत आहेत. जगातील कित्येक देशांप्रमाणे मागील वर्षी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या परिणामकारक व प्रभावी उपयोगासाठी भारत सरकारनेही तरतूद करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या कंपन्यांबरोबरच कित्येक स्टार्टअपसुद्धा त्याचा लाभ घेऊन पुढे जात आहेत. वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, विमान वाहतूक, संरक्षण अशा क्षेत्रांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वाढतो आहे.

कोरोना महामारीमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे महत्त्व आता शिक्षण, शेतीबरोबरच इतरही क्षेत्रांत अधोरेखित होऊ लागले आहे. मानसशास्त्रासाठीही आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा उपयोग होऊ घातला आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनातील भाव, होणारी चलबिचल तसेच साधारणपणे कोणत्यातरी विशिष्ट विषयाबद्दलचे मत समजून घेणे हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा एक भाग आहे. आपणही अनेकदा आपापल्या पद्धतीने समोरील व्यक्तीच्या स्वभावाचा साधारण अंदाज घेऊन आपल्यापरीने त्या व्यक्तीशी कसे वागायचे ते ठरवत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या विविध तंत्रांचा वापर आता एखाद्याचे मन किंवा मेंदूतील विचार समजून घेण्यात होऊ लागला आहे. इंटरनेटवर आपण जे शोधतो त्या शोधाच्या पद्धतीनुसार आपल्या आवडीनिवडींचा साधारण अंदाज इंटेलिजन्ट अल्गोरिदमना येत असतो. हे आता नवीन राहिलेले नाही. त्यात बऱ्याच त्रुटीदेखील आहेत. पण मेंदूतील संकेतांचा व हालचालींचा ठाव घेऊन एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध घेणे आता अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे. याच शक्यतांच्या विविध पैलूंचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे. 

मेंदूतील माहिती वाचण्यासाठीच्या एका प्रकल्पावर सॅनफ्रान्सिस्कोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. जोसेफ मॅकिन सध्या काम करत आहेत. या प्रकल्पाला ‘फेसबुक’ने अनुदान दिले आहे. एका प्रयोगात डॉ. मॅकिन यांनी अपस्मार आजाराने त्रस्त असलेल्या महिलांच्या मेंदूतील हालचालींची नोंद केली. त्यांनी या महिलांच्या डोक्यावर सेन्सर बसवले व त्यांना २५० शब्दांची विविध वाक्ये मोठयाने उच्चारण्यास सांगितले. ती वाक्ये उच्चारत असताना सेन्सर त्यांच्या मेंदूत होणाऱ्या हालचालींची नोंद करत होते. पुढे त्या हालचालींचे आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क या मशिन लर्निंग तंत्राचा वापर करून अंकांमध्ये तसेच वाक्यांमधे रूपांतर केले. ही वाक्ये महिलांनी वाचलेल्या वाक्यांशी बऱ्याच अंशी जुळणारी होती. अर्थात, प्रत्येक प्रौढ माणसाकडे साधारणपणे काही लाख शब्दांचे भांडार असते, त्यामानाने २५० शब्दांवर केलेला प्रयोग खूपच तोकडा आहे. परंतु डॉ. जोसेफ मॅकिन यांनी यशस्वी करून दाखवलेल्या छोटेखानी प्रयोगावरून बोलू-ऐकू न शकणाऱ्या तसेच अर्धांगवायू किंवा पक्षाघात झालेल्या लोकांना आशेचा किरण नक्कीच दिसतो आहे. जेणेकरून अशा लोकांच्या मेंदूतील संकेत समजून घेता येतील व त्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे ‘बोलते’ करता येईल. त्यासाठी अशा रुग्णांना शरीराच्या एकाही स्नायूची हालचाल करावी लागणार नाही, हे महत्त्वाचे. अमेरिकेतील ‘रीव्ह फाउंडेशन; या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार एकट्या अमेरिकेत ५० लाखांहून अधिक लोक अर्धांगवायू किंवा पक्षाघाताने त्रस्त आहेत. त्यामुळे अमेरिकेतील लोकांबरोबरच जगातील अशा कोट्यवधी लोकांसाठी हे एक वरदान ठरू शकते. मानवी मेंदूतील हालचालींचा अभ्यास करण्याच्या या प्रकल्पात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही ‘फेसबुक’ सध्या काम करते आहे. आपल्या मेंदूतील संकेत समजून घेऊन त्यानुसार उपकरणे नियंत्रित करणे, ही या प्रयत्नांची पुढची पायरी आहे. उदाहरणार्थ, खूप उकडायला वागल्यावर थंडावा मिळण्यासाठी पंखा चालू करावा असे वाटल्यास, त्या विचारानुसार मेंदूतील न्यूरॉनमध्ये झालेली माहितीची देवाणघेवाण, संकेत, बदल वगैरे सेन्सरद्वारे समजून घेऊन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अल्गोरिदम वापरून त्याचा योग्य अर्थ लावण्यात येईल व त्यानुसार पंखा चालू करण्यासाठी योग्य त्या सूचना कॉम्प्युटर नियंत्रित पंख्याला देण्यात येतील. हे केवळ एक सर्वसामान्य उदाहरण आहे. अशा एक ना अनेक उपयोगांची यादीच बनवता येईल. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची ‘न्यूरालिंक’ ही कंपनी याच धर्तीवर एका विशिष्ट प्रकारचे लवचिक धागे बनवत आहे. हे धागे मेंदूमध्ये बसवून कॉम्प्युटर तसेच मोबाईल फोन वापरणे शक्य होईल असा कंपनीचा दावा आहे. काही तज्ज्ञांच्या मते उंदरांवर तसेच माकडांवर हे प्रयोग बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत. लवकरच याची प्रायोगिक चाचणी अपेक्षित आहे. 

फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठ व डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठाने केलेल्या एका संयुक्त संशोधनानुसार आता मेंदूतील संकेत व न्यूरॉनमधील माहितीची देवाणघेवाण समजून घेऊन त्यानुसार चित्रेसुद्धा बनवता येऊ लागली आहेत. एका प्रतिष्ठित नियतकालीकाच्या फेब्रुवारी २०२१च्या अंकात या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला आहे. या संदर्भातल्या प्रयोगात, संशोधकांनी ३० स्वयंसेवकांना काही चेहरे असलेले फोटो दाखवले. त्यातील सर्वांत आवडत्या चेहऱ्याकडे जास्त वेळ बघण्यास सांगण्यात आले. प्रत्येक फोटो पाहताना त्यांच्या मेंदूची प्रतिक्रिया इलेक्ट्रोसेफॅलोग्राफी, अर्थात ‘ईईजी’द्वारे नोंदवली गेली. त्या नोंदवलेल्या माहितीच्या आधारे मशिन लर्निंग अल्गोरिदम वापरून कॉम्प्युटरला शिकवण्यात आले. त्यानुसार अल्गोरिदमने सर्वात जास्त आवडलेल्या चेहऱ्यामधे थोडे बदल करून अधिक सुंदर बनवला. हा फोटो स्वयंसेवकाला दाखवल्यानंतर ‘ईईजी’च्या नोंदी आधीच्या प्रयोगाप्रमाणेच दिसून आल्या आहेत. संशोधकांच्या निष्कर्षानुसार तुमच्या स्वभावानुसार आणि आवडीनुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आता तुम्हाला फोटो पाठवू शकेल, आधीच्या फोटोंमध्ये बदल करू शकेल. कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील अशाच एका संशोधनानुसार, तेरा स्वयंसेवकांना १४० फोटो दाखवण्यात आले आणि त्यांच्या ‘ईईजी’ नोंदीनुसार त्यांना आवडलेला फोटो शोधण्यात आला. हा प्रयोग जवळजवळ १०० टक्के यशस्वी झाला आहे. जपानमधील क्योटो विद्यापीठात ‘ईईजी’च्या ऐवजी रक्त प्रवाहातील बदलाच्या नोंदींवरून आवडनिवड ओळखण्यावरील संशोधन शेवटच्या टप्प्यात आहे. 

इंटेलिजन्ट रोबोटिक्स क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. इयान पिअर्सन यांच्या मते पुढील दशकाच्या शेवटी मेंदूतील हालचाली, संकेत समजावून घेऊन रोजच्या जीवनातील जटिल समस्या सोडवणे आता शक्य होऊ शकते. आज हे संशोधन अगदी प्राथमिक स्वरूपाचे वाटत असले तरी संरक्षण क्षेत्रात व गुन्हेगारी रोखण्यात त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. या संशोधनाच्या आधारे विमानतळावरील प्रवाशांच्या मेंदूतील संकेत, तसेच न्यूरॉनच्या माहितीचे विश्लेषण करता येईल व संभाव्य धोका ओळखता येऊ शकेल. तसेच पोलिस तपासामध्ये ‘कसून चौकशी’ करण्याची गरज उरणार नाही. इंटेलिजन्ट अल्गोरिदमने सुसज्ज हेल्मेट संशयिताच्या डोक्यावर बसवल्यावर संपूर्ण मेंदूच वाचता येईल. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील कित्येक कंपन्या आता ‘ईईजी’ किंवा सेन्सर अंगावर किंवा डोक्यावर बसवण्याऐवजी दुरूनच येनकेन प्रकारे मेंदूतील बदल शोधता येण्यावर भर देत आहेत. यासंदर्भात साधक आणि बाधक असे दोन्ही पैलू आहेत. त्यातील दुरुपयोगांचा विचार केल्यास मात्र एखाद्या कंपनीच्या सॉफ्टवेअरने आपल्या मेंदूतील माहिती शोधणे आणि समजून घेणे हे एक मोठे संकट ठरू शकते. ती माहिती चुकीच्या हातात पडू शकते, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, तसेच अगदी अत्यंत खासगी विचारसुद्धा दुसऱ्याला समजू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे मूकबधिर व अर्धांगवायू किंवा पक्षाघात झालेल्या लोकांसाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे वरदान ठरू शकते, उलटपक्षी सामान्य लोकांसाठी मात्र ही एक डोकेदुखी ठरू शकते. कोणतेही तंत्रज्ञान हे स्वतः तटस्थच असते. त्याचा वापर करणाऱ्यांच्या उद्देशावर परिणाम ठरत असतात. उदात्त हेतूच्या बुरख्याआड आपली अत्यंत खासगी माहिती मिळवली जाऊ शकते. तीच पुढे वेगवेगळ्या जाहिरात करणाऱ्या कंपन्यांपर्यंत किंवा देशांतर्गत वा बाहेरील व्यक्तींपर्यंत पोचवली जाऊ शकते. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मेंदूतील माहिती चोरली जाऊ शकते. या शक्यता लक्षात घेता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही पावले लवकरात लवकर उचलण्याची गरज निर्माण होईल. त्याचप्रमाणे, एकंदर मानवी समाजाची रचना व त्यातील गुंतागुंत पाहता यासाठी काही आचारसंहिता व कायदे लागू करणेही गरजेचे ठरेल. अन्यथा भविष्यात ‘मन वाचण्या’चे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

संबंधित बातम्या