मनुष्यबळाच्या नियोजनासाठी...

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 24 मे 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

योग्य उमेदवार शोधण्याचे काम इंटेलिजन्ट अल्गोरिदम करतात, त्याच प्रमाणे नव्यानेच काम सुरू केलेल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष देण्याचे महत्त्वाचे कामही आता इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर करत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने आता माणसांच्या जगण्याशी जोडलेल्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांत प्रवेश केलेला आहे. काही दशकांपूर्वी ज्या संकल्पनेचा उपयोग केवळ फक्त स्वप्नवत वाटत होता, ती संकल्पना आता अनेक क्षेत्रांचा अविभाज्य भाग बनते आहे. मॅकेन्झी या व्यवस्थापकीय कंपनीच्या एका सर्वेक्षणानुसार आणखी दहा वर्षांनी म्हणजे २०३०पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगातल्या उद्योगधंद्यांमधला वाटा ३० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.

एखाद्या कामासाठी योग्य उमेदवार शोधणे, त्याची/ तिची मुलाखत घेणे, नव्याने भरती केलेल्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे, त्यांना योग्य काम देणे, त्यांच्या बढत्या, बदल्या आदींपासून ते निवृत्तीपर्यंतचे सर्व नियोजन साधारणपणे ह्युमन रिसोर्स म्हणजेच मनुष्यबळ विभाग करत असतो. या क्षेत्रातही आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा चंचुप्रवेश झाला आहे. अजूनही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला मनुष्यबळाच्या नियोजनाच्या क्षेत्रात बरीच मजल मारायची आहे; पण गेल्या दशकाच्या सुरुवातीपासून माहिती साठवण्याची वाढलेली क्षमता व त्याचा अर्थ लावण्यासाठीच्या कॉम्प्युटर तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल पाहता खूप कमी वेळात मोठा पल्ला गाठणे शक्य होईल असे दिसत आहे.

कंपन्यांमध्ये ज्या कामांची वारंवार पुनरावृत्ती होत असते, अशी क्वचित कंटाळवाणी ठरणारी कामे यंत्रमानवांच्या, रोबोटच्या, हवाली करून मानवी हातांचा, मेंदूचा, परिश्रमांचा उपयोग अधिक चांगल्या महत्त्वाच्या, सर्जनशील कामासाठी करणे आता ऑटोमेशनमुळे शक्य होते आहे. यामुळे एकूणच सर्व प्रकारची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारलेल्या अशाच ऑटोमेशनच्या मदतीने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी प्रामुख्याने नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे इंटरनेटवरील विविध सोशल मीडियावरील अकाउंट्स शोधले जातात. त्यासाठी इंटेलिजन्ट सर्च व मशिन लर्निंग अल्गोरिदम बनवलेले असतात. अक्षरशः काही मिनिटांत हे अल्गोरिदम उमेदवाराचे सोशल मीडियावरील वर्तन, त्याच्या साधारण सामाजिक विचारांचा कल, त्याच्या जवळच्या मित्रांचा, नातेवाइकांचा एकूण प्रभावसुद्धा शोधला जातो. या माहितीच्या आधारे हे अल्गोरिदम संबंधित उमेदवारांचे सोशल मीडिया संबंधित प्रोफाइल बनवतात. तसेच त्यावरून ह्युमन रिसोर्स मॅनेजर्सना कंपनीच्या कामासाठी प्रत्येक उमेदवारामधले योग्य ते गुणसुद्धा सुचवले जातात. यावरून उमेदवाराची पार्श्वभूमी ठरवण्यात मदत होते. सध्याच्या अस्थिर, गतिमान, तसेच, स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी कोणत्याही कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

उमेदवाराचा बायोडाटा कंपनीकडे आल्यानंतर त्या उमेदवाराची योग्यता तपासली जाते. हे तसे फार गुंतागुंतीचे काम नसते. काही ठरावीक गोष्टी, उदाहरणार्थ शैक्षणिक पात्रता, त्यावेळपर्यंतचा अनुभव, मिळालेली सन्मानपत्रे, असलेली कौशल्ये समजून घेऊन पुढील प्रक्रिया व सोपस्कारांसाठी तो बायोडाटा पाठवायचा की नाही हे ठरवले जाते. अशा एखाद्या सीव्हीबाबत निर्णय घेण्यात फार मोठा वेळ जातो असे नाही; परंतु दररोज अशा कित्येक सीव्हींची पडताळणी करणे हे पुन्हा एक कंटाळवाणे काम होऊन बसते. या पद्धतीने काम करताना माणसाच्या स्वभावात निसर्गतः काही प्रमाणात असणारे पूर्वग्रह किंवा  व्यक्तीगत आवडीनिवडींमुळे योग्य सीव्ही नाकारलासुद्धा जाऊ शकतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साह्याने हे सर्व टाळता येणे शक्य होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित मशिन लर्निंग अल्गोरिदम विशिष्ट उमेदवाराकडून अपेक्षित असलेल्या पात्रतेनुसार सीव्हीमधील ठरावीक शब्दांचा शोध घेतात. त्यानुसार गुणवत्तेची क्रमवारीसुद्धा देतात. यामुळे ह्युमन रिसोर्समधील कारकुनांचा तसेच अधिकाऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचतो. मुख्य म्हणजे नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमी वेळेत उत्तर मिळाल्यामुळे त्यांचा वेळही वाचतो. असे अल्गोरिदम इंटरनेटवरील विविध जॉब साइट वरूनसुद्धा इच्छुक उमेदवारांचा शोध घेतात व ह्युमन रिसोर्स मॅनेजर्सना सूचित करतात. 

ज्याप्रमाणे योग्य उमेदवार शोधण्याचे काम इंटेलिजन्ट अल्गोरिदम करतात, त्याच प्रमाण नव्यानेच काम सुरू केलेल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष देण्याचे महत्त्वाचे कामही आता इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर करत आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीच्या विविध पैलूंची माहिती करून देणे, काही औपचारिकता पूर्ण करून घेणे, प्रशिक्षणाची माहिती देणे, प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यांवर त्यांच्या छोट्या चाचण्या घेणे, त्यानुसार मार्किंग करणे, बदल सुचवणे आदी कामे आता ही सॉफ्टवेअर करत आहेत. हल्ली कित्येक कंपन्यांमध्ये प्राथमिक मुलाखतीसाठी चॅटबॉट किंवा इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर वापरली जातात. उमेदवाराला साधे प्रश्न विचारून साधारण माहिती गोळा केली जाते, तसेच उमेदवाराच्या प्राथमिक प्रश्नांचे निराकरण केले जाते. यामुळे, उमेदवाराचे जलद मूल्यमापन होते.

कोणत्याही गुणी कर्मचाऱ्याला टिकवून ठेवणे कंपनीच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी वैयक्तिक तसेच कामासंबंधित समस्या समजून घेणे, योग्य व्यक्तीकडे समस्या पोचवणे व वेळेत त्या समस्यांचे निराकरण करणे हे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे कंपनीची कार्यक्षमता टिकून राहण्यासही मदत होते. त्यानुसार, नवीन तसेच जुन्या कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न व समस्या प्रथम चॅटबॉट सोडवण्याचा प्रयत्न करतात. समस्येच्या गांभीर्यानुसार तसेच व्याप्तीनुसार हे चॅटबॉट योग्य व्यक्तीकडे समस्या पोचवतात. प्रश्नांनुसार व समाधानकारक उत्तरांनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे हे चॅटबॉट शिकत जातात. पुढे त्याचाच उपयोग अधिक प्रगल्भतेने होत जातो व ह्युमन रिसोर्स विभाग अधिक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करू शकतो. मुख्य म्हणजे हे चॅटबॉट आठवड्याचे सातही दिवस, दिवसाचे चोवीस तास उपलब्ध असतात. काही इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवून असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आखून दिलेले काम कितपत पूर्ण झालेले आहे त्यावरून त्याला, त्याचप्रमाणे संबंधित वरिष्ठाला सूचित करतात. तसेच कर्मचाऱ्याला सुधारित वेळापत्रकही देतात. त्याचबरोबर, प्रत्येक कर्मचाऱ्याचे इंटरनेटवरील सर्च, तसेच इ-मेल्सचे विश्लेषण करून तो कंपनी सोडण्याच्या तयारीत असल्या संदर्भात अहवाल तयार करतात. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ते नियोजन करणे शक्य होते.

कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे होणाऱ्या या सगळ्या फायद्यांबरोबरच कंपनीची जबाबदारीही वाढते आहे. इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर काम कसे करते किंवा कंपनीच्या धोरणांनुसार योग्यरीतीने काम करते की नाही याची नियमितपणे माहिती व आढावा घेणे ह्युमन रिसोर्स मॅनेजरना क्रमप्राप्त असते. भारतासारख्या विविधतेने संपन्न असलेल्या देशात प्रतिभावान लोकांची कमी नाही, परंतु वैयक्तिक पूर्वग्रहांपासून ते अन्य असंख्य गुंत्यांतून योग्य व्यक्ती निवडून त्याच्याकडून कंपनीच्या प्रगतीत हातभार लावून घेणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे, प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी या सर्वांतून बाहेर पडून प्रतिभेस वाव देण्यासाठी तटस्थ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर अटळ आहे. योग्यता व क्षमतेची पारख करून उमेदवाराची निवड केल्याने, त्यासंदर्भातील कित्येक नकारात्मक बाबी आपसूकच दूर होतील व उमेदवाराकडे योग्य काम सोपवण्यात मदत होईल. कंपनीच्या प्रतिष्ठेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा प्रकारे भरच घालेल. 

भारतातील विद्यापीठांत विद्यार्थ्यांकडून या संदर्भातील प्रोजेक्ट्स करवून घेता येऊ शकतात. असे बनवलेले इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यात योग्य बदल करून संबंधित विभाग, संस्था व विद्यापीठीय पातळीवर वापरले जाऊ शकतात.

संबंधित बातम्या