कल भविष्यातील तंत्रज्ञानाचा

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

साधारणपणे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून म्हणजेच पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून उत्पादन पद्धती, ग्राहकांसाठी उत्पादनांमधे नवनवे बदल करण्यासाठी, विश्वासार्हता वाढीस लावण्यासाठी, उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाला, 'ऑटोमेशन'ला, सुरुवात झाली.

सीएनसी, कॉम्प्युटर नियंत्रित यंत्रसामग्री आदींपासून सुरुवात करून आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश केला आहे. आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात याचा वापर होत आहे आणि नजीकच्या काळात त्याचा आवाका अधिक विस्तारणार हे नक्की. पण त्याचबरोबर, कॉम्प्युटर हार्डवेअर, तसेच कॉम्प्युटर प्रोसेसिंग चिप, सेन्सर आदी संदर्भात झालेल्या क्रांतीमुळे, त्याचबरोबर 4G आणि येऊ घातलेल्या 5G मुळे कामाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पुढील संपूर्ण दशक या बदलाचा साक्षीदार असेल, यात शंका नाही. त्या संदर्भातील महत्त्वाच्या बदलांचा, उद्योग धंद्यांसमोरील आव्हानांचा, त्याचबरोबर कोविड-१९ सारख्या नैसर्गिक संकटांमुळे तंत्रज्ञानात अधिक तीव्र स्वरूपात होणाऱ्या परिवर्तनाचा हा थोडक्यात ऊहापोह.
***

शेअर बाजार, शेती, अन्न प्रक्रिया, उत्पादन, वाहतूक, खेळ अशा एक ना अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा, वापर वाढत आहे. याच बरोबर संरक्षण, औषध निर्माण, वैद्यकीय सल्ला, निदान, स्वयंचलित वाहने आदी क्षेत्रांतील त्याचा वाढता उपयोग पाहता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने दिलेल्या उत्तराचा किंवा सुचवलेल्या उपायांचा, तसेच निर्णयाच्या मागील कारणे, त्यामागील पारदर्शकता वापरकर्त्याला कळणे किंवा समजणे फार गरजेचे आहे. साधारणपणे मशिन लर्निंग अल्गोरिदम, उदाहरणार्थ आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क्स, डीप लर्निंग अल्गोरिदम आदींमध्ये वापरकर्त्याला अल्गोरिदमने घेतलेल्या निर्णयांची कल्पना दिली जात नाही. परंतु, वर नमूद केलेल्या जीवन-मरणाशी निगडित क्षेत्रांतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढता वापर पाहता, वापरकर्त्याला निर्णयांमागची कारणमीमांसा समजणे कायद्याने बांधिल असणे आवश्यक आहे. याला एक्सप्लेनेबल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एक्सएआय) असे संबोधतात. कारणमीमांसेबरोबरच, उत्तराची अचूकतासुद्धा सांगणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर, वापरण्यात येणारी, किंवा अपेक्षित असणारी इंटेलिजन्ट सिस्टिम कोणत्या प्रकारच्या समस्या सोडवू शकते, कोणत्या प्रकारच्या समस्या त्या प्रणालीच्या आवाक्याबाहेर आहेत, हेसुद्धा वापरकर्त्याला सांगता आले पाहिजे. अमेरिकेच्या ‘डार्पा’ या संरक्षण संबंधी संस्थेने या क्षेत्रात जोमाने काम सुरू केले आहे.

अजूनही प्राथमिक स्वरूपात असलेल्या एक्सप्लेनेबल आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये येत्या दोन  ते पाच वर्षांत मोठी प्रगती होणे अपेक्षित आहे. त्यातून प्रशासकीय निरीक्षणाखाली आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या निर्णय प्रक्रियेवर वचक राहील, त्याचबरोबर सामान्य लोकांचा विश्वास वाढीस लागेल व दैनंदिन जीवनात वापर वाढू लागेल.

इंटरनेट ऑफ थिंग्ज
इंटरनेट ऑफ थिंग्ज, म्हणजेच ‘आयओटी’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा उपयोग ठरत आहे. आयओटीमध्ये विविध सेन्सर एकमेकांशी एका क्लाऊड प्लॅटफॉर्मवर जोडले जातात. त्या सेन्सरकडून  सतत माहिती गोळा केली जात असते. त्याचे इंटेलिजन्ट अल्गोरिदमच्या साहाय्याने विश्लेषण करून पुढील योग्य सुधारणा, बदल व उपाय केले जातात, तसेच सुचवलेही जातात. उदाहरणार्थ घरातील एअर कंडिशनर, स्मार्ट मनगटी घड्याळे, पंखे, फ्रीझ आदी उपकरणांमधील सेन्सर सतत क्लाऊड प्लॅटफॉर्मवर माहिती पाठवत राहतात. तेथील इंटेलिजन्ट अल्गोरिदम त्याचे विश्लेषण करतात. त्यावरून उपकरणातील संभाव्य बिघाडाचा अंदाज बांधला जातो व त्यानुसार वापरकर्त्याला सूचित केले जाते, तसेच कस्टमर केअरकडून फोन येऊन दुरुस्ती केली जाते. या सगळ्याच्या बरोबरीनेच उपकरणे बनवणाऱ्या कंपनीलासुद्धा बिघाडाबद्दल सूचित केले जाते. कंपनीच्या उत्पादन युनिटमधील उपकरणे त्यानुसार आवश्यक बदल करतात व संपूर्ण प्रक्रियेत बदल घडवून सुधारणा केली जाते. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. गाड्या, वैद्यकीय उपकरणे, मोबाईल फोन आदींचा वापर अगोदरच आयओटी क्षेत्रात जोमाने होत आहे. जसजशी आयओटी उपकरणे वाढत जातील तसतशी ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याकडे कल वाढत जाणार आहे. प्रत्येक उपकरणाच्या अगदी छोट्यातछोट्या म्हणजे अगदी नट-बोल्ट डिझाईन करणे, बनवणे आदींच्या प्रक्रियेतसुद्धा ग्राहकांच्या सोयीनुसार त्वरित बदल होत राहतील. 

रहिवासी आणि कार्यालयीन इमारतींच्या बांधकामांपासूनच आता आयओटीचा वापर होऊ घातला आहे. स्मार्ट होम्सचा वापर त्यामुळे वाढणार आहे. ‘बिझनेस इंटेलिजन्स इन्साईडर’च्या अहवालानुसार गेल्या वर्षीपर्यंत साधारणपणे तीन अब्ज आयओटी उपकरणे जगभरात वापरात आली, ज्यांची किंमत १७,५०० अब्ज रुपयांच्या आसपास आहे. पुढील कित्येक दशके आयओटीच्या प्रभावाखाली प्रगतिशील राहतील हे नक्की. या माध्यमातून, उच्च दर्जाच्या रोजगाराच्या संधी आपल्या दाराशी उभ्या आहेत.

आयओटीच्या विस्तारामुळे खरेतर एक नवीन समस्या उभी राहते. ती म्हणजे, आयओटी उपकरणांद्वारे क्लाऊड बरोबर सतत होणारी माहितीची देवाणघेवाण, तसेच क्लाऊडवर सतत होणारे विश्लेषण. यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो. ज्या वेगाने आयओटी उपकरणांची संख्या वाढते आहे, त्याप्रमाणात यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. त्यामुळे विश्लेषण करण्यासाठी लागणारा वेळसुद्धा वाढणार आहे. या समस्येवर तोडगा म्हणजे 'एज कॉम्प्युटिंग'. या संकल्पनेत, क्लाऊडपेक्षा कमी कॉम्प्युटिंगची क्षमता असलेले संगणक ठराविक क्षेत्रातील काही आयओटी उपकरणांच्या माहितीचे स्थानिक पातळीवर विश्लेषण करून मोजकी, गरजेपुरती व महत्त्वाची माहितीच क्लाऊडकडे पाठवतात. त्यामुळे कॉम्प्युटिंगचा महत्त्वाचा वेळ वाचतो आणि त्याचबरोबर माहितीच्या विश्लेषणाची विश्वासार्हताही वाढते. भविष्यात 'एज कॉम्प्युटिंग'मध्ये आवश्यक बदल केले जातील. त्यातून रोजगाराच्या तसेच संशोधनाच्या प्रचंड उपलब्ध होतील.

सायबर सिक्युरिटी
कोविड-१९च्या संकटामुळे डिजिटल किंवा आयटी कंपन्यांचे जवळजवळ सर्व कर्मचारी घरातून काम करू लागले आहेत. त्यामुळे कंपनीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झालेला आहे व उत्पादकता वाढीस लागली आहे, हे खरे. परंतु, त्याचबरोबर या कंपन्यांना आता सायबर सिक्युरिटीचा प्रश्न नव्याने भेडसावतो आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, कंपनीचे कर्मचारी कंपनीत येऊन काम करायचे तेव्हा त्यांचे कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणे एका केंद्रीय यंत्रणेच्या देखरेखीखाली असायची. बाहेरून होणारे व्हायरसचे किंवा इतर हल्ले थांबवण्याचे व माहिती चोरीवर आळा घालण्याचे काम या यंत्रणेमार्फत होत असे. परंतु प्रत्येक कर्मचारी घरातून काम करत असल्यामुळे त्याच्या वापरात येणाऱ्या व कंपनीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक डिजिटल उपकरणांसाठी स्वतंत्र सिक्युरिटी यंत्रणा बनवणे, हे एक अत्यंत आव्हानात्मक काम सध्या जोरात चालू आहे. प्रत्येक कंपनीसाठी त्यांचे शेकडो-हजारो कर्मचारी एकमेकांशी जोडणे, त्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठीचे सुरक्षित जाळे उभे करणे, ते सुसज्ज ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली किंवा कमी झाली तरी संरक्षणात कमी पडता कामा नये हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने कर्मचारी जेव्हा त्याच्या घरातून कंपनीच्या कॉम्प्युटर प्रणालीमध्ये लॉग इन होईल त्यावेळचे सिक्युरिटी फीचर वाढवणे, बदलणे, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आदींचा समावेश आता वाढतो आहे. काही कंपन्यांनी व स्टार्टअप्सनी आता अशा सिक्युरिटी पुरवणाऱ्या क्षेत्रात उडी घेतली आहे. 

अमेरिकेतील ‘गार्टनर’ या सल्लागार क्षेत्रातील कंपनीच्या अभ्यासानुसार २०२४ च्या शेवटी सर्व कंपन्यांसाठी या संदर्भातील जागतिक स्टँडर्ड्स किंवा मानके घोषित करण्यात येतील अशी शक्यता आहे. याच कंपनीच्या सर्वेक्षणानुसार जगातील कमीतकमी ३० टक्के कंपन्या घरातूनच कामाला प्राधान्य देतील व त्यांना अशा सिक्युरिटी पुरवणाऱ्या त्याचबरोबर त्यासंबंधी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची सर्वाधिक गरज असेल.

बिग डेटा
माहितीच्या देवाणघेवाणीबद्दलही मोठी क्रांती येत्या दशकात होऊ घातली आहे. मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट आदी माहितीचे स्रोत आहेतच, पण माहितीच्या देवाणघेवाणीचा वेगही न भूतो... असा वाढलेला आहे आणि या पुढच्या काळात तो वाढतच जाणार आहे. आज एकट्या भारतातच ८० कोटींहून अधिक स्मार्ट फोन वापरात आहेत. वर्ष २०३०पर्यंत त्यात आणखी पन्नास कोटी फोनची भर पडेल म्हणजे १३० कोटींहून अधिक स्मार्ट फोन वापरात असतील. जगाचा विचार केला तर आजमितीला साधारणपणे ६०० कोटींहून अधिक स्मार्ट फोन वापरात आहेत. प्रत्येक फोन महिन्याकाठी साधारणपणे ४० एक्साबाईट इतकी प्रचंड माहिती तयार करतो. ही माहिती ई-मेल, एसएमएस, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, म्युझिक, फोन कॉल आदींच्या माध्यमातून तयार होत असते. जगात जर आज ६०० कोटी स्मार्ट फोन वापरात असतील तर ते सगळे मिळून किती माहिती तयार करत असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी. 

उदाहरण म्हणून जगात प्रत्येक मिनिटाला किती माहिती तयार होते ते पाहू. उपलब्ध आकडेवारीनुसार स्नॅपचॅट या अॅपद्वारे दर मिनिटाला २० लाखांहून अधिक फोटो शेअर केले जातात, ४० लाखांहून अधिकवेळा गूगलवर सर्च केले जाते, १० लाखांहून अधिक लोक फेसबुकवर काही ना काही शेअर करतात, ५० लाखांहून अधिक यूट्युब व्हिडिओ बघितले जातात, १९ कोटींपेक्षा अधिक ई-मेल पाठवले जातात. या सर्व माहितीचे वर्गीकरण करणे, त्यातील योग्य आणि महत्त्वाची माहिती शोधणे हे आता एक आव्हान ठरत आहे. याचे कारण म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे ही माहिती ई-मेल, एसएमएस, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, म्युझिक, फोन कॉल आदींच्या माध्यमातून जमा होत असते. ही माहिती तयार होण्याचा वेग प्रचंड असतो. अशी माहिती साठवणे, लागलीच त्या माहितीची खातरजमा करून त्यातील आपल्या गरजेची माहिती वापरून, त्याचे तितक्याच वेगाने विश्लेषण करून निष्कर्ष काढणे, निर्णय घेणे आदी क्रिया महत्त्वाच्या असतात. अशा अत्यंत वेगाने तयार होणाऱ्या भरमसाट, तसेच वैविध्यपूर्ण माहितीला ‘बिग डेटा’ असे संबोधले जाते. 

विविध उद्योगधंद्यांमध्ये आता बिग डेटाचे महत्त्व वाढत आहे. फक्त आरोग्यसेवेशी निगडित माहितीचे उदाहरण पाहिले तर बिग डेटा आणि त्यावरील प्रक्रिया किती जडव्यागळ आहे, ते लक्षात येईल. त्यात रुग्णांच्या मुलाखती, रुग्णाची वैद्यकीय व अन्य पार्श्वभूमी, प्रिस्क्रिप्शन, औषधे, विविध चाचण्यांचे रिपोर्ट, एक्सरे किंवा तत्सम फोटो अशा एक ना अनेक गोष्टी असतात. साधारणपणे दरवर्षी याप्रकारची २५०० एक्साबाईटपेक्षा अधिक माहिती तयार होते. म्हणजे साधारणपणे दररोज ७ एक्साबाईट माहिती तयार होते. आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. मुख्य म्हणजे या माहितीचे विविध प्रकार पाहता एका चाळणीतून ही सर्व माहिती तपासणे शक्य नाही. त्यातून माहितीचे योग्य व अचूक विश्लेषण करून त्यातून उपयोगी माहिती मिळवून पुढे आजाराचे अचूक व लवकर निदान करणे, योग्य व कमी खर्चिक औषधोपचार करणे शक्य होऊ लागले आहे. या माहितीचा योग्य उपयोग होण्यासाठी, त्याची विश्वासार्हता वापरकर्त्याला समजावून देणे हे आता एक्सप्लेनेबल आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ घातले आहे. तरीही बिग डेटावर झालेले संशोधन अजूनही प्राथमिक स्वरूपाचे आहे आणि अजून कितीतरी आव्हाने पेलायची आहेत. 

थोडक्यात सांगायचे तर, पुढील संपूर्ण दशक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एज कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आयओटी, बिग डेटा आदींशी संबंधित आव्हानांनी व्यापलेले आणि मोठी भरारी घेणारे असणार आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाचे हे सर्व अवतार एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांच्या साथीने पुढे जात आहेत व प्रभावी होत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दैनंदिन जीवनात अधिक सुलभता तर येईलच, पण विश्वासार्हता वाढून, खर्चही कमी होणार आहे. रोजगाराच्या तर असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. आपला तरुण देश माहिती तंत्रज्ञानात आधीच आघाडीवर आहे, पण आता त्याचे फायदे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचा काळ आपल्या दारात उभा आहे. त्याकडे पाठ न फिरवता, या संदर्भातील पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहाराशी जोडल्यास, पुढील दशकातील संधींचे सोने आपण करू शकतो हे नक्की.

संबंधित बातम्या