ग्रहमान : ५ ते ११ ऑक्टोबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

ग्रहमान
 

मेष : सप्ताहात थोडी गोंधळाची स्थिती होईल. व्यवसायात तुमच्या मनाचा कौल अजमावा. जे योग्य तेच करावे. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणताही धोका पत्करून कामे करू नयेत. नोकरीत वरिष्ठांच्या दुट्टप्पी वागण्याचा राग येईल. थोडे बुचकळ्यात पडाल. मिळालेल्या अधिकाराचा वापर योग्य ठिकाणीच करावा. घरात तुमची धाडसी वृत्ती इतरांना फायद्याची ठरेल. काहीतरी करून दाखवण्याची तुमची मनोकामना पूर्ण होईल. गृहसौख्य उपभोगाल.

वृषभ : प्रयत्नांती परमेश्‍वर हे लक्षात ठेवून कामे करावीत. मेहनतीला भोवतालच्या परिस्थितीची म्हणावी तशी साथ मिळणार नाही, तरी निराश न होता कार्यरत राहावे. व्यवसायात इरेस पेटून काहीतरी वेगळे करण्याची खुमखुमी येईल. रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत तुम्हाला झालेला विरोध तुम्ही सहन करणार नाही. वरिष्ठांपुढे तुमच्या मागण्या व कल्पना मांडाल. घरात माझे तेच खरे हा हेका राहील. त्यामुळे वादविवाद होतील.

मिथुन : ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे धाडसाने पावले उचलाल. मात्र, चुकीचे निर्णय घेत नाही ना? याची खातरजमा करावी. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे मार्गी लावाल. अचूक निर्णय घेऊन भविष्यात लाभ होणारी पावले टाकाल. विक्री व उलाढाल वाढवून त्यातून भांडवलाची उभारणी कराल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्‍यता. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. पगारवाढ होईल.

कर्क : भावनेच्या भरात एखादा निर्णय घेऊन नंतर पश्‍चात्तापाची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवसायात कामामुळे धावपळ, दगदग होईल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नवीन करार शक्‍यतो विचारांती करावा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत राहून कामे करावीत. पैशांचा मोह टाळावा. कामाचा वेग चांगला राहील. घरात सर्वांनुमते कार्यक्रम ठरेल, पार पडेल. आप्तेष्ट नातेवाइकांचे भेटीचे योग येतील. तरुणांना कलागुण दाखविता येतील.

सिंह : नको त्या कामात बराच वेळ जाईल. सहज वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन आटोक्‍याबाहेर गेलेली कामे सुरळीत आणण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात माणसांची पारख होईल. कामात खरे मित्र व हितचिंतक मदत करतील. जुनी वसुली करण्याकडे कल राहील. नोकरीत आवश्‍यक कामे प्राधान्यानुसार कराल. नवीन नोकरीच्या कामात प्रगती होईल. प्रकृतीमान सुधारेल. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल.

कन्या : संमिश्र ग्रहमान लाभत आहे, त्यामुळे सकारात्मक दृष्टीने पावले उचलाल. व्यवसायात आवश्‍यक तेथे धोका पत्करून कामे मार्गी लावाल. कामाच्या पद्धतीत बदल करावासा वाटेल. काळानुरूप कामाची गरज असेल, त्यानुसार त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्याल. नोकरीत नवीन कार्यप्रणाली, तंत्रज्ञान शिकून त्याचा अभ्यास करून कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना योग्य संधी मिळेल. घरात पैशांची तजवीज करून ठेवावी. खर्चावरही नियंत्रण ठेवावे.

तूळ : आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतलात, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसाय व घर या दोन्हीकडे सतर्क राहून काम करणे भाग पडेल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारेल. कामातील विक्री व उलाढाल वाढवण्यासाठी वेगळी युक्ती अवलंबाल. कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा मानस असेल. नोकरीत तुमचे काम, तुम्ही चांगल्याप्रकारे करून स्तुतीस पात्र ठराल. वरिष्ठ सवलतींसाठी तुमची निवड करतील. घरात खरेदीचे बेत सफल होतील. महिलांना मानसिक समाधान मिळेल.

वृश्‍चिक : महत्त्वाकांक्षा वाढवणारे ग्रहमान आहे. कष्टाची तयारी ठेवून यशश्री खेचून आणाल. व्यवसायात योग्य व्यक्तींची योग्य कारणासाठी निवड करून कामाची विभागणी कराल. कामांना गती देण्यासाठी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागले. नवीन कल्पना साकार कराल. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी अधिकारही देतील. व्यवसायातून विशेष लाभ होतील. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल.

धनू : मनातील विचाराला कृतीची ठोस जोड देऊन कामे हाती घ्याल. तुमचा उत्साही स्वभाव बंधन संपल्याने आनंदी होईल. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी काही विशेष योजना आखाल. ओळखीच्या व्यक्तींकडून पैशांची मदत झाल्याने कामात पुन्हा सक्रिय व्हाल. परदेशगमन व परदेशव्यवहार यातील अडथळे दूर होतील. नोकरीत कामांना वेग आल्याने धावपळ, दगदग वाढेल. नवीन नोकरीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश येईल. तरुणांचे विवाह ठरतील.

मकर : प्रगतीचा आलेख चढता राहील. योग्य दिशा मिळाल्याने प्रगतीचे चित्र स्पष्ट होईल. व्यवसायात इतरांवर अवलंबून न राहता तातडीची कामे स्वतः हाताळावीत. कामात झालेली गैरसोय तुम्हाला सहन होणार नाही. व्यवसायात आवश्‍यक तेवढी पैशांची सोय झाल्याने तात्पुरती गरज भागेल. मात्र, शिल्लक रक्कम नसल्याने थोडी अस्वस्थता जाणवेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे कामाचा मनस्वी कंटाळा येईल. जमेल/झेपेल तेवढेच काम करून विश्रांती घ्यावी. घरात मानले.

कुंभ : विचारपूर्वक पावले उचलावीत. भोवतालची परिस्थिती बदलण्याची वाट न बघता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करावा. व्यवसायात दैनंदिन कामे सुरळीत होत असली, तरी पैशांची आवक मंदावेल. त्यामुळे चणचण भासेल. हातात जी कामे आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. नोकरीत यशाची वाट निवडावी. खात्रीशीर मार्गाचा अवलंब करावा. वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. घरात एखादा लांबलेला सोहळा निश्‍चित होईल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

मीन : परिस्थितीत सकारात्मक बदल घडल्याने आशावाद जागृत होईल. व्यवसायात कामातील अडीअडचणींवर मात करून पुढे जाण्याचा ठाम निश्‍चय राहील. बरेच पैसे व वेळ त्यासाठी लागेल. परंतु, त्याची पर्वा नसेल. मध्यस्थांवर सोपवलेल्या कामात जातीने लक्ष घालाल. नोकरीत आवश्‍यकतेनुसार कामात बदल किंवा बदली होण्याची शक्‍यता आहे. नवीन नोकरीच्या कामाला  चालना मिळेल. घरात नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. काही तात्त्विक मतभेद होतील.

संबंधित बातम्या