ग्रहमान ः २४ ते ३० मार्च २०१८

 अनिता केळकर  
गुरुवार, 22 मार्च 2018

ग्रहमान 

मेष ः आनंद द्विगुणित करणारी चांगली बातमी कळेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून व सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. परदेशगमनास उत्तम संधी चालून येईल. खरेदीच्या गडबडीत महिलांचा वेळ जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.विद्यार्थ्यांची अभ्यासात टंगळमंगळ राहील. 

वृषभ ः व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी ओळखीचा उपयोग करून कामाचा विस्तार कराल. खेळत्या भांडवलासाठी बॅंका, पतपेढी यांची मदत घ्याल. 'आज रोख व उद्याही रोखच' हे धोरण अवलंबाल. नोकरीत सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळेल. घरात आनंदाची बातमी कळेल. महिलांनी कामाचा ताण न घेता खुबीने इतरांकडून कामे करून घ्यावीत. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांनी मन एकाग्र करावे. यश हमखास मिळेल. 

मिथुन ः तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा फलद्रूप झाल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. व्यवसायात यशाची कमान उंचावत जाईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरदार व्यक्तींना वेगळ्या कामाच्या निमित्ताने जादा भत्ते व सवलती मिळतील. महत्त्वाचे करारमदार होतील. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना मानसन्मान मिळतील. नवीन जागा, वाहन, वास्तू खरेदी कराल. 

कर्क ः व्यवसायात कलात्मकता व व्यवहार चातुर्य यामुळे उलाढाल चांगली राहील. नवीन पद्धतीची कामे तुम्हाला विशेष आकर्षित करतील. नोकरदार व्यक्तींना कामात उत्तम कामगिरी बजावल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांचा वेळ घरात नवीन खरेदी व गृहसजावट यात जाईल. खर्च वाढेल. पाहुणे येतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी ताण घेऊ नये. तरुणांचे साहस बळावेल. 

सिंह ः ग्रहमानाची साथ असल्याने कामाचा झपाटा राहील. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी पार पाडाल. केलेल्या कामातून आनंद मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचा वेळ आवडत्या छंदात मजेत जाईल. प्रकृतीमानही उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. 

कन्या ः आर्थिक बाबतीत चोखंदळ राहाल. पैशाचे व्यवहार करताना कर्तव्य श्रेष्ठ मानाल. व्यवसायात तात्पुरता नफा न बघता भविष्यात फायदा मिळेल अशा कामांवर लक्ष केंद्रित कराल. पैशाची ऊब चांगली मिळेल. ती वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतीलच ही अपेक्षा करू नका. बदलीसाठी प्रयत्न करावेत. कामात चुका कमी कराव्यात. सलोख्याने वागा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. झेपेल तेवढेच काम हाती घ्यावे. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

तूळ ः स्वतःचे वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न राहील. पैशाचे बजेट कोलमडेल. व्यवसायात जुनी देणी द्यावी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागतील. चिडचिड वाढेल. तरी जिभेवर साखर ठेवून इतरांशी बोलावे. महिलांचा वेळ नको त्या कामात जाईल. नवीन अनुभव येतील. मुलांकडून मात्र चांगली बातमी कळेल. नवविवाहितांना अपत्य सुखाची चाहूल लागेल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील. 

वृश्‍चिक ः व्यवसायात तुमच्या गुणांना वाव देणारे पूरक ग्रहमान लाभल्याने कामाचा मोबदला चांगला मिळेल. बॅंका, हितचिंतकांची मदत मिळाल्याने कामांना गती येईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत इतरांना न जमणारे काम सोपवले जाईल त्यात यशश्री खेचून आणाल. तुमचे महत्त्व इतरांना कळू येईल. प्रवास कराल. महिलांना सांसारिक जीवनात आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान उत्तम राहील. कौटुंबिक प्रश्‍न धसास लागतील. कला, क्रीडा, कौशल्य इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. 

धनू ः महत्त्वाकांक्षा जागृत करणारे ग्रहमान लाभल्याने व्यवसायात हातून निसटलेली संधी पुन्हा मिळवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्‍यक ते फेरबदल कराल. कमी श्रमात जास्त फायदा मिळवून आर्थिक बाजू भक्कम कराल. यशदायक ग्रहमान. नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलती देतील. कामाचा हुरूप वाढता राहील. महिलांचा भावनेच्या भरात अवाजवी खर्च होईल. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. 

मकर ः माणसांची पारख करावी लागले. खुबीने वागून त्यांचाच योग्य उपयोग करून घ्याल. व्यवसायात वेळेचे गणित पाळले तर उलाढाल वाढेल व फायदा होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यतत्पर राहावे. बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवावे व त्यानुसार धोरण ठरवावे. नोकरीत पुढे पुढे करून कामे स्वीकारू नका. अपेक्षाभंग होण्यापेक्षा कोणाकडून कुठलीही अपेक्षा करू नका. चांगल्या बातमीने महिलांना आनंद मिळेल. मोठ्यांच्या सल्ल्याचा उपयोग होईल. कौतुकाची थाप मिळेल. विद्यार्थ्यांनी आळशीपणा करू नये. 

कुंभ ः सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे निर्माण झाल्याने तुम्हाला निराशा येईल व पावले चुकीच्या मार्गाने पडण्याची भीती वाटेल. तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात पैशाच्या मोहापायी वातावरणापासून दूर राहावे. तत्त्वानुसार वागून कामे करावी. हितचिंतकांची मदत घ्यावी. आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. नोकरीत ताण-तणाव असला तरी वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. बेरोजगारांना नवीन कामाची संधी मिळेल. सणाच्या धांदलीत महिलांना वेळ कसा जाईल ते कळणार नाही. पाहुण्यांची ये-जा राहील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

मीन ः ""जैसी करनी वैसी भरणी'' ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात चुकीच्या सल्ल्याने नुकसान होण्याची शक्‍यता. आर्थिक बाबतीत चोखंदळ राहावे. पैशाचा अतिमोह टाळा. नोकरीत अयोग्य संगतीपासून दूर राहावे. वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनांना भुलून नवीन जबाबदारी स्वीकारू नका. आपले काम बरे आपण बरे, हे धोरण ठेवा. महिलांनी भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नयेत. "दिसते तसे नसते' हे ही लक्षात ठेवावे. तरुणांनी गडबडीने वागू नये.

संबंधित बातम्या