ग्रहमान : २१ ते २७ एप्रिल २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

ग्रहमान

मेष : आत्मिक बळ वाढेल. व्यवसायात अवघड कामात यश मिळेल. महत्त्वाकांक्षी योजना सफल होतील. भरपूर काम करावे. नवचैतन्य सळसळेल. कामात उत्पादन व नफा वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कराल. नोकरीत कमी श्रमात यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. घरात महिलांना नवीन खरेदीचा आनंद मिळेल. प्रियजन - नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. 

वृषभ : "मनी वसे ते स्वप्नी दिसे' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात बराच काळ मनात रेंगाळत असलेले बेत साकार करण्याची संधी चालून येईल. दूरदृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल. योग्य माणसांशी संपर्क साधून कामे मार्गी लागतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी यांचा पाठिंबा राहील. घरात वेळेत कामे संपवून इतर वेळ कुटुंबासमवेत घालवाल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

मिथुन : मानसिक अस्वस्थता कमी होऊन तुम्ही पुन्हा तुमच्याकार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ शकाल. व्यवसायात बरेचसे प्रश्‍न सुटतील. स्पर्धकांवर मात करण्यासाठी आखलेली योजना फलदायी ठरेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड करतील. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात मोठ्यांचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना उपयोगी पडेल. तुमचा सहवास इतरांना हवाहवासा वाटेल. महिलांना आध्यात्मिक प्रगती साधता येईल. 

कर्क : रेंगाळलेल्या कामांना गती येईल. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून प्रगती करावी. नवीन पद्धतीच्या कामात रस वाटेल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. ......काचा आनंद मिळेल. नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. शुभकार्य ठरतील. महिलांनी विनाकारण होणारी दगदग धावपळ कमी करावी. पैशाचे खर्च आटोक्‍यात ठेवावेत. 

सिंह : सुटकेचा निःश्‍वास टाकाल. अंधारात जसा छोटा दिवा प्रकाशमान वाटतो तसा आनंद मिळेल. व्यवसायात चुका दुरुस्त करून पुढे प्रगती करावी. अनुभवातून शिकून शहाणे व्हावे. पैशाची थोडी चणचण भासेल तरी तूर्तास जवळची पुंजी वापरावी. नोकरीत आव्हाने स्वीकारून काम कराल. वरिष्ठ नवीन संधी देतील त्याचा लाभ घ्यावा. निडर स्वभावाचा फायदा होईल. घरात कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. खर्चही भरपूर कराल. मानसिक समाधान मिळेल. मुलांच्याकडून आनंदाची बातमी कळेल. 

कन्या : "स्वतः मेल्याशिवाय....' या म्हणीची आठवण पदोपदी होईल. प्रत्येक कामात स्वयंसिद्ध व्हावे लागेल. व्यवसायात वेळ व काळ यांचे तारतम्य बाळगा. काही कामे दुसऱ्यावर विसंबून असतील तर विलंब होईल. खर्च वाढेल. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. घरात अनपेक्षित खर्च वाढेल. करमणुकीत वेळ घालवाल. तरुणांना रुसवे - फुगवे प्रेमात अनुभवता येतील. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. 

तूळ : अंथरूण पाहून पाय पसरलेत तर जास्त लाभदायी ठरेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे तडीस न्यावीत. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. हितचिंतक व सहकाऱ्यांची कामात मदत होईल. पैशाची चिंता मिटेल. घरात वादविवाद होतील. तुमचे निर्णय तुम्ही इतरांवर लादाल. कौटुंबिक जीवनात अस्थिरता येईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी क्षमतेबाहेर जाऊन कामे करू नयेत. 

वृश्‍चिक : कामाचा आनंद मिळाल्याने कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. व्यवसायात स्पर्धकांच्या पुढे एक पाऊल टाकाल. योग्य व्यक्तींची संगत बरेच काही साध्य करून देईल. नोकरीत आता दगदग धावपळ वाढली तरी भविष्यात त्याचा लाभ होईल. तुमची किंमत इतरांना कळेल. सगळ्यांबरोबर काम केलेत तर यशही मिळेल. घरात तरुणांचे विवाह ठरतील. नवीन वास्तू खरेदीचे योग येतील. गतिमान जीवन जगता येईल. 

धनू : शक्ती युक्तीचा वापर करून कमी श्रमात जास्त यश मिळवाल. यशाची चढती कमान आनंद द्विगुणित करेन. मानसिक शांतता मिळेल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नवीन कामे सुरू होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामे उरकावीत. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य सल्ला व संमती घ्यावी. जादा कामातून जादा पैसे मिळवता येतील. घरात इतरांच्या हट्टाखातर चार पैसे खर्च कराल व वेळही घालवाल. तरुणांना संभ्रमात टाकणारे ग्रहमान तरी तूर्तास फारशी हालचाल करू नये. 

मकर : दोन्ही आघाड्यांवर सतर्क ठेवणारे ग्रहमान. आळस झटकून कामाला लागावे. व्यवसायात दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय लाभदायी ठरेल. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मागण्या मान्य करतील. सकारात्मक दृष्टिकोन फायदा देणारा. जोडधंद्यातूनही चांगली कमाई होईल. घरात प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. शुभकार्याची नांदी होईल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील. 

कुंभ : स्वतःच्या तंत्राने कामाची आखणी करून कामे करावीत. व्यवसायात दक्ष राहून यश संपादन करावे. कार्यपद्धतीत केलेला बदल लाभ देईल. नोकरीत खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात खरेदीचे योग येतील. पाहुण्यांची ये-जा राहील. आवडत्या कामात महिलांना रस वाटेल. 

मीन : स्वभावाला साजेसे ग्रहमान लाभल्याने जीवनाचा निखळ आनंद घ्याल. इतरांनाही त्यात सहभागी कराल. व्यवसायात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळतील. खेळत्या भांडवलाची पूर्तता झाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ जादा सवलती देतील. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. घरात शुभकार्य ठरतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग आहेत. मनसोक्त खर्च कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप दुसऱ्यांवर पडेल.

संबंधित बातम्या