ग्रहमान : १२ ते १८ मे २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 11 मे 2018

ग्रहमान
 

मेष : व्यवसाय, नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. 

वृषभ : दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी ठराल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील. 

मिथुन : चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्यावा. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्यावे. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करावे. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाव्यात. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करावेत. 

कर्क : काहीतरी भव्यदिव्य करायची सुप्त इच्छा राहील परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जावे. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवावीत. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींशी वागावे. 

सिंह : "हाती घ्याल ते तडीस न्याल' व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खेळाडू, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल. 

कन्या : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते, याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्‍यक ठरेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. 

तूळ : तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल. 

वृश्‍चिक : "प्रयत्न वाळूचे...' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्त्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवावे. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. तरुणांनी अतिसाहस टाळावे. 

धनू : आपली कुवत ओळखून सावधगिरीने व्यवसायात आश्‍वासने देवून आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नये. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघावी. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. 

मकर : कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. 

कुंभ : अतिविचार न करता बेधकड निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल. सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. महिलांना मनासारखे काम करता येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. 

मीन : सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल रुचेल तीच कामे करावीत. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग, घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. "शब्द हे शस्त्र आहे' लक्षात ठेवा. मतलबी व्यक्तींपासून चार हात लांब राहावे. आरोग्य सुधारेल.

संबंधित बातम्या