ग्रहमान २३ ते २९ जून २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 21 जून 2018

ग्रहमान 

मेष - व्यवसाय नोकरीत अडथळ्यांवर मात कराल. कामात बदल करुन काही ठोस पावले उचलाल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करुन नवीन कामे ओढवून घेऊ नये. स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी जादाची दगदग धावपळ कमी करावी. रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरुणांना नवीन व्यक्तींच्या सहवासाचे आकर्षण वाटेल.
 
वृषभ - कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम, असे धोरण असेल. व्यवसायात नवीन जबाबदारी स्विकाराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेषः प्रयत्न कराल. अपेक्षित पैसे हाती येतील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. अपेक्षित पत्रव्यवहारांना गती येईल. महिलांचा प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान. 

मिथुन - पूरक ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात कर्तव्याला प्राधान्य द्यावे. स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे दगदग धावपळ वाढेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभेल. 

कर्क - व्यवसाय नोकरीत विस्ताराचे बेत सफल होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सुखसुविधा देतील. अपेक्षित पत्रव्यवहारांना गती येईल. तरुणांचे विवाह पार पडतील. महिलांना चांगली बातमी कानावर येईल. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढेल. नवीन खरेदीचे बेत सफल होतील. घरगुती कार्यक्रम होतील. खेळाडू कलाकारांना मानमरातब मिळेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड चांगला राहील. 

सिंह - व्यवसायात आधुनिकीकरण करुन कामात उलाढाल वाढवण्याचा तुमचा मानस असेल; त्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता भासेल. बॅंका व हितचिंतकांची मदत घेऊन कामांना गती आणाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत तुमच्या मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा सफल होतील. सहकारी व वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळेल. महिलांचा वेळ घरकामात कसा जाईल ते कळणार नाही. गृहसजावट कराल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल. 

कन्या - उत्साहवर्धक वातावरण लाभेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कामातील प्रगतीचा आलेख वाढता राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत अतिमहत्त्वकांक्षेच्या आहारी जाऊ नये. कामात बिनचूक राहून कामे वेळेत उरकावीत. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिला पाहुण्यांचे स्वागत हसतमुखाने करतील. कामे... तत्परतेने संपवण्याकडे कल राहील. नातेवाईक मित्रमंडळी यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे. 

तूळ - व्यवसाय वृद्धिंगत करण्याकडे कल राहील. दिवसाचे 24 तास कमी पडतील. कामात यश भरपूर मिळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीत हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. महत्त्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यावर सोपवाल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. घरात महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. प्रियजनांची संगत लाभेल. त्यामुळे आनंद व उत्साह वाढेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी कळेल. 

वृश्‍चिक - तुमचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात तुमच्या उद्योगप्रिय स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. त्यामुळे तुमची निराशा कमी होईल. येणी वसूल झाल्याने तुमच्या इच्छा आकांक्षांना चालना मिळेल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम राखेल. नोकरी वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा सवलत व अधिकार देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना जिवाभावाची माणसे भेटल्याने आनंद वाटेल. मनोरंजन व करमणुकीत वेळ मजेत जाईल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थ्यांना प्रगतीला भरपूर वाव मिळेल. 

धनु - तुमच्या स्वच्छंदी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नये. ऐकीव गोष्टीवर विश्‍वास न ठेवता प्रत्यक्ष पडताळा करुन मगच निर्णय घ्यावा. आर्थिक व्यवहारात चोखंदळ राहावे. नोकरीत सहकाऱ्यांकडून काम करुन घेणे जिकिरीचे असेल. कामाचा वेग वाढवण्यासाठी बरीच धावपळ दगदग होईल. घरात महिलांनी वादाचे प्रसंग टाळावेत. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा, फायदा होईल. तरुणांनी अति साहस करू नयेत. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

मकर - व्यवसाय नोकरीत व्यवहारी धोरणाचा अवलंब करुन फायदा मिळवाल. योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी कराल. वसुली करताना व आर्थिक व्यवहारात गिऱ्हाइकांचे हितसंबंधांना बाधा येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. नोकरीत वरिष्ठ कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावतील. तरी न चिडता कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावेत. महिलांचा खर्च होईल; पण तो खर्च घरातील व्यक्ती व मुलांसाठी असल्याने मानसिक समाधान मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. शुभकार्ये ठरतील. कलावंत, खेळाडू यांना प्रसिद्धी मिळेल. 

कुंभ - सध्या ...भरारी व उत्तेजन देणारे दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार सौम्य पण प्रभावीपणे मांडून व्यवसायात बरीच प्रगती कराल. अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य करुन यश मिळवाल. तुमच्यातील साहसवृत्ती जागी होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युक्ती शोधाल. नोकरीत कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. प्रकृतीची साथही उत्तम लाभेल. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. घरात शुभकार्ये ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नये. 

मीन - तुमच्यातील रसिक व कल्पकतेला दाखवण्यीाच संधी मिळेल. व्यवसायात लवचिक धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आर्थिकस्थिती नाजूक राहील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळविण्याकडे कल राहील. महत्त्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यावर सोपवाल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कामाचा उरक पाडावा. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. तरुणांना दोनाचे चार हात करण्याची सुसंधी येईल. त्याचा फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांनी 'भरपूर श्रम भरपूर यश' हे लक्षात ठेवावे. 
.............................

संबंधित बातम्या