ग्रहमान : २२ ते २८ सप्टेंबर २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

ग्रहमान
 

मेष : व्यवसाय नोकरीत तुम्ही प्रत्येक काम मनासारखे कराल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी ठराल. कामात कार्यतत्पर राहाल. कौतुकास पात्र काम हातून घडले. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार असेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. कलाकार - खेळाडूंना यशप्राप्त होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल.

वृषभ : सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल असल्याने व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची चिंता मिटेल. देणी देता आल्याने मनावरचा ताण दूर होईल. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेली कामगिरी यशस्वी पार पाडाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. काहीतरी नवीन करून दाखवण्याची खुमखुमी येईल. महिलांना कर्तव्य चोख केल्याचे समाधान मिळेल.

मिथुन : रवी तृतीयस्थानी असल्याने अडथळे दूर होतील. व्यवसायात अनुकूल घटना घडतील. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे केल्याचे समाधान मिळेल. वेळेचे गणित अचूक जमेल. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना आनंदाची बातमी कळेल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील.

कर्क : व्यवसायात आवक पेक्षा जावक जास्त होईल. कामाच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.  बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत प्रलोभनांपासून चार हात लांब राहणे चांगले. बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. महिलांचा नको त्या कामात वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्‍वास टाळावा. तरुणांनी अतिसाहस करू नये.

सिंह : व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामात कार्यतत्पर राहून कामे वेळेत उरकावी लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत पूर्वी हातून घडलेल्या चुका पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. डोके शांत ठेवून कामे करावीत. महिलांनी सहनशीलता दाखवून कामे करावीत.

कन्या : ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वेळेचा सदुपयोग होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा विशेष लाभ होईल. मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना मनःस्वास्थ्य लाभेल. चांगली बातमी कळेल. आवडत्या छंदात मन रमवता येईल.

तूळ : निराशा झटकून कामाला लागावे. व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. कार्यक्षमता वाढवून उलाढाल वाढवाल. नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. कौतुकाची थाप वरिष्ठांकडून मिळेल. प्रवास घडेल. महिलांना नवीन काहीतरी शिकता येईल. आवडत्या व्यक्तींची भेट होईल. मनाप्रमाणे खर्च करता येईल.

वृश्‍चिक :  कामात तडजोडीचे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात कर्तव्यपूर्तीला विशेष प्राधान्य द्याल. मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. रेंगाळलेले प्रश्‍न धसास लागतील. नोकरीत कामात समाधान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मर्जी संपादन कराल. महिलांनी सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. कौटुंबिक जबाबदाऱ्याही धीराने पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनू : मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. दगदग धावपळ वाढेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरीत तुमचे अंदाज अचूक येतील. वरिष्ठांची शाबासकी मिळेल. हातून योग्य कृती होईल. महिलांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यतत्पर राहून कामे करावी लागतील. मनोबल वाढेल.

मकर : वातावरणाची अनुकूलता कामांना गती देईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तरतूद केलेली लाभदायक ठरेल. व्यवसायात अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. नोकरीत विरोधक सामंजस्याची भाषा बोलतील. तुमचे महत्त्व वाढेल. महिलांना नवीन व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची बातमी कळेल.

कुंभ : व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्यावी. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत पैशाच्या मोहापासून दूर राहावे. कामात चोख राहावे. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. नवीन प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. महिलांना घरगुती प्रश्‍न इतरांची मनं न दुखावता सोडवता येतील.

मीन : व्यवसायात श्रमसाफल्याचा अनुभव येईल. पूर्वी केलेल्या कामातून आता पैसे मिळेल. पैशाची चिंता मिटेल. नवीन गुंतवणुकीमुळे खिशावर ताण येईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे करता येतील. सामूहिक कामात प्रगती कराल. सरकारी कामात यश येईल. महिलांना मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल.

संबंधित बातम्या