ग्रहमान : २० ते २६ ऑक्‍टोबर २०१८

अनिता केळकर
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

ग्रहमान

मेष ः प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घाई असते. तुम्ही तुमच्या प्रयत्नात जेवढी सातत्य ठेवाल तेवढे तुमचे यशाचे प्रमाण वाढेल. धंदा, व्यवसायात पूर्वी घेतलेला निर्णय योग्यच होता, याचा प्रत्यय तुम्हाला येईल. नोकरीत तुम्ही तुमचे कामाचे उद्दिष्ठ गाठू शकाल. तुमच्या कामात युक्‍तीचा व धाडसाचा उपयोग होईल. घरात मीपणाला महत्त्व देऊ नये.

वृषभ ः यश नजरेच्या टप्प्यात आल्याने तुम्हाला काम करायला स्फूर्ती येईल. जिद्द व चिकाटी मात्र सोडू नये. धंदा व्यवसायात दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक केली असेल तर ती योग्यच होती, याचा प्रत्यय येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची योग्य ती दखल घेतील. घरात चांगल्या घटनेमुळे उत्साही वातावरण राहील. खेळाडूंना आपले नैपुण्य सिद्ध करावे लागेल.

मिथुन ः विचार व कृती अंमलात आणून मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण करण्याची घाई असेल. धंदा व्यवसायात कठीण वाटणारी कामे धसास लावण्यात यशस्वी व्हाल. आवश्‍यक त्या पैशाची सोय झाल्याने झपाट्याने तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार काम केल्याने ते खूष असतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

कर्क ः नेहमीच्या कामाबरोबर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळवाल. व्यवसायात वाढ होण्याच्या उद्देशाने नव्या ओळखी होतील. काम करून लक्षणीय यश व फायदा मिळवायचा तुमचा मानस असेल. परदेश व्यवहारात चांगली बातमी कळेल. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. नोकरीत प्रतिष्ठित व्यक्तींना सांभाळून घ्यावे लागेल.

सिंह ः तुमच्या कल्पकतेने काम करण्याने तुमच्या यशात वाढ होईल. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील. धंदा व्यवसाय नवीन युक्ती योजून उलाढाल वाढवाल. हिततिंचकांची मदत होऊन आर्थिक आघाडीवर तुम्ही विश्‍वासाने पुढे जाल. जोडधंदा असणाऱ्यांना पूर्वीच्या कामाचे पैसे हातात पडतील. तरुणांच्या इच्छा सफल होतील.

कन्या ः ज्या कामात काही घडतच नाही अशा कामांना आता तुमच्या दृष्टीने महत्त्व असेल. ती कामे पूर्ण करण्याच्या मागे लागावे. म्हणजे त्याचा फायदा पुढील दोन आठवड्यात दिसेल. धंदा व्यवसायात नवनवीन कल्पना साकार करण्यासाठी भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामामध्ये बदल किंवा बदली हवी असेल तर तसे प्रयत्न करायला हरकत नाही.

तूळ ः समोर यशाचे शिखर दिसत असताना थोडा धीर धरणे आवश्‍यक ठरेल. युक्तीने व निश्‍चयाने काम करीत राहिलात तर तुमचा त्रास कमी होईल. महत्त्वाची कामे हातावेगळी करण्यासाठी योग्य व्यक्तींचा उपयोग करुन घ्यावा. धंदा व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब कराल. नोकरीत कितीही काम केले तरी अपुरेच वाटेल. घरात अनपेक्षित खर्च वाढेल.

वृश्‍चिक ः पैशाच्या कामांना या सप्ताहात महत्त्व द्याल. कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जादा भांडवलाची तरतूद करावी लागेल. प्रसिद्धी व जनसंपर्काचे नवे तंत्र आत्मसात कराल. नोकरीत तुमच्या कलागुणांची कदर करणारे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामुळे तुमचा भाव वधारेल. तरुणांना भुरळ पाडणाऱ्या व्यक्तींची साथ लाभेल.

धनू ः एखादी भव्यदिव्य कल्पना तुम्हाला दंग ठेवेल. त्यातील खाचखळग्यांचा प्रथम विचार करावा. धंदा व्यवसायात लाभदायक सप्ताह जाईल. बॅंका व वित्तीय संस्था यांच्याकडून अर्थसाहाय्य होईल. नोकरीत जरी कामाचा ताण वाढला तरी भविष्यातील एखादी चांगली संधी तुमच्या वाट्याला येईल. घरात मनाप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घ्याल.

मकर ः एखाद्या संधीचा आपल्याला कसा उपयोग करुन घेता येईल, हे तुम्हाला लगेच समजते. आजूबाजूच्या माणसांचा कसा उपयोग करुन घेता त्यावर तुमच्या यशाचे गणित अवलंबून राहील. धंदा व्यवसायात नवीन शाखा उघडण्याच्या दृष्टीने पैसे व माणसांचा योग्य ठिकाणी वापर करुन घ्याल. नोकरीत चांगल्या कामाकरिता प्रशिक्षण मिळेल.

कुंभ ः परिस्थिती आटोक्‍यात आणण्याचा तुम्ही निकराने प्रयत्न कराल. जो मार्ग निवडाल तो योग्य अयोग्य ठरवून मगच पाऊल उचला. धंदा व्यवसायात बाजारातील हालचालीवर नजर ठेवावी. नोकरीसाठी येणाऱ्या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करावा. घरात मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

मीन ः तुम्ही वास्तवापेक्षा स्वप्नामध्ये जास्त रमता. त्यातून नवनवीन कल्पना मनात येतात. पण त्यातील फार थोड्याच मनात रेंगाळतात. स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याकरिता विशेष प्रयत्न कराल. हे सर्व तुमच्या खिशाला परवडेल तेच करावे. धंदा व्यवसायात हातातील पैशाचा योग्य कारणा करिताच उपयोग करावा. नोकरीत अवघड काम निश्‍चयाने पार पाडाल.
 

संबंधित बातम्या