ग्रहमान : १७ ते २३ नोव्हेंबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

ग्रहमान
 

मेष ः कामाचा उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात अवघड वाटणाऱ्या कामात यश मिळवाल. पैशाची स्थिती सुधारेल. नोकरीत थोड्या वेगळ्या कामामुळे सतर्क राहाल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे मार्गी लावाल. नवीन व्यक्तींशी मैत्री होईल. प्रवासाचे योग येतील. घरात कोणावरही विसंबून राहू नये. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृषभ ः केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील, ही अपेक्षा ठेवू नये. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. हितचिंतकांची मदत आवश्‍यक तेथे घ्यावी. नोकरीत कामाची योग्य आखणी करावी. कामातील बेत गुप्त ठेवावेत. लवचिक धोरण ठेवण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन ः सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. त्यातूनच शहाणे बनून योग्य कृती करावी. व्यवसायात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यावे. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्यावीत. नोकरीत कामात बिनचूक राहावे. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मर्जी तुमच्यावर राहील. जोडधंद्यातून विशेष कमाई करण्याची संधी मिळेल. घरात वातावरण गढूळ राहील.

कर्क ः ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहे, त्यामुळे कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. व्यवसायात उद्दिष्टे व धोरणे ठरवून कृती करावी. वेळेचे बंधन ठेवून कामांना गती द्यावी. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. पूर्वी केलेल्या  कामाचा लाभ आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. मात्र अतिविश्‍वास टाळावा.

सिंह ः तुमच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. मनातील  इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची सुसंधी मिळेल. व्यवसायात कामात दक्ष राहावे. जुनी देणी देऊन मगच नवीन कामात लक्ष घालावे. दिलेला शब्द व आश्‍वासन पाळावे. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. कामात तत्पर राहावे. सहकारी कामात मदत करतील.

कन्या ः तुमच्या कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभले आहे. त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरण स्वीकारून कामाचा वेग वाढवावा. कामात विस्तार करून उत्पन्न वाढविण्यावर भर राहील. पैशाची चिंता मिटेल. पैशामुळे आलेला तणाव कमी होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने  सुविधा व सवलती देतील.

तूळ ः तुमच्या हळव्या स्वभावामुळे भावनेला प्राधान्य द्याल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींचा कार्यकारण भाव काय आहे, हे कळणार नाही. त्यामुळे आपले काम बरे नि आपण बरे! हे धोरण ठेवावे. प्रगतीला पूरक संधी चालून येतील.  परंतु त्याची पडताळणी करुन पुढे जावे. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. डोके शांत ठेवावे.

वृश्‍चिक ः स्वयंसिद्ध राहण्याचा तुमचा स्वभाव आहे. परंतु या सप्ताहात इच्छा नसतानाही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल. व्यवसायात पैशाची चणचण भासेल, त्यामुळे कामांना विलंब होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. नोकरीत स्वतःचे काम उरकून इतरांनाही मदत कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन एकाग्र करावे.

धनू ः अडथळ्यांची शर्यत पार करून पुढे जाण्याचा ध्यास असेल, त्यात यशही मिळेल. थोडी सबुरी ठेवावी. व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता कामाचे योग्य नियोजन करावे. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. पैशाची सोय ओळखीमुळे होईल. नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द पाळावा.

मकर ः शनी तुमचा राश्‍याधिपती आहे, त्यामुळे स्वतःला हवे तसे बिनबोभाट करण्यात तुमचा हातखंडा आहे. व्यवसायात योग्य व्यक्तींकडून योग्य कामे करून घेऊन कामांना गती द्याल. नवीन पद्धतीच्या कामासाठी धोरणात बदल करावा लागेल. भविष्याची तरतूद योग्यप्रकारे करून ठेवाल. नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमची धावपळ होईल.

कुंभ ः  घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्याल. व्यवसायात काही बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढले. भांडवलासाठी पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे नोकरी सोडून देण्याचे विचार मनात येतील, पण घाई नको. घरात नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष होऊन नको त्या कामात बराच वेळ जाईल.

मीन ः तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहाल. व्यवसायात प्रगती समाधानकारक राहील. हितचिंतकांची मदत योग्य वेळी मिळेल. कामांना गती येईल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत स्वतः पुढाकार घेऊन कामे पूर्ण कराल, उत्साही राहाल. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे कर्तृत्व दिसून येईल.

संबंधित बातम्या