ग्रहमान : ८ ते १४ डिसेंबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ग्रहमान
 

मेष : ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ या म्हणीचा अनुभव मिळेल. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची घाई असेल. व्यवसायात रोखीचे व्यवहार करताना दक्षता घ्यावी. चुकीची संगत टाळावी. कामात दुर्लक्ष होऊन चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. दगदग धावपळ कमी करावी. नोकरीत वरिष्ठांना गृहीत धरून कामे करू नये. तरुणांनी अति धाडस टाळावे.

वृषभ : सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यातून बरेच काही शिकताही येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढेल. रात्रीचा दिवस केला, तरी कामे पूर्ण होताना वेळ कमीच पडेल. योग्य कामासाठी निवड करावी. नोकरीत अति उत्साहाच्या भरात काम संपण्याची घाई करू नये. आवश्‍यक तेथे वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. पैशाची चिंता मिटेल.

मिथुन : मनोकामना प्रत्यक्षात साकार करण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात हातातील कामे संपवून, मगच नवीन कामांकडे वळावे. आर्थिक दृष्टिकोन ठेवून कामाचे विभाजन करावे. कामाचे प्रमाण वाढेल, त्यामुळे वेळेचे नियोजन करणे गरजेचे होईल. पैशाची चणचण कमी करण्यासाठी तात्पुरती तरतूद करावी लागेल. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल.

कर्क : कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे पुढे न्यावे. संघर्षातून खडतर वाटचाल राहील. हितचिंतकांकडून मोलाची मदत मिळेल. व्यवसायात घट्ट पाय रोवून उभे राहावे. हातातील पैशाचा विनियोग योग्य कामांसाठी करावा. नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीत कामात केलेला आळस अंगलट येण्याची शक्‍यता आहे, प्रकृतीची काळजी घ्यावी.

सिंह : ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीचा प्रत्यय येईल. आपल्याच माणसांकडून तोंडघशी पडण्याची वेळ येईल. तरी सावध राहावे. व्यवसायात कोणावरही जास्त विसंबून न राहाता स्वयंसिद्ध बनावे. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नको त्या कामात बराच वेळ व पैसे खर्च होण्याची शक्‍यता आहे. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा.

कन्या : योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे सोपवली, तर कामाचा तणाव कमी होईल. प्रकृतीचे तंत्र सांभाळले, तर जास्त वेळ कामे आनंदाने करू शकाल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावी. खेळत्या भांडवलाची सोय व कर्ज वसुली यावर लक्ष केंद्रित करावे. घरातील शांतता ढळणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करावे.

तूळ : माणसांची पारख करून त्यांच्यावर विश्‍वास ठेवून कामे सोपविणे हे अवघड काम आहे असा अनुभव येईल. व्यवसायात कामाचे स्वरूप चांगले असेल. पैशाच्या हव्यासापोटी धोका पत्करू नये. खरे हितचिंतकच तुमच्या मदतीला येतील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चिंता मिटेल. महिलांनी आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर चित्त एकाग्र करावे.

वृश्‍चिक : अनपेक्षित शुभ घटना मनाला उभारी देतील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. नवीन कामाची संधी मिळेल. मात्र कामाच्या पूर्ततेसाठी जादा वेळ मागून घ्यावा. नोकरीत तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. कामात सहकारी मदत करतील. वरिष्ठ जादा अधिकार व सवलती देतील. घरात मुलांच्या अभ्यासाची चिंता वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा अतिताण घेऊ नये.

धनू : वेगळी वाट पत्करून काहीतरी वेगळे करण्याची खुमखुमी येईल. मात्र ‘अति तेथे माती’ ही म्हण लक्षात ठेवावी. व्यवसायात नियोजनपूर्वक कामे केलीत तर फायदा होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. मात्र ती स्वीकारण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करा. विश्‍वासार्हता पडताळून नवीन व्यक्तींवर जबाबदारी सोपवा.

मकर : महत्त्वाचे निर्णय घेताना सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. थोडेसे गोंधळात टाकणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पैशाचे व वेळेतच गणित आखून त्याप्रमाणे कामाची आखणी करावी. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे खुबीने सहकाऱ्यांकडून करून घ्यावी. पैशाची तजवीज होईल. जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी शंका निरसन करून घेणे चांगले.

कुंभ :  भौतिक व्यवहार जपताना थोडी तारेवरील कसरत होईल. मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने थोडी चिडचिडही होईल, पण सबुरी ठेवली तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवण्याचा प्रयत्न राहील. नियमांचे काटेकोरपणे पालन करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत धोरणात बदल झाल्याने कामाचे स्वरूप बदलेल.

मीन : चंचल स्वभावामुळे हातून बारीक गोष्टी राहून जातात. त्यामुळे नंतर त्याचा त्रास होतो, तेव्हा सजगवृत्ती बाळगावी. व्यवसायात ठरवलेली कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. उधार उसनवार शक्‍यतो टाळावी. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावे. प्रियजन, आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

संबंधित बातम्या