ग्रहमान : १५ ते २१ डिसेंबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ग्रहमान

मेष : ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात कर्तव्याला प्राधान्य द्यावे. कार्यक्षेत्र विस्तृत करून उलाढाल वाढवावी. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कामाचा ताण कमी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी. वेळेत कामे संपवावी. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. मनोरंजनासाठी छोटी सहल काढावी. मनाप्रमाणे गोष्टी घडल्याचे समाधान महिलांना मिळेल.

वृषभ : मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार झाल्याने आकाश ठेंगणे वाटेल. पैशाचा ओघ चालू राहील. त्यामुळे खर्च वाढेल. व्यवसायात नवीन कामे हाती घ्यावी. केलेल्या कामात यशाचे प्रमाण वाढेल. कामाच्या स्वरूपात बदल करून फायदा मिळवावा. नोकरीत नवीन ओळखी होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. जोडधंद्यातून लाभ होईल.

मिथुन : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस असेल. कधी युक्तीने, तर कधी गोड बोलून कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. व्यवसायात वेळ व पैसे योग्य तेथे खर्च करावेत. कामांना गती व वेग देण्यासाठी प्रयत्न राहील. जादा भांडवलाची तरतूदही करून ठेवावी. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावी.

कर्क : सर्व ग्रहांची अनुकूलता उत्साह वाढवेल. व्यवसायात ताणतणाव कमी होतील. अपेक्षित कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची स्थितीही सुधारेल. प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून कामातील उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलती व अधिकार देतील. प्रवास घडेल.

सिंह : महत्त्वाचे निर्णय स्वतः घेऊन प्रगती करण्याचा विचार असेल. पण हातून काही चूक घडत नाही ना, याची टोचणीही मनात असेल. तेव्हा सबुरीने वागावे. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून वागावे. जुनी येणी वसुली करण्याचा प्रयत्न करावा. अंथरूण पाहून पाय पसरावे. जोडधंद्यातून फायदा मिळेल. दुरुस्ती, गृहसजावट यात बराच पैसे खर्च होतील.

कन्या : आर्थिक नियोजनात तुमचा हातखंडा असतो. पूर्वी केलेल्या नियोजनाचा आता उपयोग होईल. व्यवसायात पैशाची ऊब मिळेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. निर्णय अचूक ठरतील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत बढती, पगारवाढ इत्यादी सारख्या सुविधा मिळतील. नवीन दिशा नवा दृष्टिकोन जीवनात प्रगती घडवेल.

तूळ : काम व सुख एकाच वेळी उपभोगण्याची तुमची मनीषा पूर्ण होईल. व्यवसायात अनावश्‍यक खर्च कमी करून योग्य तेथेच पैसे खर्च करावेत. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे खुबीने सहकाऱ्यांकडून करवून घ्यावीत. नोकरीत कामाचा ताण असला, तरी काम करण्याचे स्वातंत्र्य असेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत पार पडतील.

वृश्‍चिक : जीवनात चांगले घडण्याची आशा निर्माण झाल्याने उत्साह येईल. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत व सल्ला उपयोगी पडेल. कामांना वेग देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. नोकरीत कामाचा बाऊच जास्त कराल. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरात ठरलेले शुभकार्य पार पडेल.

धनू : कामांना अपेक्षित गती आल्याने तुमचे लक्ष इतर गोष्टींकडे केंद्रित करावे. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाचे नियोजन करावे. यश येईल. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने डोक्‍यावरचे ओझे खांद्यावर येईल. वेळ व पैसा यांची योग्य सांगड अपेक्षित लाभ घडवून आणेल. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. उधार उसनवार देऊ नये.

मकर : तुम्ही स्वभावाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न कराल व त्यात यशही मिळेल. विचार न करता बिनधास्त जीवन जगण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात नवीन कामाची धुरा सांभाळावी. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. लांबचे प्रवास होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. मनासारखे काम झाल्याने मानसिक समाधान मिळेल.

कुंभ :  ‘जो दुसऱ्यावर विसंबला...’ ही म्हण सार्थ ठरेल. आळशी स्वभाव नडेल. व्यवसायात कामात शिथिलता येईल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. आर्थिक स्थिती मात्र समाधानकारक असेल. नोकरीत मिळालेली संधी दवडू नये. सजग वृत्ती ठेवावी. कामात गुप्तता राखावी. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. महिलांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा.

मीन : डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे प्रगती साधावी. व्यवसायात दुर्लक्ष झालेल्या कामात लक्ष घालून गती द्यावी. आवश्‍यक वाटल्यास महत्त्वाचे निर्णय घ्यावे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून काम करावे. आपल्या मागण्या वरिष्ठांचा मूड बघून मान्य करून घ्याव्या. कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रकृतीची हेळसांड करू नये. न चिडता सारासार विचार करून कृती करावी.
 

संबंधित बातम्या