ग्रहमान : २९ डिसेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

ग्रहमान

मेष : प्रत्येक कामाचा शांतपणे विचार करून त्याप्रमाणे कृती करावी. मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात सतर्क राहून कामे उरकावीत. पैशाच्या व्यवहारात चोखंदळ राहावे. नोकरीत महत्त्वाचे निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. जुन्या नव्या प्रश्‍नामुळे चिंता वाढेल.  महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.

वृषभ : वेळेचे व कामाचे योग्य नियोजन केले, तर रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा. सरकारी नियमांचे उल्लंघन न करता कामात फायदा वाढवावा. कमी श्रमात जास्त यश मिळवावे. नोकरीत आपले काम बरे, ती आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल.

मिथुन : पैशाचे गणित मांडून कामे स्वीकारावीत. अंथरूण पाहून पाय पसरावेत. व्यवसायात नवे तंत्रज्ञान वापरून कामात उलाढाल वाढवावी. नवीन कामांसाठी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. बॅंका व हितचिंतकांची मदत याकामी होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येईल. परंतु थोडा धीर धरा. पाहुण्यांची ये जा राहील. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.

कर्क : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती करावी. व्यवसायात अडथळे कमी झाल्याने जिद्दीने कामाला लागावे. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वेळेचे गणित मांडावे. पैशाची वसुली मनाप्रमाणे होईल. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील व आश्‍वासने पूर्ण करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. घरात एखादा छोटासा समारंभ पार पडेल.

सिंह : मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. व्यवसायात कामाच्या नवीन संधी चालून येतील. मात्र कुठलेही काम स्वीकारताना त्यातील अडीअडचणींचा विचार करावा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. घरात वातावरण आनंदी राहील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

कन्या : उमेद व उत्साह वाढवणारे ग्रहमान लाभल्याने कामांना स्फूर्ती येईल. व्यवसायात कामातील प्रगतीसाठी चाकोरीबाहेर जाऊन वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा. निश्‍चित यशाच्या दिशेने पावले टाकावे. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ आपलाच हट्ट पुरा करतील. त्यांच्या तंत्राने वागून कामे करावी.कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील.

तूळ : अवघड व अशक्‍य वाटणारी कामे झपाट्याने पार पडतील व सोपी कामे रेंगाळतील. अनपेक्षित कामात सुधारणा झाल्याने तुम्हालाही आश्‍चर्य वाटेल. व्यवसायात कामाचे महत्त्व वाढेल. योग्य वेळी मिळालेली योग्य संगत बरेच काही मिळवून देईल. नोकरीत कामातील बेत गुप्त ठेवावेत. सहकारी व वरिष्ठांकडून मदतीची अपेक्षा नको. घरात पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.

वृश्‍चिक : ईर्षा जागृत करणारे ग्रहमान. व्यवसायात प्रत्येक कामात यश संपादन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतील. कामाच्या प्रमाणात यश मिळेल. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत कामात चोख राहावे. माणसांची पारख करण्यात गल्लत करू नये. परदेश व्यवहारांच्या कामांना चालना मिळेल. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हावे.

धनू : परिस्थितीनुरूप कार्यपद्धतीत बदल करून कामात सतर्क राहावे. अतिविश्‍वास टाळावा. व्यवसायात हातातोंडाशी आलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामात सतत पाठपुरावा करून कामे संपवावी. नोकरीत कामात शिथिलता येऊ देऊ नये. मुलांच्या व इतर व्यक्तींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मानसिक समाधान मिळेल.

मकर : बुद्धिचातुर्याच्या जोरावर इतरांवर छाप पाडाल. कामात यश संपादन कराल. व्यवसायात कामाच झपाटा वाखाणण्याजोगा राहील. विचारांना कृतीची जोड मिळाल्याने यशाची कमान उंचावेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. मात्र चार हात लांब राहणेच इष्ट ठरेल. विचारल्याखेरीज सल्ला देणे महागात जाईल.

कुंभ : सभोवतालच्या व्यक्तींची मने सांभाळून कृती करावी. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे. काही कारणाने आखलेले बेत बदलावे लागतील. पैशाची चणचण भासेल. तरी न चिडता सर्वांशी प्रेमाने बोलावे. पैशामुळे हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कामाचे वेळी इतरांना तुमची आठवण होईल. वातावरण बदलाची गरज भासेल.

मीन : पैशाची ऊब मिळाल्याने सभोवताली वेगवेगळ्या व्यक्तींचा वावर वाढेल. माणसांची खरी पारख करावी लागेल. व्यवसायात कामात प्रगती होईल. व्यवहारदक्ष राहून कामे उरकावी. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढतील. काम करून घेतील. पण वाच्यताही करणार नाहीत. त्यामुळे चिडचिड होईल. आर्थिक चिंता मिटेल. तरुणांचे विवाह ठरतील.
 

संबंधित बातम्या