ग्रहमान : ५ ते ११ जानेवारी २०१९

अनिता केळकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

ग्रहमान
 

मेष : तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कामे मार्गी लावावीत. योग्य व्यक्तींचा उपयोग योग्य कामासाठी करावा. पैशाचे व्यवहारात दक्ष राहावे. नोकरीत अधिकाराचा वापर व मिळालेल्या सवलतींचा वापर योग्य ठिकाणी करावा. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वादविवादाचे प्रसंग आले तरी दुर्लक्ष करावे.

वृषभ : कार्यपद्धतीत बदल करून कामाचा दर्जा उंचावण्याकडे कल राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. पैशाची आवक चांगली झाल्याने नड भागेल. नोकरीत कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. स्वतःच्या मनाप्रमाणे कामे कराल. घरात दोन पिढीतील तफावत वैचारिक मतभेद घडवून आणेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तंत्र आत्मसात करावे. यश हमखास मिळेल.

मिथुन : कामाचा उरक पडल्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात नवीन कामांकडे लक्ष पुरवाल. कार्यपद्धतीत बदल करून रेंगाळलेली कामे मार्गी लावावीत. ओळखीचा उपयोग करून तुम्ही तुमचा मतलब साध्य करून घ्याल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. कामात बदल हवा असल्यास त्यादृष्टीने हालचाल करावी. घरात आनंदाची बातमी कळेल.

कर्क : पूर्वी केलेल्या कामाचा लाभ या सप्ताहात मिळेल. भविष्यात उपयोगी पडणारी कामे हाती येतील. व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना वेग येईल. सभोवतालच्या व्यक्तींचे मूड सांभाळून कामे पूर्ण करावीत. सरकारी कामात गती येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशगमन, परदेशव्यवहारांच्या कामांना गती येईल. घरात आप्तेष्टांचे रुसवे-फुगवे सहन करावे लागतील, तरी डोके शांत ठेवावे.

सिंह : कामाच्या पद्धतीत सहसा बदल केलेला तुम्हाला आवडत नाही. परंतु सभोवतालच्या परिस्थितीनुरूप कामात बदल करावा लागेल, त्यामुळे नवीन अनुभव मिळतील. व्यवसायात चौफेर नजर ठेवून स्पर्धेत टिकून राहण्याकडे कल राहील. काही गोष्टींत तडजोड करावी लागेल. पैशाची उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. विद्यार्थ्यांनी शांत चित्त ठेवून अभ्यास करावा.

कन्या : तुमच्या सुप्त गुणांना वाव देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. नवीन कामात पुढाकार राहील. सहकारी कामांना गती येईल. परदेशगमन व परदेशव्यवहाराच्या कामांना वेग येईल. नोकरीत कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल करू नये.

तूळ : कामाचे नियोजन योग्य केलेत तर तणाव जाणवणार नाही व आनंदही घेऊ शकाल. व्यवसायात कामाचे प्रमाण भरपूर असेल, त्यामुळे समाधान वाटेल. मात्र कामाची पूर्तता वेळेत करणे बंधनकारक राहील. शब्द देताना विचार करावा. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट कराल, मात्र वरिष्ठांच्या बदलत्या मूडमुळे तुमची कुचंबणा होईल. घरात वैचारिक तफावत जाणवेल.

वृश्‍चिक : तारेवरची कसरत करावी लागेल, तरीही त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करून कामे सोपवा. विश्‍वासार्हता पडताळून नवीन कामाची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवावी. जादा कमाईच्या मोहाने न पेलावणारी कामे स्वीकारू नये. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी वरिष्ठ आवश्‍यक त्या सुविधा देतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

धनू : कृतिशीलता वाढल्याने उत्साही राहावे. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. सर्व आघाड्यांवर पुढे जायचा विचार असेल. व्यवसायात कुठल्याही मार्गाचा अवलंब करून ईप्सित साध्य करून घ्याल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कल्पना विचार मनात येतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्या कामात तुमची धाडसी वृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल.

मकर : प्रगतीला पूरक ग्रहमान लाभले आहे. पूर्वी काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. व्यवसायात काही ठोस पावले उचलून त्याप्रमाणे कृती कराल. अनपेक्षित चांगली संधी चालून आल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कार्यपद्धतीत बदल करून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. तुम्ही तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील.

कुंभ : योग्य दिशा सापडेल, त्यामुळे कामांना गती येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष प्रयत्नशील राहील. ओळखीचा उपयोग याकामी होईल. नोकरीत विचार व कृती यांची सांगड घालून कामाचे नियोजन करावे. सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील याची दक्षता घ्यावी. नवीन नोकरीचे निर्णय भावनेच्या आहारी जावून घेऊ नये.

मीन : चंचल मनाला आवर घालून व कामाचे नियोजन करून कार्यपद्धती ठरवावी लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वतः कंबर कसून काम करावे लागेल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करावी. आर्थिक व्यवहारात काटेकोर राहावे. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे कामाचा ताण वाढेल, तरी झेपेल तेवढेच काम करावे. महिलांना छंद जोपासता येईल.

संबंधित बातम्या