ग्रहमान : १२ ते १८ जानेवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

ग्रहमान 

मेष : ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहे. चांगल्या घटनांची नांदी होईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. वरिष्ठ कामानिमित्ताने एखादी सवलत देतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांचा उत्साह द्विगुणित होईल. घरात कुटुंबासमवेत विशेष कार्यक्रम ठरवाल.

वृषभ : आर्थिक घडी नीट बसवून कामाला लागावे. कामाचे नियोजन कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल. व्यवसायात सतर्क राहून सभोवतालच्या हालचालींवर नजर ठेवावी. फायदा मिळवून देणारे काम मिळेल. नोकरीत जादा भत्ते व सुविधा मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. नवी नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल. नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात महिलांना खरेदीची हौसमौज भागविता येईल.

मिथुन : मनात बरेच बेत असतील ते प्रत्यक्षात साकार करण्याचा विचार असेल. व्यवसायात नवनवीन प्रयोग कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. प्रसिद्धिमाध्यमांचा वापर करून व्यवसायात वेगळी उंची गाठू शकाल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी मदत मिळेल. नोकरीत युक्तीचा वापर करून कामे संपवावीत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल.

कर्क : ग्रहमान सुधारल्याने कामांना वेग येईल. इच्छापूर्तीचा आनंद मिळेल. कष्टाच्या प्रमाणात यश हे मात्र लक्षात ठेवावे. व्यवसायात जुनी येणी वसुल होतील. पैशाची स्थिती चांगली राहील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत तुमच्या पद्धतीने काम कराल. कामाचे समाधान मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. घरात आनंदाची बातमी कळेल. पाहुण्यांची ये-जा राहील.

सिंह : गोंधळाची स्थिती कमी होऊन ठोस निर्णय घेऊ शकाल. बऱ्याच प्रश्‍नांची उकल झाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात आशावादी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. कामाची आखणी योग्यप्रकारे करून कामात प्रगती साधाल. विनाकारण वाढलेले खर्च आटोक्‍यात आणाल. नोकरीत वरिष्ठ वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवतील. चांगल्या वातावरणाचा लाभ मिळेल. जादा कामातून वरकमाई करता येईल.

कन्या : काही ठोस पावले उचलून कामात झालेला विलंब कमी करण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्यावीत. तुमचे विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे उरकावीत. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत स्वयंसिद्ध राहून कामे करावीत. सहकारी व वरिष्ठांकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. घरात महिलांना सहजीवनाचा आनंद घेता येईल.

तूळ : अडीअडचणींवर मात करून प्रगती करण्याचा विचार राहील. कामाचा ताण वाढेल, त्यामुळे दगदग, धावपळ वाढेल. व्यवसायात सहज सोपी वाटणारी कामे विलंबाने पूर्ण होतील. पैशाची थोडी चणचणही भासेल. प्रकृतीचेही तंत्र बिघडेल, काळजी घ्यावी. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? ते पहावे. कारण तुमचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा त्यांचा मानस असेल.

वृश्‍चिक : ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. हातातील कामे पूर्ण केल्याशिवाय उसंत मिळणार नाही. अवघड कामातही यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूष होतील. जादा सवलती व अधिकार देतील. बढती व पगारवाढीची शक्‍यता आहे.

धनू : प्रगतीचा आलेख चढता राहील, त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात आर्थिक कारणाने लांबलेली कामे हाती घेऊन मार्गी लावाल. कामांना योग्य दिशा देऊन नव्या दमाने वाटचाल कराल. फळाची अपेक्षा न करता कृतीवर भर द्यावा. यश हमखास मिळेल. नोकरीत कंटाळवाणे पर्व संपेल, त्यामुळे नवीन कामाची धुरा यशस्वीपणे घेऊ शकाल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सुविधा देतील.

मकर : कामात अचानक बदल झाल्यामुळे तुम्ही थोडे गोंधळात पडाल. मात्र प्रश्‍नांची उकल योग्य रीतीने करून कामांना गती द्याल. व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार उसनवार शक्‍यतो टाळावे. नवीन कामे मिळवताना हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत आपले काम चोख पार पाडावे. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. नकळत झालेल्या चुका निस्तरण्यात वेळ जाईल. प्रकृतीकडे लक्ष ठेवावे.

कुंभ : चांगल्या ग्रहमानामुळे हातून चांगल्या पद्धतीने व कल्पकतेने कामे कराल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींना 
खुबीने सांभाळून घ्यावे लागेल. ताबडतोब कोणतेही निष्कर्ष काढू नये. पैशाचे निर्णय घेताना सावधानता बाळगावी. नोकरीत ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असे वागावे. कामातील बेत गुप्त ठेवावेत. घरात नवीन खरेदीचा मोह होईल.

मीन : संमिश्र ग्रहमान लाभले आहे. मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात बारकाव्यांकडे लक्ष ठेवावे. स्पर्धकांच्या हालचाली पाहून तुमचे धोरण ठेवावे. जुनी येणी हाती पडण्यास थोडा विलंब होईल, तरी जपून खर्च करावा. नोकरीत नवीन व्यक्तींशी जुळवून घेताना तडजोड करावी लागेल. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात दुरुस्ती, इतर खर्च यांमुळे खर्च प्रमाणाबाहेर जाईल. आरोग्य मात्र उत्तम राहील.
 

संबंधित बातम्या