ग्रहमान : १९ ते २५ जानेवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

ग्रहमान

मेष : कार्यमग्न राहावे. व्यवसायात नवीन उपक्रम हाती घ्यावेत. खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता भासेल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत स्वतःचे काम पूर्ण करून इतर सहकाऱ्यांनाही कामात मदत करावी. वेळेत कामे पूर्ण होतील. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. घरात विनाकारण खर्च होतील. स्वतःसाठी चार क्षण घालवावे. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीने आनंद वाढेल.

वृषभ : मनातील संकल्प प्रत्यक्ष कृतीत येण्यास अनुकूल वातावरण लाभेल. व्यवसायात कामाचा उत्साह वाढेल. नवीन करारमदार होतील. पैशाची स्थिती सुधारेल. कामानिमित्ताने परदेशगमनाचे योग येतील. नोकरीत प्रतिष्ठा वाढवणारी कामे सोपवली जातील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व पटेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. मनाप्रमाणे कामे होतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. तरुणांचे विवाह ठरतील.

मिथुन : अवघड व अशक्‍य वाटणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा. प्रसिद्धिमाध्यम व नवीन तंत्रज्ञान वापरून स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. नोकरीत विनाकारण रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण करावीत. कार्यतत्पर राहावे. जोडधंद्यातून विशेष लाभाची शक्‍यता. घरात कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा भागविण्यासाठी पैसे सढळ हाताने खर्च कराल.

कर्क : सतत वेगवेगळ्या कामात पुढाकार घेऊन काम करायला आवडते, त्याचा उपयोग होईल. व्यवसायात सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे कामाची पद्धत ठरवाल. फायद्याचे प्रमाण समाधानकारक असेल. कामाच्या निमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामापेक्षा दिखावाच जास्त असेल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. घरात दुरुस्ती, डागडुजी यात खर्च होईल.

सिंह : मी माझ्या मनाचा राजा असे तत्त्व राहील. व्यवसायात मनाला पटेल, रुचेल तेच काम हाती घ्याल. महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेऊन कामात प्रगती कराल. पैशाची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत स्वतःहून कुठलीही जबाबदारी घेणार नाही, असा बाणा असेल. हातातील कामे संपवण्यासाठी आवश्‍यक वाटल्यास वरिष्ठांची मदत घ्याल. मुलांच्या भविष्याबाबत महिलांनी मात्र सतर्क राहावे.

कन्या : पैशाचे गणित जमल्याखेरीज व खर्चाचा अंदाज आल्याशिवाय व्यवसायात पुढे पाऊल टाकू नये. उधार उसनवार शक्‍यतो टाळावे. कामात काही निर्णायक बदल करावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवणे आवश्‍यक. नोकरीत अतिविश्‍वास ठेवू नये. हलके कान ठेवून गैरसमज करून घेऊ नये. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. घरात अट्टाहासापायी चुकीचे निर्णय घेऊ नये.

तूळ : सतत नावीन्याचा शोध घेणारे तुम्ही रुटीनचा लवकर कंटाळा येतो. त्यामुळे व्यवसायात कार्यपद्धतीत बदल घडवून नवीन योजना राबविण्याचा विचार असेल. मात्र बाजारातील चढउतारांचा अभ्यास करावा. गाफील राहून चालणार नाही. नोकरीत मनोकामना पूर्ण होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलत व अधिकार देतील. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे. तरुणांचे विवाह ठरतील.

वृश्‍चिक : ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहे. तेव्हात कामात नवचैतन्य येईल. चांगल्या मूृडमुळे नवीन कामे स्वीकाराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामात सक्रिय व्हाल. विनाकारण रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. घरात कष्टाची तयारी असेल तर सर्व काही ठीक राहील. महिलांना मानसिक समाधान मिळेल.

धनू : एकाच वेळी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची थोडी तारेवरची कसरत होईल. व्यवसायात कामाच्या वेळेचे भान ठेवणे आवश्‍यक. प्रसिद्धिमाध्यम, जाहिरात इ. साठी खर्च करावे लागतील. उलाढाल वाढवणे हे एकच ध्येय राहील. पैशाची तरतूद झाल्याने चिंता नसेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. कर्तव्य व व्यक्तिगत सुख यात गल्लत करू नये.

मकर : कामाचे केलेले नियोजन अचानक उद्‌भवणाऱ्या कामांमुळे बिनसेल. व्यवसायात चालू कामात बदल करावे लागतील. महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतक बॅंका यांची मदत घ्याल. नोकरीत वरिष्ठांच्या मूडप्रमाणे वागावे लागेल. त्यांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कामे करावीत. घरात कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.

कुंभ : कामांना वेग आणण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. व्यवसायात अपेक्षित पत्रव्यवहार होतील. कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमची वरिष्ठ खुशामत करतील मात्र आवळा देऊन कोहळा काढत नाहीत याकडे लक्ष द्यावे. कंटाळवाणे काम सहकाऱ्यांच्या मदतीने संपवावे. घरात बिनसलेली घडी पूर्ववत होण्यास योग्य काळ. महिलांनी थोडे सबुरीचे धोरण ठेवावे.

मीन : कर्तृत्वाला यशाची झालर मिळाल्याने आनंदाला पारावार राहणार नाही. व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना यश येईल. नवीन कामे मिळतील. नवीन योजना आकर्षित करतील मात्र त्यातील त्रुटींचा अंदाज घ्यावा. नोकरीत वरिष्ठ नेहमीपेक्षा वेगळे काम सोपवतील. तुमच्यावर त्यांची भिस्त राहील. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. बेकार व्यक्तींना नवीन कामाची सुसंधी मिळेल. लाभ घ्यावा. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. हुरूप वाढेल.

संबंधित बातम्या