ग्रहमान : २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९

अनिता केळकर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

ग्रहमान 

मेष : ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहेच, तेव्हा कामात उत्साह राहील. मात्र विचारपूर्वक कामाचे नियोजन करावे. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. नको त्या कामात वेळ व पैसा खर्च होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. कर्तव्यदक्ष राहाल. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या विचारांमुळे थोडेसे बुचकळ्यात पडाल. पाहुण्यांची, आप्तेष्टांची भेट होईल. मुलांकडून चांगली प्रगती कळेल.

वृषभ : सारासार विचार करून मगच निर्णय घेतलात तर लाभ तुमचाच होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, त्यातील कोणत्या स्वीकारायच्या हे तुमच्याच हातात आहे. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. घरात व्यक्तींचा आधार वाटेल. महिलांनी मानले तर समाधान मिळेल.

मिथुन : आत्मिक बळ उंचावेल, त्यामुळे कामात उंच भरारी मारावीशी वाटेल. परंतु मनाला थोडा लगाम लावावा. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे संपवावीत. नवीन कामे हाती घेताना त्यातील त्रुटी व नियमांचा अभ्यास करावा. आर्थिक व शारिरीक कुवत ओळखून कामाचा विस्तार करावा, यश हमखास मिळेल. घरात कमी बोलून कृती अधिक करावी. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

कर्क : तुमच्या जीवनात भावनेला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे माणसे जोडण्यात तुमचा हातखंडा आहे. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारून कामांची पूर्तता कराल. जुने व नवीन हितसंबंध प्रस्थापित कराल. पैशाची वसुली झाल्याने चिंता नसेल. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील.

सिंह : रवी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमचा निर्णय ठाम असेल. व्यवसायात कोणत्याही प्रश्‍नांवर धडाडीने निर्णय घेऊ शकाल. प्रश्‍नांची उकल झाल्याने बरेच प्रश्‍न सुटतील. मन शांत ठेवून कामाचे नियोजन करावे व त्याप्रमाणे कृती करावी. नोकरीत वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. बदल किंवा बदली यासाठी प्रयत्न केल्यास यश येईल. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल.

कन्या : अत्यंत धोरणी असे तुमचे व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे सहसा फसगत होत नाही. व्यवसायात कोणतेही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. आर्थिक बजेट आखून त्याप्रमाणे कामांची पूर्तता कराल. मिळालेल्या बातमीवर पूर्णपणे विश्‍वास ठेवू नये. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. महिलांनी ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवावे.

तूळ : प्रगतीचा आलेख चढा राहील, त्यामुळे ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कार्यक्षेत्र रुंदावल्याने कामाचा व्याप वाढेल. दगदग, धावपळ वाढेल. पैशाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नोकरीत स्वयंभू राहिलात तर कामात तुमची खोटी होणार नाही. सहकारी दिलेली आश्‍वासने पाळतील, ही अपेक्षा करू नये. आनंदाची बातमी कळेल.

वृश्‍चिक : महत्त्वाकांक्षा बळावेल, त्यामुळे कामाचा जोर वाढेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल, त्यामुळे कामाची आखणी कराल. ज्यांच्याकडून कामे करून घ्यायचे अशा व्यक्तींना खुश ठेवाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी तुमची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई करु नये. प्रवासात चीजवस्तू सांभाळाव्यात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी मनन चिंतन करावे.

धनू : तणाव कमी झाल्याने पुन्हा जोमाने कार्यरत व्हाल. व्यवसायात दुर्लक्ष झालेली कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा इरादा असेल. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चणचण कमी होईल. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतकांकडून होईल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. चांगली बातमी कळेल. महिलांना आरोग्यात सुधारणा झाल्याने हायसे वाटेल.

मकर : मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सज्ज व्हाल. परिस्थितीनुरूप बदल करून कार्यभाग साधाल. व्यवसायात जमाखर्चाचा ताळमेळ घालून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. ‘आपण बरे नि आपले काम बरे’ हा दृष्टिकोन ठेवावा. योग्य व्यक्तींकडे योग्य ती कामे सोपवावीत. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.

कुंभ : शांत चित्ताने येणाऱ्या घटनांकडे बघावे. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन कामाच्या संधी चालून येतील, त्या स्वीकारताना त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावे. वेळ व पैसे यांचे गणित आखून जोखीम स्वीकारा. नोकरीत दगदग-धावपळ राहील, तरी खुबीने वागून सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावा. नवीन खरेदीमुळे आनंद वाढेल.

मीन : गुरुची साथ मिळेल, त्यामुळे अपेक्षित प्रगती होईल. मनोबळ वाढेल. व्यवसायात पैशाचे व्यवहारात चोख राहावे. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नकाच. कामाचा उरक दांडगा राहील. नवीन कामेही मिळतील. नोकरीत माणसांची पारख महत्त्वाची ठरेल. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा मोह टाळावा. कोणाकडूनही फसगत होणार नाही याची काळजी घ्या. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.

संबंधित बातम्या