ग्रहमान : ९ ते १५ फेब्रुवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

ग्रहमान

मेष : ग्रहांची मर्जी तुमच्यावर राहील तेव्हा मोठ्या उमेदीने कामाला लागावे. व्यवसायात कामाच्या स्वरूपात बदल घडवून उलाढाल वाढवाल. पैशाची येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करुन शिल्लक वाढवण्याचा कल राहील. रेंगाळलेली कामे हाती घेऊन मार्गी लागतील. नोकरीत बढती, पगारवाढ मिळेल. बोलण्यात मात्र सावधगिरी बाळगावी. सर्व आघाड्यावर गतिमान राहण्याचा प्रयत्न राहील. घरात कौटुंबीक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळाल. तणाव कमी होईल. आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ : कामाचे योग्य नियोजन करुन कृती करावी. यश मिळेल. व्यवसायात हितचिंतकांची मदत घेऊन कामे मिळवावीत व पूर्ण करावीत. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. अतिविश्‍वास टाळावा. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. कामाचा ताण वाढल्याने दगदग धावपळ जास्त कराल. सहकाऱ्यांची मदत होईल. ज्येष्ठ व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.

मिथुन : हरहुन्नरी स्वभावाला पूरक वातावरण लाभेल. व्यवसायात नवीन काम आव्हान म्हणून स्वीकाराल व यशही मिळेल. पैशाची तजवीज झाल्याने चिंता नाहीशी होईल. नोकरीत मनाजोगते काम करता येईल. बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरी मिळेल. कामानिमित्ताने दूरच्या प्रवासाचे योग येतील. उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. घरात कौटुंबिक जबाबदारीतून तोडगा निघेल. तुमच्या शब्दाला, मताला मान मिळेल. महिलांना आवडत्या क्षेत्रात चांगले काम करुन दाखवता येईल.

कर्क : भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलेत तर पुढे प्रगतीचा मार्ग सुकर होईल. व्यवसायात ओळखीचा उपयोग करुन कामे मिळवावीत. दिलेली वेळ व शब्द पाळावा. यश हमखास मिळेल. नोकरीत कंटाळवाणे काम संपवून मनाप्रमाणे काम करता येईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमची गरज भासेल. मात्र ते आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत याची काळजी घ्यावी. घरात कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगता येईल. नवीन खरेदी मनाला आनंद देईल. प्रकृतीमान व मनःस्वास्थ्य उत्तम राहील.

सिंह : तुम्ही तुमचा दृष्टिकोन वास्तववादी ठेवलात तर येणाऱ्या अडचणींना समर्थपणे तोंड देऊ शकाल. व्यवसायात मनातील सुप्त बेत साकार करण्याचा विचार राहील. नको त्या कामात बराच वेळ व पैसे खर्च होतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सुविधाही देतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. घरात प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण साजरे कराल. मुलांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये.

कन्या : पैशाच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील असता. त्यामुळे लगेच अस्वस्थ होता. व्यवसायात आर्थिक तणाव वाढल्याने तुम्ही अत्यावश्‍यक व महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. कामे वेळेत सुरू करुन पूर्ण कराल. तात्पुरते खेळते भांडवल उभे करावे लागेल. नोकरीत स्वतःची कुवत ओळखून कामे स्वीकारावीत. तुमच्या कौशल्याला हवा तसा वाव मिळेल. पैशाच्या हव्यासापोटी वाममार्गाला जाऊ नये. घरात खर्चावर बंधन ठेवून काटकसरीने वागावे. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी रागावू नये.

तूळ : सध्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे. त्यामुळे पैशाचा ओघ राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. रेंगाळलेले, गुंतागुंतीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमचे महत्त्व इतरांना कळून चुकेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. जोडधंद्यातून विशेष फायदा व लाभ होईल. घरात केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. कुटुंबासमवेत सहलीला जाल. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील.

वृश्‍चिक : ग्रहांची साथ लाभल्याने अर्धवट राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात कामाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्याने तुम्ही खूश असाल. उत्साही राहाल. खेळत्या भांडवलाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. सहकारी व वरिष्ठांकडून कामात मदत मिळेल, ही अपेक्षा मात्र ठेवू नये. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये जा राहील. घरातील व्यक्तींना समाधान देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.

धनू : मानले तर समाधान मिळेल. तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. व्यवसायात अडथळे दूर होतील व प्रगतीचा मार्ग सुकर होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. अर्धवट कामे मार्गी लागतील. अनेक गोष्टींना नवी दिशा मिळेल. नोकरीत तुमच्यातील गुणांचा व कौशल्याचा उपयोग होईल. तुमच्या स्वातंत्र्यप्रिय स्वभावाला अनुसरून एखादी घटना घडेल. घरात वादविवाद व ताण तणाव कमी होतील. चांगली बातमी मन आनंदी करेल. प्रकृतीमान सुधारेल.

मकर : तुमच्यातील जिद्द व चिकाटी या गुणांचा प्रकर्षाने प्रभाव जाणवेल. व्यवसायात अवघड अशक्‍यप्राय  कामात यश मिळवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठराल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्‍यक ते बदल कराल. योग्य सल्याचा उपयोग करुन रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत कामात गाफील राहून चालणार नाही. वरिष्ठांचा मूड बघून स्वतःची मते मांडावीत. घरात तुमच्या विचित्र वागण्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

कुंभ : कासवाच्या शर्यतीत मनातील इप्सित साध्य कराल. व्यवसायात महत्त्वाकांक्षा ठेवून कामांना न्याय द्याल. चाकोरीबाहेरचे काम हाती घेऊन पूर्ण कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वेगळे काहीतरी करुन दाखवण्याची तुमची तमन्ना पूर्ण होईल. सहकारी व वरिष्ठांची मदत कामात मिळेल. अपेक्षित भेटीगाठी व पत्रव्यवहार होतील. घरात नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल. घरकामात वेळ मजेत जाईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

मीन : प्रयत्नाच्या प्रमाणात यश हे समीकरण राहील. तेव्हा व्यवसायात सतर्क राहावे. हितशत्रूपासून सावध राहावे. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. नोकरीत कामातील बेत गुप्त ठेवावेत. सहकाऱ्यांची असूया त्रासदायक ठरेल. तेव्हा काळजी घ्यावी. एखादा रेंगाळलेला प्रश्‍न तडीस न्याल. घरात मोठ्या व्यक्तींचा आधार वाटेल. प्रकृतीची कुरबूर राहील. वादविवादाचे प्रसंग आले तरी मौनव्रत पाळा. सलोख्याचे संबंध राखावेत.
 

संबंधित बातम्या