ग्रहमान : १६ ते २२ फेब्रुवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

ग्रहमान

ग्रहमान : १६ ते २२ फेब्रुवारी २०१९
मेष : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात तुमच्या निर्भयी व धाडसी प्रवृत्तीची चुणूक दिसेल. कर्तव्यात कसूर न करता कामात प्रगती कराल. नोकरीत इतरांनी केलेला विरोध सहन होणार नाही. तुमच्या कृतीत अधिकार व प्रेम दोन्हीही दिसेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.

वृषभ : कामात रस घेऊन सक्रिय व्हाल. व्यवसायात आलेली शिथिलता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. पैशाची आवक वाढवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे काम स्वीकाराल. नोकरीत कामे वेळेत पूर्ण कराल. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. कौटुंबिक सौख्य उपभोगाल. मुलांच्या प्रगतीबाबत चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.

मिथुन : आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होईल. त्यामुळे कामात विशेष लक्ष द्याल व यशप्राप्ती होईल. वातावरण व भोवतालच्या व्यक्तींची साथही तुम्हाला मिळेल. व्यवसायात कामाची व्याप्ती वाढेल. आर्थिक चणचण दूर होईल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत तुमच्या गुणांची कदर होईल. परदेशातील कामांना गती येईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत व महत्त्व कळेल. घरात आवश्‍यक खर्च कराल.

कर्क : कार्यमग्न राहून कामे कराल. व्यवसायात चाकोरीबाहेर जाऊन कामे कराल. त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. बाजारातील चढ-उताराकडे विशेष लक्ष राहील. नोकरीत चांगल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. जादा कामाची तयारी असेल तर अधिक कमाई करता येईल. वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड करतील. घरात वातावरण आनंदी राहील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल.

सिंह : स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची प्रचिती येईल. व्यवसायात मोठ्या योजना दृष्टिक्षेपात येतील. परंतु, त्या हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा व त्रुटींचा अभ्यास करावा. महत्त्वाची कामे स्वतः करावीत. अतिविश्‍वास टाळावा. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी सोपवली जाईल. मात्र, त्याचा गैरवापर करू नका. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे होतील. मोठ्या खर्चाची नांदी होईल.

कन्या : आर्थिक विवंचना कमी होऊन कामांना वेग येईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील. योग्य वेळी योग्य व्यक्तींची झालेली मदत बरेच काही मिळवून देईल. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आलेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा. घरात नको त्या कामात वेळ गेल्यामुळे इतर कामांना विलंब होईल. चांगली बातमी मन प्रसन्न करेल. तब्येत सांभाळून कृती करा.

तूळ : पैशाची स्थिती समाधान देणारी असल्याने चिंता मिटेल. देणी देता आल्याने भविष्यातील स्वप्ने रंगविता येतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कामाचा वेग वाढेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत प्रतिष्ठा मिळेल. सहकारी व वरिष्ठ महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचा सल्ला घेतील. मात्र, योग्य मार्गदर्शन करा. बोलण्यातून इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात रखडलेल्या प्रश्‍नावर तोडगा निघेल.

वृश्‍चिक : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने आनंद होईल. नोकरीत कामात सहकारी मदत करतील. जादा कामातून तुमची सुटका होईल. नोकरीनिमित्त नवीन ओळखी होतील. घरात वातावरण आनंदी राहील.

धनू : हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच इतर कामांकडे लक्ष द्याल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. भांडवलाची तरतूद करून कामांना गती द्याल. माणसांची पारख योग्य प्रकारे करून गोड बोलून खुबीने कामे करून घ्याल. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेले काम आनंदाने करा. यश मिळेल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. विचारांपेक्षा कृतीवर भर द्या.

मकर : भोवतीच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव घ्याल. गोंधळाची स्थिती असेल तर थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात कामाची उमेद चांगली असेल, परंतु कामे स्वीकारण्यापूर्वी स्वतःची क्षमता ओळखा. पैशाचे सोंग घेता येत नाही हे लक्षात ठेवा. व्यवहारी निर्णय घ्या. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, तरीही वाच्यता करू नका. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. महिलांनी सर्वांशी जमवून घेणेच इष्ट.

कुंभ : आपलाच घोडा दामटवण्यापेक्षा प्रकृती व आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन पुढे जावे. व्यवसायात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य सल्ला घ्या. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व आल्याने वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. घरात मानसिक समाधान ठेवण्यासाठी तोंडाला कुलूप लावा. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे.

मीन : कल्पना व विचार यांचा योग्य समन्वय साधल्यामुळे तुमच्या सुप्त इच्छा-आकांक्षा साकार होतील. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. आर्थिक ऊब लाभल्याने मनात वेगळे तरंग उठतील. हितचिंतकांची मदत घेऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात आलेली मरगळ दूर होईल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठांच्या पुढे-पुढे करून जास्तीची कामे ओढवून घेऊ नका. घरात तुमच्या मताला मान मिळेल.

संबंधित बातम्या