ग्रहमान : २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

ग्रहमान 

मेष : ग्रहांची साथ हुरूप देईल. व्यवसायात कामे पूर्ण होतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सावध राहा. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत हव्यासापोटी एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारू नका. क्षमता ओळखा. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात वातावरण आनंदी राहील. व्यक्तिगत जीवनात चांगली घटना घडेल. महिलांना जीवनात रस वाटेल. तरुणांनी मात्र विवाहबंधनात अडकण्याची घाई करू नये.

वृषभ : अनपेक्षित आलेल्या खर्चामुळे गंगाजळीला हात घालावा लागेल. व्यवसायात अनुकूल वातावरण मिळेल. कामाच्या नवीन योजना आकर्षित करतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष द्या. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवून मतप्रदर्शन करू नका. पैशाची उसनवारी टाळा. कामानिमित्ताने प्रवास योग घडतील. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी स्वतःचे छंद जोपासावेत.

मिथुन : इच्छा तेथे मार्ग सापडेल. तणाव कमी होऊन कामांना गती येईल. व्यवसायात चाकोरीत राहून कामे करा. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. प्रतिष्ठेला जपा. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे करा. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. चांगली बातमी कळेल. घरात महिलांनी अपेक्षा न ठेवता काम केले तर लाभ होईल. त्रास होणार नाही. भावनेच्या भरात वाहून न जाता योग्य निर्णय घ्या.

कर्क : भोवतालच्या व्यक्तींच्या स्वभावाची चुणूक दिसेल. ‘आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत,’ याची दक्षता घ्या. व्यवसायात बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. हितसंबंध जोडा. कर्तव्याला प्राधान्य द्या. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून अपेक्षा ठेवू नका. कामात चोख राहा. हितशत्रूंपासून सावध राहा. कामात गुप्तता राखा. घरात इतर लोकांच्या विचित्र वागण्याचा ताप सहन करावा लागेल.

सिंह : कर्तव्य व इच्छा यांचा योग्य समन्वय साधून कामे करा. व्यवसायात अनुभवी व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामातून लाभ होईल. नोकरीत दिलेली आश्‍वासने पाळा. ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,’ असा अनुभव येईल. मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी वेळेचे व कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्यावे.

कन्या : पैशाची तरतूद करण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. अति हाव टाळा. व्यवसायात स्वतःची क्षमता ओळखून कामे स्वीकारा. अंथरूण पाहून पाय पसरा. नवीन संधी दृष्टिक्षेपात असतील. नोकरीत अनावश्‍यक दगदग, धावपळ टाळा. दिलेला शब्द पाळा. सहकाऱ्यांची कामात मदत होईल. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या हौसेमौजेखातर चार पैसे जादा खर्च होतील. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

तूळ : कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामात गुप्तता राखा. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. स्पर्धेत तग धरण्यासाठी बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवा. नोकरीत तुमचा पवित्रा सावध ठेवा. स्वतःच्या क्षमतेचा विचार केल्याखेरीज कामे स्वीकारू नका. वरिष्ठांची अवमर्जी होणार नाही, याची काळजी घ्या. घरात तडजोडीचे धोरण ठेवा. वेळेचे व कामाचे योग्य नियोजन केलेत, तर ताण पडणार नाही.

वृश्‍चिक : ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात परिस्थितीनुसार बदल करून प्रगती कराल. नवीन योजना व गुंतवणूक करण्यासाठी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामे वेळेत संपवून इतरांनाही कामात मदत कराल. जोडव्यवसायातून अधिक पैसे मिळतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्या कामाचे व तुमचे महत्त्व कळेल. घरात कामामुळे दगदग व धावपळ होईल.

धनू : एकाच वेळी सगळीकडची कामे सुरू झाल्याने कुठे प्राधान्य द्यायचे हा संभ्रम राहील. महत्त्वाची व फायदा देणारी कामे आधी हाती घ्या. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी देणी देता आल्याने मनावरचा ताण कमी होईल. नवीन कामाची योग्य आखणी व नियोजन भविष्यात लाभ देईल. नोकरीत कामाच्या मानाने समाधान नाही, असे वाटेल. निराशेचे झटके येतील, परंतु थोडी सबुरी ठेवा. हितसंबंध जपावेत.

मकर : मनावर संयम ठेवून वागा. व्यवसायात ध्येय-धोरणे ठरवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही कुठलेही आश्‍वासन देताना आधी पडताळणी करा. पैशांच्या व्यवहारात दक्ष राहा. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नका. नोकरीत नवीन करारमदार तूर्त पुढे ढकला. अनवधानाने हातून चूक होणार नाही, याची काळजी घ्या. तुमची मते गुप्त ठेवा. प्रवासात बेसावध राहू नका. घरात इतर कामात इतर व्यक्तींची होणारी मदत मोलाची ठरेल.

कुंभ : अतिविचार करण्यापेक्षा कृती करा. व्यवसायात कामासाठी दिलेला शब्द पाळा. आर्थिक तणाव दूर करण्यासाठी विशेष परिश्रम घ्या. आवश्‍यकता भासल्यास कार्यपद्धतीत बदल घडवून कामांना गती द्या. नोकरीत स्वतःचा हेकेखोर स्वभाव नडेल, तरी वरिष्ठांपुढे नरमाईने वागा. शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवून बोला. घरात चार हात लांब राहूनच वागा. योग्य ते निर्णय विचारविनिमयाने घ्या. जुने वाद डोके वर काढण्याची शक्‍यता.

मीन : आजचे काम आजच करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. ओळखीतून नवीन कामे मिळतील. प्रत्येक काम स्वयंसिद्ध राहून संपवाल. दुसऱ्यांवर विसंबून राहिल्यास अपेक्षाभंग होईल. नोकरीत बदल तूर्त नको. कामात दक्ष राहा. काटेकोरपणे कामाची पूर्तता करा. आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव येईल. महिलांना छंद जोपासता येईल.

संबंधित बातम्या