ग्रहमान : २ ते ८ मार्च २०१९

अनिता केळकर
सोमवार, 4 मार्च 2019

ग्रहमान
 

मेष : ‘नाही’ हा शब्द तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे जिद्दीने कामे पूर्ण कराल. व्यवसायात नवीन उलाढाल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. जेवढे कष्ट कराल, तेवढे यश मिळेल. पैशांची चिंता मिटेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. नोकरीत वरिष्ठ ‘आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत,’ याची काळजी घ्या. हातून चांगले काम घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कुटुंबासाठी वेळ व पैसे खर्च कराल.

वृषभ : पैशाचे गणित अचूक ठरेल. व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने मनोकामना पूर्ण होतील. स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल, त्याचा फायदा करून घ्या. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. घरात सामंजस्याने वागून प्रश्‍नांची उकल कराल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.

मिथुन : जीवनात काही ठोस निर्णय घेण्याची बऱ्याच दिवसांची खुमखुमी उफाळून येईल. नवीन साहस कराल. मनाला पटतील तीच कामे कराल. व्यवसायात वेगळ्या मार्गाने जाऊन स्वतःची प्रतिभा दाखवण्याचा व प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. जे पैसे मिळतील, त्यात समाधानी राहाल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाल. नवीन नोकरी मिळेल.

कर्क : कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात योग्य आखणी करून कामे हातावेगळी कराल. योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड कराल. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न कराल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत दिलेली कामे संपवून इतर सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर राहील. कामानिमित्त प्रवास होईल.

सिंह : जीवनाचा पुरेपूर आस्वाद घ्याल. पूरक ग्रहमान असल्याने पैशाची ऊबही मिळेल. व्यवसायात उलाढाल मनाजोगती राहील. नवीन योजना कार्यान्वित करून त्यात प्रगती कराल. भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेऊन कामात हवा तसा प्रतिसाद मिळवू शकाल. नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळतील. अनपेक्षित कामे होतील. वरिष्ठ कामासाठी सवलती व अधिकार देतील. घरात मनोकामना पूर्ण होतील.

कन्या : ग्रहांची मर्जी राहील, तेव्हा कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामाचा वेग जास्त असेल. विक्री, उलाढाल वाढवून नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाल. तुमची बाजारातील प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत हातून चांगली कामगिरी घडेल. चांगले लाभ होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. तरुणांचे विवाह ठरतील.

तूळ : कामामुळे विश्रांती घ्यायला उसंत मिळणार नाही. व्यवसायात हितचिंतक मदत करतील व नवीन कामे मिळतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. काहीतरी नवीन करून दाखवण्याची खुमखुमी येईल. नोकरीत वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. हातून चांगली कामगिरी घडेल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर विशेष सवलती मिळतील. घरात कामाचा ताण वाढेल. खर्चाचे प्रमाणही वाढेल.

वृश्‍चिक : आहे त्यात समाधानी राहा. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे संपवा. कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. केलेल्या कामाचे श्रेय ताबडतोब मिळेल, ही अपेक्षा नको. नोकरीत वरिष्ठ कामापुरते गोड बोलतील व अधिक काम करून घेतील. जोडव्यवसायातून जादा कमाई करण्याची संधी मिळेल. घरात कुटुंबासमवेत कार्यक्रम ठरवाल. वेळ मजेत घालवाल.

धनू :  प्रयत्नांती परमेश्‍वर या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात आत्मविश्‍वास दांडगा राहील. एखादे भव्यदिव्य काम करून दाखवण्याची खुमखुमी येईल. कष्टाची पर्वा न करता कामात स्वतःला झोकून द्याल. अपेक्षित प्रगती दिसू लागेल. नोकरीत तुमच्यातील कार्यतत्परता दाखवून द्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. घरात आवडत्या छंदात वेळ घालवाल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.

मकर : तुमच्या स्वभावाला पूरक वातावरण राहील. त्याचा फायदा कसा घ्यायचा, हे तुम्हीच ठरवा. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. भविष्यात उपयोगी पडणारे निर्णय घेऊन कामात प्रगती साधाल. गोड बोलून कामे करून घ्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामे हाती घ्याल. महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तींची मदत होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. घरात तरुणांचे विवाह ठरतील.

कुंभ : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ ही म्हण सार्थ ठरेल. इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. तुम्ही फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. कामाच्या प्रमाणात यश मिळेल. नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. त्याचा लाभ घ्या. नोकरीत तुमची प्रगती वाखाणण्याजोगी असेल. अनेक तऱ्हेने लाभ होतील. कामात वरिष्ठांची विश्‍वासार्हता संपादन करू शकाल. घरात वातावरण चांगले राहील.

मीन : मनोनिग्रह चांगला असेल. त्याच्या जोरावर व्यवसायात कामे संपवाल. नवीन योजना दृष्टिक्षेपात येतील. पैशाची क्षमता ओळखून मगच पुढे जा. जुनी येणी, वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत सहकाऱ्यांची साथ मिळेल, त्यामुळे कामाचा भार हलका होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. त्यामुळे जादा सवलतीही मिळतील. घरात खर्चिक वस्तू खरेदीचा मोह होईल. तणावाचे वातावरण कमी होईल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

संबंधित बातम्या