ग्रहमान : ९ ते १५ मार्च २०१९

अनिता केळकर
सोमवार, 11 मार्च 2019

ग्रहमान

मेष : ‘रात्र थोडी सोंगे फार,’ अशी तुमची स्थिती असेल, तेव्हा थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात अनुकूल घटना उत्साह वाढवतील. कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. वेळेचे बंधन ठेवून कामे संपवा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग येतील. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : नोकरी, व्यवसाय, घर या सर्व ठिकाणी सारखेच लक्ष द्यावे लागेल. ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामाची संधी मिळेल. पैशाची तजवीज होईल. नवीन धाडस करावेसे वाटेल. हितचिंतकांची मदत मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत नेहमीपेक्षा वेगळे काम कराल. जादा अधिकारही मिळतील. कामानिमित्त प्रवास घडेल. घरात वातावरण आनंदी राहील. आप्तेष्ट नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.

मिथुन : भोवतालच्या वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल केलात व लवचिक धोरण ठेवलेत तर लाभ होईल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. भविष्यात फायदा मिळवून देतील, अशा कामांवर लक्ष केंद्रित कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. सहकारी व वरिष्ठांची मर्जी राहील. कामाचा ताण वाढेल. घरात खरेदीचा मोह होईल.

कर्क : विरोधकांवर मात करून कामात प्रगती करायची, हे तुमचे उद्दिष्ट राहील. व्यवसायात सतर्क राहून कामातील डावपेच आखा. कृतीवर भर देऊन व कामाची आखणी करून कामे संपवा. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागली, तरी रागावू नका. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करा. जोडव्यवसायातून विशेष आर्थिक लाभ मिळेल. जुनी येणी वसूल होतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह : मनोबल चांगले राहील. मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा सफल होतील. व्यवसायात कामाचा विस्तार वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नवीन योजना, प्रकल्प तुम्हाला आकर्षित करतील. उलाढाल वाढेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. पाहुणचार करण्यात वेळ जाईल. वातावरण आनंदी राहील.

कन्या : परिस्थितीनुसार ध्येय-धोरणे ठरवा. व्यवसायात व्यवहारदक्ष राहून कामात प्रगती साधता येईल. कामाचा वेग व ताण वाढेल. त्यामुळे क्षणभरही विश्रांती मिळणार नाही. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. नवीन हितसंबंध जोपासले जातील. वरिष्ठांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. प्रकृती सांभाळून कामे करा. तुम्हाला नवीन संधी आकर्षित करेल. पैशांची चिंता मिटेल. घरात नवीन खरेदी कराल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील.

तूळ : ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा बेत सफल होईल. ओळखीचा उपयोग होऊन खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. पैशांची आवकही वाढेल. नवीन कामाची सुरुवात कराल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. मात्र कामातील बेत गुप्त ठेवा. कमी श्रमात जास्त यश मिळेल. जादा सवलती व सुविधांचा लाभ मिळेल. घरात चांगली बातमी कळेल.

वृश्‍चिक : माणसांची पारख करून त्यांचा योग्य तो उपयोग करून घेण्यात तुमच्या बुद्धीकौशल्याची चुणूक दिसेल. व्यवसायात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, तरी डोके शांत ठेवा. येणाऱ्या संधीची वाट बघा. कामातील बदल तुमची दगदग धावपळ वाढवेल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मतलबापुरते गोड बोलतील, तरी सावध राहा. भलतेच धाडस करू नका.

धनू : बुद्धीकौशल्य व चातुर्य यांना कल्पकतेची जोड मिळाल्याने कामे वेगाने पूर्ण कराल. एका नवीन पर्वाची ही नांदीच असेल, तेव्हा कंबर कसून कामाला लागा. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवाल. कधी शक्ती, तर कधी युक्तीने कामे कराल. पैशांची तरतूद करावी लागेल. नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा.

मकर : स्वयंसिद्ध राहून कामे करा. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून कामांना गती द्या. कामामुळे तुमची दगदग, धावपळ वाढेल. नवीन योजना हाती घेऊन त्यात प्रगती करण्याचे तुमचे ईप्सित साध्य होईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे,’ असा खाक्‍या राहील. तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल, तेव्हा अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवा. मानसिक शांतता मिळेल.

कुंभ : ‘केल्याने होत आहे रे,’ हे लक्षात ठेवा. भोवतालच्या व्यक्तींकडून बरा-वाईट अनुभव येईल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. घरात मोठ्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल.

मीन : व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींची मदत घ्या. युक्तीने कमी श्रमात जास्त यश मिळवाल. व्यवसायात नवनवीन कल्पनांचा वापर करून विक्री व उलाढाल वाढवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत मनाजोगते काम करता येईल. जोडव्यवसायातून विशेष कमाई होईल. प्रवास घडेल. घरात आळस बाजूला ठेवून कामे कराल. प्रियजनांसमवेत वेळ मजेत जाईल. प्रकृतीमान सुधारेल.

संबंधित बातम्या