ग्रहमान : १६ ते २२ मार्च २०१९

अनिता केळकर
सोमवार, 18 मार्च 2019

ग्रहमान 

मेष : स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावाल. तुमचा आशावादी दृष्टिकोन तुम्हाला लाभदायक ठरेल. सर्व आघाड्यांवर त्याचा उपयोग होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. करारमदार होतील. मात्र सह्या करताना त्यातील अटी व नियमांचा नीट अभ्यास करावा. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ कामापुरते गोड बोलतील, तरी रागावू नये. मनाप्रमाणे कामात बदल करता येतील, त्याचा भविष्यात लाभच होईल. घरात वातावरण आनंदी राहील.

वृषभ : ग्रहमान संमिश्र असल्याने प्रत्येक कृती सावधगिरीने करावी. व्यवसायात काही बदल करणे आवश्‍यक असेल, तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. नोकरीत महत्त्वाच्या संधीसाठी तुमची निवड होईल. कामासंदर्भातील बेत गुप्त ठेवावा. छोटा प्रवास घडेल. लांबलेले निर्णय निश्‍चित होतील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. आनंदाचे क्षण उपभोगाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक वातावरण लाभेल.

मिथुन : गोंधळात टाकणारे ग्रहमान आहे, तरी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावे. व्यवसायात कामाचा झपाटा वाढवण्यासाठी धाडसी योजना आखाल व त्याची कार्यवाही ताबडतोब कराल. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीजही होईल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून तुमचे निर्णय मांडावेत. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी चिडचिड करू नका. घरात आडमुठे धोरण त्रासदायक ठरेल. वादविवाद होतील.

कर्क : अडथळ्यांची शर्यत पार करून मार्गक्रमण करावे लागेल, परंतु तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची जिद्द वाढवेल. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी धावपळ, दगदग करावी लागेल. महत्त्वाचे प्रश्‍न तातडीने मार्गी लागतील. तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूदही करावी लागेल. नोकरीत जास्त कामाची तयारी ठेवावी. कितीही कामे केली तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. सहकारी कामात मदत करतील, ही अपेक्षा नको. घरात तडजोडीचे धोरण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी.

सिंह : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यातून बरेच काही शिकायलाही मिळेल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन गती द्यावी. व्यवसायात तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे इतरांचे गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नवीन कामे ओळखीतून मिळतील. पैशाची चिंता नसेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सुविधा व सवलती देतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात एखाद्या प्रश्‍नावर तोडगा निघेल.

कन्या : ग्रहमान सुधारल्याने तुम्ही थोडे निर्धास्त व्हाल, परंतु स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर सतर्क राहणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवावे. व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीचा अवलंब कराल. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. कामात गुप्तता राखावी. पैशाच्या मोहापायी चुकीचा मार्ग हाताळू नये. घरात व्यक्तींच्या गरजा भागविण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल.

तूळ : तुमची मनीषा जागृत होईल, त्यामुळे नवीन काहीतरी करावेसे वाटेल. व्यवसायात प्रगतीसाठी काही ठोस पावले उचलाल, नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. मात्र हे करताना कुणावरही विसंबून राहू नये. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. कामातील अडथळे दूर करण्यातच तुमचा बराच वेळ जाईल. घरात दोन पिढ्यांतील विचारांची तफावत जाणवेल. तरी वादाचे मुद्दे टाळावेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पद्धतीनेच अभ्यास करावा.

वृश्‍चिक : कामाचा तणाव कमी झाल्याने तुम्ही निश्‍चितपणे राहाल. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. बाजारातील घडामोडींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. सुख-सुविधा घेण्याकडे तुमचा कल राहील. घरात तडजोडीने प्रश्‍नांची उकल कराल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवाल. महिलांची घर, व्यवसाय दोन्हीकडे दगदग होईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.

धनू : मनातील इच्छा - आकांक्षा प्रत्यक्षात साकार झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसायात पैशाची ऊब मिळाल्याने हायसे वाटेल. प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन योजना आखाल. कामे हाती घेण्यापूर्वी कामाचे योग्य नियोजन व आखणी करावी. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे विचार व सूचना पटतील व त्याप्रमाणे ते प्रतिसादही देतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात नातेवाईक व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील.

मकर : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात आवश्‍यक तेवढी भांडवलाची तरतूद होईल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी काही कारणाने रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांनी पूर्वी दिलेले आश्‍वासन ते पाळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. अनपेक्षित कलाटणी देणारी चांगली सुवार्ता कळेल. घरात वातावरण आनंदी राहील. आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल कराल. पैशाची चिंता मिटेल. प्रकृतीमान सुधारेल.

कुंभ : तुमच्यात नवीन उमेद जागृत होईल. जी कामे तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळलेली होती, ती पुन्हा गती घेतील, व्यवसायात मात्र फार मोठी उडी घेऊ नये. आर्थिक धोकाही पत्करू नये. नवीन करारमदारांवर सह्या करण्यापूर्वी त्यातील अटी-नियमांचा नीट अभ्यास करावा. नोकरीत बढाया मारून विनाकारण कामाची जबाबदारी ओढवून घेऊ नये. उत्साहाला थोडा आवर घालावा. नवीन अनुभव येतील. राग-लोभाचे प्रसंग येतील, तरी शांत राहावे. विद्यार्थ्यांनी मन एकाग्र करावे.

मीन : तुम्हाला बुचकळ्यात टाकणारे ग्रहमान आहे, तरी थोडी सबुरी ठेवावी. व्यवसायात कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. जमा-खर्चाचा ताळा करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्यावे. पैशाची चणचण वाटत असेल, तर तात्पुरते उसने पैसे घेऊन वेळ मारून न्याल. अवास्तव खर्चांवर बंधन ठेवावे लागेल. नोकरीत वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. कामातील बेत गुप्त ठेवावे लागतील. जादा काम करून वरकमाई करता येईल. घरात नातेवाइकांची ये-जा राहील.
 

संबंधित बातम्या