ग्रहमान : २३ ते २९ मार्च २०१९

अनिता केळकर
सोमवार, 25 मार्च 2019

ग्रहमान
 

मेष : प्रत्येक कामात स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा अट्टहास राहील. ग्रहांची साथही मिळेल. व्यवसायात नवीन कामे हाती घ्याल. मात्र, पूर्वीची हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. नवीन कामात कागदपत्रांची पूर्तता पडताळून बघावी. हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे. नोकरीत जादा अधिकार व सुविधा मिळतील, मात्र त्याचा उपयोग योग्य कारणांसाठीच करावा. कामानिमित्त नवीन ओळखी व प्रवास घडेल. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ : ग्रहांची मर्जी राहील, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून व स्वतःच्या बुद्धी कौशल्याचा वापर करून खुबीने कामे करून घ्यावीत. आर्थिक व्यवहारात लाभ होईल. स्वयंसिद्ध राहून महत्त्वाची कामे मार्गी लावाल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. पण वरिष्ठांच्या अपेक्षा बऱ्याच असल्याने तुमची धावपळ, दगदग होईल. बढती व बदलीसाठी विशेष अनुकूल ग्रहमान. घरात अचानक येणाऱ्या खर्चाची तरतूद करावी लागेल.

मिथुन : ग्रहांची अनुकूलता मिळेल, तरी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. व्यवसायात स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवावी. कामात गुप्तता राखावी. सरकारी कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची, दक्षता घ्यावी. नवीन कामे मिळतील. पैशांची तरतूद होईल. नोकरीत पगारवाढ व सवलती मिळतील, त्यामुळे आनंदी रहाल. वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळेल. घरात वातावरण आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.

कर्क : कामात सजग राहून कामे वेळेवर पूर्ण कराल. भोवतालच्या व्यक्तींचे कडू-गोड अनुभव येतील. व्यवसायात हितचिंतकांची मदत मिळेल, ही अपेक्षा करू नये. कामात चोख राहून कामे पूर्ण करावी. पैशाची वसुली होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. नवीन कामाची जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरात प्रकृतीच्या तक्रारींवर वेळीच लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी परीक्षा जवळ आल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा टाळावा.

सिंह :  ‘पळत्याच्या पाठी लागू नये’ हे लक्षात येईल. व्यवसायात कधी शक्ती, तर कधी युक्तीने कामे कराल. पैसे व वेळेचे गणित मांडून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्याल. अशक्‍यप्राय कामात यशश्री खेचून आणाल. नोकरीत तुमचे आडमुठे धोरण वरिष्ठांना आवडणार नाही. मात्र, तुम्ही तुम्हाला हवे तेच कराल. तुमच्या वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल.

कन्या : स्फूर्तिदायक ग्रहमान आहे. अडचणींवर मात करून कामात यशस्वी व्हाल. व्यवसायात किचकट कामे युक्तीने संपवाल. नवीन कामांना वेग येईल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ विश्‍वासाने एखादे काम तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार देतील. सरकारी नियमांचे पालन करून कामे पूर्ण कराल. घरात प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांना चांगली बातमी कळेल.

तूळ : अंथरूण पाहून पाय पसरावेत. अपेक्षित पैसे मिळण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पैशांची तजवीज होईल. नोकरीत तुमची मागणी वरिष्ठ पूर्ण करतील. नवीन नोकरीच्या कामात यश येईल. आवश्‍यक गरजा भागू शकतील. घरात वादविवाद समेट होईल. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल.

वृश्‍चिक : व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून कामे पूर्ण करावीत. लांबलेल्या कामांमुळे गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत नवीन पद्धतीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. शारीरिक दगदग प्रमाणाबाहेर वाढेल. घरात प्रत्येक व्यक्तीची गरज महत्त्वाची वाटेल, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. आवडत्या व्यक्तींची भेट होईल. प्रकृतीची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांनी मात्र घाईने निर्णय घेऊ नयेत.

धनू : उत्साही रहाल व इतरांनाही त्यात सामील करून घ्याल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदलही कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन योजना कार्यान्वित करण्याचे बेत ठरतील, त्यासाठी हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. ‘आपले काम बरे, नि आपण बरे’ हे धोरण उपयोगी पडेल. तरुणांना नवीन संधी मिळतील, त्याचा लाभ घ्यावा.

मकर :  विचार व कृती यांचा समन्वय साधून कामे कराल. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घेणे उपयोगी पडेल. व्यवसायात सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. सुवर्णमध्य साधून कामगार व मालक यांच्यामधील मागण्या मान्य कराव्या लागतील. पैशांची तरतूद करावी लागेल. नोकरीत न आवडणारे काम कराल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. घरात थोडी गैरसोय जाणवेल. तरीही सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावाल. हितचिंतकांची मदत मिळेल.

कुंभ : कृतिशील बनाल. स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावाल. व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. नवीन प्रयोग करावासा वाटेल. कामाचा वेग, विक्री व फायदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नोकरीत विनाकारण बढाया मारू नये. वरिष्ठ महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवतील. सहकारी कामात मदत करतील. घरात तुमच्या वागण्याने संभ्रमावस्था राहील. तुमचा अहंपणा इतरांना आवडणार नाही. महिलांनी शांत राहावे. विद्यार्थ्यांनी अतिधाडस करू नये.

मीन : स्वास्थ्य व समाधान देणारा सप्ताह आहे. व्यवसायात कामे मिळतील, त्यातून पैशांची चिंता मिटेल. भविष्यात उलाढाल वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. नोकरीत गुप्तशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. खर्चावर नियंत्रण ठेवावे. तरुणांनी आकांक्षांवर बंधन ठेवावे. कामात गुप्तता राखावी. घरात सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असेल, यासाठी हात सैल सोडाल. आवडत्या व्यक्तींच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा कराल.

संबंधित बातम्या