ग्रहमान : ३१ ते ६ एप्रिल २०१९

अनिता केळकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

ग्रहमान
 

मेष - डोळ्यांसमोर ध्येय धोरणे आखून त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात अडचणी अडथळ्यांवर मात करून सावधतेने पुढे जावे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे. स्पर्धकांना तुमच्याबद्दल असूया निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची मदत मिळेल. वरिष्ठ कामासाठी नवीन अधिकार देतील, त्याच्या कक्षेत राहून केलेले काम जास्त फायदेशीर ठरेल. घरात प्रकृतीची काळजी घ्यावी. दगदग, धावपळ कमी करावी. विनाकारण होणारी चिडचिड कमी करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत अति आत्मविश्‍वास टाळावा.

वृषभ - अनपेक्षित नवीन अनुभव येतील. व्यवसायात नवीन करार मदार होतील. अनोळखी व्यक्तींचा सहवास लाभेल. विश्‍वासार्हता पडताळून पाहून मगच कामे सोपवा. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. परदेश व्यवहार व परदेशगमन करणाऱ्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी करावी. नोकरीत मितभाषी राहून कामे करून घ्यावीत. कामानिमित्ताने प्रवास योग संभवतो. घरात पेल्यातील वादळे उठतील, तरी दुर्लक्ष करावे. नवीन खरेदी तूर्तास करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात इतरांवर विसंबून राहू नये. 

मिथुन - भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे. व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. परिस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे कामाची आखणी करावी. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चिंता वाटेल. मुलांच्या सहवासात वेळ मजेत घालवण्याचा विचार राहील. अतिश्रम व दगदग करु नये. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गाफील राहू नये. 

कर्क - एकदम एकाचवेळी कामात अडचणी उद्‌भवल्यामुळे तुम्हाला उसंत मिळणार नाही. प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. व्यवसायात स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत भोवतालच्या परिस्थितीनुरूप कामे करावी. नवीन अनुभव येतील. चुकीची संगत मात्र धरू नये. घरात मानसिक अशांतता जाणवेल, तरी आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करावी. अनपेक्षित एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांनी कोणतेही धाडस करू नये. तरुणांनी फाजील आत्मविश्‍वास ठेवू नये. 

सिंह - तुमच्या स्वभावाविरुद्ध वागावे लागेल. व्यवसायात कामात फेरबदल करून कामे पूर्ण करावी लागतील. अडथळे, अडचणीवर यशस्वीपणे मात करून प्रगती कराल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करून मर्जी संपादन करू शकाल. घरात दगदग, धावपळ कमी करावी. मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे प्रकृतीची कुरबूर राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी.

कन्या - तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील, तरी वेळीच मनाला लगाम घालावा. व्यवसायात पैशाच्या व्यवहारात दक्ष राहावे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत ‘आपले काम बरे नि आपण बरे’ हे धोरण ठेवावे. प्रलोभनापासून चार हात लांबच राहावे. वरिष्ठांना दिलेली आश्‍वासने पाळावीत. घरात सगळ्यांची मने जपणे कठीण वाटेल. मुलांच्या वागण्याचा त्रास जाणवेल. तरी डोके शांत ठेवावे. तरुणांनी संयमाने वागावे. विद्यार्थ्यांनी संभ्रमावस्थेत राहू नये. 

तूळ - घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. योग्य वेळी, योग्य व्यक्तींची मिळालेली मदत लाभ देईल. व्यवसायात नवीन कामाचे प्रस्ताव पुढे येतील. नवीन करारमदार होतील. कामाचा व्याप वाढेल. नोकरीत तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे पार पाडावे. कोणत्याही आश्‍वासनांना बळी न पडता सत्यता पडताळून बघावी. घरात एखाद्या प्रश्‍नावरून वादविवाद होतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यापासून चार हात लांब राहणेच इष्ट. प्रकृतीमान सांभाळा. विद्यार्थ्यांनी गाफील राहू नये. 

वृश्‍चिक - मनातील गोष्टी प्रत्यक्षात साकार करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कोणावरही अति विसंबून राहू नये. व्यवसायात कामे करताना चित्त विचलित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सही करण्यापूर्वी कामाच्या पूर्ततेचा सर्वकष विचार करावा. नोकरीत विचारल्या खेरीज मतप्रदर्शन करू नये. कामातील बेत गुप्त ठेवावे. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात शुल्लक कारणाने वादविवाद होतील. मन शांत ठेवावे. गैरसमजूतीने होणारे घोटाळे टाळावेत. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण उपभोगाल. विद्यार्थ्यांनी उजळणी केली, तर लाभ होईल. तरुणांचे विवाह ठरतील. 

धनू - ग्रहांची मर्जी दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यामुळे तुमची काम करण्याची ऊर्मी वाढत राहील. व्यवसायात केलेल्या कामाचे फळ मिळेल. पैशाविषयी मिळालेली आश्‍वासने पूर्ण होतील. जुनी येणी वसूल होतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. कामात बिनचूक राहावे. घरात तुमच्या स्पष्ट बोलण्याचा राग येईल, तरी वाद टाळावा. तडजोडीने वागावे. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्‍वास बाळगू नये. 

मकर - भविष्याची तरतूद करून पुढे मार्गक्रमण करण्याच्या धोरणात यश मिळेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. मोठे कार्य करण्याची इच्छा होईल, त्यामुळे त्यादृष्टीने कृतिशील रहाल. नोकरीत, कामात झालेली हयगय वरिष्ठांना सहन होणार नाही, तरी कामाची आखणी करून काम वेळेत संपवावे. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. घरात व्यक्तींशी बोलण्यात सबुरीचे धोरण ठेवावे. अनपेक्षित चांगली घटना मन प्रसन्न करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल.

कुंभ - सहज सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ गेल्याने इतर कामांना विलंब होईल. व्यवसायात कामातील त्रुटी शोधून त्यावर उपाय शोधावे लागतील. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवून पैशाची तजवीज करून ठेवावी. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत, कामात तत्पर राहावे. कोणावरही विसंबून राहू नये. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जोडव्यवसायातून कमाई होईल. घरात अनपेक्षित खर्च वाढतील. कोणतीही जादा जबाबदारी घेऊ नये. विद्यार्थ्यांनी मनाला योग्य वाटले, तसाच अभ्यास करावा.

मीन - भोवतालच्या व्यक्तींकडून बरेच अनुभव येतील. त्यातून नवीन शिकायला मिळेल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात फसगत होणार नाही, याची काळजी घ्यावी. नवीन करार करण्यापूर्वी स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. नोकरीत दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा करू नये. दैनंदिन कामात मन रमेल. घरात मोठ्या व्यक्तींचे विचार पटणार नाहीत, त्यामुळे शांत राहावे. विद्यार्थ्यांनी नेटाने अभ्यास पूर्ण करावा. एकाग्रतेवर भर द्यावा. चांगली बातमी कळेल.
 

संबंधित बातम्या