ग्रहमान : ६ ते १२ एप्रिल २०१९

अनिता केळकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

ग्रहमान

मेष - आशावादी दृष्टिकोन राहील. व्यवसायात अतिआत्मविश्‍वास न बाळगता व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कृती करावी. कामाच्या पद्धतीत बदल करून फायदा मिळवाल. वेगळ्या मार्गाचा अवलंब करून पैशाची उभारणी करा. जुनी येणीही वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. त्यांच्या आज्ञेचे पालन करून मर्जी संपादन करू शकाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात महिलांनी प्रेम व व्यवहार यांची गल्लत करू नये. झेपेल तेवढेच काम करून विश्रांती घ्यावी. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

वृषभ - मनातील शंकांचे निरसन झाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात अतिविचार करण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. तुम्हाला योग्य वाटतो, तोच निर्णय घेऊन कामे करावीत. पैशांची चांगली ऊब मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहील. तुमच्या विचारांना योग्य प्रतिसाद मिळेल. घरात सण समारंभानिमित्त खरेदी होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

मिथुन - केलेल्या श्रमाचे चीज होईल. भविष्यात लाभ देणारी कामे आता हातून पूर्ण होतील. व्यवसायात जमाखर्चाचा मेळ समसमान राहील. येणी वसूल होतील व देणी द्याल. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींची मोलाची मदत होईल. नोकरीत स्वतःहून कामे ओढवून घेऊ नये. हातातील कामाचे योग्य नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. वातावरण आनंदी ठेवण्यासाठी चार पैसे जादा खर्च कराल. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. 

कर्क - भोवतालच्या व्यक्तींशी वागताना अंदाज घेऊन फासे टाकावेत. स्वार्थ व परमार्थ साधून कामाचा ताळमेळ घालावा. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. पैशाची चिंता मिटेल. तुमच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. नोकरीत अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. बऱ्याच गोष्टी साध्य करण्यास सकारात्मक धोरण उपयोगी पडेल. घरात महिलांना आवडत्या क्षेत्रात मन रमविता येईल. प्रिजजनांच्या जीवनातील छानसा समारंभ साजरा होईल. 

सिंह - आशा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींची साथ मिळेल. एकाचवेळी अनेक कल्पना मनात येतील. पैशांची तरतूद होईल. नोकरीत प्रयत्न तसे यश मिळेल. प्रगतीसाठी परिश्रम करावे लागतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. परदेशगमनाची संधी दृष्टिक्षेपात येईल. घरात नवीन वस्तू खरेदीचे बेत ठरवाल. नातेवाईक, प्रियजन यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. 

कन्या - कामात लवचिक धोरण ठेवले, तर यश सहजसाध्य होईल. व्यवसायात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. हितचिंतकांची मदत घेऊन नवीन कामे मिळवता येतील. प्रसिद्धी माध्यमे व जाहिरातींचा उपयोग करून कामात नफा व उलाढाल वाढवता येईल. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. नवीन कामे स्वीकारण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घ्यावी. वरिष्ठांचा मूड पाहून ध्येय धोरणे ठरवावीत. घरात महिलांना मान मिळेल. त्यांचे विचार इतर व्यक्तींना पटतील. पैशांची चिंता मिटेल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. 

तूळ - तुमचा उत्साह द्विगुणित करणारे ग्रहमान आहे. परंतु, बेताने पावले टाकावीत. व्यवसायात ज्या कामातून फायदा मिळेल, ती कामे हाती घ्यावीत. अव्यवहारी राहू नये. नको त्या कामात धावपळ, दगदग होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत अंथरूण पाहून पाय पसरावेत. हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. घरात छोटासा शुभसमारंभ पार पडेल. महिलांना हौसमौज करता येईल. तरुणांना विवाहबंधनात अडकण्याचा मोह होईल.

वृश्‍चिक - संयमी स्वभावाचा फायदा घ्यावा. व्यवसायात अपेक्षित कामे लांबणीवर पडल्याने कामांना विलंब होईल. परिस्थितीनुरूप कामात बदल करावा लागेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. आर्थिक गोष्टींचा आढावा घेऊन कृती करावी. नोकरीत वरिष्ठ व सहकारी तुमची कदर करतील, ही अपेक्षा ठेवू नये. मात्र, आता केलेल्या कामाचा लाभ भविष्यात होईल. घरात मानले, तर समाधान मिळेल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. तरुणांनी अतिसाहस करू नये. 

धनू - वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात कामांना गती देऊन प्रगती पथावर मार्गस्थ व्हाल. योग्य वेळी, योग्य व्यक्तींची मिळालेली संगत लाभ देईल. पैशाची चिंता मिटेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत चांगल्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. बेकार व्यक्तींना नवीन कामाची संधी मिळेल. घरात पेल्यातील वादविवाद मिटतील. किरकोळ प्रश्‍नही मार्गी लागतील. व्यक्तिगत जीवनात एखाद्या प्रश्‍नात हळवे बनाल. मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. 

मकर - सरड्याप्रमाणे रंग बदलाल. गरज तशी वागणूक हे तंत्र अवलंबाल. व्यवसायात सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कामे उरकाल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येतील. बाजारातील चढउतारांवर लक्ष ठेवलेत, तर फायदाही होईल. नोकरीत हवे ते वरिष्ठांना देऊन मतलब साध्य कराल. कामात दक्ष राहून कामे पूर्ण कराल. नवीन ओळखी होतील. घरात कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. मनाप्रमाणे कामे होतील. आनंदाचे क्षण येतील, त्यात सहभागी व्हाल. सामूहिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल.

कुंभ - एकाचवेळी अनेक विचार मनात येतील व त्यातील कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हा संभ्रम होईल. व्यवसायात हाती घेतलेल्या कामात गती घेऊन पूर्ण करावे. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, त्याआधी कागदपत्रांची छाननी करून ती स्वीकारावीत. नोकरीत जमेल तेवढेच काम करून, उरलेला वेळ विश्रांती घ्यावी. तुमच्या मनाजोगते काम मिळाल्याने तुम्ही खूष असाल. परदेश व्यवहाराच्या कामात गती येईल. घरात सण, विवाहसमारंभ असतील, त्यात आनंदाने सहभागी व्हाल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलून यश मिळवाल. 

मीन - चांगल्या घटनांची नांदी होईल. मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात मिळणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. योग्य व्यक्तींशी संपर्क साधून नवीन कामे मिळवता येतील. पैशांची चिंताही मिटेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत तुमच्या नेतृत्वगुणांना संधी मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. घरात आप्तेष्ट व नातेवाईक यांचा सहवास लाभेल, आनंदही मिळेल. महिलांना सहजीवनाचा आनंद लुटता येईल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना बरीच मागणी राहील.

संबंधित बातम्या