ग्रहमान : १४ ते २० एप्रिल २०१९

अनिता केळकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

ग्रहमान
 

मेष : शुक्राची साथ मिळेल. तुमचा कामाचा वेग वाढेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. अपेक्षित पैसे हाती येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत दिलेले काम पूर्ण कराल. स्वतःच्या अपेक्षा थोडाकाळ बाजूला ठेवाव्या लागतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सत्संगाचे महिलांना लाभ होईल. मानसिक आरोग्य सुधारेल.

वृषभ : कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. सुखाकडे झुकाल, पण कर्तव्यात कोठेही कसूर होणार नाही याचीही दक्षता घ्याल. व्यवसायात मनाजोगते पैसे मिळतील. आवक-जावक समान राहील, त्यामुळे शिल्लक मात्र राहणार नाही. गरजा वाढल्याने नवीन जोडधंदा सुरू करावासा वाटेल. नोकरीत फायदा ज्यात असेल, तेच काम हाती घ्याल. गोड बोलून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. घरासाठी नवीन खरेदीचा मोह होईल. प्रकृतीमान नाजूकच राहील. उरलेल्या वेळात जीवनाचा आस्वाद घ्याल.

मिथुन : कामाचा ताण कमी झाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात अपेक्षित कामात प्रगती होईल. जुनी देणी देता येतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीत कार्यपद्धतीत बदल घडवून कामे हातावेगळी कराल. वरिष्ठांनी दिलेल्या सवलतींचा लाभ घ्याल. कमी श्रमात कामाचा उरक पाडाल. घरात शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. जुने प्रश्‍न धसास लागतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

कर्क : मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतील. ग्रहांची मर्जी आहेच. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद होईल, त्यामुळे नवीन योजना हाती घ्याल. पैशाअभावी रखडलेली कामे वेग घेतील. इतरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने आनंद वाटेल. नोकरीत मनाजोगते काम मिळेल. बदलीच्या केलेल्या प्रयत्नांना यश येईल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाईही चांगली होईल. घरात गृहसजावट, दुरुस्ती व वाहन खरेदीचे योग येतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग येतील.

सिंह : विरोधकांवर मात करून प्रगतीची वाटचाल कराल. व्यवसायात आवश्‍यक त्यावेळी सबुरीचे धोरण ठेवलेत, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात भावनिक निर्णय घेऊ नये. सतर्क राहून स्पर्धेतील खबरबात घ्यावी. नोकरीत भोवतालच्या व्यक्तींचे नवीन अनुभव येतील. मतलबापुरते सहकारी व वरिष्ठ गोड बोलतील. मात्र, लक्षात आल्यावरही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये. घरात मनःस्वास्थ्य व प्रकृतीचे तंत्र सांभाळावे. महिलांनी आनंदाने जमेल तेवढेच काम करावे. तरुणांनी अतिआत्मविश्‍वास बाळगू नये. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल.

कन्या : कामाची पूर्तता झालीच पाहिजे हा अट्टहास तुमचा असतो, मात्र या सप्ताहात थोडेसे लवचिक धोरण स्वीकारून व वेगळ्या मार्गाचा अवलंब करून यश मिळवाल. आवश्‍यक तिथे हात सैल सोडाल. व्यवसायात फायदा वाढवण्यासाठी ओळखीचा उपयोग होईल. मात्र, पैशाचा हव्यास धरू नये. नोकरीत कामानिमित्ताने अधिकार व सवलती मिळतील, मात्र त्याचा गैरवापर टाळावा. प्रवासयोग येतील. सहकारी कामात मदत करतील. घरात मुलांसाठी वेगळा वेळ काढाल. पाहुण्यांची, आप्तेष्टांची सरबराई कराल. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. महिलांनी तब्येत सांभाळावी.

तूळ : या सप्ताहात तुमचेच म्हणणे सर्वांनी ऐकावे हा हट्ट धरू नये. नको त्या कामात वेळ घालवण्यापेक्षा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे. व्यवसायात नियोजनबद्ध काम केले, तर कामाचे समाधान मिळेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन फायदा मिळवण्याचा विचार असेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत स्वतःचे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य मानून कामाला लागाल. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. कुटुंबासमवेत प्रवासाला जाण्याचे योग येतील. महिलांना आवडत्या क्षेत्रात भरारी घेता येईल. विद्यार्थ्यांनी गडबड न करता पेपर सोडवावा.

वृश्‍चिक : दुसऱ्यांच्या मनातले ओळखून तुम्ही तुमचा पवित्रा ठरवावा. या सप्ताहात व्यवसायात कामाचे प्रमाण चांगले राहील. मिळालेल्या नवीन संधीचा लाभ घेता येईल. नवीन कामे मिळतील. पैशांची चिंताही दूर होईल. नोकरीत स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधू शकाल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळून येईल. घरात तरुणांचे विवाह ठरतील. तुमच्याच कामामुळे इतर कामे लांबणीवर पडतील. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. महिलांना मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

धनू : ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. अनपेक्षित कामांना कलाटणी मिळेल. कामात परिस्थिती सुधारल्याने इच्छा-आकांक्षा वाढतील. आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. कुणालाही आश्‍वासने देताना त्याची पूर्तता करू शकाल, की नाही याचा अंदाज बांधावा. नोकरीत महत्त्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे करावीत. कामानिमित्ताने प्रवास घडेल. मिळालेल्या अधिकाराचा जरुरीपेक्षा जास्त वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरात कृतीवर भर राहील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नातेवाईकांपासून चार हात लांबच राहावे. विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने अभ्यास ग्रहण करावा.

मकर : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून कामाची उलाढाल वाढवाल. मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी भविष्यकाळात होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेऊन कार्यपद्धती आखाल. पैशाची सोय होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. मात्र, त्यांच्या डिवचण्याकडे कानाडोळा करावा. मनावर संयम ठेवावा. स्वतःहून कुठलीही कामे ओढवून घेऊ नयेत. घरात तात्त्विक वाद होतील, तरी रागावू नये. मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंद वाटेल. महिलांना कामाची उमेद वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.

कुंभ : तुमचा किचकट व चेंगट स्वभाव बाजूला ठेवून कामात उत्कृष्ट दर्जा ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींना कसे हाताळता त्यावर तुमची यशाची भिस्त राहील. तडजोडीचे धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नोकरीत, कामात हळूहळू सुधारणा दिसेल. केलेल्या चुका निस्तरून नवीन कामे हाती घ्याल. कामात तुमची झलक दिसेल. घरात फुकटचा सल्ला देऊ नये. वैचारिक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने अभ्यास करून पेपर लिहावा.

मीन : कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे करावीत. महत्त्वाच्या कामांचा अग्रक्रम ठरवून ती वेळेत पूर्ण करावीत. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे पूर्ण कामाचे आश्‍वासन देताना, जरा जास्तीची मुदत घ्यावी. कामाची वसुली करण्यावर लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढतील. विशेष सवलतीचे आमिष दाखवून जादा काम करून घेतील. घरात छोटासा समारंभ ठरेल. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. महिलांना हौसमौज करण्याचा मोह होईल. विद्यार्थ्यांनी मात्र शंका निरसन वेळीच करावे.

संबंधित बातम्या