ग्रहमान : २१ ते २७ एप्रिल २०१९

अनिता केळकर
सोमवार, 22 एप्रिल 2019

ग्रहमान
 

मेष - ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात कामाची आखणी करून त्याप्रमाणे वेळेचे नियोजन कराल. काम वाढवण्यासाठी वेगळी युक्ती कराल. कामानिमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क साधाल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत कामात बेधडकपणा टाळावा. काम वेळेत व व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. स्वतःची मर्यादा ओळखून, त्यात राहून काम करावे. घरातील व्यक्तींच्या सुखसमाधानासाठी तत्पर राहाल. आवश्‍यक त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. महिलांचे विचार ठाम व स्पष्ट असतील. तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. 

वृषभ - या सप्ताहात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सुप्त बेत प्रत्यक्षात साकार झाल्याने धन्यता वाटेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशांची चणचण कमी होईल. कामाचा ताण वाढेल, त्यामुळे रात्रीचा दिवस करावा लागेल. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. मान व प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. पाहुण्यांची ये-जा राहील. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. 

मिथुन - ग्रहमान चांगले असूनही प्रत्येक गोष्टीत संभ्रमावस्था निर्माण होईल. तेव्हा मानले, तर समाधान मिळेल. व्यवसायात कामाचा उत्साह दांडगा राहील. तात्पुरते कर्ज काढून वेळ निभावून न्याल. परिस्थितीनुरूप बदलून तुमचे ध्येय गाठण्याचा विचार असेल. नोकरीत व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठ तुमची एखादी मागणी मान्य करतील. व्यवसायातून जादा कमाई होईल. घरात वादाचे मुद्दे उफाळून येतील. तरी शांत राहावे. सलोख्याने प्रश्‍नांची उकल करावी. महिलांनी मौनव्रत ठेवावे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.

कर्क - आर्थिक व शारीरिक मर्यादांचा विचार करून मगच कोणतीही जबाबदारी स्वीकारावी. व्यवसायात ठरलेली कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. नवीन कल्पना तुम्हाला भुरळ पाडतील. पण प्रत्यक्षात त्या सुरू करण्यास विलंब होईल. अपेक्षित पैसे मिळण्यास विलंब होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. कामाचा मनस्वी कंटाळा येईल. बदल किंवा वारे वाहतील. घरात अनावश्‍यक खर्च वाढेल. त्यामुळे खर्चावर बंधन ठेवणे गरजेचे होईल. विद्यार्थ्यांनी तब्येतीस जपावे. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी.

सिंह - तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभेल. मात्र, जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. व्यवसायात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करावा. अहोरात्र कष्ट करूनही ताजेतवाने राहाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचा तणाव कमी होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत याकामी होईल. घरात आनंदाचे क्षण साजरे कराल. महिलांना सुखद क्षणांचा आधार मनोबल वाढवण्यास उपयुक्त ठरेल. प्रियजनांकडून अनपेक्षित लाभ होईल. 

कन्या - काही महत्त्वाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त होईल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य द्याल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी एखादे आमिष दाखवतील. त्यामुळे आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत याची काळजी घ्यावी. पैशांचा मोह टाळावा. घरात तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. पण तुमच्या बोलण्यामुळे इतरांचे गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. महिलांच्या केलेल्या श्रमाचे चीज होईल.

तूळ - ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहेच. तेव्हा यश कसे मिळवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. व्यवसायात दिलेला शब्द पाळून कामाचा उरक पाडावा. आवश्‍यक तेथे कामात बदल करून कामांना गती द्यावी. पैशांचा विनियोग योग्य तेथेच करावा. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी विशेष सवलती देतील. जोडव्यवसाय असणाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. पैशाची ऊब मिळेल. घरात मुलांच्या बाबतीत उद्‌भवणारे प्रश्‍न सुटतील. शुभवार्ता कळेल. महिलांना नवीन मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. 

वृश्‍चिक - व्यवसायात बऱ्याच गोष्टी साध्य करू शकाल. केलेल्या प्रयत्नांना यश येईल. खर्चाचे प्रमाण वाढले, तरी आवकही वाढेल. तणावाचे वातावरण कमी होईल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. घरात मनाविरुद्ध वागावे लागेल. पण त्यातच हित आहे, हे लक्षात ठेवावे. वादाचे प्रसंग टाळावेत. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. महिलांनी इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करावेत. प्रकृतीची काळजी घ्यावी. 

धनू - भविष्यात होणाऱ्या बदलांची नांदी देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात व्यक्तींची झालेली भेट लाभ घडवून देईल. नवीन कामे मिळतील. कामे मार्गी लागतील. एक आशावादी दृष्टिकोन मनाला उभारी देईल. पैशांची चणचण भासेल, तरी त्यावरही मार्ग सापडेल. नोकरीत वरिष्ठ सहकाऱ्यांची मदत होईल. मर्जी संपादन करून कामाचा बोजा कमी केल्याने मनाजोगते काम मिळेल. घरात चांगला तोडगा निघेल. आप्तेष्टांच्या सहवासाने वेळ मजेत जाईल. तरुणांचा आत्मविश्‍वास बळावेल. 

मकर - खर्च वाढला, तरी चांगल्या कारणासाठी असल्याने समाधान राहील. व्यवसायात कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. इच्छा तेथे मार्ग सापडेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहाल. नोकरीत, कामात अनपेक्षित बदल घडतील. त्यामुळे कामाचे स्वरूप व कार्यपद्धत बदलावी लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप मिळेल. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात काही ठोस पावले उचलाल. त्याचा भविष्यात लाभ होईल. घरगुती समारंभ ठरवाल. महिलांनी झेपेल तेवढेच काम करून उरलेला वेळ विश्रांती घ्यावी.

कुंभ - किचकट वाटणाऱ्या कामात विशेष रस घ्याल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा विचार कराल. पैशांची तजवीज हितचिंतकांकडून होईल. नोकरीत वेगळ्या पण महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. त्यासाठी जादा सवलत अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात कामाचे नियोजन करूनही खर्च वाढेल. वेळेचे गणित चुकेल. महिलांनी स्वतःचे छंद जोपासावेत. तरुणांनी अतिधाडस करू नये. 

मीन - इतर ग्रहांची साथ आहे (शुक्र वगळता), तेव्हा खर्च हे चांगल्यासाठीच होणार याची खात्री बाळगावी. व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. नवीन कामेही दृष्टिक्षेपात येतील. मनाजोगते पैसे हाती आल्याने पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा तणाव वाढेल. त्यामुळे दगदग, धावपळ होईल. चिडचिड न करता महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यावे व उरक पाडावा. घरात आपल्या व्यक्तींची जी साथ मिळेल, ती मोलाची ठरेल. मनोबल वाढवण्यास ती उद्युक्त करेल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांची बराच काळाची सुप्त इच्छा सफल होईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

संबंधित बातम्या