ग्रहमान : ४ ते १० मे २०१९

अनिता केळकर
सोमवार, 6 मे 2019

ग्रहमान

मेष : ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा. हितचिंतकांची साथ उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्त जादा सवलती मिळतील, त्याचा लाभ घ्यावा. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई चांगली होईल.

वृषभ : मनातील बेत प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निर्धार करावा. कृतिशील बनवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन त्यांना गती द्याल. कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. नोकरीत कामात बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. केलेल्या कामाचे समाधान राहील. तुमचे व कामाचे महत्त्व कळून येईल.

मिथुन :  प्रगतीला पूरक वातावरण व ग्रहमान लाभले आहे, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात विनाकारण रेंगाळलेली कामे हाती घेऊन मार्गी लावावीत. तांत्रिक अडथळ्यांवर मात करून कामाची पद्धत बदलून उलाढाल वाढवाल. नवीन करारमदार होतील. नोकरीत कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. बेकार व्यक्तींना चांगल्या संधी चालून येतील. पैशांची तजवीज होईल. घरात चांगली बातमी कळेल.

कर्क : परिस्थितीनुरूप बदल करावा व ध्येयधोरणे ठरवावीत. व्यवसायात तुमचा हुरूप चांगला असेल. कामे आटोक्‍यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. हातून चुका होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता शहानिशा करावी. घरात कामाची आखणी करून त्याप्रमाणे प्राधान्य द्यावे व कामे संपवावीत. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

सिंह : स्वतः सिद्ध राहून कामे करावीत, फायदाच होईल. व्यवसायात काही ठोस पावले उचलून कामांना गती द्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. पूर्वीचे हितसंबंध संपून नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत काही प्रश्‍न सुटतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात महिलांनी कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. सामंजस्याने वैचारिक मतभेद मिटवावेत.

कन्या : कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी. दुसऱ्यांवर फारसे अवलंबून राहू नये. व्यवसायात हातातील कामांवर लक्ष ठेवावे. भागीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कोणतेही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तणावाचे वातावरण राहील. परंतु, बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहावे. तरुणांनी अतिविश्‍वास टाळावा.

तूळ : कामात म्हणावी तशी प्रगती नाही. यामुळे निराशा येईल. थोडी सबुरी ठेवलीत, तर यश मिळावे. व्यवसायात महत्त्वाची कामे होतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतकांची मदत मिळेल. भावनेच्या भरात मोठी उडी घेऊ नये. वेळ व काळाचे भान ठेवून कामे उरकावीत. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे न करता कुवत ओळखून कामे स्वीकारावीत. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत.

वृश्‍चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात, कामात आलेला विस्कळितपणा कमी होईल. कामात कर्तव्य व आनंद दोन्हींचा उपभोग घेता येईल. आर्थिक आवक सुधारेल. नोकरीत निश्‍चय पक्का असेल, तर यश मिळणारच. प्रगतीचा मार्ग अवघड असला, तरी त्यासाठी केलेल्या प्रयत्नात आनंद मिळेल. ओळखीचा उपयोग होईल. मनोधैर्य चांगले राहील.

धनू : जादूची कांडी फिरवावी व विस्कटलेली घडी सुरळीत व्हावी, अशी तुमची अपेक्षा असेल. परंतु, थोडा धीर धरलात, तर बरेचसे प्रश्‍न सुकर होतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेऊन कामाची आखणी करावी. यशासाठी थोडी वाट पहावी लागेल. काही प्रश्‍नांना चालना मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून मदतीची अपेक्षा करू नये. घरात तुमचा आग्रही स्वभाव राहील. कामाबाबत तुमच्या पद्धतीने हक्क गाजवाल.

मकर : पैशासंबंधीच्या व्यवहारांना महत्त्व द्यावे. व्यवसायात कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करावा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे करावीत. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे. शब्द जपून वापरावेत. बोलण्यातून होणारे गैरसमज टाळावेत. पैशांचा अपव्यय टाळावा. कामात काटेकोर राहावे.

कुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल. विचार स्वातंत्र्य मिळेल. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करून उलाढाल वाढवावी. तडजोडीचे धोरण स्वीकारून कामात लवचिकता आणल्यास प्रगती होईल. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. स्वतःच्या उन्नतीसाठी हालचाली कराल, त्यात यश येईल. पैशांचा मोह होईल, परंतु अव्यवहाराने वागू नये. घरात तुमच्या विचित्र वागण्याचा इतर व्यक्ती वेगळाच कयास बांधतील. दुर्लक्ष करावे.

मीन : मूड बदलायला तुम्हाला वेळ लागत नाही, तेव्हा सारासार विचार करावा, मगच कृती करावी. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न धावता हाती असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन योजना तुमच्या दृष्टिक्षेपात असतील. हाती असलेल्या पैशांचा वापर जपून करावा. नोकरीत हलक्‍या कानाने निर्णय घेऊ नयेत. मनाला पटेल, रुचेल तेच निर्णय घ्यावे व त्याप्रमाणे वागावे. कामानिमित्त नवीन ओळखी होतील.

संबंधित बातम्या