ग्रहमान : २५ ते ३१ मे २०१९

अनिता केळकर
सोमवार, 27 मे 2019

ग्रहमान 
 

मेष : मनाला ब्रेक लावून प्रगती करणे आवश्‍यक ठरेल. व्यवसायात बाजारातील चढ-उतारांकडे लक्ष द्यावे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती करावी. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्याव्यात. थोडे सबुरीचे धोरण ठेवलेत, तर फायदा तुमचाच होईल. घरात इतर व्यक्तींकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत. निराशा झटकून सकारात्मक दृष्टी ठेवावी. वादाचे मुद्दे टाळावेत. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर भर द्यावा.

वृषभ : ग्रहांची मदत मिळेल. त्यामुळे उत्साहाने कामाला लागाल. व्यवसायात अस्थिरता कमी होऊन महत्त्वाची कामे हाती घ्याल. प्रगतीमान चांगले राहील. नको त्या कामात वेळ जाण्याची शक्‍यता आहे. पैशांची स्थितीही सुधारेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमच्यावर राहील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. प्रवासाचे योग येतील. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी मनाची शांतता राखावी.

मिथुन : कामाचा ताण वाढेल, त्यामुळे दगदग जास्त होईल. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. कोणालाही, कुठलेही आश्‍वासन देताना भविष्यातील परिणामांचा विचार आधी करावा. विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधून कामांना चालना द्यावी. नोकरीत बुद्धी शाबूत ठेवून कामे करावीत. तब्येतीला झेपेल तेवढेच काम पूर्ण करावे. कोणालाही उलट बोलू नये. घरात इतर व्यक्तींची साथ मिळेल.

कर्क : माणसांची पारख करून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागणे, ही एक कसोटीच असेल. परंतु, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. जुनी येणी वसूल झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील. कोणताही धोका पत्करून पैशांची गुंतवणूक करू नये. नोकरीत वरिष्ठांना बऱ्याच अपेक्षा असतील. कामाचे व वेळेचे नियोजन करून कामे संपवावीत. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल.

सिंह : तुम्हाला सजगवृत्तीने कामे हाताळावी लागतील. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन मार्गी लावाल. मात्र, फार मोठी उडी मारू नये. व्यवसायात ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते, तीच गोष्ट त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. बेफिकीरपणा अंगाशी येण्याची शक्‍यता आहे. रागावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरात वैचारिक मतभेद होतील, तरी दुर्लक्ष करावे.

कन्या : गोंधळाची स्थिती असेल, त्यामुळे नक्की कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हा संभ्रम होईल. व्यवसायात कामाची आखणी करून कामे हाती घ्यावीत. विचारपूर्वक निर्णय घेऊन कामांना चालना द्यावी. कामातील प्रगतीबाबत चिंता वाटेल. नोकरीत वरिष्ठांची मान्यता घेऊन कामे हाती घ्यावीत. त्यांच्या शब्दाला मान द्यावा. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. घरात वैयक्तिक मतभेदांमध्ये समेट होईल. लवचिक धोरण लाभदायी ठरेल.

तूळ : पैशाचे सोंग घेता येत नाही, तरी व्यवहार दक्ष राहावे. व्यवसायात आर्थिक बाबतीत चोख राहावे. उधार उसनवार शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करावीत. कामात झालेली हेळसांड नंतर निस्तरावी लागेल, तरी खबरदारी घ्यावी. नोकरीत कामात गुप्तता राखावी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. घरात इतर व्यक्तींचे समाधान करणे कठीण जाईल, तरीही त्यांच्यासाठी थोडा वेळ व पैसे खर्च करावेत. विद्यार्थ्यांनी मित्रांवर अवलंबून राहू नये.

वृश्‍चिक : तुमच्या अहंमान्य स्वभावाला ठेच लागण्याची शक्‍यता आहे, तरी सावध राहावे. व्यवसायात फार मोठे धोके पत्करू नयेत. प्रलोभनांना बळी न पडता, सत्यता पडताळून बघून कामे स्वीकारावीत. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. नोकरीत वरिष्ठांचा मान राखावा. तुमचाच फायदा होईल. रागलोभाचे प्रसंग टाळावेत. वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी.

धनू : सध्या ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहे, त्यामुळे आनंदाचे बरेच क्षण उपभोगाल. व्यवसायात नवीन करार होतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. पैशांची स्थितीही समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत विश्‍वासार्हता पडताळून सहकाऱ्यांवर कामे सोपवावीत. उत्साहाच्या भरात कामे ओढवून घेऊ नयेत. सबुरीचे धोरण ठेवावे. अर्धवट बातमीने गोंधळ होण्याची शक्‍यता आहे.

मकर : अत्यंत व्यावहारिक विचार असतो, त्याचा लाभ होईल. व्यवहारात भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कार्यप्रणाली आखाल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामांची पूर्तता कराल. पैशांची गुंतवणूक योग्य प्रकारे करून भविष्याची तरतूद करून ठेवाल. नोकरीत नवीन अनुभव येतील. वरिष्ठांच्या दुटप्पी वागण्याचा राग येईल. तरीही राग व्यक्त करू नये. नवीन नोकरीचे निर्णय पुढे ढकलावेत. घरात गृहसौख्य मिळेल.

कुंभ : प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा तुमचा इरादा असेल, त्यामुळे गैरसमज होण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात आडमुठ्या धोरणामुळे कामे लांबतील. निर्णय घेण्यात विलंब होईल. विरोधकांचा विरोध मोडून काढण्यात बराच वेळ व शक्ती खर्च होईल. पैशांचीही तजवीज करावी लागले. नोकरीत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. सहकाऱ्यांशी वागताना जपून वागावे. कामानिमित्त प्रवासयोग येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगीत टाळावी.

मीन : स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल, त्याचा फायदा घ्यावा. व्यवसायात कामाचा उत्साह प्रचंड असेल, त्यामुळे कामे पूर्णत्वाला जातील. नवीन कामेही मिळतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. कामात गुप्तता राखावी. वरिष्ठ व सहकारी आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याची काळजी घ्यावी. घरात वातावरण प्रसन्न राहील. मनाप्रमाणे कामे होतील. मनःशांती लाभेल. आरोग्यमान चांगले राहील.
 

संबंधित बातम्या