ग्रहमान : १ ते ७ जून २०१९

अनिता केळकर
सोमवार, 3 जून 2019

ग्रहमान
 

मेष : तुमच्यावर ग्रहांची मर्जी असल्याने यशाची चढती कमान अनुभवता येईल. सर्व आघाड्यांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामानिमित्त नवे संबंध जोडले जातील. पैशांची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाच्या स्वरूपात व जागेत बदल होण्याची शक्‍यता आहे. घरात समारंभामुळे आनंद मिळेल. महिलांना कामात सकारात्मक दिशा मिळेल.

वृषभ : यशापयशाचा वाटा समसमान राहील. व्यवसायात थोडा धोका पत्करल्याशिवाय प्रगतिपथावर राहणे अवघड जाईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व हितचिंतकांच्या सल्ल्याचा उपयोग होईल. नोकरीत वरिष्ठांपुढे स्वतःच्या हक्कांसाठी आग्रही राहाल. मात्र, हट्टी हेकेखोर वृत्ती ठेवू नये. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात तात्त्विक मतभेद झाले, तरी सामंजस्याने प्रश्‍न सोडवावेत. महिलांनी आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रगती करावी.

मिथुन : थोडे मनाविरुद्ध वागावे लागल्याने तुमची चिडचिड होईल. मात्र, राग डोक्‍यात जाऊन देऊ नये. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारलेत, तर फायदा तुमचाच होईल. नवीन गुंतवणुकीसाठी भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत भोवतालच्या परिस्थितीनुरूप धोरण आखावे. कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. घरात कौटुंबिक जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. कामातील विरंगुळा महिलांना उत्साही ठेवेल.

कर्क : कामातील अडथळे व अडचणींवर मात करून कामात प्रगती केलीत, तर प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदतीसाठी निवड केलीत, तर कामे मार्गी लागतील. खर्च जास्त व आवक कमी अशी स्थिती असेल, पण तरीही तुमचा आशावाद तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. नोकरीत, कामात केलेली दिरंगाई वरिष्ठांना मान्य होणार नाही. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केलात, तर यश येईल. कामानिमित्त प्रवास घडेल.

सिंह : एकाच वेळी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. पण नेमकी कोणती दिशा निवडावी याबाबत थोडी साशंकता वाटेल, तेव्हा निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे. स्पर्धा तीव्रतेने जाणवेल. मिळालेली संधी दवडू नये. संधीचा लाभ घेताना चुकीच्या व्यक्तींशी संबंध जोडू नयेत. नोकरीत अधिकारांचा वापर जपून करावा. तुमच्या वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कन्या : कामाच्या वेळी काम व इतर वेळी आराम करण्याची तुमची इच्छा राहील. व्यवसायात पत व प्रतिष्ठा उंचावण्याकडे कल राहील. अनपेक्षित लाभामुळे पैशांची ऊब राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, ती ओळखीचा उपयोग करून मिळवावीत. नोकरीत कामाचा कंटाळा नंतर त्रासदायक ठरेल, तेव्हा सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवून कामे संपवावीत. घरात नवीन खरेदीचा मोह होईल. नातेवाईक, प्रियजनांशी भेटीचे योग येतील.

तूळ : भोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न कराल, त्यात यश येईल. वाढती स्पर्धा व येणारे नवीन अनुभव यातून बरेच काही शिकाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारे काम हाती घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत आर्थिक प्राप्ती चांगली राहील. सहकारी व वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व लक्षात येईल. घरात गृहसौख्य अनुभवता येईल.

वृश्‍चिक : व्यवसायात तात्पुरत्या परिणामांचा विचार न करता दूरगामी परिणामांचा विचार करावा. मोठे काम स्वीकारताना तांत्रिक व संभाव्य अडचणींचा विचार करावा. पैशाचे सोंग पांघरता येत नाही, हे लक्षात ठेवून कृती करावी. नोकरीत पगारवाढ किंवा अधिकारात वाढ होईल. मानाच्या कामासाठी तुमची निवड होईल. प्रतिष्ठा मिळेल. मात्र, व्यक्तींची पारख नीट करावी. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. एखादा सुखद प्रसंग साजरा कराल.

धनू : धोके पत्करून प्रगती करताना विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधावा. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न धावता सत्य परिस्थितीचा सामना करावा. फायदा-तोट्याचा विचार न करता कामात प्रगती करावी. पैशांची तजवीज होईल. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. तुमच्या बोलण्याने भोवतालच्या व्यक्तींचा गैरसमज होणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरात वातावरण आनंदी राहील. मंगलकार्य ठरतील. महिलांना छंद जोपासता येईल.

मकर : ग्रहांची मर्जी राहील, त्यामुळे उत्साही राहाल. व्यवसायात मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा विचार राहील. मात्र, भावनेच्या भरात कोणतीही कृती घाईने करू नये. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत, कामात वरिष्ठांची मदत मिळेल. सहकारी कामात साथ देतील. वरिष्ठांपुढे मांडलेल्या मागण्या ते मान्य करतील. त्यामुळे तुम्ही आश्‍वासनांची पूर्तता झाल्याचा आनंद घेऊ शकाल.

कुंभ : सध्या नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्याल. व्यवसायात मनाप्रमाणे कमाई असेल. पैशाचा विनियोग मात्र निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन करावा. हितशत्रूंपासून सावध राहावे. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा अधिकारही देतील. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊ नये. कामात आळस करू नये. घरात तात्त्विक मतभेद होतील. रुसवेफुगवे सहन करावे लागतील, तरी डोके शांत ठेवावे.

मीन : तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने उत्साही राहाल. व्यवसायात, कामात बदल करून उलाढाल वाढविण्याकडे कल राहील. नैतिक पाठबळ मिळवण्यात यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात राहाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्या वाट्याला येईल. कामाचे कौतुक सर्वजण करतील. जोडव्यवसायातून जादा कमाई होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल.

संबंधित बातम्या