ग्रहमान : ८ ते १४ जून २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 13 जून 2019

ग्रहमान
 

मेष : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस राहील. व्यवसायात आर्थिक दृष्टीने सप्ताह महत्त्वाचा आहे. अपेक्षित पैसे हातात पडून अत्यावश्‍यक देणी देता येतील. नेहमीच्या कामातून तुमची सुटका होणार नाही, तरी कार्यमग्न राहावे. नोकरीत कामाचा व सोयी-सुविधांचा आस्वाद घेता येईल. कामानिमित्त प्रवासयोग येईल, त्यातून नवीन ओळखी होतील. घरात शुभसमारंभानिमित्त आप्तेष्ट भेटतील.

वृषभ : ग्रहमान सुधारत आहे, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात चौफेर नजर ठेवून सतर्क राहावे. कामगार व ग्राहक यांचे मूड सांभाळणे हे महत्त्वाचे काम असेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, मात्र कोणतेच व्यवहार घाईने करू नयेत. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागले, तरी सहकारी व वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. हातून झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न स्तुत्य असेल. घरात धीर धरलात, तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे.

मिथुन : या सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळेल. ज्यामुळे व्यवसायात कार्यक्षेत्राची कक्षा रुंदावेल. नवीन काम सुरू करण्यासाठी तयारी करावी लागेल. मात्र, तुमच्या कामात गुप्तता राखावी. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांपासून चार हात दूरच राहावे. गरजेपेक्षा जास्त पुढे पुढे करू नये. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामावर लक्ष द्यावे. पैशाचा मोह टाळावा. घरात प्रिय व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क : तुमचा आशावादी दृष्टिकोन राहील. त्याचा फायदा घेऊन लांबलेली कामे मार्गी लावावीत. व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न कराल. माणसांची पारख महत्त्वाची ठरेल. भागीदारी किंवा करार करण्यापूर्वी नीट चौकशी करावी. चुकीच्या व्यक्तींशी व्यवहार करू नये. नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. हितशत्रूंपासून कामात अडथळे येण्याची शक्‍यता आहे, तरी सावध राहावे. महिलांनी मनन चिंतनात वेळ घालवावा.

सिंह : आत्मिक बळाच्या जोरावर अवघड कामात यश मिळवाल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. जुनी येणी वसूल करताना शब्द जपून वापरावे. ओळखीचा उपयोग करून नवीन कामे मिळतील. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. सहकाऱ्यांची टीका सहन करावी लागली, तरी दुर्लक्ष करून आपले काम चांगले करावे. घरात स्वतःच्या मर्यादा ओळखून कामे करावीत.

कन्या : पैशाची ऊब मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात तुमची बाजू बळकट राहील. महत्त्वाच्या कामात योग्य व्यक्तींची मदत मिळेल. अनावश्‍यक खर्चांना फाटा देऊन अडीनडीसाठी काही पैसे राखून ठेवावेत. नोकरीत अति उत्साहाच्या भरात अधिकाराचा गैरवापर करू नये. चुकीची संगत व वाईट मार्गापासून लांब राहावे. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. महिलांनी बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्यावा.

तूळ : अडथळ्यांची शर्यत पार करून कामात यश मिळवाल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली साथ फायदा मिळवून देईल. कामाचा वेग वाढवणे गरजेचे होईल. कामाच्या नवीन योजना तुमचे लक्ष वेधतील. आर्थिक आघाडीही भक्कम करावी लागले. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवतील. वरिष्ठ त्यासाठी जादा अधिकारही देतील. जोडव्यवसायातून लाभ होईल.

वृश्‍चिक : ग्रहमान अनुकूल राहील, त्यामुळे तुमच्या आशा पल्लवित होतील. तुमचा व्यवसायातील पवित्रा आक्रमक असेल. समोरच्या संधीचा फायदा कसा घ्यायचा, याचा विचार करावा. हितचिंतकांची मदत घेऊन आर्थिक बाजू बळकट करावी. नोकरीत आपले कोण व परके कोण याची जाणीव होईल. वरिष्ठांनी दिलेली कामे चोख करून शांत राहावे. घरात तुमचे पूर्वी न पटलेले विचार आता पटतील. प्रकृतीचे त्रासही कमी होतील.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल, तरी कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करावीत. व्यवसायात नवे प्रस्ताव पुढे आले, तरी पुढील परिणामांचा अभ्यास करून मगच काय तो निर्णय घ्यावा. नेहमीच्या पद्धतीने कामे चालू ठेवावीत. नोकरीत कितीही काम केले, तरी समाधान असे मिळणार नाही. तेव्हा फार अपेक्षा करू नयेत. विचारल्याशिवाय फुकटचा सल्लाही देऊ नये. मनावर संयम ठेवून वागणे हितावह ठरेल.

मकर : मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. हातातील कामे वेळेत पूर्ण करू शकाल. श्रमाचे चीज होईल. पैशाची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. कर्तव्याला प्राधान्य द्याल. नोकरीत इतरांना न जमणारे काम वरिष्ठ विश्‍वासाने तुमच्यावर सोपवतील. नको असलेल्या व्यक्तींशी संपर्क येईल. मात्र, त्यात फार गुंतू नये. घरात पथ्यपाणी सांभाळून हौसमौज करता येईल. कामात उत्साह वाढेल.

कुंभ : जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कामात स्थिरता निर्माण करू शकाल. व्यवसायात ज्यांच्यावर तुमची भिस्त होती, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे स्वयंसिद्ध राहावे. खेळत्या भांडवलाची तात्पुरती सोय करावी लागेल. नोकरीत, कामात चोख राहावे. ‘आपले काम बरे नि आपण बरे’ हे धोरण उपयोगी पडेल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. घरात लवचिक धोरण फायद्याचे ठरेल.

मीन : अनुभवासारखा गुरू नाही, याचा प्रत्यय येईल. व्यवसायात कामातील शिथिलता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. भांडवल उभे करावे लागेल. अनपेक्षित लाभामुळे मनाला सुखद धक्का बसेल. नोकरीत वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आळस झटकून कामे कराल. जोडव्यवसायातून कमाई होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. तब्येतीची उत्तम साथ मिळेल.

संबंधित बातम्या