ग्रहमान : १५ ते २१ जून २०१९

अनिता केळकर
सोमवार, 17 जून 2019

ग्रहमान 

मेष : रवी, बुधाची साथ मिळेल. त्यामुळे ज्या गोष्टींकडे काणाडोळा केला होता, त्या गोष्टींना प्राधान्य द्याल. व्यवसायात स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवून कार्यप्रणाली आखाल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. कामाचा उरक दांडगा राहील. नवीन ओळखी होतील. घरात महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. वादाचे मुद्दे टाळण्यात यश मिळेल.

वृषभ : गुरू अनुकूल असल्याने दिशा मिळेल. व्यवसायात काहीतरी वेगळे करण्याचा मोह होईल. मोठ्या उमेदीने कामाला लागाल. नवीन कामेही मिळतील. पैशांची तजवीज झाल्याने चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ आमिष दाखवून जादा काम करवून घेतील. अनपेक्षित लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. घरात काही कामे इतरांवर सोपवाल. वादविवादाचे प्रसंग आले, तरी दुर्लक्ष कराल. मानसिक शांतता राखण्यावर भर राहील. महिलांनी वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. तब्येत सांभाळावी.

मिथुन : माणसांची पारख करून संबंध ठेवावेत. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल, परंतु तुमच्या कामाच्या वेळी कोणी मदतीला येणार नाही. त्यामुळे थोडे निराश व्हाल. झेपेल तेवढेच काम करून कामाचा आनंद घ्यावा. पैशांची आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तुमचे काम निगुतीने करावे. विचारल्याखेरीज सल्ला देऊ नये. घरात तडजोडीने प्रश्‍नांची उकल करावी. हटवादी स्वभाव बाजूला ठेवून कामे मार्गी लावावीत.

कर्क : भोवतालच्या व्यक्तींकडून कसे काम करून घेता यावर बरेचसे यश अवलंबून राहील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा मानस असेल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य द्याल. खेळत्या पैशाची जुळवाजुळव करण्यात बराच वेळ खर्ची पडेल. नोकरीनिमित्त परदेशगमन करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. वरिष्ठांच्या आश्‍वासनांवर फार विसंबून राहू नये. तुमच्या पद्धतीनेच तुम्ही काम करावे. घरात स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न राहील. मनन व चिंतन केलेत, तर फायदा होईल. वातावरण आनंदी राहील.

सिंह : तुमच्या अति महत्त्वकांक्षेला थोडी गवसणी घालून कार्यपद्धतीप्रमाणे कामे करावीत. मानसिकदृष्ट्या तुम्ही उत्साही व आशावादी राहाल. व्यवसायात उद्‌भवणाऱ्या अडचणींवर समर्थपणे मात करून प्रगती कराल. सरकारी नियमांचे पालन काटेकोरपणे कराल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन वेळेची कसर भरून काढाल. नोकरीत कामातील बेत गुप्त ठेवावेत. कामात स्व-मताला महत्त्व न देता वरिष्ठांचे महत्त्व व मान राखावा. व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात दोन पिढ्यांतील तफावत जाणवेल.

कन्या : प्रयत्नांच्या प्रमाणात यश मिळेल म्हणून प्रयत्नात कसूर करू नये. व्यवसायात स्वतःची व आर्थिक कुवत ओळखून कामाची जबाबदारी स्वीकारावी. नियमांच्या चौकटीत राहून कामे करावीत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य राहील. नोकरीत नवीन कामासंबंधी गुप्तता राखावी. कुणावरही विसंबून राहू नये. किचकट काम संपवून मगच नवीन कामांकडे वळावे. पैशांचा मोह बाळगू नये. घरात मोठ्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. हलक्‍या कानांमुळे वादविवाद होतील. तरुणांनी अति धाडस करू नये.

तूळ : सध्या तुम्हाला येणारे अनुभव बरेच काही शिकवून जातील. त्यामुळे सतर्क व्हाल. व्यवसायात नवे विचार व धोरण कृतीत आणण्याचा विचार असेल. परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच कोणतेही निर्णय घ्यावेत. पूर्वीची देणी वेळेत द्यावीत. नोकरीत भविष्यातील योजनांची आखणी करून त्याप्रमाणे कृती करावी. कामात चोखंदळ राहावे. वाईट संगत टाळावी. घरात वैचारिक मतभेद होतील. त्यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत.

वृश्‍चिक : रवी अनुकूल झाल्याने मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल. त्यादृष्टीने पावले उचलाल. येणाऱ्या अडीअडचणींचा अंदाज घेऊन कामाची आखणी कराल. हितचिंतकांची मदत घेऊन रखडलेली कामे मार्गी लावाल. जुनी येणी वसुलीवर भर द्याल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. किरकोळ गोष्टीत मानापाणाची भावना दूर ठेवली, तर यशाचे प्रमाण वाढेल. घरात काही ठोस निर्णय घ्याल. तरुणांचे विवाह ठरतील. अनपेक्षित चांगली बातमी कळेल. मानसिक स्वास्थ्य मिळेल.

धनू : तुमच्या आशा-आकांक्षा वाढत जातील, त्यात योग्य व्यक्तींची साथही मिळेल. कामाचा झपाटा राहील. व्यवसायात पैशांचा अंदाज अचूक ठरेल. नवीन कामे स्वीकारण्यापूर्वी त्यातील कायदे व नियमांचा अभ्यास करणे गरजेचे होईल. प्रगतीचा आलेख उंचावेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून कामे कराल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामाची वाटणी कराल. वेळ व पैसे यांचे गणित बरोबर आखून बचत कराल. घरात मुलांची प्रगती व प्रकृतीबाबत लक्ष घालाल. विनाकारण होणाऱ्या खर्चावर बंधन ठेवून पैशांची बचत कराल.

मकर : थोडी सबुरी धरली, तर बरेच प्रश्‍न सोपे होतील. व्यवसायात योग्य वेळी निष्णात व्यक्तींचा सल्ला लाभदायी ठरेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. पैशांची चिंता मिटेल. मनोकामना पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. त्यांची तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. पण कंटाळून न जाता काम केले, तर यश हमखास मिळेल. घरात एकमेकांचे विचार समजून घेतले, तर सुसंवाद घडेल. गृहसौख्य उपभोगता येईल. प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद मिळेल.

कुंभ : परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या धोरणात बदल करावा लागेल. व्यवसायात पूर्वी झालेल्या चुका निस्तराव्या लागतील. त्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काही निर्णय घ्याल. कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कामे पूर्ण केलीत, तर ताण जाणवणार नाही. नोकरीत स्वयंभू व्हावे. सहकाऱ्यांवर अतिविश्‍वास ठेवू नये. फुशारकी पोटी नवीन जबाबदारी स्वीकारू नये. घरात वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. भावनोद्रेक टाळावा. मनन व चिंतन यात वेळ घालवावा.

मीन : आशा-निराशा असा अनुभव कामात येईल. पण तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने अडथळ्यांवर मात कराल. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील राहाल. चाकोरीबाहेरच्या मार्गाचा अवलंब आवश्‍यक असल्यास कराल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू राहतील. वरिष्ठ कामातील चुकांवर बोट ठेवतील. त्यामुळे कामात काय सुधारणा करता येईल याचा विचार कराल. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे केलीत, तर त्रास होणार नाही. वेळ मजेत जाईल.

संबंधित बातम्या