ग्रहमान : २२ ते २८ जून २०१९

अनिता केळकर
सोमवार, 24 जून 2019

ग्रहमान
 

मेष : तुमची मानसिक उमेद दांडगी असेल, त्यामुळे नवे उपक्रम हाती घ्याल. व्यवसायात आर्थिक चलनाचा वेग वाढेल. बॅंक-हितचिंतक यांची मदत मिळेल. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीत फायद्याचे काम मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. वेगळ्या कामानिमित्त सुविधा मिळतील. जोडव्यवसायातून विशेष आर्थिक प्राप्ती होईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. मात्र, भावनेच्या भरात जादा खर्च करू नये. तरुणांनी मनावर संयम ठेवावा.

वृषभ : घाईने कोणतेही निर्णय न घेता सद्यःस्थितीची माहिती घेऊन कृती करावी. व्यवसायात निष्णात व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. भविष्यात मोठ्या गुंतवणुकीचा लाभ होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमच्या गुणांचा फायदा वरिष्ठांना होईल. त्यामुळे केलेल्या कामाचे श्रेय मिळेल ही अपेक्षा ठेवू नये. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे पूर्ण करावीत. घरात दोन पिढ्यांतील अंतर जाणवेल, तरी शांत राहावे. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल.

मिथुन : कामाचा विस्तृत विचार मनात असेल, परंतु हातून कृती घडणार नाही. त्यामुळे तणाव वाढेल. व्यवसायात अतिविश्‍वास ठेवणे अंगाशी येईल. अंदाज चुकल्याने दगदग, धावपळ वाढेल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसेही हाती मिळण्यास विलंब होईल. त्यामुळे चणचण भासेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांवर जास्त भिस्त ठेवू नये. आपले काम चोख करावे. एखादी चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

कर्क : कामाच्या प्रमाणात यश मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. परंतु, कामाबाबत थोडी संभ्रमावस्था राहील, तरी थोडी सबुरी ठेवावी. जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित करावे. नोकरीत कामाचा झपाटा राहील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. हलक्‍या कानाने वादविवाद होतील, तरी शहानिशा करावी. घरात वातावरण तंग राहील. पैशांची चिंता कामांना विलंब करेल. मुलांच्या प्रगतीबाबत महत्त्वाची बातमी कळेल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल.

सिंह : मनोधैर्य उंचावणारे ग्रहमान आहे. त्यामुळे तुमची जिद्द व महत्त्वाकांक्षा वाढत राहील. व्यवसायात नवीन अनुभव घ्याल. डोके शांत ठेवून विचारपूर्वक घेतलेला निर्णय उपयोगी पडेल. स्वतः सिद्ध राहून कामे पूर्ण कराल. नोकरीत बुद्धी व कृती यांची योग्य सांगड घालून कामे पूर्ण कराल. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी दुर्लक्ष कराल. हितशत्रूपासून सावध राहावे. घरात कर्तव्य चोख पार पाडाल. आनंदाचे क्षण अनुभवता येतील. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.

कन्या : कामाबाबत तुम्ही दक्ष असता, नीटनेटके, व्यवस्थित, वेळेत केलेले काम तुम्हाला आवडते. पण व्यवसायात याच्या उलट अनुभव येईल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. भोवतालच्या व्यक्तींच्या बेशिस्त वर्तनाची चीड येईल. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामापुरती तुमची खुशामत करतील. तुमच्या भिडस्त स्वभावाचा गैरफायदा घेणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नवीन संधी हुलकावणी देईल. घरात गृहसजावटीसाठी खर्च होईल.

तूळ : वारा वाहील तसे न वाहता कामाचे योग्य नियोजन करून कृती करावी. माणसांची पारख करून त्याप्रमाणे व्यक्तींना महत्त्व द्यावे. व्यवसायात कर्तव्यपूर्तीसाठी जादा मेहनत घ्याल. पैशांची चिंता मिटेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत अंतर्मनाचा निर्णय ग्राह्य धरून वागावे. चांगले हितसंबंध काही कारणाने बिघडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात एखादा चांगला कार्यक्रम ठरेल. इतर व्यक्ती तुमची खुशामत करतील. तरुणांनी मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नये.

वृश्‍चिक : महत्त्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. त्यामुळे नवी आव्हाने स्वीकारून प्रगती कराल. व्यवसायात बदलत्या परिस्थितीनुरूप ध्येय धोरणे बदलावी लागतील. कामाचे योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. खेळत्या भांडवलाची गरज अनपेक्षित मार्गाने भागेल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. कामातील बेत गुप्त ठेवावेत. सहकाऱ्यांच्या असूयेचा अनुभव येईल, तरी शांत राहावे. घरात वातावरण आनंदी राहील. तुमचे महत्त्व वाढेल. कुटुंबासमवेत छोटीशी सहल काढाल.

धनू : महत्त्वाच्या संधी नजरेच्या टप्प्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा. कार्य तत्पर राहून कामात जिद्दीने प्रगती करावी. व्यवसायात नवीन विचारांचा प्रभाव राहील. नवीन कार्यपद्धतीची आर्थिक उलाढाल वाढवल्यास मदत होईल. स्वतःची कुवत व मर्यादा ओळखून कामे केलीत, तर कामाचा त्रास व तणाव जाणवणार नाही. नोकरीत आत्मविश्‍वास बळावेल. सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. तुमच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ होईल. घरातील गढूळ वातावरण निवळेल. नातेवाईक व पाहुण्यांची ये-जा राहील.

मकर : कुठलीही कृती ही भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊन केली, तर त्याचा लाभ होईल. व्यवसायात सावध दृष्टिकोन ठेवून कृती करावी. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्याचा आराखडा तयार करून आर्थिक गोष्टींचा विचार करून पुढे जावे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. कामाचा पाठपुरावा करावा. गृहीत न धरता चोखंदळ राहावे. घरात वाद व गैरसमज टाळावे. न बोलून कृती करावी. नातेवाइकांच्या भेटीचे योग येतील.

कुंभ : तुमचा व्यापक दृष्टिकोन राहील, परंतु भोवतालच्या व्यक्तींची मदत मिळेल ही अपेक्षा ठेवू नये. गोंधळाची अवस्था वाटल्यास निर्णय घेण्याची घाई करू नये. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन कृती करावी. आळस झटकून कामाला लागावे. वेळेत काम पूर्ण करण्याचा चंग बांधाल. नोकरीत वरिष्ठांची मदत व सल्ला आवश्‍यक तेथे घ्यावा. हटवादीपणा बाजूला ठेवून कार्यभाग साधावा. लवचिक धोरण फायदा मिळवून देईल. अचानक धनलाभ होईल. घरात योग्य मार्गदर्शन मिळेल.

मीन : एकाचवेळी बऱ्याच गोष्टी साध्य करण्याचा मानस राहील. परंतु, वेळेचे बंधन पाळले तरच हे शक्‍य होईल. व्यवसायात विसंबून न राहता कामे हातावेगळी करावीत. एखाद्या प्रश्‍नांबाबत गोंधळाची स्थिती असेल, तर निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. मनाला योग्य वाटेल, तोच निर्णय घ्यावा. खर्चावर बंधन ठेवलेत, तर घरात शांतता राहील. मनाविरुद्ध वागावे लागेल, तरी चिडू नये. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या व्यक्तींकडून येणारे अनुभव जीवनात बरेच काही शिकवून जातील.

संबंधित बातम्या