ग्रहमान : २९ जून ते ५ जुलै २०१९

अनिता केळकर
सोमवार, 1 जुलै 2019

ग्रहमान
 

मेष : बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊन काम करावे. मनातील सुप्त भावना जागृत करणारे ग्रहमान आहे, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून विक्री व उलाढाल वाढवावी. पैशांची तजवीज होईल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. नोकरीत स्पर्धेत टिकून राहिल्याने यश मिळेल. कामात योग्य व्यक्तींची साथ मिळेल. जादा कामातून वरकमाई होईल. घरकामात महिलांचा बराच वेळ जाईल. नवीन बातमी मन सुखावेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचा योग आहे.

वृषभ : घर आणि नोकरी दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल, त्यामुळे संवेदनशील व्हाल. व्यवसायात कामाचा वेग वाढवावा. योग्य निर्णय घेऊन कामांना गती द्यावी. पैशांची चिंता नसेल. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावी. कामाचा झपाटा राहील. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. घरात अतिविचार करू नये. महिलांनी आवडते छंद जोपासावेत. तुमच्या शब्दाला मान मिळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.

मिथुन : परिस्थितीनुरूप भोवतालच्या वातावरणाशी मिळते-जुळते घ्यावे, त्याचा फायदा होईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामातून लाभ होईल. नवीन कामे मिळतील. कामात शिथिलता येणार नाही, याची काळजी घ्यावी. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. त्यांच्या सल्ल्याचा मान राखावा. घरात महिलांनी सलोख्याचे संबंध ठेवावेत. घरातील इतर व्यक्तींकडून खुबीने कामे करून घेण्यासाठी खुशामत करावी लागेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.

कर्क : ‘दिसते तसे नसते’ हे लक्षात ठेवावे. अतिविश्‍वास टाळावा. व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नयेत. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल, तरी आपणहून नवीन कामाची जबाबदारी स्वीकारू नये. दगदग, धावपळ कमी करून विश्रांती घ्यावी. घरात वादविवादावर पडदा पडेल. अपेक्षित कामे पूर्ण होतील. विरंगुळा लाभेल. चांगली बातमी मन प्रसन्न करेल. नवीन व्यक्तींचा सहवास मिळेल.

सिंह : आत्मविश्‍वासाने केलेले कार्य नेहमीच श्रेय देणारे असते; असा अनुभव येईल. अडीअडचणींवर मात करून नवीन कामे मिळवाल. व्यवसायात जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करून पैशांची उभारणी करावी. कार्यपद्धतीत बदल करून फायदा वाढवावा. नोकरीत प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. कामानिमित्त जादा अधिकार व सवलतीही देतील. प्रवास होईल. महिलांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष पुरवावे लागेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.

कन्या : कष्ट व प्रयत्न यांना यश मिळेल. व्यवसायात बराच काळ वाट पाहात होता, ती संधी मिळेल. पैशांची तात्पुरती सोयही होईल. नवीन कामामुळे हुरूप वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामाची योग्य आखणी कामे वेळेत संपवायला मदत करेल. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे उरकावीत. अपेक्षा न ठेवता कामे मार्गी लावावीत. वादाचे प्रसंग टाळावेत. हलक्‍या कानाचा वापर करू नये. विवाहोत्सुक तरुणांना विवाहाचे योग येतील.

तूळ : व्यवसायात व्यवहाराचे भान ठेवून कृती करावी. पैशाचा वायफळ खर्च टाळावा. कामांना प्राधान्य देऊन मार्गी लावावे. नवीन योजना हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावा. नोकरीत हट्टी स्वभाव अंगाशी येईल. रागावर नियंत्रण ठेवावे. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. कामाचा दर्जा राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. घरात महिलांनी त्यांच्या बोलण्यामुळे इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. आराम व विश्रांती घेऊन कामे उरकावीत.

वृश्‍चिक : मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. व्यवसायात ताण कमी करणारे ग्रहमान लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाण्या कामातून सुटका होईल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. जादा कामातून लाभ होईल. घरात तुमची मते इतरांवर लादू नयेत. तुमच्या मनाप्रमाणे कामे पूर्ण होण्यासाठी इतरांनाही कामात प्रोत्साहन द्यावे. महिलांना कामाची योग्य दिशा सापडेल.

धनू : ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी स्थिती होईल. कामाचे योग्य नियोजन व प्रयत्न यांची सांगड घालून कामांना गती द्यावी. खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल. बॅंका व हितचिंतकांची मदत मिळेल. नवीन योजना, प्रकल्प हाती घ्याल. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवून कामे करावीत. विचारल्याखेरीज सल्ले देऊ नयेत. दिलेला शब्द पाळावा. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून फारशी अपेक्षा ठेवू नये. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. तरुणांनी अतिसाहस करू नये.

मकर : ध्येय-धोरणे आखून कामे करावीत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. इतर कामे व्यवसायात सहकाऱ्यांवर सोपवावी. भविष्याची तरतूद करण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. ओळखीचा उपयोग लाभ घडवून आणेल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. विचार व कृती यांची सांगड घालून कामे करावीत. वरिष्ठांकडे तुमची मते त्यांचा मूड बघून मांडावीत. लाभ होईल. एखादी चांगली बातमी कळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

कुंभ : अस्थिरता कमी होईल, त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशांची चणचण कमी होईल. जुनी येणी येतील. अचानक धनलाभ व्हावा. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत नवीन कामात सतर्क राहावे. कामात झालेला विलंब महागात पडेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावे. घरात महिलांनी तारतम्य बाळगून वागावे. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, तरी वाच्यता करू नये. तरुणांनी घाईने निर्णय घेऊ नयेत.

मीन : अतिआत्मविश्‍वास बाळगून धोके पत्करू नयेत. स्वतःचा आडमुठा स्वभाव तापदायक ठरण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पैशांची तजवीज होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे. मनाविरुद्ध वागावे लागेल, तरी मत प्रदर्शन करू नये. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात महिलांना हौसमौज करता येईल. मनाप्रमाणे खर्च केल्याने आनंद मिळेल. एखादे शुभकार्य ठरेल.

संबंधित बातम्या