ग्रहमान : ६ ते १२ जुलै २०१९

अनिता केळकर
सोमवार, 8 जुलै 2019

ग्रहमान

मेष : महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत, त्यामुळे व्यवसायात मोठे उद्दिष्ट गाठण्याचा मानस राहील. परंतु, स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याशिवाय वाच्यता करू नये. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य राहील. पैशांची तजवीज होईल. अपेक्षित पत्रव्यवहारही होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी. आज्ञेचे पालन तंतोतंत करावे. नवीन ओळखीतून लाभ होईल. घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्‍वास बाळगू नये.

वृषभ : तुमचा सकारात्मक दृष्टिकोन व आशावादी वृत्ती तुम्हाला बुलंद ठेवेल. व्यवसायात केलेल्या कामाचे पैसे हाती पडण्यास थोडा विलंब होईल, तरी ते मिळवण्यासाठी पाठपुरावा कराल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवाल. कामात गुप्तता राखाल. नोकरीत मनोधैर्य चांगले ठेवलेत, तर अडथळ्यांवर मात करू शकाल. जोडव्यवसायातून जादा कमाई करता येईल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होईल. खर्च वाढल्यामुळे नियोजन करावे लागेल. प्रकृतीचीही कुरबूर सुरू राहील, लक्ष द्यावे.

मिथुन : ग्रहमान प्रगतिपथावर नेणारे आहे, त्यामुळे मनोकामना वाढतील. व्यवसायात विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधून कामाचे नियोजन करावे. घाईने कोणतेही निर्णय नकोत. पैशाचाही अपव्यय टाळावा. नोकरीत आलेली संधी दवडू नये. सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल. ठरवलेली उद्दिष्टे पार पाडू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. मात्र, हेकेखोरपणा वाढवू नये. अनपेक्षित खर्चाला तोंड द्यावे लागेल, तरी पैशांची सोय करून ठेवावी. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.

कर्क : नवीन आशेचा किरण तुमचे मानसिक स्वास्थ्य वाढवेल. निश्‍चयाच्या जोरावर अवघड कामात यश मिळवाल. व्यवसायात हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. जुनी येणी वसूल झाल्याने चार पैसे हातात खेळतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील, त्यामुळे आनंद मिळेल. निराशा झटकून पुढे जाण्याचा मनोदय सफल होईल. घरात वादाचे प्रसंग मात्र टाळावेत. परिस्थितीनुरूप लवचिक धोरण स्वीकारून मार्गक्रमण करावे. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळण्यास योग्य काळ आहे.

सिंह : तुमची सत्त्वपरीक्षा बघणारे ग्रहमान आहे, तरी जपून पुढे जावे. व्यवसायात सावध दृष्टिकोन ठेवावा. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्यावे. भावनेच्या भरात गुंतवणूक करू नये. बोलताना गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत माणसांची पारख महत्त्वाची ठरेल. कामातील बेत गुप्त ठेवावेत. अनावश्‍यक खर्चांना फाटा द्यावा. धोरणात्मक निर्णय घ्यावा. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत चिंता राहील. बारीक लक्ष द्यावे लागेल. भोवतालच्या व्यक्तींकडून विचित्र अनुभव येतील.

कन्या : जिद्द व महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवण्याचे तुमचे उद्दिष्ट राहील, यासाठी योग्य नियोजनही कराल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी होईल. कामांना गती देण्यासाठी आधुनिक कार्यप्रणालीचा अवलंब कराल. नवीन जागा व वास्तू खरेदीचे बेत सफल होतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात सौख्यदायी वातावरण असेल. मनीषा सफल झाल्याने मानसिक समाधान लाभेल.

तूळ : उत्तमप्रकारे काम करून सर्वांना आकर्षित करण्याचे तुमचे स्वप्न सफल होईल. व्यवसायात कामात मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेताना त्यातील उणिवांचाही विचार करणे भाग पडेल. अंथरूण पाहून पाय पसरलेत, तर धोके कमी होतील. खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत विचारल्याखेरीज सल्ले देऊ नये. वादाच्या प्रसंगातून दूर राहावे. डोके शांत ठेवावे. नवीन हितसंबंध जोडताना सावधगिरी बाळगावी. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील.

वृश्‍चिक : राशीतील धनस्थानातील शनी तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढवेल. प्रगतीला पूरक ग्रहमान राहील. व्यवसायात पैशांची आवक-जावक समान राहील, तेव्हा कामाची आखणी करून त्याप्रमाणे कामे उरकावीत. नवीन कामे ओळखीतून मिळतील. यशाचे गमक ओळखून कृतीवर भर द्याल. नोकरीत कितीही कामे केलीत, तरी अपुरेच वाटेल. वरिष्ठांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. घरात पूर्वी ठरलेले समारंभ पार पडतील. नवीन खरेदीचे योग येतील. कुटुंबासमवेत छोटी सहल काढाल.

धनू : तुमच्या उत्साही व आनंदी स्वभावाला पूरक वातावरण लाभल्याने मोठ्या उमेदीने तुम्ही कामाला लागाल. व्यवसायात नवीन कामे जोर धरतील. नवीन हितसंबंधांमुळे जुने हितसंबंध दुरावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ‘नाही’ हा शब्द तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे करून बघण्याकडे तुमचा कल राहील. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. वरिष्ठांची मर्जीही राहील. जोडव्यवसायातून कमाई होईल. सामूहिक क्षेत्रात मानसन्मान मिळतील.

मकर : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ही म्हण सार्थ ठरवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येय गाठण्याचा विचार राहील. सरळ सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ गेल्याने इतर कामांना विलंब होईल. पैशांची चिंता नसेल, त्यामुळे मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नोकरीत नको ते काम अंगावर पडेल, त्यामुळे तुमची थोडी चिडचिडही होईल. परंतु, गोड बोलून सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घेतलीत, तर तुमचाच भार हलका होईल. कामानिमित्त प्रवासयोग येईल.

कुंभ : आशावादी राहून कामे कराल, त्यामुळे कामाचा फडशा पाडाल. व्यवसायात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न राहील. कामातील सातत्य नवी दिशा दाखवेल. पैशांच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण कराल. नोकरीत ‘एकला चलो रे’ हे लक्षात ठेवावे. नोकरी किंवा व्यावसायात कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. घरात कामात इतरांची साथ मिळेल. तरुणांना बराच उत्साह राहील. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. अपेक्षित यशप्राप्ती होईल.

मीन : मनोधैर्य उत्तम असल्याने, शंकांचे निरसन करून कामात प्रगती कराल. व्यवसायात ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा राहील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. बोलताना सावध दृष्टिकोन ठेवावा. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून कामे करावीत. ‘आपले काम बरे नि आपण बरे’ हे धोरण जास्त चांगले राहील. घरात सर्वांना सांभाळून निर्णय घ्यावे लागतील. सबुरीचे धोरण लाभदायी ठरेल. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करावीत. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.

संबंधित बातम्या